Sunday, November 9, 2014

चमत्कार - भाग -२

‘ ब्रह्ममाया महाराजांचा जयजयकार असो’ या घोषणांनी सर्व आसमंत दुमदुमून गेला. भव्य तेजस्वी मुद्रेच्या महाराजांनी प्रसन्न व स्नेहार्द हास्याने आपल्या भक्तगणांच्या नमस्काराचा स्वीकार केला व ते स्थानापन्न झाले. असंख्य भक्तगण त्यांचे दर्शन व्हावे म्हणून माना उंचावून  स्टेजकडे पहात होते. त्यांच्या मस्तकाभोवती इलेक्ट्रोमॅग्नेटिक  उर्जेचा अपार साठा होता. अर्थात श्रद्धाळू भक्तांनाच फक्त  त्यांच्या चेहर्‍याभोवती तेजोवलय असल्याचे स्पष्ट दिसत होते.

काही प्रमुख प्रतिष्ठित नागरिक महाराजांच्या पवित्र पदकमलांचा स्पर्श व्हावा म्हणून शिष्यांच्या विनवण्या करीत स्टेजवर येऊन महाराजांना वंदन करण्यास अनुमती मागत होते. परंतु शिष्यांनी कोणासही स्टेजवर येण्यास अनुमती दिली नाही. कारण उघड होते. महाराजांचा देवभोळेपणा वा व्यक्तीमहात्म्य यांना कडक विरोध होता.

 ते चमत्कार करीत तेसुद्धा आपल्या कर्तृत्वापेक्षा अध्यात्मिक शक्तीचे महत्व जनमानसात रुजवून विज्ञानाच्या व चिकित्सेच्या मूर्खपणापासून लोकांना परावृत्त करण्यासाठीच. त्यांची वाणी ओजस्वी होती. ते बोलायला लागले म्हणजे लोकांना आपल्यापुढे दिव्य ज्ञानच समूर्त होऊन उभे आहे असे वाटे.

त्यामुळे महाराज नाही म्हणाले तरी लोक भक्तीभावाने त्यांना वंदन करीत व त्यांच्या समाजोपयोगी महान कार्याला आपला हातभार लागावा म्हणून आपले धन उदारहस्ते त्यांना अर्पण करून त्यांच्या कृपाप्रसादासाठी प्रार्थना  करीत. महाराजही दयाळू अंतःकरणाने त्याचा स्वीकार करीत एवढेच नव्हे तर आपल्या परमभक्तांना आपल्या दिव्य हातातून एखादी अलौकिक वस्तू निर्माण करून भेट देत असत. अतीन्द्रीय ज्ञानातून निर्माण झालेल्या या  वस्तू  भक्तांना स्वर्गसुखाचा आनंद देत.

 महाराज आपल्या प्रवचनासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी सहज वर पाहिले. सार्‍या अणूंच्यात उगीचच चलबिचल झाली त्यांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटण्याचा जणू त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला. खरे म्हणजे त्यांना तसे घाबरायचे काही कारण नव्हते कारण अजून त्या क्षणासाठी १८९ सेकंदांचा अवधी होता व आता अगदी थोडी तयारी करायचीच बाकी होती.

 भक्तगणांना वंदन करूनच महाराजांनी भाषणाला सुरुवात केली. महाराजांचा हा मोठेणा पाहून सर्वांची ह्र्दये भरून आली. हळव्या व्यक्तींच्या तर डोळ्यात पाणी आले. बोलताबोलताच महाराजांनी चमकून खाली पाहिले.
 एक भिकार्‍याचे पोर स्टेजवर चढून यायचा प्रयत्न करीत होते. शिष्य त्याला खाली ढकलायला धावले पण महाराजांची मुद्रा क्षणात  कनवाळू झाली.  त्यांनी त्या मुलाला वर  उचलून घेतले व ते म्हणाले ‘हा छोटा मुलगा माझ्या दर्शनासाठी आसुसला आहे. मी त्यावर अनुग्रह करतो.’ ‘ बाळ, मी तुला माझा कृपाप्रसाद म्हणून एक दैवी अंगठी देतो.’ असे म्हणून त्यांनी आपला हात वर केला केवळ १५ सेकंदच राहिले होते. सर्व व्यवस्थित होत आहे हे पाहून अणूंनी सुस्कारा सोडला. पण तेवढ्यात एक अघटित घडले. तो मुलगा एकदम ओरडला ‘मला अंगठी नको. मला भाकरी पाहिजे  दोन दिवसात मला काहीच खायला मिळाले नाही.’

 महाराजांचा हात तेथेच थबकला. क्षणभर काय करावे त्यांना काही सुचेना. पण त्यांनी प्रसंग ओळखला. धीरगंभीर होऊन ते म्हणाले ‘बरे मी भाकरी देतो.’ त्यांचे हे शब्द बाहेर पडण्या आधीच त्यांच्या मेंदूतील इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हने अणूंना नव्या निर्णयाची कल्पना दिली. सारे अणू हडबडलेच. कोणालाच भाकरीबद्दल काही माहिती नव्हती. शेजारच्या सर्व मोठ्या हॉटेलात त्यांनी शोध घेतला पण भाकरी ही चीज त्यांनाही अनोखी होती. भाकरी,  भाकरी भाकरी . शब्द कोशातून अर्थ काढून पहाणी केली तेव्हा शेजारच्या झोपडपट्टीत त्यांना एक शिळी भाकरी सापडली. लगेच त्याचे पृथ्थ्करण करण्यात आले. ज्वारीच्या दाण्यातील पिष्ठमय पदार्थांची रचना व त्यातील कार्बन हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंच्या लांबलचक साखळ्यांचे ज्ञान घेण्यात आले. अणूंचे चेहरे मोहरे क्षणात बदलू लागले. साध्या डोळ्यांना काही दिसत नसले तरी तेथे प्रचंड उलथापालथ चालली होती.

महाराजांनाही हे नवीनच होते. अंगठी,  भस्म वा घड्याळ  असा कोणताही शब्द उच्चारल्याबरोबर हातात ती वस्तू तयार होत असे. आज काय झाले. त्यांनी आपल्या मनःचक्षूंनी तेथील अणूंच्यावर नजर टाकली व ते खवळलेच ‘ गाढवांनो,  हा काय तमाशा चालवला आहे. माझी अब्रू घालवता की काय ? ’   आवाजाशिवाय बोललेले हे शब्द अणूंच्या जिव्हारी लागले.  अणूंची वाचाच बसली तरी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली प्रक्रियांची गती वाढवली. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरुपात ऊर्जा मिळविताना त्यांची अशी झुंबड उडाली की घासाघासीत काही इलेक्ट्रॉन निसटून पडले. लोकांना तेथे काही तरी प्रकाशासारखे वाटले. पण क्षणभरच.

 आता तेथे महाराजांच्या हातात भाकरी  आली होती. ताजी गरम  पूर्ण भाकरी. त्यातून गरम वाफाही येत होत्या. अणूंनी हे आकस्मिक अवघड कार्य फत्ते केले होते.

सर्व जनसागर महाराजांच्या या अलौकिक चमत्काराने भारावून गेला. त्यांचा जयजयकार सुरू झाला.

मुलाने ती भाकरी मिळताच आधाशासारखी खाण्यास सुरुवात केली पण भक्तांनी हा दैवी प्रसाद मिळविण्यासाठी त्याच्या हातातून ती भाकरी हिसकावून घेतली त्याचे तुकडे तुकडे मिळवण्यासाठी भक्तांच्यात संघर्ष सुरू झाला.  भक्तांच्या या स्पर्धेमुळे महाराज भारावून गेले व सर्वांना   आशीर्वाद देत आपले प्रवचन त्यांनी आटोपते घेतलॆ.     


No comments:

Post a Comment