Thursday, June 21, 2018

स्वप्नपूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल - नाशिक


Ref: https://twitter.com/nashikcity

पुण्यानंतर खास  सदाशिव पेठी पुणेकर संस्कॄती जपणारी जी दोन शहरे आहेत ती म्हणजे नाशिक व सांगली. एकमेकांपासून फार दूर असूनही या दोन शहरात विलक्षण साम्य व घनिष्ठ संबंध आहेत. नाशिक-सांगली सासर माहेर असणारी अनेक कुटुंबे आज सांगली मिरजेत पहावयास मिळतात.आमच्याबद्दल बोलायचे झाले तर आम्ही सातारहून १९६१ मध्ये सांगलीत आलो व सांगलीकर झालो. त्याचप्रमाणे  माझ्या दोन्ही मावश्या म्हणजे दातार व परांजपे कुटुंबीय त्याच काळात (एक पुण्याहून तर दुसरे मुंबईहून ) नाशिकला भगूरमध्ये रहायला गेले ते कायमचे नाशिककरच बनले.

माझ्याहून एकदीड वर्षाने मोठी असणारी उषामावशी (उषा परांजपे) माझ्या दृष्टीने मावशीपेक्षा थोरली बहीण ह्या नात्याची मला वाटते. कारण मला सख्खी बहीण नसल्याने मी लहानपणापासून तिलाच बहीण मानत आलो आहे.  नकोशी म्हणून चार बहिणींनंतर जन्माला आल्याने व वडील लवकर गेले व आई संधिवाताने आजारी अशा स्थितीत तिने सातार्‍यात आपले बालपण काढले.  सातारला असताना ती तिच्या आईबरोबर आमच्या घरापासून दूर अंतरावर रहायची. गरीबी व काबाडकष्ट करावे लागले तरी सतत आनंदी व उल्हसित असायची. त्यामुळे मी तिला आपला आदर्श मानले होते. माझे सारे बालपण तिच्याबरोबर खेळण्यात, हिंडण्यात गेले. ती चहा प्यायची नाही मग  मी पण चहा घेत नसे. आम्ही कोठे एकत्र गेलो तर लोक आम्हाला बहीणभाऊच समजायचे. त्यामुळेच मी नाशिकमध्ये तिच्या घरीच मुक्कम केला व रात्रभर गप्पा मारल्या.तिचे काही लेख मी तिच्या आवाजात रेकॉर्ड करून घेतले तिने केलेल्या कलाकॄती पाहिल्या.

 बालपण कष्टात गेले तरी लग्नानंतर तिच्या वाट्याला सुख आले. मुंबईच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या आधुनिक विचारसरणीच्या परांजपे कुटुंबात ती सून म्हणून गेली व तेथले संस्कार तिने आपलेसे केले.   तिच्यापेक्षा मोठी असणारी विमलमावशीचे दातार कुटुंब नोकरीनिमित्त नाशिकजवळ भगूरला स्थायिक झाले होते. त्यामुळे उषामावशीचे यजमान शरदराव यांनीही  भगूर येथे ऒषधाचे दुकान काढले.  नंतर दोन्ही कुटुंबे १९६५च्या सुमारास नाशिकला रहावयास गेली. आता विमलमावशीच्या सुमेधा आणि नयना या दोन मुली व मुलगा धनंजय तसेच उषामावशीचा थोरला मुलगा भूषण नाशिक्मध्ये रहात आहेत. काही कार्यक्रमांनिमित्त आमचे व त्यांचे नाशिक - सांगली दॊरे होत असतात.

या दोन्ही मावश्यांचे वॆशिष्ठ्य सांगायचे म्हणजे त्या जिद्दीच्या व आपल्या मतावर ठाम असणार्‍या व त्यांनी स्वीकारलेल्या तत्वाशी कोणतीही तडजोड न कणार्‍या ताठ कण्याच्या व्यक्ती आहेत, ( शुभांगी पण तशीच होती ) त्यामुळेच काही मते पटत नसली तरी मला त्यांचेबद्दल आदर आहे.

 विमलमावशी पुण्यातील सदाशिव पेठेत धार्मिक संस्कारात वाढली असल्याने देवावर अपार श्रद्धा असणारी आहे.   मात्र मॄणाल गोरेंच्या कार्याशी संपर्क आल्याने उषामावशीची बांधिलकी समाजवादी विचारसरणीशी जडली, उषामावशीने मुलगा मोठ्या फ्लॅटमध्ये रहात असतानाही स्वत:  सिडको चाळीतील छोट्या घरात राहण्याचे पसंत केले आहे. चार वर्षांपूर्वी तिच्या यजमानांचे ( शरदराव) निधन झाले. त्यावेळी देहदान करण्यात तिने पुढाकार घेतला होता. तिचे चोफेर वाचन, विविध विषयांवर लेखन, सामाजिक कार्य चालू असते. तिने चांगल्या पुस्तकांचे घरात वाचनालय केले आहे व शेजारच्यांना पुस्तके वाचण्यास ती उद्युक्त करते. त्यांच्या कोणत्याही अडचणीत त्यांना मदत करते. रामदेवबाबा यांची ती खरी शिष्या बनली आहे. योग व पातंजलीचे पदार्थ कटाक्षाने वापरते.


 दोन्ही मावशींच्या संसारात मोठी संकटे आली व  अगदी जवळच्या व्यक्ती त्यांना कायमच्या सोडून गेल्या. त्यामुळे सध्या या  दोघी खचून गेल्या असल्या तरी त्यांनी हार मानलेली नाही व पुन्हा जिद्दीने त्या जीवनाशी संघर्ष करीत आहेत. दोघींना एकलेपणाचे दुख: असले तरी त्या एकत्र रहायला तयार नाहीत. कारण दोघींना आपले स्वातंत्र्य जाईल आसे वाटते. उषामावशी मला म्हणाली ’ तू अमेरिकेला रहायला जाणार हे ठीक आहे. पण ही वेळ जर शुभांगीवर आली असती तर तिने सांगली सोडली नसती.  नाशिकच्या माझ्या दॊर्‍यात मला या दोघींकडून जीवनाचे तत्वज्ञान दोन्ही बाजूंनी  शिकावयास मिळाले.

सकाळी हिंडत असताना सप्तशॄंगी व दुर्गामाताची सुंदर मूर्ती असणारी देवळे दिसली. जॉगिंग ट्रॅकच्या पटांगणात प्रॊढांसाठी व्यायामाची साढने पाहिली. सर्वसामान्य घरातील प्रॊढ स्त्रियादेखील त्याठिकाळी व्यायाम करीत असल्याचे पाहून मॊज वाटली.


 दुसरे दिवशी भूषण (उषामावशीचा मुलगा) बरोबर मी शुभांगीची भाची माधवी दीक्षित हिला भेटायला गेलो. तिचे यजमान उदयन्‌ यांचे सजावट नावाचे फर्निचरचे दुकान आहे. दीक्षित घराणे हे नाशिकमधील जुने व नावाजलेले घराणे आहे, विमलमावशीचे जावई डॉ. जयराम महाबळ यांचा फिजिकोथेरॅपीचा पिढीजात व्यवसाय आहे. आता त्यांची दोन मुलेही या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन व्यवसाय करीत आहेत.


 ती भेट आटोपून आम्ही पुस्तकांच्या दुकानाकडे आमचा मोर्चा वळवला. नाशिकसंबंधी मराठी माहिती असणारी पुस्तके विकत घेतली. नंतर विमलमावशीकडे जेवावयास गेलो. मुलगा हरिद्वारला गेला असल्याने सध्या ती तिच्या नयना (चिपळूणकर)व सुमेधा(महाबळ)  या मुलींकडे  रहात आहे. तिने माझ्या लहानपणीच्या अनेक घटना मला सांगितल्या. मी भेटल्यामुळे तिला बरे वाटले.

जेवणानंतर दुपारी मी भूषणच्या घरी गेलो तेथे सांगलीची माहेरवाशीण व वालचंदची विद्यार्थिनी असलेली भूषणची बायको सुवर्णा व त्यांची मुलगी मनाली ( पुण्यात सीऒईपीमध्ये बीई कॉम्प्युटर झालेली व सुवर्णपदक मिळविलेली ) भेटली. दीड वर्षांपूर्वी त्यांचा अत्यंत हुषार व मॅकेंझी मध्ये उच्च पदावर काम करीत असलेला मुलगा निनाद याचे पुण्यात स्मार्ट सिटीबाबत मिटींग साठी आला असताना अचानक हार्ट अटॅकने दु:खद निधन झाले. त्यामुळे घरातील सर्वजण विलक्षण तणावाखाली व दु:खात होते.

याही परिस्थितीत सुवर्णाने रेशीमधाग्यांचा वापर करून वर्षभरात शेकडोअप्रतिम डिझाईन केलेली पाहून मला गहीवरून आले.

तिला मी नाशिकच्या संकेतस्थळासाठी मदत करायचे आवाहन केले. मी आणलेली सर्व नाशिकची पुस्तके तिच्याकडेच ठेवली. मनालीने तिच्यासाठी लॅपटॉप[ मागविला आहे. ती आपल्या ज्ञानदीपच्या टीममध्ये महत्वाची सहकारी बनेल असे मला वाटते. भूषण मायको व महेंद्र कंपनीतून मॅनेजरच्या पदावरून स्वेच्छेने निवृत्ती घेऊन इन्व्हेस्टरचा व्यवसाय करीत आहे. दहावी ते बारावीपर्यंतच्या मुलांना फुकट शिकविण्याचे कार्य तो करीत आहे. सुवर्णाही एका शाळेत सेवा म्हणून शिक्षण देण्यात आपले मन रमवत आहे. ज्ञानदीपचे कार्य दोघांनाही एक नवे आवडते कार्यक्षेत्र देऊ शकेल असे वाटते.

यापूर्वीच्या नाशिक भेटींमध्ये मी भगूरमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे घर, त्र्यंबकेश्वर, वणी येथील सप्तशॄंगी देवी, शिर्डीचे साईबाबा तसेच नाशिकमधील प्रेक्षणीय स्थलॆ पाहिली होती. नाशिक्मध्ये ज्ञानदीपतर्फे एक दिवसाचे ग्रीनबिल्डींगवर कार्यसत्रही आम्ही घेतले होते. सातपूरच्या कारखान्यांसाठी प्रदूषण नियंत्रण सल्ला देण्यासाठीदेखील तसेच  काकासाहेब वाघ कॉलेजमध्ये भाषण, देण्यासाठी जाण्याचा योग आला होता.  माझे  दोन विद्यार्थी कडवे आणि वरणे येथे प्रोफेसर म्हणून कार्य करीत आहेत. सांगलीच्या कॄष्णेप्रमाणेच नाशिकमधील गोदावरी नदीच्या प्रदूषणाबद्दल आम्ही संशोधन प्रकल्प केले होते. तेथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी माझे विद्यार्थी होते. या व अशा अनेक कारणांनी नाशिकबद्दल माझ्या मनात आपुलकीची भावना आहे.

सांगलीच्या मानाने नाशिकची लोकसंख्या, उद्योगधंदे, व पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. नाशिक - दिल्ली विमानसेवाही मी तेथे असताना सुरू झाल्याचे कळले. नाशिकचा कुंभमेळा हा एक राष्ट्रीय पातळीवरील मोठा उत्सव असतो. नाशिक जिल्ह्यात अनेक साखर कारखाने, त्र्यंबकेश्वर, शिर्डीसारखी लोकप्रिय देवस्थाने असल्याने नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्रात मानाचे स्थान आहे. तेथे माय नाशिक संकेतस्थळाच्या निमित्ताने ज्ञानदीपचे कार्य पोचले तर नवे सहकारी व कार्यकर्ते मिळतील असा मला विश्वास वाटतो.





No comments:

Post a Comment