Tuesday, January 21, 2020

शहरी शेती प्रशिक्षणवर्गाचा शुभारंभ

विजयनगर, सांगली येथील कृषी महाविद्यालयाच्या गच्चीवर शहरी शेती प्रशिक्षणवर्गाचा शुभारंभ दिनांक १९ जानेवारी रोजी सकाळी ८-३० वाजता मविप मध्यवर्ती संस्थेचे विषय तज्ज्ञ श्री. दिलीप हेर्लेकर यांचे हस्ते करण्यात आला. या प्रशिक्षणासाठी वैद्यकीय, व्यावसायिक. आर्थिक क्षेत्रात कार्य करीत असलेल्या सांगली मिरजेतील २५ मान्यवरांनी सदस्य नोंदणी केली आणि त्यात महिलांची संख्या सर्वाधिक होती.


उदघाटन समारंभास कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बोरकर, व्यवस्थापक मंडळाचे सदस्य श्री. राजकुमार पाटील, माजी वन अधिकारी श्री तानाजीराव मोरे, वालचंद कॉलेजचे माजी उपप्राचार्य खानिटकर, ज्ञानदीपचे डॉ. सु. वि. रानडे, म.वि. प्रबोधिनीचे श्री अरविंद य़ादव उपस्थित होते. श्री. राजकुमार पाटील यांनी  कृषी महाविद्यालयात घेतल्या जाणा-या विविध कोर्सेसची माहिती दिली. श्री तानाजीराव मोरे यांनी वनखात्यातील त्यांचे अनुभव सांगून या उपक्रमाचे कौतुक केले.



डॉ. रानडे यांनी या प्रशिक्षण वर्गातील अनुभव व ज्ञान इंटरनेटद्वारे सर्वदूर पोहोचविण्याचे कार्य ज्ञानदीप फौंडेशन करणार असल्याचे सांगून परस्पर संवादासाठी एक ग्रुप करण्याचे आवाहन केले. श्री अरविंद यादव यांनी आभार मानले.

उदघाटनानंतर मविप, मुंबईचे श्री हेर्लेकर यांनी शहरी शेतीची वैशिष्ठ्ये आणि इतर प्रकारच्या आधुनिक शेतीपद्धतीच्या तुलनेत असणारे गच्चीवर करावयाच्या शेतीतील  वेगळेपण खुलासेवार विशद केले.




घनकचरा निर्मूलन, सेंद्रीय भाजी घरच्या घरी तयार करणे, ताज्या भाजीची, आणि ऑक्सिजनची  उपलब्धता व गच्चीचे सौरउर्जेपासून संरक्षण इत्यादी फायदे असल्याने सर्वांनी याचा वापर करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.

नंतर महाविद्यालयाच्या टेरेसवर वाटरप्रुफ केलेल्या नियोजित जागेची पाहणी करून  पुढील प्राथमिक तयारीविषयी चर्चा झाली.

श्री अरविंद यादव यांनी शहरी शेती या नावाचा  व्हॉट्स अप ग्रुप सुरू केला असून हेर्लेकर यांच्या भाषणाची झ्वनीचित्रफीत सर्व सदस्यांना पाठविली जाणार आहे. 

No comments:

Post a Comment