Saturday, June 23, 2018

ज्ञानदीपचे आणखी एक अधुरे स्वप्न - विज्ञान छंदगॄह


(१९८४ साली मराठी विज्ञान प्रबोधिनीच्या म्हैसाळ येथील संमेलनाच्या निमित्ताने काढलेल्या स्मरणिकेतील लेख - विज्ञान छंदगृहाचे माझे त्यावेळचे स्वप्न आजही अपूर्णच राहिले आहे.)
आज या स्वप्नाची आठवण होण्याचे कारण म्हणजे वालचंद कॉलेजमधील माझे गुरू आणि संशोधन आणि नवोद्योग यात अनुभव व रुची असणार्‍या प्रा. भालबा केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदीप फॊंडेशनने असाच एक मोठा प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले आहे.


साधे कागदाचे विमान. ते पण आता खर्‍या विमानासारखे आकाशात झेपावणार होते. सारी मुले डोळे विस्फारुन विमानाकडे पाहात होती. प्रत्येकाच्या हातात विमान करण्याचे साहित्य होते. आपणही तसेच विमान करावे अशी तीव्र इच्छा सर्वांच्या मनात निर्माण झाली होती. त्यांच्या अनेक शंकांना मोठ्या आत्मविश्वासाने उत्तरे देत एक विद्यार्थी विमानाचा तोल आणि पंखांचा बाक तपासून पाहात. होता.दुसर्‍या बाजूला एका टेबलाभोवती बरीच मुले कोंडाळे करून उभी होतॊ. इलेक्ट्रिकल उपकरणातून चित्रविचित्र आवाज येत होते. त्याचे सर्कीट समजावून सांगण्यात एक कॉलेज विद्यार्थी गर्क झाला होता. प्रभावी विज्ञान शिक्षणाचा एक अभिनव प्रयोग सुरू झाला होता.

ज्या कल्पनेने मराठी विज्ञान प्रबोधिनीने हा विज्ञान छंदवर्ग सुरू केला त्यात केवळ करमणूक वा पूरक अभ्यासाची सोय एवढाच उद्देश नाही तर आजच्या विज्ञानयुगातील ते महत्वाचे राष्ट्रीय कार्य आहे ही भावना त्यामागे आहे.

विकसित राष्ट्रांत आज विज्ञान व तंत्रज्ञान यांची इतक्या झपाट्याने प्रगती होत आहे की भारतासारख्या विकसनसशील राष्ट्राला तो वेग गाठणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. त्यातच गरीबी, अज्ञान, अंधश्रद्धा व वाढती लोकसंख्या असे अनेक प्रश्न या विज्ञानप्रगतीत , खीळ घालत आहेत. परदेशात विकसित झालेले तंत्रज्ञान व आधुनिक साधने यांचा देशात येणारा ओघ एवढा वाढला आहे की, स्वदेशी उद्योग त्यामुळे धोक्यात आले आहेत. यावर जर वेळीच उपाययोजना केली नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या या आक्रमणामुळे आपण पुन्हा एका वेगळ्या अर्थाने परतंत्र आणि परावलंबी होण्याची भीती आहे.
उदाहरणच द्यायचे झाले तर परदेशी घड्याळे, गणकयंत्रे, टेप व व्हिडिओ कॅसेट्स अत्यंत स्वस्त किंमतीत आपल्या देशात मिळू लागल्या आहेत.या वस्तूंच्या स्वदेशी उत्पादनाचा खर्च परदेशी मालापेक्षा बराच जास्त आहे. शिवाय तांत्रिक गुणवत्ताही तेवढी सरस नाही. साहजिकच स्वदेशी वस्तूंची विक्री पूर्णपणे परदेशी वस्तूंच्या आयातीवर अवलंबून राहणार आहे. सध्याच्या काळात स्वदेशी मालाबद्दल आग्रह कोठेच दिसत नसल्याने हा धोका अधिकच संभवतो.

यासाठी परदेशी वस्तूंच्या एवढी तांत्रिक गुणवत्ता व किंमत असणार्‍या वस्तूंची निर्मिती हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. अर्थात त्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान यांचा जलद गतीने विकास करणे व त्यासाठी बुद्धीमान विद्यार्थ्याम्मधून तंत्रकुशल सण्शोधक निर्माण होण्यासाठी लहानपणापासून संशोधनाच्या सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

शाळा, कॉलेजात विज्ञान शिक्षण मिळत असले तरी परीक्षा पद्धतीस अवास्तव महत्व दिले गेल्याने जिज्ञासू व धडपड्या मुलांची फार कुचंबणा होते. यावर उपाय म्हणजे केवळ मुलांसाठी विज्ञान छंदगृहांची उभारणी. या विज्ञान छंदगृहातून महत्वाचे संशोधन वा नवीन तंत्रज्ञानाचा विकास होणे असंभवनीय असले तरी उद्य़ाचे संशोधक तयार करण्यासाठी मुलांवर योग्य ते संस्कार करण्याचे कार्य या छंदगृहांमुळे निश्चितच साध्य होईल.

या विज्ञान छंदगृहामध्ये मुलांना त्यांच्या कल्पनेनुसार प्रयोग करण्याचे व उपकरणे बनविण्याचे स्वातंत्र्य दिले जाईल. तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन पक्त आवश्यक भासेल त्यावेळीच दिले जाईल. अन्यथा सर्व मार्गदर्शन मोथि मुले छोट्या मुलांना करतील. संदर्भ ग्रंथालय, कार्यशाळा व इतर साधनसामुग्री यांची सोय येथे करावी लागेल. विज्ञानाच्या विविध शाखा लक्षात घेता सर्व साधनसामुग्री या छंदगृहात सुरुवातीपासून उपलब्ध करून देणे अवघड आहे यात शंका नाही. परंतु टप्प्याटप्प्याने जागा व साधनांचि तरतूद करत गेल्यास मुलांच्या आवाक्यात असणार्‍या बहुतेक सर्व प्रयोगांसाठी सोय करणे शक्य आहे. अर्थात हे सर्व जनतेकडून आणि विशेषकरून मुलांच्याकडून किती प्रतिसाद मिळतो यावर अवलंबून आहे.

मुलांच्या मनांत अशा छंदगृहाबद्दल कुतुहल व आकर्षण निर्मान होण्यासाठी सर्वप्रथम काही मोजक्या पण अत्याधुनिक अशा तयार उपकरणांचा वापर करावयास हवा. उदाहरण द्यायचे झाले तर प्रकाश, रंग व आवाज यांची आतषबाजी करणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे दूर राहून नियंत्रित करता येणार्‍या ( रिमोट कंट्रोल्ड) मोटारी, आकाश दर्शनासाठी मोठी दुर्बीण शिक्षणाच्या दृष्टीने याचा उपयोग थोडा असला तरी मुलांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य या उपकरणात निश्चितच आहे. प्रथम केवळ करमणूक म्हणून मुले आली तरी तशी उपकरणे बनविण्याची ओढ त्यांच्या मनात निर्माण होईल व त्यासाठी सर्व मदत छंदगृहात मिळेल हे कळल्यावर कुतुहलातून शिक्षण, शिक्षणातून प्रयोग व प्रयोगातून संशोधन ही साखळी प्रक्रिया सुरू होईल.

त्यामुळे पहिल्या टप्प्यात एक मोकळा हॉल, दोन टेबले व इलेक्ट्रॉनिकची काही सर्कीट यावर छंदगृहाची सुरुवात होऊ शकेल. याच हॉलचा उपयोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्र, फिल्म वा स्लाईडशो यासाठी होऊ शकेल. १० ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी काही सोपी सर्कीत तयार करण्यास सांगणे शक्य आहे. यास साधने कमी लागतात. खर्च कमी येतो. यापुधचा टप्पा म्हणजे फेविकॉल, प्लॅस्टिक, पत्रा व लाकूड यांचा वपर करून उपकरणे बनविण्याची सोय करणे. त्यासाठी आवश्यक असणारि सामुग्री व हत्यारे विकत घेऊन काही उपकरणे मुलांच्याकडून करवून घेणे. यामध्ये प्रथम भर द्यायचा तो स्प्रिंग, लोहचुंबक आणि बॅटरी सेल यांच्या साहाय्याने स्वयंचलित खेळणी बनविण्यावर. कारण खेळण्याचे आकर्षण मुलांना स्वभावतःच असते. शिवाय खेळणे बनविताना वस्तूचे गुणधर्म व वैज्ञानिक तत्व यांचीही मुलांना माहिती होते.

मनोरंजनातून पुढची पायरी म्हणजे नेहमीच्या वापरातील उपयुक्त साधने व उपकरणे बनविणे. ताणकाटा, विजेची घंटा, कारंजे,रॉकेलचा पंप यासारख्या वस्तू बनविताना दैनंदिन व्यवहारात विज्ञानाचा कसा उपयोग होतो हे समजेलच शिवाय ही उपकरणे स्वतः तयार केल्याने प्रयत्न केल्यास आपण मोठे कारखानदार होऊ असा आत्मविश्वास मुलांच्या मनात निर्माण होईल.

यानंतरचा टप्पा म्हणजे सूर्यशक्तीवर चालणारी आधुनिक साधने, पवनचक्की, बायोगॅस संयंत्र यासारख्या उपकरणांची कार्यपद्धती, तांत्रिक ज्ञान आणि निर्मिती याविषयी माहिती उपलब्ध करून देणे. विज्ञानविषयक मराठी, इंग्रजी पुस्तके, मासिके व इंटरनेट यावरून अशी माहिती मिळू शकते. तज्ञांचे मार्गदर्शन व प्रत्यक्ष प्रतिकृती व साधनांचे निरीक्षण यातून मुलांना हे तंत्रज्ञान आत्मसात करणे सहज शक्य होईल.

या छंदगृहासाठी जनमानसात कुतुहल व आकर्षण निर्माण करण्यासाठी एक प्रभावी उपकरण म्हणजे दुर्बीण. छंदगृहातून या दुर्बिणीच्या साहाय्याने नियमितपणे आकाशदर्शनाचे कार्यक्रम व्हावेत. त्याद्वारे चंद्राचा पृष्ठभाग, गुरूचे गृह आणि शनीची कडी, सूर्य व चंद्र ग्रहण क्वचितप्रसंगी धूमकेतू पहायला मिळतात असे कळल्यावर सर्वसामान्य जनताही छंदगृहाकडे आकर्षित होईल.


तंत्रविज्ञान व निसर्ग संग्रहालये

लहानपणापासूनच मुलांच्या मनात सभोवतालच्या परिस्थितीबद्दल व घडणार्‍या घटनांबद्दल जिज्ञासा असते. मूल का व कसे या प्रश्नांचा शोध घेत मोठे होते. या प्रश्नांना योग्य उत्तर देण्याची जबाबदारी पालक व शिक्षकांवर येऊन पडते. रोजच्या घाईगडबडीमुळे या सर्व प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत. बर्‍याच वेळा अशा प्रश्नांची उत्तरे पालकांना व शिक्षकांनाही माहीत नसतात. योग्य व यथार्थ माहिती मिळाली नाही तर अंधश्रद्धा वाढीस लागते.याउलट योग्य मार्गदर्शन मिळाले तर जिज्ञासू मूल संशोधक बनू शकते.

विज्ञानाच्या बाबतीत तर या जिज्ञासापूर्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. विज्ञान प्रदर्शन हे निसर्ग व तंत्रज्ञानातील प्रगतीची प्रत्यक्ष माहिती मिळविण्याचे हे एक प्रभावी साधन आहे. त्याबरोबरच मुलांना स्वतःच्या हाताने विज्ञान प्रतिकृती बनविणे व त्याचे प्रदर्शन करणे मनापासून आवडते. शाळाकॉलेजात दरवर्षी अशी विज्ञान प्रदर्शने भरत असतात. भारतात अनेक मोठ्या शहरांत अशी कायमस्वरुपी मोठी विज्ञान प्रदर्शने व प्रत्यक्ष प्रयोग करता येऊ शकणारी छंद गृहे कार्यरत आहेत.

मुंबईचे नेहरू प्लॅनिटोरियम व पुण्याचे होमी भाभा विज्ञान छंदगृह ही त्याचीच उदाहरणे होत. सांगली येथे असे प्रदर्शन उभारणे आवश्यक आहे. त्याच्या संयोजनास साहाय्य व्हावे म्हणून परदेशातील अशा काही प्रदर्शनांची माहिती देत आहे.

अमेरिकेत अशी तंत्रविज्ञान प्रदर्शने व निसर्ग संग्रहालये जवळजवळ प्रत्येक शहरात आहेत. माझ्या अमेरिकेच्या दौर्‍यात मला अशा काही प्रदर्शनांना भेट देण्याची संधी मिळाली. त्यापैकी सॅन ओसे येथील टेकम्युझियम, ह्यूस्टन येथील निसर्गविज्ञान संग्रहालय व सॅन फ्रॅन्सिस्को येथील एक्स्प्लोरेटोरियम यांची माहिती खाली देत आहे.

सॅन ओसे येथील टेकम्युझियम-

या संग्रहालयात जैव अभियांत्रिकी, भूगर्भशात्र, अपारंपारिक ऊर्जा साधने, संगणकातील मायक्रोचिपचे डिझाईन व सिलिकॉन व्हॅलीतील संशोधनाचा इतिहास (संगणकक्षेत्रात अग्रेसर असणार्‍या कॅलिफोर्नियाला सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते.) यांची माहिती देणार्‍या चलप्रतिकृती पहावयास मिळतात. मुलांना प्रयोग करून पाहण्यासाठी अनेक वैज्ञानिक खेळणी येथे आहेत. याविषयी सविस्तर माहिती http://www.thetech.org या संकेतस्थळावर पाहता येईल.

ह्यूस्टन येथील निसर्गविज्ञान संग्रहालय-

पुरातत्व काळापासून निसर्गात झालेल्या घडामोडींची माहिती, पृथ्वीवर निरनिराळ्या ठिकाणी असणारी निसर्गसंपदा, वृक्षवेली, पशुपक्षी, कीटक, जलचर या सर्वांची माहिती व्हावी या दृष्टीने याची उभारणी केली आहे. आफ्रिकेतील रेन फोरेस्ट प्रत्यक्षात पाहता यावे यासाठी काचेचा मोठा घुमट तयार केला असून जिवंत फुलपाखरांचे संग्रहालय हे याचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे सिद्ध करणारा फोकाल्टचा पेंड्युलम व डायनासोर प्रचंड मोठे सांगाडे ही येथील विशेष आकर्षणाची ठिकाणे आहेत. याविषयी सविस्तर माहिती http://www.hmns.org/ या संकेतस्थळावर पाहता येईल. 



सॅन फ्रॅन्सिस्को येथील एक्स्प्लोरेटोरियम-

प्रचंड मोठ्या हॉलमध्ये ६५० हून जास्त वैज्ञानिक उपकरणे व चलप्रतिकृती असणारे हे संग्रहालय कॅलिफोर्नियात अतिशय प्रसिद्ध आहे. भूमिती, प्रकाश, गति, चुंबकत्व, आधुनिक विज्ञान या विषयांतील तत्वे बालांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना सहज समजावून देणारी खेळणी ( एवढ्या मोठ्या प्रतिकृतींना खेळणी म्हणणे बरोबर नाही) येथे आहेत. याविषयी सविस्तर माहिती http://www.exploratorium.edu या संकेतस्थळावर पाहता येईल.


 या सर्व प्रदर्शनाला प्रत्यक्ष भेट देणे सर्वांना शक्य नसले तरी www.youtube.com या संकेतस्थळावर याच्या व्हिडिओ क्लिप पहावयास मिळतील. याविषयी सविस्तर माहिती ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशनच्या  www.vidnyan.net    www.school4all.org  या संकेतस्थळांवर देण्यात आली आहे. ती पहावी.

माझ्या डोळ्यासमोर जे उद्याच्या भारताचे स्वप्न आहे त्यात गावोगावी मध्यवर्ती ठिकाणी अशी विज्ञान संशोधन छंदगृहे आहेत व नव्या पिढीची स्फूर्तीकेंद्रे म्हणून ती काय करीत आहेत. आपल्या फुरसतीच्या वेळातसुट्टीत व रात्रीदेखील छोटे संशोधक त्यात उपकरणे बनवीत आहेत. प्रयोग करीत आहेत. स्वतः धडपडत शिकत आहेत. कुशल तंत्र वैज्ञानिक व शास्त्रज्ञ बनण्याची ईर्षा त्यांच्या मनात निर्माण होत आहे. त्यातूनच ग्रामविज्ञानाच्या कल्पनेने भारलेले काही तरूण दूर दुर्गम ग्रामीण भागांत जाऊन तेथे विज्ञानाचा नवा प्रकाश पोहोचवीत आहेत. इतर काही प्रयोगशाळातील संशोधनातून निसर्गाची रहस्ये उलगडण्याची उमेद बाळगून आहेत. काही तंत्रज्ञ बनून विविध वस्तूंच्या निर्मितीप्रक्रियांचे ज्ञान मिळविण्याच्या मागे आहेत. तर काही जीवरासायनिकवैद्यकीय वा पर्यावरण शास्त्रात नवे संशोधन करण्यात रंगून गेले आहेत.


या छंदगृहातील प्रयोगांचे व चर्चांचे पडसाद मोठ्या माणसांच्या सुस्त प्रयोगशाळासंथ कारखाने आणि मंद उत्पादन केंद्रे यावर आदळून नवी क्रांती घडवून आणित आहेत.छोट्या संशोधकांच्या कार्याने सारे खडबडून जागे झाले आहेत आणि नवा विज्ञानाधिष्ठित बलशाली भारत उदयास येत आहे.

हे स्वप्न तर खरेचपण विस्फारलेल्या डोळ्यांनी उपकरणे पाहणार्‍या मुलांच्या नजरेतूनबुद्धी गुंग करणार्‍या त्यांच्या प्रश्नांमधून आणि वक्तृत्वातील जोषात हे स्वप्न वास्तव सृष्टीत येणे सहज शक्य आहे असा मला विश्वास वाटतो.


विज्ञान व इतर सर्व विषयांवर इंटरनेटवर असणार्‍या अशा अमूल्य माहितीच्या खजिन्याची माहिती घेण्यासाठी www.school4all.org या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. आपल्या कल्पना, लेख व माहिती यांना या संकेतस्थळावर आपल्या नावानिशी प्रसिद्धी देण्यात येईल. मोफत सदस्य होऊन माहिती व ध्वनीचित्रफिती डाऊनलोड करण्याच्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशन आपणास करीत आहे. 

No comments:

Post a Comment