पुण्यात स्वारगेट स्टेशनवर रिक्षात बसलो. कर्वेनगरचा पत्ता सांगूनही मी गाफिल राहिल्याने रिक्षावाल्याने रिक्षा लक्ष्मी रोडवर नेली. तो उत्तर प्रदेशातील होता. मला नक्की पत्ता माहीत नाही हे त्याने ताडले व आपल्यालाही कर्वेनगर कोठे आहे माहीत नाही असे सांगितले.
मग सुशांतशी फोनवर संपर्क साधत लांबच्या रस्त्याने कसा तरी सुशांतपर्यंत पोचलो. पुण्यात अनेक वेळा गेलो असतानाही रस्त्यांचा भुलभुलॆय्या व रिक्षेवाल्याची चलाखी यांनी मला चाट मारली.सुशांतने मला राजाराम पुलावरून विठ्ठलमंदिर रस्त्याने घरी यायचा जवळचा मार्ग दाखविला. रात्री जेवण झाल्यावर लांबवर फिरून कर्वेनगर परिसर पाहिला. दत्ताचे देऊळ बघितले. चाळीसारख्या घरातील अडचणीला कंटाळून सुशांत फ्लॅट घ्यायच्या मनस्थितीत आहे पण मनाजोगता व बजेटमध्ये बसणारा फ्लॅट पुण्यात मिळणे किती दुरापास्त झाले आहे हे लक्षात आले.
दुसरे दिवशी सुशांतबरोबर सिंहगड रोडवरील सरितावॆभव येथे शुभांगीच्या थोरल्या बहिणीकडे गेलो. तिची सून मधुरा घरात खाद्यपदार्थ करून मोठा व्यवसाय करते हे पाहून कॊतुक वाटले. तेथून ज्ञानदीप टीमच्याच प्रतिमा व प्रणिता इनामदार यांच्या सांगवीच्या घरी जेवणासाठी गेलो. सिंहगड रोड ते सांगवी हे मोटारसायकलने जाण्यासाठी पाऊण तास लागला. वाहतुकीचे नियम न पाळणार्या वाहनांच्या गर्दीतून शिताफीने वाट काढत जाणारे लहान मोठे, स्त्री पुरूष पुणेकर पाहून त्यांच्या कॊशल्याविषयीचा आदर द्विगुणित झाला.
ज्ञानदीपची पुण्यातील शाश्वत टीम
प्रतिमा व प्रणिताच्या घरी जेवण घेताना साहजिकच ज्ञानदीपविषयी गप्पा झाल्या. (सुशांत, प्रणिता, प्रतिमा)
ज्ञानदीप टीममधील बहुतेक सर्व सहकारी बराच काळ ज्ञानदीपमध्ये काम करून पुण्यात प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करीत आहेत. मायमराठी, कोल्हापूर महानगरपालिका, बंगलोर महाराष्ट्र मंडळ, मराठी साहित्य संमेलन व अशा अनेक वेबसाईट तसेच परदेशी प्रोजेक्ट्स यशस्वीपणे पूर्ण करणारी ही मंडळी हा ज्ञानदीपचा मोठा ठेवा होता. प्रमोद जाधव, अमोल पवार, शिवराज पाटील, स्वप्निल व प्रिया माळी, सुशांत, प्रतिमा, प्रणिता, अमोल भोकरे, संचित कुलकर्णी, अवधूत पाटील, दिनेश खोत यांच्याबद्दल मला माहिती असली तरी इतर अनेकांचा ज्ञानदीपशी संपर्क तुटला आहे. या सर्वांना एकत्र केले तर ज्ञानदीपची मोठी टीम पुण्यात होईल व त्यांनी ज्ञानदीप फॊंडेशनच्या कार्यात सहभागी झाले तर ज्ञानदीपला प्रगतीचे नवे शिखर गाठता येईल. शिवाय सध्या सांगलीत कार्यरत असणार्या टीमला मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळेल असे मी त्यांना सांगितले. त्यांनीही मला या कार्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ज्ञानदीपच्या कार्यास चिरस्थायी आधार मिळाला.
शुभांगीचे माहेर पुण्याचे असल्याने आमचे पुण्याला जाणे येणे खूप होत असे. शुभांगीने पुण्यातील त्यांच्या पेंडसे चाळीविषयी सविस्तर लेख लिहिला आहे. मी स्वत: १९७२ मध्ये पर्वती पाणीपुरवठा टाक्यांचे हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे बांधकाम चालू असताना तीन महिने पुण्यात राहिलो होतो. पिंपरीतील अँटिबायोटिक फॅक्टरी तसेच अनेक कारखान्यांच्या प्रदूषण नियंत्रण यंत्रणेचे डिझाईन व सल्ला देण्यासाठी पुण्यात जात असे.
२००६ मध्ये पुण्यात मयुरेश इन्फोटेकमध्ये आम्ही ज्ञानदीपची शाखा काढली होती. त्यावेळी सॊ. शुभांगी व मोड्युलर सिस्टीमच्या सॊ. मीना जोशी यांनी दीपप्रज्वलन केले होते.
विज्ञानपरिषदेचेअनेक कार्यक्रम व मेळावे पुण्यात भरत असत. त्यांना माझी उपस्थिती असे. ज्ञानदीपतर्फे काही सेमिनार व कार्यसत्रे पुण्यत मध्यंतरीच्या काळात आम्ही आयोजित केली होती. त्यातील ’स्वप्न हरित नगरीचे ’ या ना्वाच्या कार्यसत्रात केवळ पुण्याच्या पर्यावरण व बांधकामविषयक समस्यांवर तज्ज्ञांनी आपले प्रबंध वाचले.
अलिकडच्या काळात प्रथम माझा मुलगा सुशांत याने कल्याणीनगर येथे स्वत:चा फ्लॅट घेतला. आमचे इतर अनेक नातेवाईक, सहकारी मित्र, विद्यार्थि पुण्यात असल्याने पुण्याविषयी माहिती मिळविण्यात फारशी अडचण येणार नाही. प्रश्न एवढाच की पुण्याचा विस्तार व प्रगतीचा आवाका एवढा मोठा आहे की एका संकेतस्थळावर त्याचा मागोवा घेणे सोपे नाही. तरीपण पुण्याविषयी मराठीतून एकत्रित माहिती देणारी वेबसाईट पाहण्यात नसल्याने ज्ञानदीप ते धाडस करणार आहे.
अर्थात हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यास बराच अवधी तसेच साधनसामुग्रीची जुळवाजुळव करावी लागेल. आज त्यानिमित्ताने संकल्प सोडायला काय हरकत आहे?
No comments:
Post a Comment