सकाळच्या वर्तमानपत्रातील संप मोर्चे, अपघात व पुढार्यांचे फॊटो व प्रक्षोभक भाषणे यांचे ठळक मथळे वाचल्यावर मला पेपर पुढे वाचवेना. नेहमीच्या सवय़ीप्रमाणे आजच्या बातम्या पहाण्यासाठी टीव्ही सुरू केला. निवडणुकीचा मोसम सुरू झाल्याने भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारोप, पक्षबदल, दारू, पैसा व बंदुकांचा निवडणूक जिंकण्यासाठी वापर कसा सर्रास वापर होत आहे हे दाखविणार्या सनसनाटी बातम्या एवढेच सर्व चॅनेलवर चालू होते. माझे मन उद्विग्न झाले. टीव्ही बंद केला व रेडिओ लावला. रेडिओवर ‘विकल मन आज झुरत असहाय’ अशी नाट्यगीतातील धुन चालू होती. मनात विचार आला की भारतातील लोकशाहीची सध्याची दशा पाहिली की सामान्य जनतेची स्थिती या गाण्यासारखीच झाली आहे.
निवडणुकीच्या अशा हुल्लडीतून लोकांसाठी लोकांनी चालविलेले राज्य ही लोकशाहीची व्याख्या किती फसवी आहे याची जाणीव झाल्याने विकासाच्या आशेने भविष्याकडे डोळे लावून बसलेल्या जनतेची पूर्ण निराशा झाली आहे. सत्ता व पैसा नेत्यांच्या हाती पडणार पण आपल्या हाती आश्वासनांखेरीज काहीच उरणार नाही याचे आकलन जनतेला होऊ लागले आहे.
या निराशेतून मानसिक संतुलन बिघडणे, अतिरेकी कृत्य, हिंसाचार, आत्महत्या यासारख्या व्यक्तीगत उद्रेकाच्या घटना वाढीस लागल्या आहेत. गुंडगिरी, दहशत, लुटालूट व दरोडे घालणार्या टोळ्या तयार होत आहेत. हे सर्व लोकशाहीला अराजकाचे स्वरूप देत आहेत. यावर उपाय होताना लोकशाहीचे हुकुमशाहीत वा लष्करशाहीत केव्हा रुपांतर होईल हे कळणारही नाही.
देशाचे राहू द्या. अगदी छोट्या गावात किंवा संस्थेत नेत्यांची सत्त्ता हस्तगत करण्यासाठी चाललेली धडपड पाहिली की आपण लोकशाहीसाठी पात्र आहोत की नाही याचीच शंका येऊ लागते. लोकशाहीत लोकप्रतिनिधी ठरविण्यासाठी निवडणूक हा रास्त मार्ग आहे. पण निवडून य़ेण्यासाठी उमेदवारांची भाऊगर्दी, शक्तीप्रदर्शने, पक्षबदल व मतदारांचे विविध मार्गांनी होणारे लांगूल चालन पाहिले की निवडणुकीवरील विश्वासच उडतो.
पक्षाचे तिकीट मिळाले नाही वा मिळण्याची शक्यता नाही हे कळल्यावर उमेदवाराची किती घालमेल होते हे आता सर्वांच्या माहितीचे झाले आहे. आजपर्यंत ज्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलो वा नेत्याचा प्रत्येक शब्द झेलत राहिलो व त्याच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करीत राहिलो त्या पक्षाविषयी एकदम घृणा, द्वेष उफाळून येऊन विरोधी पक्षाविषयी विलक्षण कळवळा निर्माण झाल्याचे वाचून आपल्याला हसावे का रडावे हे समजत नाही. ज्यांच्याबरोबर आयुष्यभर सुखदुःखात सहभागी झालो त्या मित्रांच्या व कुटुंबातील नजिकच्या नातेवाईकांशी वैर पत्करून निवडणुकीसाठी वा वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षबदल करणारी माणसे पाहिली की मन उदास होते.
माझ्या लहानपणी मीही निवडणुका पाहिलेल्या आहेत. यशवंतराव चव्हाण, वाजपेयी, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, नाथ पै, आचार्य अत्रे अशी दिग्गज मंडळी निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळत. त्यावेळी होणारी नेत्यांची भाषणे म्हणजे वैचारिक ज्ञानाचा मोठा खजिना असे. कोणत्याही पक्षाचा प्रचार असो. नेत्यांचे भाषण म्हणजे आपल्या विचारांना एक नवे खाद्य मिळत असे. कवी व लेखकही आपापल्या साहित्यिक कलेचा अनोखा नमुना सादर करून प्रचारात रंगत आणत. कॉंगेस पक्षाच्या प्रचारासाठी कवी. ग. दि. माडगुळकरांचे गीत त्याच्या प्रासादिकतेमुळे फार प्रसिद्ध झाले होते. इतर पक्षही देशभक्तीची गाणी व शिवरायांच्या पराक्रमाची गीते आपल्या प्रचारात वापरत असत. वर्तमानपत्रे विशिष्ट विचारसरणी्शी बांधलेली असायची व त्यात चांगले अभ्यासपूर्ण लेख असत.
तो काळ आता विस्मृतीच्या पडद्याआड गेला आहे. आता निवडणूक हा वैयक्तिक स्वार्थावर आधारित राजकारणाचा हमरीतुमरीचा खेळ बनला आहे. विचारांची बांधिलकी व पक्षनिष्ठा यांना काहीही महत्व उरलेले नाही. अशा निवडणुकीत यशस्वी होणारे नेते स्वतःला लोकप्रिय लोकप्रतिनिधी खुशाल समजोत. जनतेला त्यांचे खरे स्वरूप समजले आहे.
जनतेचे मन विकल होऊन ती असहाय बनली आहे. निवडणुकांचे सध्याचे बाजारी स्वरूप बदलले तरच खर्या सशक्त लोकशाहीची स्थापना होऊ शकेल व जनतेची विकासाची व समृद्धीची स्वप्ने पूर्ण होऊ शकतील.
No comments:
Post a Comment