Friday, June 28, 2019

सारं कसं शांत शांत



अमेरिकेत कोठेही जा गडबड नाही, गोंधळ नाही सारे कसे शिस्तीत चाललेले असते. भारतातून सुट्टीसाठी आपल्या मुलांकडे गेलेल्या मंडळींना हे थोडेसे अवघड जाते. पण मुलांनी दबक्या आवाजात हळू बोलायचा इशारा दिला की त्यांना आपली चूक कळते. मग हळूहळू त्यांच्या ते अंगवळणी पडते.लहान मुलांचे तसे नसते. कोणालाही न जुमानता त्यांचे रडणे, ओरडणे चालू असते. तोंडावर बोट ठेवून शांत बसण्यास खुणावले तरी ती ऐकत नाहीत. काही प्रतिष्ठित हॉटेलमध्ये मुलांना याच कारणसाठी आणायची बंदी असते. अर्थात आईवडिलांच्या दडपणाखाली अशी मुलेही चुपचाप बसायला शिकतात. पु. ल देशपांडे यांनी लंडनच्या प्रवासातली अशीच एक आठवण सांगितली होती. सहप्रवासी गप्प बसले असल्याचे पाहून राजघराण्यात तर काही बरेवाईट तर झाले नाही ना अशी शंका त्यांना येते ते आपल्या पत्नीला हळूच  बोलून दाखवितात. केवढा मोठा आवाज झाला या भावनेने इतर प्रवासी त्यांचेकडे बघतात.

ऑफिसमध्ये, मॉलमध्ये, हॉस्पिटलमध्ये एवढेच नव्हे तर बागेतही  अशीच शांतता भरून असते.

आपल्याकडे गाडीला हॉर्न ही आवश्यक गोष्ट असते व हॉर्न वाजविला नाही हा गुन्हा ठरू शकतो. तिकडे हॉर्न अगदी क्वचित प्रसंगी वापरला जातो. हॉर्न वाजविणे हे तेथे  असभ्यपणाचे मानले जाते.

कारखान्यामध्येही सर्व यंत्रे विनाकुरकुरत शांतपणे आपले काम करीत असतात. आवाज कमीतकमी होईल अशी त्यांची रचना व देखभालही काटेकोरपणे केली जाते. तेथील कर्मचारीही तोंडातून शब्द न काढता यांत्रिकपणे आपले काम चोख करीत असतात.

माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर विज्ञान तंत्रज्ञानात मोठी क्रांती केली. आपली सर्व कामे विनासायास व अधिक क्षमतेने करण्यासाठी यंत्रांची निर्मिती केली. माशाप्रमाणे पाण्यातून, पक्ष्याप्रमाणे आकाशातून आणि जमिनीवरूनही हरणापेक्षा जलद गतीने धावणारी वाहने त्याने बनवली. वाढत्या लोकसंख्येच्या व शहरीकरणाच्या समस्यांवर तोड काढण्यासाठी शेती, उद्योग व व्यापार तसेच रस्ते, इमारती, कारखाने व इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यातही तो यशस्वी झाला.

कौटुंबिक सहजीवनापासून मोठ्या समाजव्यवस्थेतील सहजीवन सुरळीत चालावे यासाठी स्थानिक ते जागतिक पातळीवर शासनव्यवस्था, कायदे आणि लोकसहभाग या क्षेत्रातही त्याने लक्षणीय प्रगती केली. माणसानेच निर्माण केलेल्या अति बलाढ्य आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक आणि व्यापारी संस्थांनी अतिशय कार्यक्षम व कार्यकुशल व्यवस्थापनासाठी कर्मचा-यांसाठी वागणुकीचे कठोर नियम केले असून त्यात माणसाला यंत्रासारखे वागण्याचे शिक्षण दिले जात आहे.

त्याहीपुढे जाऊन यंत्रमानवाची निर्मिती करून या संस्थांनी कर्मचा-यांपुढे यंत्रमानवाशी स्पर्धा करण्याचे आव्हान उभे केले आहे. मात्र कर्मचारीही शेवटी माणसेच असल्याने ती या स्पर्धेतही य़शस्वी होत असल्याचे अमेरिकेसारख्या प्रगत देशात प्रत्ययास येत आहे. आपल्या भारतातही सोठ्या शहरातील आंतरराष्ट्रीय कंपन्यात काम करणा-या लोकांनी अशी कार्यकुशलता व कार्यपद्धत आत्मसात केली आहे. सर्वत्र शांततेत य़ांत्रिक पद्धतीने काम सुरू झाले आहे. 

अशा शांततेत जीवन व्यतीत करणा-या लोकांची ऐकण्याची क्षमता जास्त आवाजापेक्षा कमी आवाजामुळे कमी होत जाईल की काय असे वाटणे स्वाभाविक आहे. पण ती काळजी करण्याची गरज नाही. जवळजवळ प्रत्येकजण कानाला वायर लावून मोबाईलवर गाणे वा पॉडकास्ट ऐकण्यात मग्न असतो. शिवाय टेलिव्हिजनवर व सिनेमागृहात स्टार वार्स सारखे चित्रपट वा व्हिडीओ किंवा कन्सर्ट आवाजांच्या वैविध्यावर व चढउतारावर लोकांची ऐकण्याची भूक भागवीत असतात.

मला भीती वाटते ती शांततेची नाही तर एकटेपणाची. माणूस हळुहळू स्वमग्नतेकडे वाटचाल करू लागला आहे. आणि हे कौटुंबिक व समाजव्यवस्थेला छेद देणारे आहे..

माणसाची यंत्रमानवाकडून मानवयंत्रे तयार करण्याकडे प्रगती चालू आहे ती मात्र भयावह आहे. कर्मचा-यांच्या ओळखीसाठी व उपस्थिती नोंदण्यासाठी कॅमेरा व थंब इंप्रेशन पद्धत सुरू झाली. आता जर्मनीत एका कंपनीने आपल्या कर्मचा-यांच्या हातात एक मायक्रोचिप बसविली आहे. त्यामुळे कर्मचा-यांची ओळखच काय पण इतर सर्व कामे स्वयंचलित होऊ लागली आहेत. शिवाय कर्मचा-यांवर २४ तास गुप्त नजर ठेवणेही कंपनीसा शक्य झाले आहे. मला आश्चर्य य़ाचे वाटले की कर्मचा-यांनी याला विरोध न करता त्याचे स्वागत केले.

आपण आत्ताच बरेचसे  यंत्रांवर अवलंबून आहोत. यंत्रमानवाच्या देखरेखीखाली मानवयंत्रे काम करू लागतील  बाह्य जीवनातही ही मानवयंत्रे आपले माणूसपण विसरतील. नातीगोती, देव, धर्म, रूढी, चालीरिती  लयाला जातील,

संवेदना, प्रेम, भावना यांची भूक भागविण्यासाठी हॅरी पॉटरसारख्या जादूवर आधारलेल्या वा परिकथेतील काल्पनिक कथा, संघर्ष प्रसार माध्यमांतून दाखविले जातील. प्रत्यक्ष अनुभवासाठी वा डिस्नेलॅंडसारखे प्रकल्प उभारले जातील.सारे जगच अमेरिकेप्रमाणे अतिप्रगत, सुखावह पण आत्मकेंद्रीत बनेल.   – डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली



नवनिर्मिती प्रकल्पासाठी शनिवार, रविवार उपयुक्त


शनिवार व रविवार यादिवशी शैक्षणिक संस्थांनी एक प्रयोगशाळा आणि एक वर्गखोली उपलब्ध करून दिली तर नव्या शिक्षणपद्धतीतील कोणत्याही उपक्रमात बदल न करता नवनिर्मिती प्रकल्प सुरू करणे शक्य आहे.

मी कॉलेजवर प्राध्यापक म्हणून काम करीत असताना आम्हाला शिकविण्याच्या पद्धतीत खूप स्वातंत्र्य होते. तरीही शनिवार, रविवार आमच्या दृष्टीने पूर्ण कॉलेजबाह्य कामाचे असत. चर्चासत्र, शैक्षणिक सहल,कन्सल्टेशनसाठी बाहेरगावी प्रवास ही कामे विद्यार्थी आणि शिक्षक यांचे संयुक्त गट शनिवार, रविवारी करत असत. माझे मराठी विज्ञान प्रबोधिनीचे कार्यक्रम, विद्यार्थी संघटना तसेच रोटरॅक्ट, नाट्य, संभाषण वर्ग, इतर सामाजिक उपक्रमातील सहभाग यामुळे शनिवार रविवारची सुट्टी आम्हाला एक नियमित पर्वणी होती.

आजही अनेक प्राध्यापक सुटीच्या काळात अशा कामात व्यग्र असतात. आमच्या कॉलेजमधील प्रा, सुनील कुलकर्णी तर सहा जिल्ह्यातील संघशाखांना भेटी देण्यासाठी गेली कित्येक वर्षे प्रत्येक शनिवार रविवारचा उपयोग करीत आहेत. सांगलीतील पक्षीमित्र श्री. शरद आपटे गेली वीस वर्षे सातत्याने शनिवार रविवारी पक्षी निरिक्षणासाठी विविध ठिकाणी जात आहेत. अशी अनेक उदाहरणे गावागावात आढळून येतात. कोणावरही सक्ती न करता स्वेच्छेने असे काम करण्यास तयार असणा-यांना एकत्र आणले तर नवनिर्मिती प्रकल्प सहज सुरू करता येईल.

नवनिर्मिती प्रकल्पात मी आतापर्यंत केवळ निवृत्त शिक्षक आणि माजी विद्यार्थी यानाच गृहीत धरले होते. मात्र सध्या शिकत असलेले विद्यार्थी आणि या प्रकल्पात काम करू इच्छिणारे शिक्षक, प्राध्यापक वा अन्य नागरीक यांचाही समावेश करणे आवश्यक आहे.

समान पातळीवर एकत्र चर्चा करणे, उद्योगांना व प्रकल्पांना भेटी देणे, संशोधन करणे वा एखादे उपकरण बनवणे अशी कामे या अवधीत करता येतील. शैक्षणिक संस्थांनी यासाठी जागा व इतर आवस्यक सोयी उपसब्ध करून दिल्या तर ज्ञानदीप फौंडेशन असे नवनिर्मिती प्रेरणा कार्यक्रम सुरू करेल. मग केवळ वालचंद कॉलेजच नव्हे तर इतर शैक्षणिक संस्थातही असे कार्य सुरू करता येईल.

 या सर्व गटांच्या कार्याची माहिती, सभासद नोंदणी व कार्यक्रम आखणी ही कामे ज्ञानदीपतर्फे केली जातील. एक परस्पर सहयोग करार करून असा प्रकल्प सुरू करता य़ेईल. – डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

Thursday, June 27, 2019

नव्या शिक्षणपद्धतीत पूर्वीच्या स्वयंप्रेरणेचा समावेश -

ऐतिहासिक काळापासून जुन्या व नव्या पिढीतील संघर्ष हाच ज्ञान व सत्ता संक्रमणास कारणीभूत झाला आहे. असा संघर्ष होणे नैसर्गिक वा स्वाभाविक असून त्यात वावगे काही नाही. नवे ज्ञान, नव्या संकल्पना प्रगतीसाठी अत्यावश्यक आहेत. मात्र जुन्या चालिरिती वा जीवनपद्धती सरसकट त्याज्य समजणेदेखील चुकीचे आहे. होते काय की जुनी पिढी आपले विचार सोडायला वा नवीन कल्पनांचा स्वीकार करण्यास तयार होत नाही. नव्या पिढीला जुन्या पद्दती कालबाह्य वाटतात व सत्तेच्या वा सामर्थ्याच्या जोरावर जुन्या पद्धतींचा नाश करण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते. मात्र नव्या पिढीस अनुभव कमी असल्याने वाईटाबरोबर चांगल्याचाही नाश त्यांच्याकडून होऊ शकतो.
वालचंद कॉलेजमध्ये प्राध्यापकांमध्ये असणारे सलोख्याचे व सहकार्याचे वातावरण स्वायत्ततेच्या नव्या बदलांमुळे विस्कटले गेले. विद्यार्थ्यांशी शिक्षकांबरोबर असणारे जिव्हाळ्याचे संबंध संपून अधिकार व कर्तव्ये यांच्या काटेकोर नियमांमुळे नवी बंधने आली. उपस्थिती, परीक्षा व शिकविण्याच्या पद्धतीत साचेपणा आला. 
पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीत असणारा मोकळेपणा व स्वातंत्र्य नसल्याने खेळ, स्पर्धा, सामाजिक सेवा, कन्सल्टेशन, शैक्षणिक सहली व संमेलने यापेक्षा पूर्वनियोजित व निर्धारित वेळापत्रकानुसार अभ्यासक्रम पुरा करणे याला शिक्षक व विद्यार्थी महत्व देऊ लागले. साहजिकच भोवतालचा समाज, उद्योग व इतर संस्था यांच्या अडचणी व गरजा  पूर्ण करण्याची क्षमता व इच्छा कमी होऊन कॉलेजची पूर्वीची संवेदनशीलता व प्रतिष्ठा जाऊन त्याजागी आत्मकेंद्रित व स्वयंभू उच्च शिक्षणसंस्थेचा दर्जा कॉलेजला प्राप्त झाला. शिक्षकही विद्यार्थ्यांबरोबर वेळ न घालवता आपली गुणवत्ता वाढीकडे जास्त लक्ष देऊ लागले.
कॉलेजच्या नावलौकिकामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणे सोपे झाले तरी नवनिर्मितीची वा स्वयंउद्योगाची प्रेरणा व सामाजिक बांधिलकीची जाणीव कमी झाली.
जुन्या निवृत्त प्राध्यापकांना याची खंत वाटू लागली व त्यातूनच
नवनिर्मिती व स्वयंउद्योग यांची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रयत्न करण्याचे  त्यांनी ठरविले.
ज्ञानदीप फौंडेशनने याबाबतीत पुढाकार घेऊन माजी उद्योगप्रिय प्राध्यापक आणि व्यवसायात यशस्वी झालेले माजी विद्यार्थी यांच्याशी चर्चा करून एक कृतिगट स्थापन केला आहे. सध्याच्या  नव्या शिक्षणपद्धतीत ही नवी संकल्पना कशाप्रकारे   संलग्न करता येईल याविषयी विचारविनिमय चालू आहे. संस्थात्मक स्वरूप देऊन हे कार्य अबाधित चालावे व इतर शिक्षणसंस्थांनाही त्याचा लाभ घेता यावा. यासाठी ही योजना आहे.  आपणही याबाबत आपले विचार मांडावेत ही विनंती. - डॉ. सु. वि. रानडे,

कॉलेज प्रशासनातील माझे योगदान


१९७६ मध्ये पीएचडी करून मी परत कॉलेजमध्ये रुजू झाल्यानंतर १९९६ पर्यंत माझे कार्यक्षेत्र मुख्यत्वे एन्व्हायर्नमेंट इंजि. (पर्यावरण अभियांत्रिकी) मध्ये संशोधन व कन्सल्टेशनपुरते मर्यादित होते. पीएचडी असूनही मी केवळ लेक्चरर या पदावरच होतो. १९८५ पासूनच कॉलेजमधील अनेक प्राध्यापक नव्या खाजगी कॉलेजमध्ये प्राचार्य वा अन्य मोठ्या पदांवर बदलून गेले. परंतु आपले कॉलेज सोडण्याचा माझ्या मनात कधीच विचार आला नाही. याची कारणे अनेक होती. मला आपल्या कॉलेजबद्दल वाटणारा जिव्हाळा व अभिमान याबरोबरच प्रशासनापेक्षा शिक्षण आणि संशोधनात मला अधिक रुची होती. प्रशासक होण्यासाठी लागणारे कठोर शिस्त व नियंत्रणाचे गुण माझ्याकडे नाहीत हेही मला ठाऊक होते. शिवाय आपल्या कॉलेजमध्ये राहून मला कॉम्पुटर तसेच मराठी विज्ञान क्षेत्रात काम करण्याची संधी व मोकळीक इतरत्र मिळणार नाही याची खात्री होती.

१९९६ मध्ये डॉ. सुब्बाराव उपप्राचार्य व नंतर पुढच्या वर्षी  प्राचार्य झाले आणि त्यांच्यामुळे माझ्यावर प्रशासनाची कामे करण्याची वेळ आली. एन्व्हायर्नमेंट इंजि. डिपार्टमेंटचे काम माझ्या अंगावर पडले.

कॉलेजला आंतरराष्ट्रीय दर्जावर नेण्यासाठी प्रशासनात आमुलाग्र बदल करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. अनेक नव्या कल्पना अंमलात आणण्यायाठी प्रशासनाने एचसीसीतील उच्च अधिका-यांची पूर्ण वेळ नेमणूक केली होती. त्यांचे मार्गदर्शनाखाली कॉलेजला स्वायत्तता मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले. इंटरनेटवरून जागतिक विद्यापीठांची महती वाचली असल्याने या त्यांच्या प्रयत्नात मीही उत्साहाने सामील झालो. कॉलेजमधील एक समाजवादी विचारसरणीचा गट स्वायत्ततेला विरोध करीत होता. त्यांच्या स्थितीवादी विचारांना व  विरोधाला न जुमानता आम्ही स्वायत्ततेसाठी विद्यापिठाकडे अर्ज केला.

आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी काही जुन्या गोष्टींचा त्याग करण्याची व प्रशासनात शिस्त आणण्याची गरज होती. आधुनिकतेचा स्वीकार करण्यास लागणारी लवचिकता व नव्या गोष्टी शिकण्याची तयारी नसल्याने जुने शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी धास्तावले होते. त्यातच प्रशासनाने कॉलेजची पुढील वाटचाल तंत्रलिकेतन वा खालच्या दिशेने न करता पदव्युत्तर किंवा वरच्या दिशेने करण्याचे जाहीर केल्याने एमटीई सोसायटी व प्रशासनात धोरणात्मक वाद सुरू झाला.

मला दोघांचे म्हणणे पटत होते. स्थानिक लोकांच्या गरजा भागविण्यासाठी कॉलेजने एक एक पायरी खाली उतरून शिक्षण द्यावे असे सोसायटीला वाटे. तर आंतरराष्ट्रीय दर्जासाठी उच्च संशोधनावर आपले सर्व लक्ष केंद्रीत करावे असे प्रशासनाचे मत होते. त्यासाठी त्यांनी कॉलेजच्या भावी विस्ताराचा एक मास्टर प्लॅन आंतरराष्ट्रीब कंपनीकडून तयार करून घेतला. 

आमच्या सिव्हिल विभागातील व देशातील अग्रगण्य कंपनीकडे कॉलेजचे व्यवस्थापन आहे याचा मला अभिमान होता व आजही आहे. १९७३ मध्ये हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी पुण्यास पर्वतीच्या पायथ्याशी बांधत असलेल्या फिल्ट्रेशन प्लँटच्या कामावर मी तीन महिने प्रशिक्षण घेतले होते त्यामुळे त्यांची कामाची पद्धत मला चांगली माहीत होती.

डॉ. सुब्बाराव निवृत्त झाल्यावर माझ्याकडे आधी एन्व्हायर्नमेंट व नंतर सिव्हील डिपार्टमेंटच्या विभाग प्रमुखाची जबाबदारी आली. ती सांभाळताना खरे तर माझी त्रेधा तिरपीटच झाली. कॉलेजपातळीवर घेतलेले निर्णय आपल्या विभागातील शिक्षकशिक्षकेतर कर्मचा-यांकडून अंमलात आणणे मला फारच अवघड जाई. कारण मी सर्वांच्या मताला मान देई. आपले मत मी लादू शकत नव्हतो. मला प्राचार्यांकडून कारणे दाखवा नोटीसही मिळाली होती.

एन,बी.ए. च्या वेळी मात्र सिव्हील विभागातील सर्वांनी मला चांगली साथ दिली व विभागाला पाच वर्षांचे ए नामांकन मिळाले. सध्याचे उपसंचालक डॉ. सोनावणे यांनी याबाबतीत स्पृहणीय काम केले व विभागाचे रंगरूप पालटले. प्रशासनाने माझ्यावर डिझॅस्टर मॅनेजमेंट प्लॅनसाठी विद्यार्थी गट करण्याचे काम दिले. आम्ही भारतातील सर्व राज्यातील बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांकडे असणा-या साधनसामुग्रीचा डाटाबेस तयार केला. परिक्षा सुरू झाल्याने विद्यार्थी मात्र प्रकल्पातील पुढच्या टप्प्यात मला देता आले नाहीत.

माझ्या ज्ञानदीपच्या कार्याची प्रशासनाला पूर्ण माहिती होती. कॉलेजच्या वेबसाईटचे काम तसेच वेबडिझाईन कोर्स करणे त्याच्या पाठिंब्यावरच शक्य झाले. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे वेबडिझाईनचे काम मिळविण्याचे प्रयत्न मी सुरू केले. मात्र कंपनीने वेगळे इन्फोटेक युनिट सुरू केले होते. श्री पुरोहितांच्या मदतीने मी मुंबईला जाऊन त्या युनिटला भेट दिली आणि त्यांचेशी चर्चा केली. त्यांनी मला बांधकामावर लागणारे सॉफ्टवेअर करण्याचा सल्ला दिला. पण माझ्या असे लक्षात आले की कंपनीतील बांधकाम क्षेत्रातील इंजिनिअर या युनिटला फारशी किंमत देत नाहीत. पुढे तर ते युनिटच बंद पडले.

मला असि. प्रोफेसर व नंतर प्रोफेसर पदे शेवटच्या काळात मिळाली आणि डीन संशोधन व विकास हे पद माझ्याकडे आले. गुलाबचंद रिसर्च फौंडेशनच्या विस्तारासाठी मी प्रशासनापुढे एक योजला मांडली. मात्र आर्थिक परताव्याच्या अटीमुळे त्याला यश आले नाही. रिटायर झाल्यावरही मी कॉलेजमध्ये नियमितपणे पोस्ट ग्रॅज्युएत गेस्ट लेक्चरर म्हणून जात होतो व प्रशासनाच्या आधुनिकीकरणाच्या कार्यात माझ्या संगणक ज्ञानाचा उपयोग करीत होतो.

काही काळाने प्रशासन आमि सोसायटी यातील धोरणात्मक मतभेदाला वैयक्तिक महत्वाकांक्षेचे रूप दिले गेले. वाद विकोपाला गेले आणि सोसायटीने  बँकेची बिल्डींग ताब्यात घेतली. त्याच काळात मला सोसायटीचे आजीव सभासद होण्याची माझ्या दृष्ठीने सुवर्ण संधी मिळाली. २००९ मध्ये मी सोसायटीचा आजीव सभासद झालो व लगेच मी ज्ञानदीपचे ऑफिस तेथे सुरू केले.

मग मात्र प्रशासनाला माझ्या हेतूबद्दल संशय वाटू लागला. यातच माझ्या एका इमेलचा वापर करून सोसायटीने मला कायदेशीर वादात अडकविले. प्रशासनाशी एकनिष्ठ असणा-या एका प्राध्यापकाने माझ्यविरुद्ध मोबाईलद्वारे अपप्रचार सुरू केला. गैरसमज वाढू नये म्हणून मी लगेच सोसायटीतून माझे ज्ञानदीपचे ऑफिस हलविले. माझे कॉलेजशी संबंध मी पूर्वीप्रमाणेच सलोख्याचे ठेवले. कॉलेजच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित रहात होतो.  

डायरेक्टर देशपांडे, जोशी आणि नंतर डॉ. परिष्वाड यांनी देखील मला नेहमीच योग्य मान दिला. गेल्या वर्षी ज्ञानदीप फौंडेशन आणि वालचंद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसाचे भव्य संमेलन घेण्याचे भाग्य मला मिळाले. डॉ. परिष्वाड यांनी मला पूर्ण सहकार्य केले. प्रशासनानेही या कार्यक्रमाला आपली संमती दिली व ज्ञानदीप आणि वालचंद कॉलेजमध्ये गैरसमजाने निर्माण झालेला दुरावा नष्ट झाला.

आता यापुढच्या काळात कॉलेजच्या प्रगतीसाठी दोन्ही संस्थांना एकत्र आणण्याचे कार्य मला करावयाचे आहे.  - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

वरील message मधील "प्रशासनाशी एकनिष्ठ असणा-या एका प्राध्यापकाने माझ्याविरुद्ध मोबाईलद्वारे अपप्रचार सुरू केला." हे वाक्य मी बिनशर्त मागे घेत असून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहे.
- डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली


Wednesday, June 26, 2019

वालचंद माजी विद्यार्थी संघटना आणि मी


वालचंद कॉलेजमध्ये १९६६ मध्ये शिक्षक म्दणून रुजू झाल्यानंतर पहिल्यांदा मला सर्व्हे प्रॅक्टिकल घ्यावी लागत. तेव्हा वर्गाबाहेर विद्यार्यांच्यात मिसळायला मला मिळत असे. शिकवितानाच त्यांच्या व्यक्तिमत्वाची तसेच घरच्या परिस्थितीची ओळख होई. मग विद्यार्थ्यापेक्षा मित्र वा थोरला भाऊ या नात्याने मी त्यांच्याशी वागत असे. माझे गुरू डॉ. सुब्बाराव यांच्याबरोबर पर्यावरण क्षेत्रात काम करीत असतांना प्रत्येक संशोधन वा कन्सल्टेशन प्रोजेक्टमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतल्यामुळे माझा दृष्टीकोन विद्यार्थ्यांबद्दल नेहमीच आपलेपणाचा राहिला. सुब्बाराव आणि  विद्यार्थी यांच्यातला दुवा म्हणून मी काम करीत असल्याने विद्यार्थी  हक्काच्या मैत्रीच्या नात्याने  माझ्याकडे आपले मनोगत वा अडचणी व्यक्त करू लागले.

आमच्या सिव्हील डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांच्या संघटनेचा (CESA) बराच काळ मी मार्गदर्शक होतो. त्यावेळी म्हणजे १९८० ते २००० या काळात आम्ही कॉलेजमधीत फायनल इयरच्या सर्व ब्रॅंचेसमधील  विद्यार्थ्यांचे पत्ते सेसा संघटनेमार्फत लिंक नावाच्या छोट्या पुस्तकरुपात   प्रसिद्ध करीत असू.
वालचंद कॉलेज माजी विद्यार्थी संघटनेची घटना व नाव बदलून खर्या अर्थाने संघटनेचे काम १९९८ मध्ये सुरू झाले. इ. स. २००० पासुन मी त्याच्या ऑपिस व्यवस्थापनाच्या कामात सहभागी झालो. प्रा. जे. जी. कुलकर्णी, प्रा. ए. जी इनामदार, प्रा. पाटणकर यांचे बरोबर काम करण्याची संधी मिळाली. नंतर माजी विद्यार्थी संघटनेची वेबसाईट बनवण्याचे काम ज्ञानदीपने हाती घेतले.

कॉलेजमधील जनरेटर रूमच्या शेजारी एसलेल्या रूममध्ये आम्ही संघटनेचा संसार मांडला. माझ्या काही विद्यार्थ्यांना हाताशी धरून माजी विद्यार्थ्यांचा डाटाबेस करून पहिले डिजिटायझेशन आम्ही त्यावेळी केले. कॉलेज चे जुने फोटो मिळवणे, संस्थेची घटना,  स्व. धोंडुमामा साठ्ये यांचे मनोगत, माजी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करणे याकामी शर्विल शहा या विद्यार्थ्याने मला फार मदत केली ( आज तो अमेरिकात मोठ्या पदावर कार्यरत आहे)  नॉन टेक्निकल संघटनेने आमच्या ऑफिसच्या जागेबद्दल विरोध केला. कऑलेज प्रशासनासही संघटनेची पाटी खोलीवर लावणे आवडले नाही. शेवटी पाटी काढून टाकली पण नेटाने तेथेच काम सुरू केले. इलेक्ट्रिकल डिपार्चमेटने त्यांची वेगळी संघटना सुरू केली. 
 पूण्याला प्रा. अभ्यंकरांनी पुणे चॅप्टर या नावाने संघटनेचे कार्य सुरू केले.

२००३ ते २००८ पर्यंत श्री अरविंद देशपांडे व नंतर २००८ ते २०१३ पर्यंत प्रा. अभ्यंकर  यांच्या अध्यक्षतेखाली असणा-या संचालक मंडळात मी सहसचिव म्हणून काम केले. त्यावेळी सभेच्या नोटिसा काढणे, ठराव लिहिणे, विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेणे ही कामे आम्ही उत्साहाने घरच्या कार्यासारखी केली.
२०१३ ते २०१८ पर्यंतच्या काळात माझा समावेश संचालक मंडळात मार्गदर्शक म्हणून करण्यात आला. श्री कोटीभास्कर आमि के. के. शहा यांनी संघटनेच्या ऑफिसचा स्वखर्चाने कायापालट केला. रंग लावला, नवे फर्निचर आणले. नव्या आधुनिक थाटात संघटनेचे काम सुरू झाले. 

माझ्या पत्नीच्या आजारपणामुळे मला संघटनेच्या कामात पूर्वीएवढे लक्ष घालता येईना. संचालक मंडळातील सर्व व्यावसायिक असल्याने नियमितपणे एकत्र येणे व ऑफिस सतत उघडे ठेवणे यात खंड पडला. मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा आजीव सदस्य झाल्याने माझ्याबद्दलही प्रशासन आणि संचालक मंडळ यांच्या मनात संशय निर्माण झाला.

खरे तर म. टे. ए. सोसायटीत सभासद होण्याची माझी फार पूर्वीपासून इच्छा होती. अनेक वेळा अर्ज करूनही मी कॉलेजमध्ये नोकरी करीत आहे या कारणास्तव मला सभासदत्व मिळाले नव्हते. कऑलेजातील सर्व माजी शिक्षकांनी सोसायटीत सभासदत्व घ्यावे व सोसायटीच्या माध्यमातून पुण्यातही आपल्या कॉलेजची शाखा काढावी असे मला वाटे. पण सारे विपरीत घडले. कॉलेज, सोसायटी व प्रशासन यात मतभेदांच्या भिंती फभ्या राहिल्या. संघटनेची या सर्व गदारोळात गळचेपी झाली.

आज पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी आली आहे व आवश्यकताही आहे असे मला वाटते. सर्वांनी ठरविले व माजी विद्यार्थी संघटनेला कोणत्याही बाह्य दडपणापासून मुक्त केले तर चमत्कार घडेल.कल्पनाही करता येणार नाही एवढे सामर्थ्य आणि धनशक्ती गोळा करण्याची पात्रता या संघटनेत आहे.  कॉलेजचा एक उपविभाग म्हणून नव्हे तर कॉलेजला सशक्त व समर्थ आधार  देणारी संस्था म्हणून  कॉलेज पूर्ववत एकसंध व स्वायत्त ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावण्याचे सामर्थ्य तिला प्राप्त होईल.

 वालचंद कॉलेज हे माझे आईवडिलांइतकेच श्रद्धास्थान आहे. माजी विद्यार्थी संघटना हे कॉलेजच्या संजीवनाचे मुख्य साधन आहे अशी माझी धारणा आहे. त्यामुळेच माजी विद्यार्थी संघटनेबद्दल मला इतकी आत्मियता वाटते.

वालचंदची गौरवशाली शिक्षणपरंपरा अबाधित रहावी यासाठी  माजी विद्यार्थी  व माजी प्राध्यापक संघटनांच्या माध्यमातून  आपण सर्वांनी आपले योगदान द्यावे. ज्ञानदीप याबाबतीत सर्वतोपरी  सहकार्य करेल अशी मी ग्वाही देतो. - डॉ. सु वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.

वालचंद कॉलेज आणि मी ---


मी फारच भावनाप्रधान होत चाललो आहे हे मला जाणवू लागले आहे. कॉलेजबद्दल एवढा प्रेमाचा उमाळा येणे बरोबर नाही. कॉलेजच्या सद्यस्थितीकडे  त्रयस्थ दृष्टीने पहायला शिकणे हे इतरांना सहज जमलेले कौशल्य मला आता मिळवणे अशक्य झाले आहे.

माझी आई अशीच होती. माहेर आणि सासर असा भेद तिच्याकडे नव्हता. स्वतपेक्षा नातेवाईकांच्या  काळजीतच ती सतत व्यग्र असायची. माझे वडील त्यामानाने विचारी व व्यवहारी होते. ते म्हणायचे कशाता काळजी करतेस. त्यांची काळजी घ्यायला ते समर्थ आहेत आणि त्यांनी मागितली तर आपण काहीही मदत देऊच की. उगाच काळजी करत बसू नकोस. पण ते आईला उमगायचे नाही. कदाचित आपण हतबल वा परावलंबी आहोत असे तिला वाटत असेल.
माझी पत्नी आपल्या आईबद्दल अशीच हळवी होती. तिच्या आईने ज्या काबाडकष्टांतून दिवस काढले व स्वतच्या श्रमांची वा गरिबीची पर्वा न करता जिद्दीने पाच जणांचा संसार पैरतिरी यशस्वीपणे ओढून नेला याबद्दल शुभांगीला तिच्याबद्दल नितांत आदर होता. त्यामुळेच असेल कदाचित. आई गेल्यावर  तिला आईच्या कवी मनातील प्रतिभेचा लाभ झाला आणि एकामागोमाग एक अशा अनेक कविता तिला स्फुरल्या आणि काव्यदीप, सांगावा आणि सय या तीन कविता पुस्तकांच्या रुपात प्रसिद्धही झाल्या. तिच्या पहिल्या काव्यदीप पुस्तकात तिने म्हटले आहे की

आम्हाला जरी सोडून गेलीस
काव्यधना परि देऊन गेलिस
सकलांना ते वाटुन देण्या
 कधी न विस्मरणार
माउली सदा तुला स्मरणार

सौ. शुभांगी गेल्यानंतर असेच काहीसे माझे झाले आहे.मला तिच्याइतकी प्रतिभा नाही मात्र माझ्या आईकडून मिळालेल्या संवेदनशील मनाला शुभांगीच्या काव्यधनाचा लाभ जाला आहे.

ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो. ज्या कॉलेज परिसरात  माझे सारे जीवन व्यतीत झाले त्या कॉलेजच्या भवितव्याबद्दल मला फार काळजी वाटू लागली आहे. आपण काहीतरी नव्हे तर काहीही करून कॉलेजला पुन्हा पूर्वीच्या वैभवशाली व स्वायत्त गुरुकुल स्थितीला नेण्याची प्रबळ इच्छा  मनात निर्माण झाली आहे. माझ्या आईसारखी हतबलतेची जाणीव अजून तरी मला नाउमेद करत नाही.

आज ना उद्या माझ्या प्रयत्नांना यश येणार याची मला खात्री आहे. तोपर्यंत
शुभांगीच्या चाल एकला या कवितेत दिलेला संदेश आणि इतरांचे साहाय्य मिळण्याची आशा मला कार्यरत ठेवणार आहे.

 आता माझे ठरले आहे. कॉलेजची माजी विद्यार्थी संघटना आणि महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी या  कॉलेजच्या भल्यासाठी झटणा-या संघटनांना समर्थ व सशक्त करून कॉलेजच्या शैक्षणिक स्वायत्ततेचे रक्षण करणे. इतरांनी मदत करावी असे वाटते पण नाही केली तरी कोणतेही वैषम्य न बाळगता जणु मला एकट्यालाच याचे श्रेय मिळवून देण्याची त्यांची इच्छा आहे असे मानून मी संघर्ष चालू ठेवणार आहे.     – डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

Sunday, June 23, 2019

बर्फाचे तट पेटुनी उठले...एक प्रतिज्ञा...

भारत सरकारने अटल इनोव्हेशन मिशन  हा महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला व डिजिटल इंडियाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. मात्र याच वेळी महाराष्ट्र शासनाने शालेय अभ्यासक्रमातून आयसीटी हा विषय काढून टाकण्यात आल्याची धक्कादायक बातमी समजली. कदाचित कॉम्पुटर प्रशिक्षित कर्मचारी नेमावा लागू नये म्हणून शासनाने हा निर्णय़ घेतला असेल.

मात्र अनेक शाळांनी स्वत:च्या खर्चाने अद्ययावत कॉम्प्युटर लॅब उभ्या केल्या आहेत. त्या ओस पडणार आहेत.  परीक्षा नाही म्हटल्यावर विद्यार्थी व शिक्षकही याकडे पाठ फिरवतील.सारे जग कॉम्प्युटरच्या साहाय्याने शिक्षण तसेच इतर सर्व क्षेत्रात प्रगती करीत असताना हा विषय परिक्षेसाठी न ठेवणे म्हणजे विद्यार्थ्यांना या नव्या प्रभावी ज्ञानसुविधेविषयी अंधारात ठेवण्यासारखे आहे.

शासनाचा निर्णय काहीही असो. अभ्यासक्रम कसाही बदलो. शालेय स्तरापासून सर्वांना कॉम्प्युटर शिक्षण देण्यासाठी शाळा कॉलेजमध्ये असलेल्या सुविधांचा पुरेपूर वापर करण्याची व त्यासाठी  प्रशिक्षकांची स्थानिक रोजगार आवश्यक असणार्‍या कुशल तंत्रज्ञांचे जाळे निर्माण करण्याची आवश्यकता आहे. कारण ’सर्व शिक्षा अभियान’ अंतर्गत असे शिक्षण मिळणे हा प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार आहे.

आता बहुतेक शाळात डिजिटल स्कूल सुरू करण्यात आली आहेत. तेथेही प्रशिक्षित कर्मचार्‍यांची उणीव आहे. साधने आहेत पण शिक्षक नाहीत याचा परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांना याचा लाभ न होता मूळ उद्देशच असफल होईल.

आज परिस्थिती काय आहे ? परिक्षार्थी विद्यार्थी आणि पालक, निरुत्साही शिक्षक व राजकारण व स्वार्थ यात गुरफटलेल्या शिक्षणसंस्था यात नवचॆतन्य कसे आणायचे ? आव्हान मोठे आहे.

 ही गरज भागवण्यासाठी ज्ञानदीप फॊंडेशनने तंत्रज्ञानात पारंगत असणारे निवृत्त शिक्षक, प्राध्यापक तसेच रोजगाराच्या शोधात असणारे आयटीआय, डिप्लोमा व डिग्री असणार्‍या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ना नफा, ना तोटा या तत्वावर ही सेवा देण्याचा प्रकल्प योजला आहे. प्रकल्पाचा आवाका मोठा आहे. निवृत्त प्राध्यापक व शिक्षक यांना या कामाचे महत्व पटवून देऊन त्यांना कार्यप्रवण करणे. स्थानिक रोजगार आवश्यक असणार्‍या कुशल तंत्रज्ञांना पुरेसे आर्थिक पाठबळ मिळेल असे कामाचे नियोजन करणे, शाळा व कॉलेजमधील संसाधनांचा वापर करता या यासाठी त्यांचेशी सहकार्य करार करणे व समाजातील नवसंशोधाकांचा शोध घेणे, सर्वांशी संपर्क करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालय तसेच प्रशिक्षणासाठी व्यवस्था करणे या सर्व गोष्टी स्थानिक पातळीवर कराव्या लागतील.

यासाठी मोठ्या आर्थिक साहाय्याची व  कुशल मनुष्यबळाची गरज आहे. या भागातील उद्योगांनी याबाबतीत  सहकार्य केले तर हे शक्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांत इनोव्हेशन व उद्योजगता वाढीस लागण्यासाठी लागून सरकारचे अटल मिशन सर्व शाळात पोचविण्याचे कार्य  यशस्वी होईल व त्याचा उद्योगांनाच फायदा होईल.

कविवर्य कुसुमाग्रज यांनी सीमेवरील जवानांसाठी लिहिलेल्या कवितेची सुरुवात  म्हटल्याप्रमाणे

 बर्फाचे तट पेटुनी उठले, सदन शिवाचे कोसळते 

अशी केली आहे.


आजचे निवृत्त शिक्षक मनाने निराश व थिजलेल्या बर्फाप्रमाणे असले तरी त्यांच्यात शुद्ध पाण्याचा झरा निर्माण करण्याची ताकत आहे.  शिक्षणमंदिर कोसळताना पाहून हे शिक्षकही नवी उभारी धरतील असे वाटते. मग त्यांनी एकदा ठरविले की

एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे धगधगते 

या त्यांच्याच कवितेतील शेवटच्या ओळीप्रमाणे ते या कार्यात जीव ओतून कार्य करतील असे वाटते. त्यांचा उत्साह व कळकळ पाहून  त्यांचे विद्यार्थीही तेवढ्याच या लढ्यात सामील होतील. नोकरीच्या शोधात असलेले व शहरात हलाखीत दिवस काढणारे कुशल तंत्रज्ञ मग आपल्या घरी परततील  व या कार्यात सहभागी होऊन आपल्या घराचा व परिसराचा विकास करतील.

ज्ञानदीप फॊंडेशनला ज्ञान व अनुभवाने समॄद्ध असणार्‍या शिक्षकांतील सुप्त चॆतन्य, शिक्षणाची तळमळ व विद्यार्थ्याबद्दल असणारे प्रेम पुन: जागे करून त्यांना कार्यप्रवण करायचे आहे, आपल्या उज्वल शिक्षण परंपरेला पुनरुज्जीवित करण्याचे पवित्र व अत्यावश्यक कार्य करण्यास  सर्वांचा हातभार लागेल अशी आशा आहे. 

Saturday, June 22, 2019

स्क्रॅच – गिरगोट्या


पाटीवर लिहायला शिकताना लहान मूल पेन्सिलने गिरगोट्या काढते. इंग्लिशमध्ये याला स्क्रॅचिंग म्हटले जाते, अगदी त्याचप्रमाणे केवळ पट्ट्या सरकवून व एकाखाली एक जोडून संगणक प्रोग्रॅम तयार करण्याची अभिनव सुविधा अमेरिकेतील एम आय टी मिडिया लॅबने स्क्रॅच या नावाने तयार केली असून ती इंटरनेटवरून सर्वांना मोफत उपलब्ध करून दिली आहे.
त्याद्वारे अगदी लहान मुलांनाही चित्रांच्या हालचाली व संवाद असणा-या चित्रफिती व व्हिडिओ गेम सहज तयार करता येतात. अमेरिकेतील तसेच इतर अनेक देशांत शालेय स्तरावर संगणक प्रोग्रॅमिंग शिकविण्यासाठी याचा वापर केला जातो.मुलांना हसतखेळत ही भाषा शिकता येते व संगणकावर नवीन चित्रफिती सहज करता येतात. .
ज्ञानदीप फौंडेशन मराठी माध्यमाच्या शाळांसाठी याचे मराठी रुपांतर करीत असून नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांत ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. इतर शाळांनीही याबाबतीत ज्ञानदीपशी (info@dnyandeep.com) संपर्क साधावा. फोन- ९४२२४१०५२०   .

शाळेची घंटा झाली आणि मराठी जागी झाली

आज शनिवार. लहानपणी शनिवारी सकाळी थंडीत कुडकुडत शाळेत जाताना एक अनामिक उत्साह वाटत असे. कारण शनिवार सकाळ म्हणजे पाढ्यांचा वार. शाळेची घंटा झाली की प्रार्थना होईपर्यंत पाढे म्हणायला मुले अधीर झालेली असायची. गुरुजीनी सुरुवात केली की सर्व मुले एकसुरात व एका तालात बेपासून ते तीसपर्यंत मोठ्याने पाढे म्हणायची. पहिलीत बेचे पाढे, दुसरीत बे आणि अकराचे पाढे, तिसरीत बेपासून तीसपर्यंत तर चौथीत दीडकी, सवायकी,अडीचकी असा चढत्या क्रमाने पाढे म्हणण्याचा कार्यक्रम सर्वांना हवाहवासा वाटायचा. घरात शुभं करोती व आरत्या म्हणताना असणा-या उत्साहाला शाळेत सर्वांमुळे अधिकच उधाण येई. सुरुवातीला काही जणांनाच पाढे येत असले तरी अशा सामुहिक पाढे म्हणण्याच्या शिरस्त्यामुळे सर्वांचेच पाढे विनासायास तोंडपाठ होत असत.

मूल आधी बोलायला शिकते ते इतरांचे अनुकरण करूनच. त्यावेळी जोडाक्षरांचा बागुलबुवा भीती घालत नाही. उच्चारातला सोपेपणा, लय व गेयता यांनाच महत्व असते. त्यामुळे अक्षरओळख नसली तरी मुले आरत्या व स्तोत्रे पाठ करू शकतात. पाढे याचप्रप्कारे मुलांना सहज पाठ होत. पाढे लिहिण्यास शिकण्याचे काम पुढे सावकाश होत रहायचे.

नव्या शिक्षणपद्धतीत घोकंपट्टीला केवळ गौण स्थानच नव्हे तर निषिद्ध मानले गेले. तर्कशुद्ध पद्धतीत आधी एक अंकी संख्या लिहिणे व मग बेरीज, वजाबाकी. त्यानंतर बेरजेपासून गुणाकाराची उत्पत्ती आणि नंतर पाढे तयार करणे या क्रमाने गणित शिक्षण सुरू झाले. माझ्या नातवंडांना हे शिकताना होत असलेला त्रास पाहून मी जुन्या पाढेपद्धतीचा वापर करून व स्वत: पाढे म्हणून एक अॅंड्रॉईड अॅप तयार केले. (https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyandeep.padhe&hl=en)

माझ्यासारख्या आजोबा आजींना ते खूप आवडले व बघताबघता दीड लाखावर ते डाऊन लोड झाले.

अर्थात त्यावर काही शिक्षणतज्ज्ञांनी निरुपयोगी कालबाह्य पद्धत असा शेरा मारला.

या अशा उच्च शिक्षाचिभुषित मान्यवरांनी ही जुनाट पद्धत समूळ नष्ट करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमातच पहिलीपासून इंग्लिशच्या धर्तीवर शास्त्रशुद्ध पद्धतीने गणित शिकविण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला.

नवी पुस्तके बाजारात आली. जुन्या शिक्षकांच्या हातात पडली आणि शाळेच्या ह्या  नवा घंटानादाने सारा मराठी समाज खडबडून जागा झाला. जणु मराठी भाषादेवीलाच जाग आली.

आता काय होईल ते काळच ठरवेल, मात्र जुने पाढे आता अधिक भक्तिभावाने घरोघरी म्हटले जातील व मराठी माध्यमातील मुले गणितात अव्वल बनतील यात शंका नाही.

नव्या शिक्षणपद्धतीचा आग्रह धरणा-यांचे हे योगदान मराठीसाठी नवसंजीवनी ठरणार आहे हे निश्चित. - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

ज्ञानदीपचा वृक्ष फुलून येण्याच्या वाटेवर

इ. स. २००० मध्ये मी व स्व. सौ, शुभांगी यांनी स्थापन केलेल्या ज्ञानदीपच्या छोट्या रोपट्याचा गेल्या वीस वर्षांत मोठा वृक्ष झाला आहे तरीदेखील त्याला फुलाफळांनी बहरण्याचा योग आला नव्हता.

 मला प्रसिद्ध कवी बींची कविता आठवते,

चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना

अनेक वेबसाईट केल्या. नाना प्रकारे जाहिराती केल्या. रात्ररात्र जागून शब्दकोश रचले, गाणी ध्वनीमुद्रीत केली.

गेले 'आंब्याच्या' बनी
म्हंटली मैनांसवें गाणी
आम्ही गळ्यांत गळे मिळवून रे

आम्हाला काय करू आणि काय नको अमे झाले होते. सांगली, कोल्हापूर, बंगलोर या शहरांच्या वेबसाईटसाठी माहिती गोळा करताकरताच, मायमराठी, संस्कृत. विज्ञान, पर्यावरण, साहित्यसंमेलन, सर्वांसाठी मोफत शिक्षण असे अनेक उपक्रम आम्ही करत होतो जणु सा-या जगाचा ठेकाच आपल्यासा दिला आहे या थाटातच सर्व धडपड चालू होती.

हे विश्वाचे अंगण
अम्हां दिले आहे आंदण
उणे करू आपण दोघेजण रे
अगदी अशीच आमची स्थिती झाली होती.

मधला काही काळ अति कष्टप्रद व  दुखदायक गेला. तिच्या आजारपणातही मनाने शुभांगी पूर्वीप्रमाणेच उत्साही व कार्यमग्न होती. अकेर दैवाने तिला माझ्यापासून कायमचे दूर केले. मीही परदेशी स्थायिक झालो. पण आम्हा दोघांनी सुरू केलेले कार्य तसेच अपुरे व अयशस्वी राहिले होते.

आज अचानक मला जाणवले की आमचा प्राणप्रिय ज्ञानदीप वृक्ष फुलांनी बहरण्याची चिन्हे दिसत आहेत.

चाफा फुली आला फुलून
तेजी दिशा गेल्या आटुन
कोण मी - चाफा? कोठे दोघे जण रे?

आम्ही दोघे कोठे तरी असू नसू पण ज्ञानदीप आमच्या बागेतील आंबा, नारळ व फणसासारखा फुलाफळांनी कायम बहरत राहील.
आणि हे समाधान मला उरल्या आयुष्यासाठी पुरेसे आहे.
डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

Wednesday, June 19, 2019

माय सिलिक़ॉन व्हॅली – नवी वेबसाईट


गेली दोन वर्षे मी अमेरिकेत वास्तव्यास आहे. आता ग्रीन कार्ड मिळाल्याने माझे कायमचे वास्तव्य तेथेच राहणार आहे.
अमेरिकेत मी राहतो तेथील म्हणजे पश्चिम किना-यावरील कॅलिफोर्निया राज्यातील बे एरिया नाव असलेल्या पण सिलिकॉन व्हॅली या नावाने ओळखल्या जाणा-या छोटा प्रदेशाचे  जगभरातील आयटी क्षेत्रातील युवकांना  आणि तरूण व्यवसाय उद्योजकांना जबरदस्त आकर्षण आहे. तेथे जाऊन नोकरी वा उद्योग उभा करण्याचे ते स्वप्न पहात असतात. ऐतिहासिक काळात, कॅलिफोर्नियामध्ये नदीच्या पाण्यात सोने मिळत असे  आणि सोन्याच्या शोधात जगातील अनेक लोक स्थलांतर करून  आले होते. तो गोल्ड रश कालावधी संपला आहे. पण आता, हा प्रदेश  माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अत्युच्च पदावर पोचल्याने कॉम्प्युटर चिपमधील सिलिकॉन वरून सिलिकॉन व्हॅली या नावाने प्रसिद्धीस आला असून याचे महत्व सोन्यापेक्षाही अनेक पटीने वाढले आहे. 
तेथील   पर्यावरण व समाजव्यवस्था यांचा थोडाफार अभ्यास केल्यावर मला असे आढळले की तेथे अनेक वर्षे राहणा-या विविध देशांतील लोकांना त्या प्रदेशाची अगदी त्रोटक माहिती आहे. आपल्या मूळ प्रदेशातील लोकांशीच त्यांचा संपर्क आहे. तेथील स्थानिक लोकांची ओळख नसल्याने असुरक्षितता वाटते. स्थानिक लोकांनाही या उप-या लोकांविषयी संशय व असूया आहे. यावर एकमेव उपाय हा तेथे जाणा-या लोकांनी तेथील निसर्ग आणि समाज यांची माहिती तसेच तेथील समस्यांची सोडणवूक करण्यात आपले योगदान दिले पाहिजे. जन्मभूमीप्रमाणेच कर्मभूमीबद्दलही आपलेपणा वाटला. तरच ही दुराव्याची व असुरक्षिततेची भावना नाहिशी होईल.
या दृष्टीकोनातून ज्ञानदीप फाऊंडेशनने मायसांगली आणि मायकोल्हापूर या लोकप्रिय वेबसाईटच्या धर्तीवर माय सिलिक़ॉन व्हॅली या नावाची वेबसाईट (www.mysiliconvalley.net) तयार करण्याचे काम हाती घेतले असून ती प्राथमिक स्वरुपात कार्यान्वित करण्यात आली आहे.
वेबयाईटच्या नावात "माय" म्हणून जो प्रत्यय जोडला आहे त्याला माझी हा एक विशेष अर्थ आहे.  ज्याप्रमाणे  स्थानिक रहिवाशांना आपल्या निवास स्थानाबद्दल किंवा क्षेत्राबद्दल अभिमान असतो. त्याप्रमाणे सिलीकॉनव्हॅलीमधील  सर्व रहिवाशांना  सिलिकॉन व्हॅलीविषयी आपलेपणाची व अभिमानाची जाणीव व्हावी या दृष्टीकोनातून वेबसाईटचे नाव निवडले आहे.
तेथे सध्या कार्यरत असणा-या बहुतेक वेबसाईट्स आयटी आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित आहेत. त्यांत व्यवसायांविषयी आणि उद्योग आस्थापनांबद्दल खूप माहिती आहे. काही साइट्स धार्मिक आणि सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य करणा-या आहेत व त्याही विशिष्ठ देशवासियांसाठी वा व्यवसायासाठी  आहेत.
उद्देश - या वेबसाईटवर सहसा उपलब्ध नसणारी व बे एरिया म्हणून ओळखल्या जाणा-या प्रदेशाची भौगोलिक, ऐतिहासिक माहिती, तेथील निसर्गसंपदा, प्राणी व पक्षी, हवामान, वाहतुक तसेच प्रशासकीय आणि पायाभूत सुविधांची माहिती संकलित करणे व तेथे असणा-या वा जाऊ इच्छिणा-या परदेशी व्यक्तींसाठी मार्गदर्शन करणे असा महत्वाकांक्षी उद्देश या वेबसाईट निर्मितीमागे आहे.

वेबसाइटचे प्रस्तावित मुख्य विभाग
 1. अमेरिका, कॅलिफोर्निया, बे एरिया आणि त्यातील सिलिकॉन व्हॅली यांचा इतिहास आणि भूगोल
2. भौगोलिक वैशिष्ट्ये, पाणी, माती, पर्यावरण आणि बदलते हवामान.
3. वनस्पती आणि झाडे, वन्य प्राणी
4. रस्ते व इमारती, वाहतूक व्यवस्था
5. कौंटी, शहरे आणि त्यांचे प्रशासन
6. पाणी पुरवठा, सांडपाणी विल्हेवाट, वीज
7. रुग्णालये, शाळा, ग्रंथालय, शासकीय कार्यालये, मनोरंजन केंद्र, दुकाने आणि मॉल
8. स्थानिक आणि प्रादेशिक समस्या.
9. अभिप्राय आणि अभ्यागत मंच
वरील मुद्द्यांबद्दल आम्ही काही मूलभूत माहिती संकलित केली आहे ती पुढील ब्लॉगमध्ये देणार आहे.परंतु प्रस्तावित वेबसाईटची व्याप्ती आणि उपयुक्ततेविषयी सूचना आणि माहिती यांचे स्वागत आहे.
आशा आहे की ही वेबसाइट ज्ञानदीप इन्फोटेक आणि ज्ञानदीप फाऊंडेशन यांच्या प्रगती आणि सहकार्याचे नवीन दालन उघडेल. अर्थात यासाठी आपणा सर्वांचे सक्रीय साहाय्य मिळाल्यासच हा प्रकल्प यशस्वी होऊ शकेल. याची आम्हाला जाणीव आहे.
आपण या उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करावे ही विनंती.
डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

Tuesday, June 18, 2019

जगायचे कसे ?


 जगायचे कशासाठी हा लेख लिहिल्यानंतर सहज मनात विचार आला, जगायचेच तर कसे जगायचे याबद्दल आपले विचार मांडावेत. आजपर्यंत विविध धर्मातील अनेक साधुसंतांनी कसे जगावे याविषयी उपदेश केला आहे तोही कोणी फारसे मनावर घेत नाही तर माझ्या विचारांना कोण विचारणार ?

तरीही शिक्षकी पेशामुळे सांगितल्याविना राहवत नाही म्हणून हा प्रपंच.

प्रत्येक माणसाचे शरीर, बुद्धी व मन  त्याचे स्वत:चे असते. त्याचे आयुष्यही त्यालाच भोगायचे वा उपभोगायचे असते. त्यामुळे त्याने काय खावे, काय व कसे काम करावे, आपले आरोग्य कसे राखावे, इतरांशी कसे वागावे हे तोच ठरवत असतो. त्याचे चांगले वाईट परिणामही त्यालाच भोगावे लागतात.

लहानपणी मी, माझे असा बालसुलभ हट्ट असतो. . वडिलधार्यांचे वा गुरुजनांचे संस्कार व शिस्त यामुळे त्यात बदल होऊन इतरांशी सहकार्य करणे कसे फायद्याचे असते हे उमजते. शिक्षणामुळे मनाच्या जाणिवा विस्तारून इतराँबद्दल व सजीव सृष्टीविषयी ते संवेदनशील बनते. बुद्धीच्या विकासाने योग्य सकारात्मक विचार करून निर्णय  घेण्याची क्षमता प्राप्त होते. चांगल्या झाडांपेक्षा तण तगेच रुजते व वाढते त्याप्रमाणे कामक्रोधादि षडरिपु नकळत मनाचा व बुद्धीचा ताबा घेऊ शकतात. त्यकडे दुर्लक्ष केले की ते आपली मुळे पसरवून शिरजोर होतात. मग इतरांनी  कितीही व  काहीही सांगितले तरी घट्ट मूळ धरून बसलेल्या वाईट सवयी आणि स्वभावातील विकृती यांचाच प्रभाव सा-या जीवनाला व्यापून टाकतात. नंतर अशी स्थिती येते की माणूस कळत असूनही हतबल होतो.  

माझी एक जुनी आठवण अजूनही मला उद्विग्न करते. अतिशय बुद्धीमान व तत्वचिंतक असा माझा एक अगदी जवळचा नातेवाईक दारूच्या व्यसनामुळे आपले आयुष्य गमावून बसलाच पण सार्या कुटुंबाला त्याच्या या सवयीने उध्वस्त केले. आहार विहारात दुर्लक्ष केले आळस व आवड यांच्या आहारी गेले की शरीर व मानसिक स्वास्थ्य बिघडते. आजही सभोवती अशी माणसे पाहिली की मला त्यांना उपदेश करायचा मोह होतो. पण त्याचा फारसा परिणाम होणार नाही हे कळून मन खिन्न होते.

जी गोष्ट व्यसनाची तीच रागाची वा लोभाची. त्याचे दुष्परिणाम केव्हा प्रकट होतील हे सांगता येत नाही. आपण कोणावर रागावलो तर त्याचा आपल्यालाही तेवढाच त्रास होत असतो. नाती तुटतात, मित्रसंबंध दुरावतात, ज्याच्यावर रागावलो तोही प्रतिशोधाची संधी शोधू लागतो. लोभाच्या मोहाने भ्रष्टाचार केल्यास संपत्ती वाढू शकते पण आपण कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी भविष्यात ते उघडकीस येऊ शकते शिवाय ते मागे जाऊन पुसूनही टाकता येत नाही. ते भुतासारखे मन व बुद्धीला कायम घाबरवत राहते. आपले जीवन सुखी होण्यासाठी केवळ पैशाची घरज नसून उत्तम आरोग्य व चिंता मुक्ततेची नितांत आवश्यकता आहे.

सत्तेची नशाही माणसाची सारासार विचार करण्याची क्षमता व सहानभूती वा संवेदना नष्ट करते. त्यातून घडणारे शोषण वा अत्याचार आपल्या जीवनाला कायमचे कलंकित करतात.

 या सर्वांचा विचार करता आपल्या आयुष्याचा कर्ता करविता बव्हंशी आपण स्वतच असतो.

आपले शरीर, बुद्धी व मन, ज्यावर केवळ आपलीच मालकी आहे  व जीवनातील यश अपयश ठरविण्यासाठी वा जीवनसंघर्षात विजयी होण्यासाठी,  आपल्या हातात तेवढीच आयुधे ईश्वराने दिली आहेत  हे लक्षात घेतले पाहिजे. समाज, शासन व निसर्ग यांची बाह्य बंधने आपल्या  जीवनावर परिणाम करतातच. पण जे आपल्या हातात आहे ते तरी आपल्याला अनुकूल राहील याची दक्षता आपण घेतली पाहिजे. अर्थात हे माझे व्यक्तीगत विचार आहेत. शेवटी आपले जीवन कसे जगायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे.

आजचे युग व्यक्तीस्वातंत्र्याचे आहे. प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचे व मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे.  'ऐकावे जनाचे , करावे मनाचे' हा सुखकारक सोपा मार्ग सर्व  कटाक्षाने अनुसरतात. त्यामुळे त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याची बूज राखून मी आपली मते त्यांच्या विचारार्थ मांडली  आहेत.

 - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

Bridging the gap between haves and have nots.

Going to foreign country is a great privilege for common middle class people in India. I had that opportunity for number of times in last twenty years.  However,  I could not enjoy that happy and heaven comparable facilities, luxury, tours and delicious food etc as my inner sense was reminding me about the dire conditions in my country where the people  were living below poverty level  and  struggling to rise to sustainable living standards.

I hated luxury being enjoyed by Indians living abroad. They must look back from where they have come from. They should try to wipe tears from their old friend’s eyes. They should assure them, help them, inspire them, build them. It is not necessary to come back and compete with them for lucrative jobs. They can easily shade  few bucks from their earnings to boost the morale of the unemployed educated youth and help them to stand on their feet.

What is true for people living in foreign countries is sadly true even in India, where the fortunate few who got good jobs with hefty salaries in mega towns.  The same culture of luxury, enjoyment and aloofness has delineated them from harsh realities of their home towns and childhood friends who are getting frustrated and loosing the confidence about their future life.

Dnyandeep Foundation wishes to create this awareness and build strong bonds between the two worlds for improving the situation and accelerate  India’s development. I hope all will participate and spread the message. – Dr. S. V. Ranade, Dnyandeep, Sangli

Wednesday, June 12, 2019

जगायचे कशासाठी

जन्माला आलो, म्हणजे जगणे भाग आहे म्हणून नव्हे तर प्रचंड आसक्तीने . माणूस  जगण्यासाठी लागणारी सारी धडपड करत राहतो. ही  प्रेरणा निसर्गदत्त असते.माणूस जगत राहतो पण आपण कशासाठी जगतो याचा विचार मात्र फारसा कधी करीत नाही. आपल्याला काहीतरी करायचे आहे. काही उद्दीष्ट साध्य कराहचे आहे हे जेव्हा त्याच्या लक्षात येते त्यावेळी जगण्याला एक वेगळीच सकारात्मक दिशा प्राप्त होते आणि मग जगायला मिळणे ही एक अनमोल पण मर्यादित काळापुरती संधी  आहे व तिचा मी पुरेपूर उपयोग करून माझ्या आशा आकांक्षा पूर्ण करेन आशी ईर्षा मनात निर्माण होते व मग आविरत कार्यमग्नता हेच त्याचे जीवनाचे उद्दीष्ट बनते.

निव़त्त होणे याचा खरा अर्थ म्हणजे शारिरिक व्याधीची नवी बंधने  व काम करण्याच्या क्षमतेत झालेली नैसर्गिक घट याँचा स्वीकार करणे.. त्याचा आपल्या बौद्धिक क्षमतेवर वा मानसिकतेवर प्रभाव पडण्याचे काहीच कारण नाही. उलट आपले आयुष्य आता कमी उरले या जाणीवेने कार्याची गती वाढणे अपेक्षित आहे. पण होते काय, की निवृत्तीनंतर माणूस आपली जीवनातली इतिकर्तव्यता संपली आता फक्त आराम करायचा या कल्पनेने ग्रासला जातो. नातेवाईक व समाजही त्याच्याकडे एक सांभाळायचे ओझे या दृष्टीने पाहतो. काहीही न करण्याची मानसिकता त्यातून निर्माण होते. काम थांबले, आराम वाढला की शारिरीक व्याधी जोर धरू लागतात. माणूस आणखीनच खचून जातो. याउलट तो जर पूर्वीप्रमाणेच पण झेपेल तेव्हडे आपल्या आवडीचे काम करीत राहिला तर आरामापेक्षा उच्च प्रतीचा वेगळा आनंद त्याला मिळत राहील. नातेवाईक व समाजालाही त्याची प्रतिष्ठा वाढेल आणि गरजही वाटेल.

निवृत्त झाल्यावर बॅंक व शेअर्समध्ये गुंतवणूक करून पैसे कसे वाढतील याकडे डोळे लावून बसणे हा ब-याच लोकांचा आवडीचा छंद असतो. काही व्यक्ती  धर्मादाय संस्थेला दान दान देऊन मानसिक समाधान मिळवितात. तर बरेचसे सामाजिक कार्यात स्वतला गुंतवून घेतात.

याशिवाय आणकी एक पर्याय आहे. तो म्हणजे आपले  ज्ञान व अनुभवाचा उपयोग होईल असा व्यवसाय सुरू करणे.  नोकरी वा व्यवसायाच्या ओधात असणा-या नवयुवकांना हाताशी धरून अगदी कमी मानधन देऊनही  आपल्याली काही उद्योह सुरू करता हेईल. याचे अनेक फायदे आहेत.  पहिला दृष्य फायदा म्हणजे रोजगार निर्मिती. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यास मिळालाली संधी, प्रशिक्षित पण अनुभव नसणा-या युवकांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या उत्साही समूह चर्चेत सामील होणे. आपल्या त्यांच्याकडून मिळणारी आदरायुक्त मदत, आपम्या एकटेपणात वा आजारीपणात वा प्रवासात मिळणारी सोबत निश्चितच फार मोलाची आहे.

असे केले तर आपल्या जीवनाला एक वेगळे आनंददायी वळण मिळेल, आपण पुन्हा तरुण झाल्यासारखे वाटेल. समाजालाही  आपला फायदा होईल.  निदान मलातरी ज्ञानदीपच्या कार्यात सक्रीय सहभागी झाल्याने असा लाभ झाला आहे.   डॉ. सु. वि. रानडे, र्ानदीप, सांगली.

Saturday, June 8, 2019

जाहिरात शिक्षकांची करा, बिल्डींगची नको.

सध्या वर्तमानपत्रे, टीव्ही, रेडिओ व सोशल मिडियावर शैक्षणिक संस्थांच्या पानपानभर जाहिराती दिसत आहेत. त्यात मुख्यत्वे आकर्षक इमारती व इतर सुखसोयी आणि य़शस्वी विद्यार्थ्यांचे फोटो दिसतात. मात्र शिक्षकांचा कोठेच उल्लेख दिसत नाही. शिक्षणासाठी इमारती आणि इतर सुविधा यांची आवश्यकता असली तरी शिक्षकांचे महत्व सर्वोच्च आहे हे सोयीस्करपणे विसरले जाते. यशस्वी विद्यार्थ्यांच्या नावावर जाहिरात करताना हे विद्यार्थी खासगी क्लासेसमध्ये जात असल्याने त्याचे श्रेय शिक्षणसंस्था घेऊ शकत नाहीत.

प्रत्यक्षात स्थिती फार निराशाजनक आहे. जाहिरातीत अग्रेसर असणा-या शिक्षणसंस्थात शिक्षकांना अगदी गौण स्थान आहे. पगार संस्थाचालकांच्या मर्जीवर केव्हातरी मिळणार. कामाचा प्रचंड ताण आणि शिक्षणाबाबत शिक्षकांचीच उदासीनता व पाट्या टाकण्याकडे प्रवृत्ती. साहजिकच चांगल्या शिक्षकांची कमतरता.

जाहिरात करायचीच तर शिक्षकांची करा. तुमच्या दिखाऊ परिसराची नको. अर्थात लोकांना हे सर्व माहीत असतेच. नाईलाज म्हणून प्रवेश घेणे आणि खाजगी क्लासेसची कास धरणे आता सर्वमान्य झाले आहे.

चांगले शिक्षक आहेत हे कळले तर ही  जाहिरातबाजी आणि विद्यार्थ्यांची क्लासेसमध्ये होणारी लूट थांबेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिक्षणाचे पावित्र्य राहून उत्तम विद्यार्थी घडतील.

 सुदैवाने आजही अशा काही शिक्षणसंस्था आहेत की त्यांना जाहिरात लागत नाही. शिक्षक आणि पूर्वीची गौरवशाली शैक्षणिक परंपरा हीच त्यांची जाहिरात असते. सांगली या अर्थाने फार भाग्यवान आहे. राणी सरस्वतीदेवी कन्याशाळा, सांगली शिक्षण संस्था, लठ्ठे एज्युकेशन, विलिंग्डन व वालचंद ही यातली काही ठळक उदाहरणे आहेत.