Friday, September 11, 2020

माझ्यावर भावासारखे प्रेम करणारे - प्रा.सुरेश गजेंद्रगडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

 माझ्या वडिलबंधूसम असलेले प्रा. सुरेश गजेंद्रगडकर यांचे दुःखद निधन झाल्याचा निरोप मला डॉ. अशोक पटवर्धनांकडून आला आणि फार वाईट वाटले.

त्यांची माझी ओळख गेल्या ५० वर्षांची.  गजेंद्रगडकर आमच्या वालचंदचे माजी विद्यार्थी आणि कै. प्रा. जोगळेकरांचे वर्गमित्र. व्हीजेटीआयमध्ये प्राध्यापक असणारे प्रा. भा. ल महाबळ , अशोक पटवर्धन आणि सुरेश गजेंद्रगडकर हे वालचंदच्या सिव्हिल डिपार्टमेंटसाठी दत्तासारखे त्रिमूर्ती गुरुदेव होते. अनेक वेळा परिक्षेचे वा गेस्ट लेक्चरचे निमित्त काढून आम्ही त्यांना बोलवत असू.

त्यांच्या आयुष्यात त्यांना अनेक मानसिक व शारिरीक त्रासांना सामोरे जावे लागले.  पीएचडीसाठी अमेरिकेत गेल्यानंतर एक वर्षातच त्यांना कौटुंबिक समस्येमुळे भारतात परतावे लागले. मराठी विज्ञान परिषदेचे वि. मो.पंडित यांच्या मुलीशी त्यांचा विवाह झाल्यावर त्यांच्या जीवनात स्थिरता आली. मध्यंतरी जिवावरच्या दुखण्यातून ते वाचले मात्र कायम त्याना बाह्य साधनावर अवलंबून रहावे लागले तरी ते नेहमी आनंदी अमत. आपले दुःख लपवून ते इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करत.

 ते नेहमी हसतमुख व उत्साही असत. त्यांनी IWWA च्या स्थापनेत आणि व्यवस्थापनात आपले अमूल्य योगदान दिले.

कॉलेजच्या स्टाफ क्वार्टर्समध्ये मी आणि डॉ. सुब्बाराव दोघेही रहात असल्याने आमच्या घरातील सर्वांचीच त्यांना माहिती होती. त्यातही प्रा. गजेंद्रगडकर  मला आपल्या धाकट्या भावासारखे आपलेपणाने वागवत. घरच्यांची विचारपूस करीत. आमच्या घरातील सर्वांना त्यांचा परिचय होता. मी आणि माझी पत्नी  त्यांना पुण्यात त्यांच्या पाटील इस्टेटमधील घरी नेहमी भेटत असू.

त्यांचा लिहिणे माझ्या पत्नीच्या कवितांचे ते कौतुक करीत. मराठी असो वा इंग्रजी. त्यांची पत्रे म्हणजे एक उत्तम साहित्यकृतीचा खजिना असे.  मी त्यांची अनेक पत्रे जपून ठेवली आहेत. पुढेमागे तीही नमुन्यादाखल देण्याचा विचार आहे.

पर्यावरण क्षेत्रातील कोणत्याही तांत्रिक वा सामाजिक समस्येवर त्यांचे भाष्य ऐकले की त्यांच्या विचारशक्तीची कल्पना येई.

त्यांचा अध्यात्मशास्त्राचा चांगला अभ्यास होता. कै. गुरुदेव रानडे यांचे ते शिष्य होते व चिमड येथील आश्रमात निगडित होते.  समान आवडी व छंदामुळे माझे सहाध्यायी प्रा. गाडगीळ यांचेशी त्यांचा नित्य संबंध असे. माझ्याकडून त्यांच्याशी संपर्क करण्यात चालढकल होई.त्यांना ते आवडत नसे.  

एकदा मी आणि माझा भाऊ पुण्यातील त्यांच्या घरी भेटायला गेलो. मी नेहमीच्या रिवाजाने "आत येऊ का" असे विचारले त्यांनी उत्तर दिले "नको". माझ्या भावाला आश्चर्य वाटले. मी मात्र समजलो की बरेच दिवसात न भेटल्याने ते नाराज आहेत.

 असेच  एकदा ब-याच दिवसांनी त्यांना फोन केला  त्यांनी फोन घेतला व म्हणाले "मी स्वर्गातून बोलतोय, तुला माहीत नाही का ?"


मला ओशाळल्यासारखे झाले. फोन करण्यास उशीर झाल्याचे मी कबूल केले.

हल्ली बरेच दिवसांत मी त्यांना भेटलो नव्हतो. भेटल्यावर असेच रागावतील अशी भीती वाटत होती. पण आता खरेच त्यांचे ते बोल माझ्या कानी पडत आहेत. 


आता फोनवर नाही तरी आपणा सर्वांपुढे  त्यांची क्षमा मागून त्यांना माझी श्रद्धांजली अर्पण करतो.

No comments:

Post a Comment