Wednesday, January 25, 2012

समन्वय

परवा संक्रांतीच्या दिवशी मी ‘मतभेदाकडून सुसंवादाकडे’ या नावाचा लेख लिहिला होता. त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर अनेक अशी उदाहरणे होती की जेथे व्यक्ती व संस्था यांच्यातील मतभेद पराकोटीचे ताणले गेल्याने दोन्ही पक्षांना समन्वय करणे अशक्यप्राय गोष्ट वाटत होती. दोन विरुद्ध टोकांचे विचार असणारे पक्ष एकत्र येणे कसे शक्य आहे या जाणिवेने मलाही माझ्या लेखातील सूचनांबद्दल संदेह निर्माण झाला होता.

या संदेहाची सोडणवूक करण्याचा मार्ग एका छोट्या प्रसंगातून अनपेक्षितपणे माझ्या ध्यानात आला. माझ्या नातीला कागदाची होडी कशी करायची हे मी शिकवीत होतो. एक चौकोनी कागद घेऊन त्याची घडी कशी घालायची हे मी तिला दाखविले व हे दाखवत असताना माझ्या विचारचक्राला गती मिळाली.



चौकोनी कागदाच्या दोन विरुद्ध टोकांना एकत्र करण्यासाठी या दोन्ही टोकांपासून सारख्याच अंतरावर असणार्‍या टोकांचा उपयोग करून घडी घालावी लागते. या घडीवरील सर्व बिंदू दोन विरुद्ध टोकांच्यापासून सारख्याच अंतरावर असतात. म्हणजे दोन्ही बाजूंना मान्य असणारा एक समान पाया घडीच्या रुपाने तयार होतो. ही घडी दाबून घट्ट केली की दोन विरुद्ध टॊके एकत्र येण्याचा मार्ग मोकळा होतो. घडीपासून सावकाश व सावधानतेने दोन्ही बाजू मिळवत टोकांकडे जावे लागते. अन्यथा ती टोके एकमेकापासून पुन्हा दूर होऊ शकतात. आता हीच पद्धत दोन विरुद्ध गटात समन्वय करण्यास वापरता येईल.

दोन्ही गटांबद्दल सारखीच सहानुभूती व त्यांच्या प्रामाणिकपणाबद्द्ल विश्वास असणार्‍या व्यक्तींनी आपली एकजूट केली तर दोन विरुद्ध टोके एकत्र येणे शक्य होईल. अशी टोके एकत्र येण्याचा फायदा म्हणजे टोकाचे विचार असणार्‍या लोकांना आपल्या भूमिकेवर पुनर्विचार करणे भाग पडेल व आपल्या मतांना प्रसंगी मुरड घालावी लागेल व निर्विरोध प्रगतीसाठी आवश्यक ते बळ लाभेल.

रशिया व अमेरिका या दोन विरुद्ध बलाढ्य राष्ट्रांच्या लढाईमुळॆ विश्वयुद्धाची शक्यता टाळण्यासाठी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी पुढाकार घेऊन अलिप्त राष्ट्रांची तिसरी आघाडी केली व त्याद्वारे या दोन्ही विरुद्ध गटांना शांततेसाठी एकत्र येण्यास भाग पाडले व विश्वशांतीचा मार्ग सुकर केला.

कागदाच्या घडीने मला समन्वयाचा नैसर्गिक नियम उमजला. यावर पुढे विचार करता असे लक्षात आले की संक्रांतीचा हलवा ठेवण्यासाठी कागदाचा जो डबा आम्ही लहानपणी तयार करायचो त्यात तर कागदाची सर्व टोके एकत्र आणून व एकमेकात गुंतवावी लागायची. मगच अशा डब्यात समन्वयाचा संदेश देणारा गोड हलवा ठेवता यायचा.

सध्या एकाच समान अंतिम ध्येयाकडे पण विरुद्ध दिशांनी एकमेकांशी झगडत कार्य करणार्‍या गटांनी यापासून काही बोध घॆण्यास हरकत नाही.

No comments:

Post a Comment