Thursday, January 26, 2012

हलव्याचा डबा

जपान देशात विकसित झालेली कागदाच्या विविध वस्तू, पक्षी, प्राणी यांच्या प्रतिकृती करण्याची कला ‘ओरिगामी’ आता सर्व जगात प्रसिद्ध झाली आहे. त्याची सविस्तर माहिती देणारी अनेक पुस्तके आज उपलब्ध आहेत. इंदुताई टिळक यांची या विषयावर पाच पुस्तके लिहिली आहेत.

आमच्या लहानपणी आम्हाला याची काही माहिती नव्हती मात्र कागदाच्या होडी, बंबी बोट, फोटोफ्रेम, विमान, सुदर्शन चक्र व पतंग करण्याचे ज्ञान घरातील वडिलधार्‍या मंडळींना असायचे व त्यांच्या मदतीने अशा वस्तू करण्यात आम्ही रंगून जात असू. त्यात हलव्याचा डबा करणे हे मोठे कौशल्याचे काम असे. डिंक न वापरता केवळ घड्या घालून व कात्रीने आवश्यक तेथे कापून आकर्षक हलव्याचा डबा करता येतो. रंगीत कागद वापरून वा रंगाच्या ब्रशने नक्षी काढल्यास अशा डब्याचे सौंदर्य अधिकच वाढू शकते.

बालगोपाळांच्या माहितीसाठी असा हलव्याचा डबा कसा करायचा याची माहिती खाली देत आहे.
१. प्रथम एक चौरस आकाराचा (लांबी व रुंदी सारखी असलेला) कागद कापून घ्यावा.
२. विरुद्ध बाजूची टोके जोडतील अशा घड्या पाडाव्यात. (चित्र १ पहा)

३. एक टोक कागदाच्या मध्यावर आणून घडी घालावी व त्याच घडीची बाजू मध्यावर आणून दुसरी घडी घालावी. अशीच कृती सर्व टोकांसाठी करावी.(चित्र २ पहा)

४. एका टोकाच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे बाजू कापून कानासारखे सुटे भाग तर विरुद्ध टोकाजवळ आडवी फट तयार करावी.
५. चित्रात दाखविल्याप्रमाणे कागद दुमडून डब्याचा आकार देणे सुलभ व्हावे यासाठी प्रत्येक कोपरा छेद करून मोकळा करावा.
६. आता कानाचा कोपरा दुमडून समोरच्या टोका जवळच्या फटीतून आत घालून चित्रात दाखविल्याप्रमाणे उघडावा म्हणजे दोन्ही कोपरे जुळून येऊन डब्याच्या दोन बाजू तयार होतील.


७. तीच क्रिया राहिलेल्या कोपर्‍यांसाठी करून डबा तयार करावा.

८. डब्याच्या चारही कोपर्‍यात तयार झालेले नवीन कानांच्या आकाराचे भाग उघडून ते नक्षीदार करावेत.
९. डबा हातात धरण्यासाठी कागदाचीच नक्षीदार पट्टी करावी व ती डब्याच्या मध्यावरील फटीत पूर्वीच्याच पद्धतीने अडकवण्याची सोय करावी.

१०. तयार झालेल्या डब्यात चारही बाजूंनी हलवा आत टाकता येतो व त्यातून बाहेरही काढता येतो. शिवाय इतरवेळी डब्याची तोंडे बंदच राहतात.
११. असा डबा आपणही तयार करा व पुढच्या संक्रांतीला त्यातूनच हलवा वाटा.

No comments:

Post a Comment