इंग्रजी सत्तेपासून आपल्या देशाला काही महत्त्वाचे लाभ आहेत, ह्याची स्पष्ट कल्पना जशी लोकहितवादींना होती, तशीच इंग्रजांच्या शोषक अर्थनीतीचीही होती. ज्यांना मूर्ख आणि टोणपे म्हणता येईल, असे इंग्रज अधिकारीही येथे हजारो रुपये पगार घेतात तसेच इंग्रजांच्या राज्यात ह्या देशातली संपत्ती देशाबाहेर जाते आणि ह्या देशाला दारिद्र्य येते, असे लोकहितवादींनी म्हटले आहे. ह्या देशावर मुसलमानांनीही राज्य केले परंतु मुस्लिम राज्यकर्त्यांनी कमावलेली संपत्ती ह्या देशाबाहेर गेली नाही कारण मुसलमान आले, ते इकडेच राहिले त्यांचा ‘परकी भाव’ गेला, असा एक महत्त्वाचा भेद इंग्रज आणि मुस्लिम राज्यकर्त्यांमध्ये लोकहितवादींनी दाखवून दिला.
इंग्रज राज्यकर्ते हिंदूस्थानातील लोकांना मोठी अधिकारपदे देत नाहीत, अशी तक्रार होती. मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकराण्याची पात्रता येथील लोकांत आली, की इंग्रज सरकार ह्या धोरणात निश्चितपणे बदल करील, अशी आशा लोकहितवादींना वाटत होती पण पुढे त्यांची ही धारणा बदलली. इंग्रजांच्या राज्याचा एक गंभीर दोष म्हणून ते त्या धोरणाकडे पाहू लागले. विद्यापीठांची स्थापना होऊन त्यांतून उच्चविद्याविभूषित तरूण बाहेर पडू लागल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली. तिच्या संदर्भात ह्या धोरणाचा विचार ते करीत असावेत. पण नुसत्या नोकऱ्यांच्याच मागे न लागता, आपल्या लोकांनी व्यापार-उद्योगातही मनःपूर्वक लक्ष घातले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. आळशीपणामुळे देश भिकारी झाला, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा एक भाग म्हणून येथे स्वदेशीची चळवळ झाली परदेशी मालावर बहिष्कार घालण्यात आला. परंतु स्वदेशीचा विचार लोकहितवादींनी त्यांच्या ‘शतपत्रां’त कितीतरी आधी मांडून ठेवलेला आढळतो. ‘… आपले लोक कापडे जाडी, वाईट करतात परंतु तीच नेसावी. इकडे छत्र्या करितात, त्याच घ्याव्या म्हणजे ह्या लोकांत व्यापार राहून इकडे सुख होईल परंतु हे लोक असे करीत नाहीत आणि थोडी किंमत म्हणून लोकांचा जिन्नस विकत घेतात’, असे त्यांनी म्हटले आहे. विलायतेत प्रचंड शक्तीची वाफेची एंजिने असल्यामुळे अत्यंत कमी खर्चात फार मोठ्या प्रमाणावर सूत आणि कापड निर्माण होते. इंग्लंडच्या ह्या यंत्रसामर्थ्याने आपल्यावर खरे आक्रमण केलेले आहे आणि आपण भिकारी होऊन लुटले गेलो आहोत शिकंदर, गझनीचा महमूद, तैमूरलंग आणि नादिरशही ह्यांची चढाई त्या मानाने काहीच नव्हे ह्या चढाईमुळे सर्व हिंदुस्थानची मजुरी विलायतेस गेल्यासारखी आहे, हे त्यांचे अचूक निरीक्षण होते.
एक जित, पराभूत समाजाच्या दारूण पराजयाची अत्यंत कठोर, चिकित्सक समीक्षा करण्यासाठी लोकहितवादी उभे ठाकले होते. आपल्याला गुलाम करून टाकणाऱ्या ह्या सत्तांतरामागे राजकीय कारणांबरोबरच आपल्या एकूण मनोवृत्तीतील काही आत्मघातक दोष, तसेच गंभीर सांस्कृतिक न्यूनेही आहेत, हे त्यांना स्पष्ट दिसत होते. इतिहासाचे भान ठेवून त्यांची चर्चा -चिकित्सा झाली, आत्मपरीक्षण झाले, तरच आपल्या प्रबोधनाचा आणि विकासाचा मार्ग खुला होईल, असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळेच ह्या पराभवाचा विचार केवळ राजकीय अंगाने न करता विद्या, धर्म, समाजकारण, अर्थकारण अशा विविध अंगांनी त्यांनी तो केला.
िद्या हा समाजपरिवर्तनाचा मूलाधार आहे, अशी लोकहितवादींची धारणा होती. तथापि येथे विद्येचे क्षेत्र मर्यादित ठेवले गेल्यामुळे विद्याप्रसार होऊ शकला नाही. विद्या वाढविलीही गेली नाही. ‘विद्या म्हणजे केवळ धर्माचे ज्ञान’ असा विद्येचा अर्थही काळाच्या ओघात संकुचित झाला. ही विद्याही ग्रंथार्थ समजून न घेता केवळ पाठांतराच्या आधारे रक्षिली गेली. ह्यामुळे धर्मविषयीचे अज्ञान आणि कर्मकांडांचे स्तोम अतोनात वाढले. प्राचीन ग्रंथांचे लेखक देव किंवा ऋषी होते, असा समज दृढ करण्यात आल्यामुळे नव्या ग्रंथरचनेला उत्तेजन मिळणे अवघड होऊन बसले. विद्येच्या क्षेत्रात साचलेपणा आला. ज्ञानसंपादनाच्या मार्गात इतरही काही अडचणी निर्माण करण्यात आल्या होत्या. परदेशगमन निषिद्ध मानल्यामुळे भूगोलाबद्दल व जगातील विविध स्थळांबद्दल अज्ञान निर्माण झाले. काळाची जाणीव ठेवून परंपरेची चिकित्सा करीत राहिल्याखेरीज नवी विद्या, नवे विचार आणि नव्या कल्पनांबाबत कोणताही समाज स्वागतशील राहात नाही परंतु येथे प्राचीन काळाची आणि परंपरांची चिकित्सा करणे हाच अधर्म मानला गेल्यामुळे स्थळाबरोबरच काळाचीही जाणीव नष्ट झाली. आपल्या देशात येऊन येथील ज्ञान मिळविण्यात, तसेच येथे व्यापार नोकरी करण्यात इंग्रजांना कोणतीच अडचण नव्हती. चुकीच्या निर्बंधांमुळे आपणाला मात्र त्यांच्या देशातही जाणे शक्य होत नाही
हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे ?’ ह्या शीर्षकाने त्यांनी इंदुप्रकाशात लिहिलेले (१८७६) आठ लेखनही महत्त्वाचे आहेत. भारताच्या दारिद्र्याची चिकित्सा लोकहितवादींनी त्यांच्या अन्य लेखनातूनही केली आहे. ब्रिटिशांनी ह्या देशाचे अर्थशोषण केले असले, तरी ‘द्रव्याचे ढीग हातांत, पायांत गळ्यात’ घालणारे श्रीमंतही उत्पादक कार्यासाठी संपत्ती खर्च करण्याचे मनात आणीत नाहीत, ह्याचा त्यांनी निषेध केला आहे. दागिने जमवत राहणे, ही ‘दुष्टपणाची व अधर्माची’ चाल आहे, असे ते म्हणतात. शेती, व्यापार, कारागिरी ह्यांत वाढ झाली पाहिजे तंत्रविद्या वाढवली पाहिजे, हे त्यांनी सांगितले. ‘आता लोक फार वृद्धिंगत जहाले, व त्यांस खावयास मिळत नाही…’ असे सांगून वाढत्या लोकसंख्येवरही त्यांनी बोट ठेवल्याचे दिसते. भारतातील दारिद्र्याची मीमांसा करताना दादाभाई नवरोजी ह्यांनी जो खंडणीचा सिद्धांत मांडला, त्याचे पूर्वसूचन त्यांच्या अर्थशास्त्रीय लेखनात फार पूर्वीच झालेले दिसते. संदर्भ - मराठी विश्वकोश
… ‘