स्वानंद वास्तू - अयशस्वी उद्योजकाची शोकांतिका
प्रत्येक वास्तू ही केवळ प्रॉपर्टी नसते. तिला इतिहास असतो. माजी प्रा. स्वर्गीय विकासचंद्र बहुलेकर यांनी आमच्या घराशेजारी स्वानंद उभे केले. प्रा. बहुलेकर स्वतः किर्लोस्करमध्ये नोकरी करून वालचंद कॉलेजमध्ये मेकॅनिकल विभागात रुजू झाले होते. ते मितभाषी पण अतिशय मेथॉडिकल काम करीत असत.
Biodata Ref: https://walchandheritage.com/index.php/retired-teachers-biodata/254-late-prof-v-r-bahulekar
माजी प्रा. स्वर्गीय विकासचंद्र बहुलेकर
मी आणि बहुलेकर दोघेही वालचंद कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाने सुरू केलेल्या कॉलेजबाह्य व्यक्तींसाठी संगणक प्रशिक्षण वर्गात युनिक्स, बेसिक आणि कोबोल लॅंग्वेज शिकवित असू. वालचंद कॉलेजने शिवाजी युनिव्हर्सिटी व गोवा युनिव्हर्सिटीच्या परिक्षांचे संगणकीकरण करण्याचे काम घेतले होते. प्रा. मुकुंद शियेकर यांच्या लीडरशिपखाली आम्ही सर्व काम करीत होतो.
एके दिवशी रात्री बारा वाजता काम संपवून आम्ही दोघे पावसातून घरी आल्याचे मला आठवते. अगदी छोट्या आजाराने हार्ट अटॅक येऊन २९ फेब्रुवारी १९९६ रोजी त्यांची प्राणज्योत मावळली.
त्यांच्या अकाली निधनाने सर्व जबाबदारी राजू ( सुदीप) बहुलेकरवर येऊन पडली.
स्वत: बी. ई. मेक. असूनही नोकरी न करता स्वत: चा उद्योग करायचा या जिद्दीने लिंक द ट्रेड या नावाने सोलर पॅनेलचा व्यवसाय त्याने सुरू केला. ज्ञानदीपच्या बिल्डींगवर त्यांचेच सोलर पॅनेल आम्ही बसविले. विद्युत मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळे त्याला अपेक्षित फायदा होईना. त्यातच बहिणीचे लग्न आणि आईचे आजारपण यात त्याच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. नाईलाजाने त्याला स्वानंद विकावे लागले.
ज्ञानदीपने ती वास्तू केवळ त्यांना उभारी देण्यासाठी भाड्याने घेतली. वालचंद कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेसाठी गेस्ट हाऊस तसेच मराठी विज्ञान प्रबोधिनीसाठी कार्यालय करण्यासाठी महिना ३०००० रु. भाड्याने आम्ही जागा घेतली.
या वास्तूचे उद्घाटन डेक्कन एज्यकेशन सोसायटीचे सांगलीतील व्यवस्थापक आणि विज्ञान शिक्षक गोपां. कंटक यांचे यांचे् भाचे डॉ. विश्राम लोमटे याच्या हस्ते थाटामाटाने करण्यात आले.
वालचंद कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेसाठी गेस्ट हाऊस
स्थानिक व्यवस्थापनाची रीतसर अनुमती घेऊन आणि निमंत्रण पत्रिका छापून वालचंद कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेसाठी गेस्ट हाऊसचे १५ ऑगस्ट २०२५ रोजी उद्घाटन करण्याचे ठरले. प्रत्यक्षात आयत्यावेळी कॉलेजच्या व्यवस्थापनाचे कोणीही उपस्थित राहिले नाही.
मी त्यावेळी अमेरिकेत होतो. काही जणांनी ती वेळ निभावून नेली पण मला ते पटले नाही. वालचंद कॉलेजच्या स्टेक होल्डर्सना ही गेस्ट हाऊसची कल्पना मान्य नाही असे मला फोनवरून सांगण्यात आले. व्यवस्थापनाच्या इच्छेविरुद्ध मला काहीही करायचे नव्हते. मी ती जागा त्या दिवशीच सोडण्यास कळविले व सर्व सामान काढून किल्या मालकांकडे सुपूर्त केल्या. तीन चार महिन्यांचा जवळजवळ एक लाख रुपयांचा खर्च निष्कारण वाया गेला.
त्या स्वानंदची गेल्या वर्षभर बेवारस स्थिती पाहून वाईट वाटते. ती केवळ प्रॉपर्टी नसून एक अयशस्वी उद्योजकाची शोकांतिका आहे हे स्वत: उद्योजक असणा-याना कळत नाही. याची खंत वाटते.
- डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.

