Friday, June 1, 2018

समुद्रमंथन योग्य की अयोग्य ?

देव आणि राक्षस यांनी एकत्र मिळून समुद्रमंथन केले आणि समुद्राच्या तळाशी असणारी चॊदा रत्ने मिळविली अशी कथा आहे. मात्र या रत्नांमध्ये अमॄत आणि विष यांचे कलशही होते. ज्याला अमॄत पाहिजे त्याने विषही घेतले पाहिजे अशी अट असल्याने राक्षसांनी त्यास नकार दिला. मात्र देवांनी हे आव्हान स्वीकारले आणि शंकराने विष प्राशन करून देवांना अमॄत मिळवून दिले.

आजच्या घडीलाही ही कथा लागू पडते. उद्योग व विकास करताना पर्यावरणाचा र्‍हास व प्रदूषण हे धोके उद्‍भवतात. मानवाच्या प्रगतीसाठी व रोजगार्निर्मिती आणि आर्थिक उन्नतीसाठी विकास ही एक आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे प्रदूषणाची भिती बाळगून विकासाला विरोध करणे चुकीचे आहे.

सुदॆवाने प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण करण्याचे तंत्रज्ञान मानवाने विकसित केले आहे. शासनानेही पर्यावरण रक्षणासाठी उद्योजक व प्रकल्प उभारणार्‍या संस्थांवर योग्य ती उपाययोजना करण्याविषयी कडक निर्बंध घातले आहेत. एवढेच नव्हे तर आवश्यक नियंत्रण व्यवस्थेची पाहणी केल्यानंतरच मुख्य उद्योग वा प्रकल्प सुरू करण्याची संमती दिली जाते.

एवढे असूनही प्रत्यक्षात प्रदूषण होत असल्याचे दिसत असल्याने जनतेचा प्रदूषण नियंत्रणावरील विश्वास उडाला असून त्यांचा कोणत्याही नव्या उद्योगास वा प्रकल्पास विरोध होत आहे.


येथे उद्योग वा प्रकल्प करणार्‍याची प्रदूषण नियंत्रण करण्याविषयी अनास्था तसेच तपास यंत्रणांमधील भ्रष्टाचार हे महत्वाचे कारण असून त्यावर अंकूश ठेवणाची गरज आहे.हे काम जनताच करू शकते. मात्र केवळ आंदोलन व उद्योगाला विरोध असे त्याचे स्वरूप न राहता कायदा व तंत्रज्ञान यांची प्रभावी अंमलबजावणी होते आहे का हे तपासण्याची आवश्यकता आहे. पर्यावरण अभियांत्रिकी विषयातील तज्ञ व अभियंते यानी यात पुढाकार घेऊन जनतेचे व स्वयंसेवी संस्थांचे नेतृत्व करावयास हवे.

असे झाले तर उद्योग, विकासक तसेच प्रदूषण नियंत्रक यांच्यावर प्रभावी अंकुश ठेवता येईल व पर्यावरणाचा र्‍हास न होता विकास साधता येईल.

No comments:

Post a Comment