Sunday, November 9, 2014

चमत्कार भाग -१

( जुन्या डायरीची पाने चाळताना मला १९७९ साली लिहिलेली माझी एक विज्ञान कथा सापडली. ती खाली देत आहे.)

संध्याकाळी पाचचा सुमार. सूर्य मावळतीकडे चालला होता. चौपाटीच्या पांढर्‍याशुभ्र वाळूवर समुद्राच्या लाटा लयबद्धतेने आदळत होत्या. कडक उन्हाची तिरीप कमी झाल्याने वारा उत्साहवर्धक वाटत होता. चौपाटीवर फिरायला येणार्‍या लोकांची गर्दी वाढू लागली होती. भेळपुरी वाल्यांचे आवाजही चढू लागले होते.

आजची गर्दी मात्र नेहमीपेक्षा खूपच जास्त होती. त्याला कारणही तसेच होते. ब्रह्ममाया महाराज यांचे प्रवचन तेथे होणार होते. मुंबईकरांनी महाराजांची कीर्ती खूप दिवस ऎकली होती. पण आज त्यांचे प्रत्यक्ष दर्शन मिळण्याचा दुर्लभ योग आला होता. त्यातून महाराज चमत्कार करुन दाखवितात असे बोलले जात होते. टिळक पुतळ्याशेजारी एक भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. महाराजांची पवित्र भजने लाऊडस्पीकरवरून श्रोत्यांना ऎकवायला सुरुवात झाली होती. तसा महाराजांना यायला तासभर अवकाश होता. पण ते येणार या जाणिवेने सर्व चराचरात चैतन्य संचारल्याचा भास होत होता.

 भास कसला? खरं म्हणजे स्टेजवरील महाराजांच्या खुर्चीच्या वरच्या बाजूस ९९७.२९ मिलीमीटर अंतरावरील हवेतील अणूची ही धांदल उडाली होती. या गर्दीत मुख्यत्वे नायट्रोजन व ऑक्सिजन यांचे अणू असले तरी त्यामध्ये क्वचित हायड्रोजन अर्गॉन वगैरे अणूंचेही दर्शन होत होते. नेहमी तोर्‍यात वावरणार्‍या कार्बन डाय ऑक्साईड व पाण्याच्या रेणूंकडे कोणाचेही लक्ष नव्हते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हवर सर्व अणूंना कोणत्याही प्रसंगास  सज्ज राहण्याचा आदेश दिला गेला होता. अजून बरोबर ३७१९ सेकंदांनी महाराजांचा हात तेथे येणार होत्या आणि महाराजांच्या इच्चेनुसार  हवी ती वस्तू क्षणार्धात तयार करून देणे तेथील अणूंना भाग होते.

एक महाराज सोडले तर इतर मानवांना या अणूंना हे शक्य आहे हे माहीत नव्हते. बिचारे शास्त्रज्ञ अणूचे इलेक्टॉन, प्रोटॉन असे विच्छेदन करून त्याचे गुणधर्म शोधत बसले होते आणि त्याही बाबतीत त्यांच्यात एकमत होत नव्हते. न्युक्लियसमधील न्यूट्रॉन म्हणजे निरुपद्रवी  व निष्क्रीय भाग अशी त्यांची कल्पना होती. पण तो तर अणूचा मेंदू होता. इलेक्ट्रॉन व प्रोटॉन एकत्र येऊन तेथे खलबते करीत बसतात व तेथूनच अणूच्या कार्याविषयी निर्णय घेतले जातात हे फक्त महाराजांना ज्ञात  होते.

 वरवर पाहता अणूंची हालचाल नेहमीसारखी नियमबद्ध वाटत असली तरी त्यांच्या अंतरंगात  भयंकर वादळ उठले होते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेवतर्फे महाराजांच्या आवडीच्या गोष्टींची त्यांनी यादी केली होती. भस्म, अंगठी वा घड्याळ तयार करण्याची सर्व तयारी झाली होती.

गाईच्या शेणातील घटकांचे ज्वलनानंतर होणारे रुपांतर  व त्याबरहुकूम भस्माची रचना करण्यासाठी लागनारी मूलद्रव्ये व त्यांच्या रेणूंची रचना यासंबंधी सर्व माहिती अणूंनी आत्मसात केली होती. नायट्रोजन व ऑक्सिजन अणूंना इलेक्ट्रॉन व प्रोटॉन बदलून  कराव्या लागणार्‍या  महाप्रचंड व गुंतागुंतीच्या प्रक्रियांचा आराखडा तयार होता. त्यासाठी लागणार्‍या उर्जेची मागणीही नोंदवण्यात आली होती.

त्यामानाने अंगठीसाठी कमी व्याप होता. मुख्यत्वे त्यात एकतर सोने हा मुख्य घटक असल्याने बहुतेक अणूंनी सोने बनण्यावर लक्ष केंद्रीत केले तरी चालणार होते. कोलारच्या खाणीतील सोन्यातील अशुद्धता तपासून पहाण्यात आली होती व त्यात आढळ्णार्‍या काही मिश्र धातूंचे प्रमाण तंतोतंत तसेच ठेवण्याची अणूंची तयारी होती. शिवाय भक्ताला  अंगठी देताना त्याच्या बोटात ती बसावी यासाठी नेमका आकार देऊन त्यावर महाराजांची मुद्रा कोरण्याचीही दक्षता घेण्यात आली होती.  अर्थात प्रत्यक्षात कोण भक्त ही अंगठि घेणार हे अजून माहीत नसल्याने प्रॉबेबिलिटी थिअरीवर आधारलेले अनेक वह्या भरतील  एवढी समीकरणे अणूंनी आपल्या स्मृतीत साठवून ठेवली होती.

 एकेका अणूला स्मृती साठविण्यासाठी अन्रेक दालने होती भस्म व अंगठीच्या दालनांनंतर तिसर्‍या दालनात घडाळ्याची माहिती साठविण्याचे काम सुरू झाले होते.

 महाराजांना स्विझर्लंडमधील सँडोज घड्याळ आवडते ते अणूंना आधीच ठाऊक असल्याने स्विझर्लंडमधील सँडोज कारखान्यात जाऊन तेथील सर्व इत्थंभूत माहिती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हद्वारे मिळविण्यात अणू यशस्वी झाले होते. तरीदेखील महाराजांच्या परमपवित्र हाताला आपल्या हेळसांडीमुळे कोणतीही ऊर्जा जाणवली तर काय प्रसंग ओढवेल  या कल्पनेने प्रत्येक अणू थरथर कापत होता.

1 comment: