पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना । असे संस्कृत वचन आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. तसे त्याचे विचारही वेगळे असतात. त्यामुळे त्यांच्यात मतभेद होणे यात काहीच गैर नाही. तरी वैचारिक मतभेदांना वैयक्तिक शत्रुत्वाचे स्वरूप देणे चुकीचे आहे. विचार आपल्याशी जुळत नसतील वा आपल्या विचारांच्या अगदी उलट टोकाचे असतील तरी चर्चेचे दार कधी बंद करू नये. एकमेकांबद्दल आदर ठेवून केलेल्या चर्चेने मतपरिवर्तन वा मतैक्य होण्याची शक्यता असते त्यामुळे परस्पर संपर्काची संधी घेऊन सुसंवाद निर्माण करणे दोन्ही बाजूंच्या हिताचे ठरते.
यासाठी गरज आहे ती व्यक्तिगत टीका टाळण्याची. कारण एका बाजूने व्यक्तिगत टीका सुरू झाली की दुसर्या बाजूकडूनही अशी टीका सुरू होते. मग या टीकांना प्रत्युत्तर देण्याच्या चढाओढीत वादाचा मूळ मुद्दा बाजूला पडतो व वितुष्ट वाढत जाते. वितुष्ट वाढले की परस्परातील दरी रुंदावते. मने दुखावतात वा दुभंगतात. प्रत्येक गोष्टीचा विचार मग ती आपल्या का विरुद्ध पार्टीची यावर त्याचे मूल्यमापन केले जाते. कोणा बाहेरच्या व्यक्ती वा गटाशी संपर्क आला तर त्याची बांधिलकी कोणत्या गटाशी आहे याचा विचार आधी केला जातो. परिणामी सुसंवादच काय पण एकत्र येणेही टाळण्याची प्रवृत्ती वाढत जाते. अविश्वास व संशयाचे वातावरण निर्माण होते. त्यातूनच पुढे मुद्यांचे रुपांतर युद्धात होऊ शकते.
परस्पर संवाद हा माणसाचा स्थायी भाव आहे. हा संवाद सुसंवाद असेल तर आनंददायी ठरतो. समूह भावना वाढीस लागते. एकत्रित कार्यशक्ती मोठी ध्येये साध्य करण्यास सक्षम ठरते. लोकांना परस्परांशी बोलणे आवडते. जास्त ओळखी असणे हा मोठा गुण मानला जातॊ. आपल्या विचारांचा व कृतीचा प्रभाव इतरांवर पडावा असे प्रत्येकाला वाटत असते. आपले मुद्दे एकमेकांना पटवून द्यायची त्यांची इच्छा असते. मात्र दुसर्यांच्या मतांचा विचार न करता आपले मतच खरे आहे असा हट्ट धरणे योग्य नाही. याउलट दुसर्याच्या विचारांतील व पूर्वगृहातील त्रुटी शोधून त्याची चूक त्याला दाखवून दिल्यास त्याचे मतपरिवर्तन होऊ शकते. मात्र वैयक्तिक आकसातून वाटागाठींचे दरवाजे बंद करून टाकल्यास संघर्षास दोन्ही बाजूस मान्य होईल असा पर्याय निर्माण करण्याचा मार्गच खुंटतो.
मला आठवते, वालचंद कॉलेजच्या स्टाफ क्वार्टर्समध्ये रहात असताना मी तेथील सोशल क्लबचा कार्यवाह होतो. त्यावेळी ‘संवाद’ नावाचे हस्तलिखित मी सुरू केले होते. सदस्यांनी त्यात आपले लेख, चित्रे, कविता द्याव्यात व ते हस्तलिखित सर्वांकडे पाळीपाळीने पाठ्वायचे अशी ती योजना होती. त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. पुढे माझ्याकडूनच या उपक्रमात थोडी चालढकल झाली व लिखित संवाद बंद पडला. कॉलेजमध्ये व सांगलीतील नगरवाचनालयामध्येही आम्ही असे वादविवाद मंडळ चालविले होते त्यावेळी अनेक नव्या विचारांची मला ओळख झाली. माझ्या विचारांतही त्यामुळे खूप चांगले फेरबदल झाले. त्याकाळचे ते वातावरण आता इतिहासजमा झाले आहे.
राजकारणात, संस्थात व विविध धार्मिक गटात आज सुसंवादाची जागा संघर्षाने घेतलेली आपण पहातो. मात्र याबाबतीत मला आपल्या राजकीय नेत्यांचे कौतुक करावेसे वाटते. एखद्या समारंभाच्या निमित्ताने दोन विरुद्ध पार्टीचे नेते एकत्र आले की दोन जिवाभावाचे मित्र भेटतील असे ते वागतात. एकमेकांची स्तुती करतात. त्यांचे कुशल विचारतात. कारण त्यांना माहीत असते की भविष्यात त्यांना आपल्याकडे किंवा आपणास त्यांचेकडे जावे लागेल. शिवाय सर्व सामान्य जनतेपुढे आपले साधे सोज्वळ स्वरूप दाखविण्याची त्यामागे धडपड असते आणि त्यात बिघडले ते काय? नव्हे त्यांनी तसेच बाहेरही व आपल्या अनुयायांच्या समोर बोलावे. म्हणजे अनुयायांच्यातील परस्पर द्वेष कमी होईल व सामंजस्याच्या वातावरणात विचारांचे खंडन मंडन होऊ शकेल. प्रसिद्ध विनोदी लेखक मार्क ट्वेन याने म्हटले होते की हिटलर व विस्टन चर्चिल यांना एकत्र एका खोलीत ठेवले असते तर चर्चेने प्रश्न सुटून महायुद्ध टाळता आले असते.
`We agree to disagree.' आमचे विचार एकमेकांना पटत नाहीत याबद्दल आम्हा दोघांचे एकमत आहे. परस्परांचे विचार समजून घॆण्याची प्रक्रिया यात अंतर्भूत आहे. हल्ली काय होते. दोन पक्ष एकमेकांपासून विरुद्ध दिशेला तोंडे फिरवून एकमेकांवर टीका करीत असतात. त्यामुळे वादाला वितंडवादाचे स्वरूप येते. एकमेकांना न भेटता त्रयस्थ वकिलांमार्फत न्यायालयात आरोप प्रत्यारोप केले जातात. दुसर्या बाजूचा नि्ष्पक्षपातीपणे विचार न करता आपली बाजूच खरी आहे या ईर्षेने खालच्या कोर्टातून वरच्या कोर्टात जात असे खटले वर्षानुवर्षे ताटकळत पडतात. यात पैसा व वेळ जातोच पण ज्या वादासाठी आपण भांडतो त्या वादाचे मूळच नाहिसे होण्याची वा बदलण्याची शक्यता असते.
यासाठी ‘ वादे वादे जायते तत्वबोधः ।’ या वचनावर श्रद्धा ठेवून व परस्परांबद्दल कोणतीही वैयक्तिक कटुतेची भावना न ठेवता मतभेदाकडून सुसंवादाकडे वाटचाल करणे केव्हाही श्रेयस्कर आहे. असे झाले तर व्यक्ती, गट, प्रांत, जाती, देश यातील अनेक वाद मिटतील. सलोख्याचे, सौहार्दाचे व परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. अखिल मानवजातीच्या सुखसमृद्धीकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होईल.
यंदाच्या मकरसंक्रांतीतील संक्रमणाचा अर्थ ‘मतभेदाकडून सुसंवादाकडे संक्रमण’ असा आपण घॆऊया.
No comments:
Post a Comment