Sunday, September 30, 2018

अशा शाळा, असे शिक्षक - ५

डॉ. देशपांडे स्मृतिमंदीरच्या डॉ. लता देशपांडे 

माजी नगराध्यक्ष कै. डॉ. जी. ए. देशपांडे यांच्या कन्या श्रीमती लता व अरूणा देशपांडे या भगिनी डॉ. देशपांडे स्मृतिमंदिराच्या माध्यमातून सांगली परिसरातील मुलामुलींसाठी व दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम चालवीत आहेत.
(श्रीमती लता देशपांडे)
        शिशुविकास मंडळ - जिजामाता बालमंदिराला जोडूनच सौ. पुष्पावती देशपांडे शिशुु संगोपन मंदीर हे पाळणाघर चालविले जाते. तसेच सांगलवाडीला ना. खाडिलकर बालमंदीरही चालविले जाते. सांगलीमध्ये डॉ. देशपांडे बाल विद्यामंदीर या नावाने एक प्राथमिक शाळाही काढण्यात आलेली आहे.
        डॉ. देशपांडे स्मृतिमंदीरातर्फे अनेक स्तुत्य उपक्रम हाती घेतलेले आहेत.
आरोग्य मंदीर - खरकटवाडी येथे डॉ. देशपांडे यांचा दवाखाना असून तेथे गोरगरिबांना मदत देण्यात येते.
अभ्यास मंदीर - गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा उपलब्ध करून देणे, मार्गदर्शन करणे व पुस्तक पेढी चालविणे. या योजनांचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होत आहे.
उद्योग मंदीर - लहान वयात स्वावलंबनाची सवय लागावी, स्वकष्टार्जित पैसा मिळविण्याचा आनंद लाभावा, कमवा व शिका योजना राबविता यावी हा या योजनेचा उद्देश.
संस्कार मंदीर - प्रत्येक रविवारी गीतापाठ, संस्कृत श्लोकपाठ याद्वारे किशोर किशोरींचा संस्कार वर्ग घेतला जातो.तसेच खरकटवाडी येथेही संस्कार केंद्र चालविले जाते.
कला मंदीर - होतकरू मुलांच्या चित्रकला, नाट्यकला गायन यासारख्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांना जागा, साधने, साहित्य आणि मार्गदर्शन केले जाते.
क्रीडा मंदीर - विविध खेळांसाठी जागा व साधने उपलब्ध करून देणे, स्पर्धा घेणे.
विज्ञान मंदीर - विज्ञानाच्या या युगात मुलामुलींच्या बुद्धीला चालना देण्यासाठी प्रयोगशाळेची व खटपटघराची योजना आहे.   बालमंदीरांसाठी खेळणी व साधनांची बँक - सर्व बालवाड्यांना विविध प्रकारच्या खेळण्यांचा लाभ मिळावा हा यामागील उद्देश आहे.
  स्मृति मंदीर - कै. डॉ. जी.ए. देशपांडे यांच्या विविध स्वरूपातील दुर्मिळ स्मृतींचे जतन करणे.
      एक नाविन्यपूर्ण `बालभवन` उभारण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी श्रीमती लता व अरूणा देशपांडे या दोघीही अहोरात्र झटत आहेत.

स्त्रीशिक्षणाचे सांगलीतील अग्रगण्य शिल्पकार गुरुवर्य कै. य. द. लिमयेसर



 राणी सरस्वतीदेवी कन्याशाळेचे मुख्याध्यापक श्री. य. द. लिमये यांच्याशी माझी पहिली ओळख झाली ती १९६८ मध्ये. मला विज्ञानाची आवड असल्याने मुंबईच्या मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक श्री. म. ना. गोगटे यांना आमच्या वालचंद कॉलेजमध्ये भाषण देण्यासाठी सांगलीस मी बोलाविले होते. त्यांनी सांगलीत मराठी विज्ञान परिषदेची स्थापना करण्याची कल्पना मांडली. श्री य. द. लिमये व आरवाडे हायस्कूलमधील भूगोल शिक्षक श्री. शंकरराव सोमण यांच्याबरोबर आमची बैठक होऊन श्री. य. द. लिमये यांच्या पुढाकाराने राणी सरस्वतीदेवी कन्याशाळेतच अशी संस्था आम्ही सुरू केली.

त्यावेळी संस्थेच्या कामानिमित्त मी अनेकदा त्यांच्या घरी जात असे व आमचा चांगला स्नेह संबंध निर्माण झाला होता. श्री. य. द. लिमये ह्यांची प्रखर विज्ञाननिष्ठा व समाजवादी विचारसरणी यांचे संस्कार त्यावेळी माझ्या मनावर झाले. पुढे ३/४ वर्षातच काही कारणानी ती संस्था बंद पडली तेव्हा लिमये सरांनी माझ्याकडे स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.पुढे अनेक वर्षांनी म्हणजे १९८१ साली त्यांच्याच पेठभाग शाळेत ‘मराठी विज्ञान प्रबोधिनी’ या नावाने संस्था सुरू झाली ती आता नियमितपणे विज्ञान प्रसाराचे कार्य करीत आहे.

य. द. लिमये यांचा जन्म २२-१-१९२४ रोजी सांगलीत झाला. शालेय शिक्षण १९३४ पासून सिटी हायस्कूलमध्ये झाले. शाळेत मित्रमंडळ स्थापन करून चर्चा व वादविवाद मंडळ सुरू करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. शालेय शिक्षण झाल्यावर त्यांनी बी.ए.बीटी पदवी संपादन केली व ते राणी सरस्वतीदेवी कन्याशाळेतच शिक्षक म्हणून रुजू झाले.

य. द. लिमये यांच्या पत्नी सौ. लीलाताई लिमये या बेळगावच्या प्रा. गोविंदराव केळकर यांच्या कन्या. त्याही याच शाळेत शिक्षिका होत्या. दोघांना शिक्षणाची व राष्ट्र सेवा दलाच्या कार्याची आवड असल्याने त्यांनी एकत्र येऊन आपले जीवन मुलींच्या शिक्षणासाठी व्यतीत करण्याचे ठरविले. त्या काळात रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन अत्यंत साधेपणाने लग्न करण्याचे धाडस त्यानी दाखविले.त्यांच्याशी एकदा गप्पा मारताना त्यांनी सहज आपल्या लग्नाची गोष्ट मला सांगितली. हार, एक पेढ्याचा पुडा व फुलाची वेणी एवढ्याच साहित्यानिशी रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी लग्न केले. येताना टांग्याने दोघे घरी आले. हाच त्यांचा लग्न समारंभ.

 त्यानंतर ३६ वर्षे शिक्षक व त्यातील १८ वर्षे मुख्याध्यापक व वुईमेन्स एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह म्हणून कार्य करून संस्था नावारुपाला आणण्यासाठी, तिला जनमानसात प्रतिष्ठा व प्रेमाचे स्थान मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले.विविध विषय शिकवणारे, व्यासंगी उत्तम शिक्षक व शिस्तप्रिय प्रशासक म्हणून त्यांनी नावलौकीक मिळविला.साधी राहणी, स्पष्टवक्तेपणा व शिस्तीचे भोक्ते असूनही ते सतत आनंदी व हसतमुख असायचे. मुलींच्यात सामाजिक जाणीव निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी भाऊबीजेला रिमांडहोममधील मुलांना फराळाचे नेऊन देण्याची प्रथा त्यानीच सुरू केली.

मुलींनी खासगी शिकवण्यांना जाऊ नये व गरीब मुलींना चांगले शिक्षण मिळावे म्हणून कोणतेही मानधन न घेता रोज दोन तीन तास शाळेत जादा शिकविणारे त्यांच्यासारखे शिक्षक विरळाच. मुख्याध्यापक म्हणून मिळणारे अधिक वेतन त्यानी कधीही स्वत:साठी घेतले नाही तर ते संस्थेस सुपूर्त केले. १२-९-१९८२ मध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ग. प्र प्रधान यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कै. वि. द. घाटे या शिक्षण तज्ज्ञांचे हस्ते ’गुरुदेव’ सुवर्णपदक अर्पण करण्यात आले.

निवृत्तीनंतरही ते नियमितपणे संस्थेच्या कार्यात मदत करीत असत व अखंडपणे विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्याचे व त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे त्यांचे कार्य चालू असे.

१४ फेब्रुवारी २००४ रोजी त्याचे दु:खद निधन झाले. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शास अनुसरून संस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू आहे. आता त्यांची कन्या सौ. मेधा भागवत यांचे नेतृत्व संस्थेस लाभल्याने संस्थेचा अधिक गतीने सर्वांगीण उत्कर्ष होईल यात शंका नाही. संस्थेचा विस्तार आता खूपच मोठा झाला असून श्रीमती उषा कुलकर्णी कार्यवाह म्हणून ती जबाबदारी समर्थपणे सांभाळीत आहेत.




No comments:

Post a Comment