Wednesday, November 12, 2014

गुप्तहेर भाग - १

(सुमारे चाळीस वर्षांपूर्वी लिहिलेली माझी विज्ञान कथा)


 ‘पोखरान क्षेत्रात भारताची अणुस्फोटाची तयारी सुरू - अमेरिकेत प्रसिद्ध झालेले वृत्त’

 डॉ. केळकर वृत्तपत्रातील ती बातमी पुनःपुन्हा वाचत होते. त्यांच्या मनात विलक्षण खळबळ माजली होती. अणुशक्ती विभागातील प्रमुख सुरक्षा अधिकारी म्हणून ते गेली १० वर्षे काम करीत होते. परंतु ही बातमी वाचून त्यांना आपल्या सर्व कामगिरीवर पाणी पडल्यासारखे वाटले. पोखरान विभागाची पाहणी करून परत मुंबईत पोहोचेपर्यंत अशी बातमी अमेरिकेत प्रसिद्ध होते म्ह्णजे त्यांच्या कार्याला काळिमा आणणारी आणि त्याहीपेक्षा राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब होती.

त्यांनी चष्मा काढून कपाळावरचा घाम पुसला. डोक्यात विचारचक्र जोरात सुरू झाले होते. आपल्याबरोबर असलेले कॅप्टन डेसूझा, असिस्टंट वागळे आणि भौतिक विभाग प्रमुख डॉ. शर्मा यांची ते मनातल्या मनात उलटतपासणी घेऊ लागले. पन हे सर्व त्यांचे पूर्वीपासून माहितीचे व विश्वासू असल्याने त्याच्याविषयी काही संशयासही वाव मिळेना. कदाचित ऑफिसमध्ये स्टेनो टायपिस्ट, क्लार्क यांच्याकडूनही ही बातमी फुटली असेल. आता पुढे काय करायचे. हा विचार मनात येताच त्यांनी फोन उचलला व सतर्कता अधिकारी इन्स्पेक्टर माने यांना फोन लावला.

 ‘ हॅलो मिस्टर माने. मी केळकर बोलतोय. आजच्या लोकसत्तेतील पहिल्या पानावरील बातमी वाचलीत. फार सीरीयस  गोष्ट आहे. ऑफिस स्टॉफ व सारा प्रकल्प ग्रुप या सर्वांवर नजर ठेवा. मीही याबाबतीत काय करायचे याचा विचार करतोच आहे.’

‘मला आत्ताच मिनिस्ट्रीकडून फोन आला होता. आमचे इन्व्हेस्टीगेशन चालू झाले आहे’ असे म्हणून मानेनी फोन बंद केला.

 केळकरांच्या  डोक्यात असंख्य विचारांचे थैमान सुरू झाले. अणुशक्तीच्या विभागात घातपाताचे प्रयत्न यापूर्वीही झाले होते. परंतु हेरगिरीचा हा प्रयत्न नवीनच होता. नाही म्हणायला गेले सहा महिने असे छोटे छोटे तुरळक प्रकार होत होते परंतु त्याकडे इतके गंभीरपणे पाहिले गेले नाही असे केळकरांच्या लक्षात आले. आता मात्र त्या सर्व गटनाम्चि संगती लागत होती.

 हवेत गारवा असला तरी केळकरांना भयंकर उकडत होते. फ्रीज उघडून त्यातली  गार पाण्याची बाटलीच त्यांनी तोंडाला लावली. बाहेरचे गार वारे आत यावे म्हणून खिडकी उघडली व पडदा बाजूस सरकवला. बिल्डींगच्या खाली कोपर्‍यावर एक निळी गाडी उभी होती. असली गाडी केळकरांना पूर्वी कधीच दिसली नव्हती. केळकरांची खिडकी उघडताच गाडी सुरू झाली व लांब गल्लीच्या टोकाला पानाच्या दुकानासमोर थांबली. केळकरांना शंका आली. त्यांनी प्रथम पडदा परत लावला व दिवा बंद केला. पडद्याच्या फटीतून ते खाली रस्त्यावर पाहू लागले. त्यांची शंका खरी ठरली. गाडीतील दोन माणसे पुन्हा गाडीत बसली व परत गाडी त्यांच्या घराखाली येऊन थांबली.

केळकरांना आठवले. पूर्वी एक शास्त्रज्ञ अचानक बेपत्ता झाला होता. तब्बल आठ दिवसांनी भ्रमिष्ठ अवस्थेत मरीन ड्राईव्हवर  हिंडताना सापडला पण त्याची सर्व स्मृती गायब झाली होती.  असेच काहीतरी षडयंत्र असावे.

 पण बच्चमजी. मी तुम्हाला पुरून उरेन असा विचार करीत केळकरांनी कपाट उघडले. त्यातले रिव्हॉल्व्हर काढून आपल्या पाठीशी पट्ट्यात अडकवले व सावधपणे हळूच दार उघदले. तिसर्‍या मजल्यावरून  खालच्या मजल्यावर सरळ जिन्याने जाणे निश्चितच धोक्याचे होते होते. कुलूप लावून ते मागच्या गच्चीत गेले कठड्यालगत  असलेल्या भरभक्कम द्राक्षाच्या वेलाने त्यांना धीर आला. वेलावरून खाली उतरताना त्यांचा हात सारखा मागच्या रिव्हाल्व्हरकडे जात होता.

पाठीमागील रिव्हाल्व्हरपेक्षा पोटाशी रिव्हाल्व्हर असणे केव्हाही फायद्याचे. पण केळकरांचे सहा महिन्यांपूर्वीच पोटाचे मोठे ऑपरेशन झाले असल्याने ते उगीचच रिस्क घ्यायला तयार नव्हते. जिवावरच्या दुखण्यातून ते त्यावेळी बचावले होते. . सावकाश खाली उतरून केळकर मागील बाजूने शेजारच्या बिल्डींगमध्ये गेले. तळमजल्यावरच  त्यांच्या मित्राचे घर  होते. सुदैवाने घरात मित्र एकटाच होता. त्यामुळे केळकरांचे काम सोपे झाले. स्पेशल ड्युटीवरून पहाटे परत आलो व फ्लॅटची किल्ली ऑफिसमध्येच राहिली अशी थाप ठोकून त्यानी मित्राला घडलेल्या प्रसंगाचा थांगपत्ता लागू दिला नाही.  

No comments:

Post a Comment