Tuesday, January 10, 2012

त्यांना बोलते करा.

मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही हे एका दृष्टीने बरेच आहे. कारण त्यांना बोलता आले असते तर आपण माणसे त्या प्राण्यांपेक्षाही किती खालच्या दर्जाचे आहोत हे त्यांनी आपल्याला तोंडावर सुनावले असते. मोठ्या प्राण्यांच्या बाबतीत त्याचे दुःख आपल्याला समजू शकते. बैलांवर मारले जाणारे चाबकाचे फटकारे, सायकलीला उलट्या बांधून विक्रीस आणलेल्या कोंबड्या, पाय बांधून नेली जाणारी डुकरे, कसायाच्या तावडीत सापडलेली गुरे, पाण्याबाहेर काढल्यावर तडफडणारे मासे हे पाहिले की कोणाही संवेदनशील माणसाचे मन हळहळते. साप, उंदीर, बेडूक या प्राण्यांचे दुःख आपल्याला फारसे जाणवत नाही. किडा, मुंगी यासारख्या लहान कीटक यांच्याबाबतीत त्याना दुःख होत असेल की नाही याचा आपण विचारच करीत नाही. झाडांना संवेदना नसतातच. अशी आपली खात्रीच असते.

पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्राण्यांच्या व वनस्पतींच्या संवेदनांची माणसाला जाणीव करून देण्याची गरज भासू लागली. मग त्यांच्या अन्नपाण्याच्या गरजांविषयी माणूस गांभीर्याने विचार करू लागला. त्यांचे संरक्षण व संवर्धन माणसाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने आवश्यक आहे हे समजल्याने त्यांच्याबद्दलचा बघण्याचा माणसाचा दृष्टीकोन आता बराच बदललेला आहे. या बदललेल्या दृष्टीकोनाचा परिणाम म्हणून वन, वन्यप्राणी व जैवविविधता संरक्षण कायदे अस्तित्वात आले. अभयारण्ये व वृक्षारोपणासारखे प्रकल्प हाती घेण्यात आले. मात्र हे सर्व करत असताना त्यांच्या संवेदनक्षमतेचा विचार न होता माणसाच्या भवितव्याविषयी वाटणारी काळजी ही मुख्य प्रेरणा आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

प्रखर संवेदनशीलता ही माणसाला मिळालेली एक अप्रतिम देणगी आहे. कवी, साहित्यिक वा कलाकार यांना निसर्गातील प्रत्येक गोष्टीमधील चैतन्याचा साक्षात्कार होतो. त्यातून त्यांची प्रतिभा व नंतर कलाकृती निर्माण होते. शास्त्रज्ञाला निसर्गातील कार्य कारण भावाचा शोध घ्यावयाचा असल्याने त्याचेही मन तसेच संवेदनशील असावे लागते तरच आपल्या बुद्धीचा वापर करून त्या माहितीचा मानवाच्या कल्याणासाठी कसा उपयोग करता येईल याविषयी शोध घेण्याचे कार्य तो करू शकतो.

निर्जीव पदार्थांना संवेदना नसते. मात्र उपयुक्त निर्जीव पदार्थ व वस्तूंना विज्ञानाच्या साहाय्याने आपण संवेदनशील बनवू शकतो. सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा उपयोग करून तिजोरीची राखण करण्यासाठी वा परिसरावर नजर ठेवण्यासाठी निर्जीव यंत्रणेला नवी दृष्टी आपण देऊ शकतो. संवेदनशील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून यांत्रिक मानवास कान, नाक, डोळे यासारखी पर्यायी संवेदन इंद्रिये आपण त्याला लावू शकतो. यांचाच उपयोग करून आपन मुक्या प्राण्यांना बोलते करू शकू. झाडांना बोलते करू शको. मग ‘मला पाणी पाहिजे’ असे झाड ओरडून सांगू शकेल’. प्राण्यांचे दुःख आपल्या बधीर झालेल्या कानांना ऎकू येऊ शकेल. वंगण नसलेले यंत्र वा गंजलेल्या बिजागिरी असणारे दार असे कुरकुर आवाज करीत आपले लक्ष वेधते त्याप्रमाणे प्रत्येक वस्तु आपल्या तब्बेतीची तक्रार बोलून दाखवू शकेल.

हीच कल्पना पुढे नेली तर खड्डे पडलेले रस्ते, तुंबलेले गटार, गळणारे नळ, तुटलेले रूळ, विजेच्या लोंबकळणार्‍या तारा नगरसेवकाची वा मोर्चांची वाट न पाहता आपले गार्‍हाणे थेट योग्य त्या डिपार्टमेंटकडे पाठवू शकतील. अर्थात या सर्वांना दर वेळी अत्याधुनिक उपकरणांची गरज लागेलच असे नाही. माहिती संकलन व्यवस्था सर्वसमावेशक केली व त्याच्या विष्लेषणाचा योग्य उपयोग केला तर अशा अनेक गोष्टी आपल्याला समजू शकतील.

उदाहरणच द्यायचे झाले तर शहरातील प्रत्येक रस्त्याची माहिती म्हणजे तो तयार केव्हा केला, दुरुस्ती केव्हा केली, ट्रॅफिक किती आहे, अपघात किती झाले यांच्या माहितीचा आढावा घेतल्यास रस्त्याच्या आरोग्याविषयी आपल्याला अंदाज बांधता येईल. हा अंदाज इशारा स्वरुपात संगणकावर दिसू शकण्याची योजना करता येईल म्हणजे रस्ता धोकादायक बनला आहे व तो लगेच दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे हे त्या रस्त्याची माहितीच आपल्याला सांगू शकेल. मग लोकांच्या तक्रारीची वाट न बघता त्यावर वेळीच उपाय योजना करता येईल.

सध्या अशा निर्जीव सेवासुविधांविषयीच्या तक्रार लोक व नगरसेवक संबंधित खात्याकडे करतात. यात जो तक्रार करील वा ज्या नगरसेवकाचा दरारा मोठा त्याच रस्त्याचे भाग्य उजळते. आवश्यकता नसली तरी अशा रस्त्यांचे नूतनीकरण होते. इतर रस्त्यांची स्थिती अगदी खालावलेली असली तरी प्रभावी तक्रारीअभावी त्यांची कोणी दखल घेत नाही. परिणामी एखादा मोठा अपघात सगळ्यांचे त्याच्याकडे लक्ष वेधतो. पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. घडायचे ते घडून गेलेले असते.

जी गोष्ट रस्त्याची तीच प्रत्येक सुविधेची, प्रदूषणाची, धोकादायक परिस्थितीची. या सर्वांना आधुनिक उपरणांच्या व सर्वंकष माहिती व्यवस्थापनाच्या आधारे बोलते केले तर अपघात टळतील, प्रदूषण वाढणार नाही व शहरातील सर्व सेवासुविधा विनातक्रार काम करतील. सर्वांचा विकास लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाशिवाय केवळ गरज व गुणवत्ता यांच्या आधारे करणे शक्य होईल.

No comments:

Post a Comment