Wednesday, November 12, 2014

इ- निवडणूक भाग-२

 जगन्नाथच्या चेहर्‍यावर सारख्रे फ्लॅशचे झोत पडत होते. तो बसला होता त्याच्या समोर २०/२५ मायक्रोफोन गर्दी करून लागले होते. दुरून टीव्ही कॅमेर्‍यासाठी टाकलेला प्रकाशझोत पुढे मागे रेंगाळत होता.. जगन्नाथला घाम फुटला.

 मुख्य निवडणूक अधिकारी प्रख्यात तंत्रवैज्ञानिक डॉ. शहाणे यांच्या निवेदनाने पत्रकार परिषद सुरू झाली.‘ भारतातील तंत्रविज्ञानातील क्रांतीने खरी लोकशाही प्रस्थापित करून एका नव्या युगाची सुरुवात केली आहे.
पूर्वीच्या पक्षीय, भावनाप्रधान, खर्चिक व सदोष मतदान पद्धत रद्द करून खर्‍या अर्थाने वस्तुनिष्ट व पूर्वगृहविरहित अशी गणकयंत्राच्या पद्धतीने सर्व जनतेतून एक राष्ट्राध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पार पाडून  कोणत्याही व्यक्तीस  राष्ट्राध्यक्ष होण्याची पद्धत आपण विकसित केली आहे हे भारतास निश्चितच भूषणास्पद व आपल्या गौरवशाली परंपरेस साजेसे आहे.

 आजच्या निवडणुकीबाबत गेले कित्येक दिवस वृत्तपत्रे व इतर प्रसारमाध्यमे अंदाज व्यक्त करीत असताना त्या सर्व अंदाजांचा फोलपणा या निवडणुकीने सिद्ध केला आहे.

 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा गुंतागुंतीच्या प्रश्नांवर नूतन राष्ट्राध्यक्ष आता खर्‍या अर्थाने भारतातील सामान्य नागरिकाची प्रतिक्रिया व्यक्त करतील. सन्माननीय राष्ट्राध्यक्ष माननीय जगन्नाथ आता पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देतील जगन्नाथच्या चेहर्‍यावरील प्रकाश झोत वाढले.

 समोरच्या रांगातील एका भारदस्त पत्रकाराने प्रश्न विचारला ‘ युरोपमध्ये मध्यमप्रतीची अण्वस्त्रे ठेवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर आपले काय मत आहे?"

जगन्नाथला प्रश्नातले ‘ओ की ठो’ कळले नाही. त्याने नुसती मान हलवली. डॉ. शहाणे म्हणाले ‘माननीय राष्ट्राध्यक्षांनी या संवेदनशील प्रश्नावर मतप्रदर्शन करण्यास नकार दिला आहे.’

‘भारताने अंतराळ संशोधनात आपले काय उद्दीष्ट ठेवले आहे?’ एका विदेशी पत्रकाराने विचारले.
शनी व मंगळाची धास्ती घेतलेल्या जगन्नाथ्ने सांगितले. ‘शनी व मंगळ जिंकणे’
.
‘ भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी आपण कोणते उपाय योजणार आहात?’
शेजार्‍याने वर्षाचे धान्य घेतल्याने तो सध्या आरामात आहे हे आठवून जगन्नाथ म्हणाला ‘ वर्षभर पुरेल एवढे धान्य साठविण्याची व्यवस्था करू.’

टाळ्यांचा कडकडाट झाला.

त्या आवाजाने जगन्नाथने डोळे उघडले. लता कानाशी टाळ्या वाजवून त्याला उठवीत होती.  ‘ बाबा उठा की.’
 ( Election नावाच्या रशियन विज्ञानकथेवर आधारित)

No comments:

Post a Comment