Thursday, May 28, 2020

मागोवा

सध्या टीव्हीवरील मालिका, व्हिडीओ, मालिका किंवा फोनवर गप्पाटप्पा यात बहुतेक वयस्कर मंडळी आपला रिकामा वेळ घालवत असतात. मला त्यात फारसा रस नसल्याने आपल्या गतजीवनाचा विचार करून त्यात रममाण होण्याचा मला छंद लागला आहे. येथे अमेरिकेत आल्यापासून बाहेरचे फारसे लोक भेटत नसल्याने आणि कोरोनाच्या स्थानबद्धतेमुळे नातेवाईक व मित्रमंडळीही फिरकत नसल्याने मला  माझ्या जीवनातील उतार चढाव पहायला व त्यावर विचार करायला भरपूर वेळ मिळतो.

पुढील वाटचालीसाठी मागील उपलब्धींचा विचार नेहमीच हिताचा असतो. मराठीत सिंहावलोकन असा शब्द वापरला जातो. हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यांसमोर डोंगराच्या कड्यावर उभा राहिलेल्या सिंहाचे चित्र उमटते.


वर चढत जाणा-या सिंहासारख्या पराक्रमी व्यकतीच्या दृष्टीने हा शब्द योग्य असला तरी आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी मागोवा हा शब्द मला अधिक समर्पक वाटतो.

जीवनातील उतार चढाव हे शब्द जर आपल्या प्रगतीचे निदर्शक मानले तर फार गमतीशीर निष्कर्ष काढता येतात.



बहुतेक नोकरदार मध्यम वर्गातील व्यक्तींच्या बाबतीत शिक्षणाचा काळ चढावाचा व नंतरचा सर्व काळ सपाट व निवृत्तीनंतरचा काळ उताराचा झात असल्याचे जाणवते.

 चढ म्हणजे   ज्यासाठी श्रम आणि निर्धाराची स्वार्थत्यागाची गरज लागते अशा अभ्यास, प्रयत्न वा धडपड या कृती आणि उतार म्हणजे मिळविलेल्या संपत्तीचा उपभोग, ज्ञानाच्या आधारे आनंद देणा-या  मनोरंजन, खाणे पिणे वा आराम करणे असे मानले तर बहुतेकांची वाटचाल   गरीबी किंवा बौद्धिक दिवाळखोरीकडे होत असते.

मागोवा घेताना आपल्या पाठीमागे उंच डोंगर आमि पुढे खोल दरी दिसली तर
         'कोण होतास तू, काय झालास तू '
यासारखे सारे गमावणे किंवा जगाच्या तुलनेत अज्ञानी ठरणे या गोष्टी मग नशिबी येतात.

याउलट मागे दरी व पुढे डोंगर असेल तर माणसाला शिखरावर जाण्याचे ध्येय राहते. तो व तेवढ्याच उत्साहाने जीवनात कार्यरत राहतो. चढण्यातील श्रमात वा दुःख सोसण्यात एक वेगळाच आनंद असतो.

सुदैवाने माझी मनस्थिती वर चढणा-या मुसाफिरासारखी आहे व मला ती अध्यात्मापेक्षा जास्त आनंद देते. आपण इतरांचे आयुष्य फुलविण्याल मदत केली तर तो आनंद द्विगुणित होतो.

 माझ्याबाबतीत तर अनेक विद्यार्थी व माझे सहकारी माझ्या मार्गदर्शनाची मागणी करून मला मोठेपणा देत असतात त्यामुळे मला कृतार्थ जीवन जगण्याचे समाधान लाभत आहे.त्यांच्याकडे पाहिले की मला त्यांच्यापुढील डोंगर माझे वाटू लागतात. मी त्यांना हार न मानता चढण्याचा व श्रम करण्याचा फक्त सल्ला देतो. पण मला त्यात फार समाधान वाटते व त्यांच्याप्रमाणेच मानसिकदृष्ट्या का होईना मी धडपढत राहण्याचा आनंद लुटतो.


No comments:

Post a Comment