Thursday, September 20, 2018

अशा शाळा, असे शिक्षक - २

सांगलीत आल्यानंतर प्रथमच  शिक्षणाविषयी शाळा, शिक्षक व पालक अतिशय जागृत असल्याचे जाणवले. पुण्याला विद्येचे माहेर समजले जायचे पण सांगलीदेखील या क्षेत्रात चांगलीच अग्रेसर होती.

माझे धाकटे भाऊ गावभागातील प्राथमिक शाळा, बापटबातमंदिर आणि सिटी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होते.शाळेत जवळजवळ सर्व शिक्षकच अभ्यासू व नावाजलेले होते. बीई होउन वालचंदमध्ये नोकरीस लागल्यानंतर शाळेशी माझा संबंध वाढला.

राणी सरस्वतीदेवी कन्याशाळेचे मुख्याध्यापक श्री. य. द. लिमये व आरवाडे हायस्कूलचे श्री शंकरराव सोमण यांची साधी राहणी व विद्यार्थ्यांबद्दल त्यांना वाटणारी तळमळ पाहून मी प्रभावित झालो. त्यांच्या सहकार्याने मराठी विज्ञान परिषद मी उत्साहाने सुरू केली खरी. पण मी त्यात आरंभशूरच ठरलो. सोमण सर भूगोलाचे शिक्षक होते त्यांचे दोन खोल्यांचे घर नकाशांनी भरलेले असे. य. द. लिमये आपल्या मुलीलाही शाळेतल्या इतर मुलींप्रमाणे कडक शिस्तीत वागवत.संध्याकाळी शाळेत इंग्रजीचा जादा तास घेत. त्या शाळेतल्या फडके बाई आज नव्वदीच्या घरात असूनही सरांचे शिक्षणाचे व्रत  तेवढ्याच निष्ठेने पाळत आहेत.

१९७० मध्ये पुण्यातील सुमन शिंत्रेशी माझे लग्न झाले. लग्नाआधी ती हुजुरपागा शाळेत शिक्षिका होती. लग्नाआधीच तिचा सिटी हायस्कूलमध्ये इंटरव्ह्यू झाला व लग्नानंतर ती (आता शुभांगी रानडे या नावाने)लगेच शाळेत संस्कृतची  शिक्षिका म्हणून रुजू झाली.

माझा धाकटा भाऊ श्रीकांतही मिरजेला विज्ञानशिक्षक म्हणून नोकरीस लागला. म्हणजे रानडे घराण्यात शिक्षकपरंपरा सुरू झाली ती सांगलीतच.सिटी हायस्कूल हे सांगलीचे भूषण होते. तोच मान मिरजेतील विद्यामंदिर प्रशालेला होता. या दोन्ही ठिकाणच्या शिक्षकांचा समृद्ध वारसा आम्हास मिळाला.


१९७३ ते १९७६ या काळात मी सहकुटुंब आय.आय.टी. कानपूर येथे पीएचडीसाठी गेलो होतो. तेथे शुभांगीने हिंदी आत्मसात केले. तिथल्या मराठी विद्यार्थ्यांचे आमचे घर हे हक्काचे आपले घर बनले.  शुभांगीने त्यांच्या नाटकातही काम केले. त्या विद्यार्थ्यांशी आजही आमचे घनिष्ठ संबंध आहेत.

माझा भाऊ श्रीकांत हा मनमोकळ्या स्वभावाचा, उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय शिक्षक होता. श्री तात्या साठे व गो. पां. कंटक यांच्या विज्ञानशिक्षणाच्या उपक्रमाला त्याने व्यापक रूप दिले.

निसर्गसहली, प्रदर्शने, निबंध स्पर्धा एक ना दोन. तो सतत या कार्यात मग्न असायचा. मुख्याध्यापक झाल्यावर तर बालविज्ञान चळवळीच्या माध्यमातून त्याने सांगली परिसरातील सर्व शाळांत विज्ञान चळवळ सुरू केली. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा व प्रदर्शने यात सांगलीची मुले यशस्वी होऊ लागली.

मला आठवते. अनेकवेळा तो सकाळी सकाळी आमच्या घरी येऊन निबंध वा प्रकल्पाविषयी संदर्भ मिळविण्यासाठी येई. सहलीत व स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांसोबत जाई. त्याचा लोकसंग्रह दांडगा होता.शिक्षणाशी संबंध नसलेल्या सामान्य हिंदू मुस्लीम घरातील लहानथोर तसेच व्यापारी, डॉक्टर, वकील त्याचे जीवाभावाचे मित्र होते.

 कानपूरहून आल्यानंतर शुभांगीने राणी सरस्वती, आरवाडे हायस्कूल, मिरज विद्यामंदिर, पटवर्धन हायस्कूल  इत्यादी ठिकाणी रजेच्या मुदतीतील नोकर्या केल्या.विश्रामबाग येथे श्री नामजोशी या दृष्ट्या शिक्षकांनी सावरकर प्रतिष्ठान या शाळेच्या माध्यमातून प्रज्ञाशोध परिक्षेसाठी विशेष वर्ग घेतले जात होते.

१९८३-८४ चा काळ.वालचंद कॉलेजमध्ये संगणक शिक्षणास सुरवात झाली होती. शुभांगीने बेसिकचा कोर्स केला. आम्हीही घरात संगणक आणला.१९८५ मध्ये मे महिन्यात एक महिन्याचा मराठीतून संगणक प्रशिक्षणाचा कोर्स शुभांगीने घेतला. नंतर तिने सुहास खांबे, विजया कुलकर्णी यांच्या सहकार्याने विश्रामबाग येथे सुयश कॉंम्युटर्स या नावाने संगणक प्रशिक्षण वर्ग सुरू केले. अनेक व्यापारी, डॉक्टर, वकील यांनी तेथे संगणकाचे प्राथमिक धडे घेतले.

यातुनच पुढे ज्ञानदीपचा जन्म झाला.

No comments:

Post a Comment