Thursday, June 7, 2018

माय सिलिकॉन व्हॅली - ज्ञानदीपचे नवे संकेतस्थळ

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सिलिकॉन व्हॅली ही संपूर्ण जगभरातील युवा पिढीचे आणि व्यवसाय उद्योजकांचे एक स्वप्न आहे. परंतु बहुतेकांना या ठिकाणाबद्दल खूपच  थोडी माहिती असते.


सिलिकॉन व्हॅली हा अमेरिकेतील ५० राज्यांपॆकी कॅलिफोर्निया या राज्यातील अगदी छोटा ( महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याएवढा) भाग आहे. मात्र येथे माहिती तंत्रज्ञानातील बहुतेक सर्व मोठ्या कंपन्या ( गुगल, याहू, फेसबुक, आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, एचपी ) तसेच आंतरराष्ट्रीय उद्योग ( वालमार्ट, मॅक्डोनाल्ड, अमेझॉन इत्यादी) आहेत. येथे असणार्‍या परदेशी लोकांमध्ये भारतीयांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. सिलिकॉन व्हॅली हे नाव सोन्याची लंका या धर्तीवर सोन्याऎवजी सिलिकॉन आधारित उद्योगपंढरी म्हणून छोट्या भोगोलिक परिभाषेत 'बे एरिया' या प्रदेशाला दिले जाते.

ज्ञानदीप फाऊंडेशनने आतापर्यंत सांगली आणि कोल्हापूर शहरांची सर्वंकष माहिती देणारी संकेतस्थळे तयार केली आहेत. ज्ञानदीपच्या संचालक मंडळापॆकी बहुतेक सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सिलिकॉन व्हॅलीमध्ये स्थायिक झाले असल्याने आणि मी स्वत: तेथील ग्रीन कार्डधारक झाल्याने सांगली कोल्हापूरच्या धर्तीवर सिलिकॉन व्हॅलीचे नवे संकेतस्थळ करावे असे  ज्ञानदीप फाऊंडेशनने ठरविले आहे.

याचा मुख्य उद्देश हा तेथे व्यवसाय वा नोकरीसाठी जाणार्‍या परदेशी नागरिकांना या परिसराची एकत्रित माहिती त्यांच्या भाषेत उपलब्ध करून देणे हा आहे. तेथे जाणार्‍या प्रत्येकाला तेथील इतिहास, भूगोल, निसर्ग, समाजजीवन, विविध सेवासुविधा, उद्योगधंदे तसेच शिक्षण व व्यवसायाच्या संधि यांची माहिती व्हावी व त्याला या परिसराबद्दल आपलेपणा वाटावा, जन्मभूमीप्रमाणेच कर्मभूमी म्हणून त्या परिसराच्या विकासासाठी व तेथील लोकांच्या कल्याणासाठी त्याने काम करावे अशी उदात्त कल्पना यामागे आहे. यामुळे जन्मभूमी आणि कर्मभूमी यात एक नवे नाते प्रस्थापित होऊन त्याचा दोन्ही बाजूंना फायदा होईल असे वाटते.

ज्ञानदीप फाऊंडेशन सांगलीत आहे व सांगली परिसरातील अनेक युवक  व त्यांची कुटुंबे सध्या या सिलिकॉन व्हॅलीत रहात आहेत. पुण्यामुंबईत राहणार्‍या लोकांना ज्याप्रमाणे विविध प्रांतातील लोकांशी संबंध येतो त्याचप्रमाणे सिलिकॉन व्हॅलीत राहणार्‍या लोकांना भारताशिवाय इतर सर्व देशातील लोकांशी दॆनंदिन संबंध येतो. आंतरराष्ट्रीय समाजात वावरताना प्रथम बिचकल्यासारखे होते, भीती वाटते, परस्पर संवादात अडचणी येतात. संस्कॄती समजायला व आत्मसात करायला वेळ लागतो. पण आपल्यासारख्याच अडचणी असणार्‍यांची संख्या मोठी असल्याने हायसे वाटते. इतर लोकही आपल्याला सांभाळून घेतात हे पाहिल्यावर सर्वांबाबत सहानुभूती व प्रेम वाटायला लागते व त्यांच्या रीती रिवाजांबद्दल आकस न राहता कुतुहल वाटते, जाती, धर्म, देश यापलिकडे जाऊन माणसाची माणूस म्हणून ऒळख होते.

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःख भाग्भवेत्।
 
या प्राचीन संस्कृत उक्तींची प्रचिती येते.

"माय" हा शब्द सिलिकॉन व्हॅलीशी जोडण्यात  एक विशेष हेतू आहे.  'माय' याचा इंग्रजीत ’माझा” असा अर्थ असला तरी मराठीत आई असा अर्थ आहे. आपण जेथे जन्मलो व वाढतो तॊ आपली मातॄभूमी असते. आईसारखी माया ती भूमी आपल्यावर करते तशीच आपणही आपण मातॄभूमीवर मनापासून प्रेम करतो. आपल्याला आपल्या मातॄभूमीबद्दल  अभिमान असतो. त्याचप्रमाणे  सिलिकॉन व्हॅलीत राहणार्‍या सर्वांना त्या परिसराबद्दल आपलेपणा  वाटावा व त्याच्या प्रगतीसाठी तसेच भोवतालच्या निसर्ग व समाजासाठी त्यांनी कार्य करावे असे वाटते.

उद्देश -

१. सिलिकॉन व्हॅलीतील सर्व स्थलांतरितांच्या जलद एकत्रीकरणासाठी प्रयत्न करणे जेणेकरून त्यांना स्थानिक नागरिकांचे सहकार्य व सहानुभूती मिळेल. तसेच त्यांना तेथील इतिहास, भूगोल, पर्यावरण, प्रशासकीय आणि पायाभूत सुविधांची माहिती मिळेल.

२. सिलिकॉन व्हॅलीत नव्याने येणार्‍या परदेशी नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या आवश्यकतांबद्दल माहिती देऊन मदत करणे.

वेबसाइटचे प्रस्तावित मुख्य विभाग

 1. यूएसए, कॅलिफोर्निया, बे एरिया आणि त्याची सिलिकॉन व्हॅली ओळख यांचे इतिहास आणि भूगोल
2. भौगोलिक वैशिष्ट्ये, पाणी, माती, पर्यावरण आणि हंगामबदल.
3. वनस्पती आणि झाडे, वन्य प्राणी
4. रस्ते व इमारती, वाहतूक व्यवस्था
5. देश आणि  प्रशासन
6. पाणी पुरवठा, सांडपाणी विल्हेवाट, वीज
7. रुग्णालये, शाळा, ग्रंथालय, शासकीय कार्यालये, मनोरंजन केंद्र, दुकाने आणि मॉल
8. स्थानिक आणि प्रादेशिक समस्या.
9. अभिप्राय आणि अभ्यागत मंच

मी वरील मुद्द्यांबद्दल काही मूलभूत माहिती संकलित केली आहे परंतु प्रस्तावित वेबसाईटची व्याप्ती आणि सामग्रीविषयी सर्व गोष्टींबद्दलआपली मते, सूचना पाठवावी तसेच माहिती संकलनात  सहकार्य करावे ही विनंती.

No comments:

Post a Comment