Tuesday, October 30, 2018

वालचंद कालेज - कै. प्राचार्य स. द. फाटक सर

एक अलौकिक व्यक्तिमत्व - फाटक सर

कै. प्राचार्य स. द. फाटक
वालचंद कॉलेजमध्ये शिकत असताना, मला विशेष न कळणार्‍या विषयातले एक तज्ञ व ज्येष्ठ प्राध्यापक एवढाच परिचय माझा फाटकसरांशी झाला होता. त्यांचा पांढरा शुभ्र पेहराव व भारदस्त चालणे यामुळे त्यांचे वेगळेपण लगेच जाणवे. त्यांची अध्यात्माची आवड, साधेपणा आणि शिस्तीचा आग्रह यामुळे विद्यार्थी तसेच शिक्षकांतही त्यांच्याबद्दल आदराची भावना होती.
मी कॉलेजात नोकरीस लागल्यानंतर, माझे जेष्ठ सहकारी ज्या ‘नानासाहेब’ या सलगीच्या नावाने त्यांच्याशी बोलत असत तेवढ्या सलगीने वा मोकळेपनाने त्यांचेसी बोलणे मला जमत नसे. कारण माझ्या दृष्टीने ते ‘सर’ होते. मात्र त्यांच्याशी अधिक परिचय झाल्यावर मात्र त्यांच्या मित्रत्वाच्या व मिष्किलपणे बोलण्याच्या पद्धतीमुळे त्यांनी मला केव्हा आपलेसे केले हे कळलेच नाही. प्राचार्य झाल्यानंतरही त्यांनी ती जवळीक तशीच कायम राखली. पुढे प्राचार्यांच्या बंगल्याशेजारी मेनगेटजवळ मी राहणेस आलो आणि त्यांचेशी माझा शेजारी म्हणून अधिक संपर्क आला. प्रा. सुब्बाराव, संतपूर, जोगळेकर यांचेकडे ते बर्‍याच वेळा गप्पा मारण्यास येत तेव्हा मीही नकळत त्यांत सामील होत असे. त्यातूनच मला त्यांच्या स्वभावातील मनमिळाऊपणा, प्रसन्नवृत्ति आणि कोणासही त्यांच्या कामात प्रोत्साहन देण्याची वृत्ती यांचे दर्शन झाले.
त्यांच्या बोलण्याची पद्धत मोठी आकर्षक होती. ते एखादेच वाक्य बोलत. पण त्यातून हास्याची लहर उमटवीत. त्या वाक्यात थट्टा असे. पण उपरोध वा बोचरेपणाचा अंशही नसे. त्यांच्या बोलण्यावर हसता हसता आपल्याला आपली चूक उमजे, नवीन मार्गदर्शन मिळे. स्फूर्ति येई. ए. आर. ई.मधील उद्योजक मंडळींसमवेत चर्चा करताना मी त्यांना पाहिले होते. त्यांत संयमी श्रोत्याची भूमिका घेऊन ते सर्वांच्या कल्पना ऎकून घेत व नंतर अप्रत्यक्षपणे नेहमीच्या बोलण्यातून ते मार्गदर्शन करीत. तेही अशारीतीने की, इतरांच्या विचारांना चालना मिळावी व त्यांच्याकडून नव्या कल्पना याव्यात. यात स्वत: अलिप्त राहून इतरांच्या सृजनशक्तीला वाव देणे व वळण लावणे हा त्यांचा उद्देश असे.
‘अरे आता प्रत्यक्ष कामाला लागा. आपल्याला राष्ट्रवाद किती जमतो हे आपण कृतीने दाखवू या. गप्पा मारून काय मिळणार? आजपासून गप्पा बंद करा, भारतात काय घडावे हे तुम्ही सांगू नका. तुम्ही एकत्रितपणे काय करू शकता हे दाखवून द्या. तुम्ही तरूण आहात. आव्हान पेलून दाखवा. टीका करू नका, काम करा. काही नवीन डिझाईन, उत्पादन करून संशोधकवृतीला वाट करून द्या. त्यातून उद्योगधंदा उभा राहू द्या.’
‘आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी इकडे तिकडे विखुरले आहेत, विखुरणार आहेत. मोठमोठी कामे करणार, मानाच्या जागा मिळविणार. हीच आपली प्रतिष्ठा. शेवटी प्रतिष्ठा म्हणून बोलणारे नि मोजणारे हेच लोक. म्हणजे आपलेच विद्यार्थी आणि त्यांची प्रतिष्ठा म्हणजेच पर्यायाने आपली प्रतिष्ठा. जसे हे विद्यार्थी वाढतील मोठे होतील तशी पर्यायाने कॉलेजची व विद्यापीठाची प्रतिष्ठा वाढेल. प्रत्येक विद्यार्थ्याने हीच जाण ठेवली पाहिजे.

शिक्षकाची गुणवत्ता ठरविण्याचा निकष -
(कै. प्राचार्य स द. फाटक स्मृति-विशेषांक वरून)
आज विद्यार्थी काय म्हणतो यापेक्षा पुढं वीस वर्षांनी तो आपणाविषयी काय म्हणेल याचा शिक्षकाने विचार केला पाहिजे. कारण आज विद्यार्थी अपरिपक्व असतो व आज न आवडलेला शिक्षक कदाचित वीस वर्षांनी समजतो व चांगला ठरतो” - प्राचार्य स द. फाटक


प्रा फाटक इ. स. १९५६ मध्ये वालचंद कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १५ जुलै १९७५ रोजी प्राचार्य गो. चिं. कानिटकर निवृत्त झाल्यावर प्रा. फाटक यानी प्राचार्यपदाची सूत्रे हाती घेतली. ए. आर. ई. उद्योगाचे ते मुख्य प्रेरणास्रोत होते.९ आक्टोबर १९८१ रोजी अल्पशा आजाराने त्यांचे दुख:द निधन झाले.
-------------
आमच्या वालचंद इनोव्हेशन सेंटर मूळ प्रेरणास्रोत कै. प्राचार्य फाटक सर पवित्र स्मृतीला माझे विनम्र अभिवादन .
---- सु. वि. रानडे

Saturday, October 27, 2018

वालचंद कॉलेज- माझ्या आठवणीतील काही प्राध्यापक - ३

प्रा. तलाठी
प्रा. तलाठी बिल्डींग कन्स्ट्रक्शन शिकवायचे. ते शांत व मनमिळावू स्वभावाचे होते. त्त्यांनी कॉलेजमध्ये चुना तयार करण्यची भट्टी बांधली होती.

प्रा. संतपूर
 ( मध्यभागी प्रा. संतपूर - प्रा. अभ्यंकर यांचे संग्रहातून साभार) 
गोरेपान उंचेपुरे व खंबीर व्यक्तिमत्वाचे प्रा. संतपूर सर बोलण्यात रोखठोक पण उदार मनाचे होते. आम्हा ज्युनिअर मंडळीना त्यांचा भीतीयुक्त आदर वाटे. प्रत्येक काम वेळच्यावेळी व व्यवस्थित होण्यासाठी ते आग्रही असत. कामात चालढकल किंवा गुळमुळीत उत्तरे त्यांना अजिबात खपत नसत. त्त्यामुळे नीट विचार करून व पूर्वतयारी करून मीटींगला जाण्याची सवय मला त्यांचेमुळे लागली. प्रशासनातील या कौशल्यामुळे वारणानगर येथील इंजिनिअरिंग कॉलेजवर प्रिंन्सिपॉल म्हणून गेल्यावर त्यांनी चांगलाच नावलौकीक मिळविला होता.

आय.आय. टी. मुंबई येथे डॉ. सौंदलगेकर यांचेकडे त्यांनी ओपन चॅनल फ्लो या विषयात पी. एच. डी. केली होती. प्रा. सखदेव यांचे बरोबरीने इरिगेशनच्या प्रॉजेक्ट्समध्ये त्यांनी बाकी स्टाफचे नेतृत्व केले. प्रा. संतपूर, प्रा. करंदीकर, प्रा शिरहट्टी असे तिघेजण हायड्रॉलिक्स व फ्लुईड मेकॅनिक्स शिकवायचे. त्या तिघांनी हायड्रॉलिक्स प्रयोगशाळेची उभारणी केली. या प्रयोगशाळेतील अवाढव्य टिल्टींग फ्ल्यूम, उंच पाण्याची टाकी, पंप व चॅनल या सोयींमुळे आमच्या सिव्हील डिपार्टमेंटला मोठे महत्व प्राप्त झाले. कराड व बुधगाव येथील कॉलेजचे विद्यार्थी येथे प्रॅक्टिकलसाठी येत असत. शिवाय पंप व व्हॉव कॅलिब्रेशनची कामे मिळत असत.


प्रा शिरहट्टी
प्रा शिरहट्टी यांनी नदी, नाला वा कालव्यातील प्रवाह मोजण्यासाठी उपयोगात येणा-या पार्शल फ्लूमवर एम. ई. केले होते. ते स्वभावाने शांत व अभ्यासू वृत्तीचे होते. काही थोडी वर्षेच ते डिपार्टमेंटमध्ये होते.

प्रा. श्रीधर करंदीकर
प्रा. श्रीधर करंदीकर माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठे. आम्ही ६१ साली सांगलीत गावभागात रहायला आल्यापासूनच माझी त्यांच्याशी ओळख होती. प्रा. संतपूर यांचेप्रमाऩेच ते शिस्तीचे भोक्ते. ते मुळचे नागपूरचे. १९६८ साली NEERI मध्ये टेस्टींग शिकण्यासाठी त्यांच्या नागपूरच्या घरी दोन महिने कुटुंबातील सदस्याप्रमाऩे राहिलो होतो. त्यामुळे तेव्हापासूनच आमची घनिष्ठ मैत्री आहे. त्यांनी आय.आय.टी. मुंबई येथे पीएचडी केले. समुद्रकिनारी जमिनीतील गोड्या पाण्यात समुद्राचे खारे पाणी मिसळू नये यासाठी करावयाच्या उपाययोजनेबाबत त्यांचे संशोधन होते. विभागप्रमुख म्हणून काम केल्यावर कॉलेजमधून निवृत्ती घेऊन के. आय.टी. कोल्हापूर येथे प्राचार्यपद स्वीकारले.
त्यांची व माझी मुलगी वीस वर्षांपूर्वीच अमेरिकेत स्थायिक झाल्याने तसेच आमचे कौटुबिक संबंध जवळचे असल्याने सुखदुखात  आजही मला त्यांचा थोरल्या भावासारखा आधार वाटतो.

Tuesday, October 23, 2018

वालचंद कॉलेज- माझ्या आठवणीतील काही प्राध्यापक - २

आमच्या सिव्हील डिपार्टमेंटमध्ये रुजू झालेले बहुतेक प्राध्यापक बाहेर प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन आले होते. आमचे विभागप्रमुख प्रा. म. अ. ब्रह्मनाळकर पूर्वी गुजराथमधील उकाई धरणावर इंजिनिअर होते.  प्रा. बर्वे व  प्रा. गोळे मिलिटरीतून, प्रा. सखदेव आणि प्रा. तलाठी इरिगेशन डिपार्टमेंटमधून, प्रा. शिरहट्टी पुण्याच्या cwprs मधून, प्रा. रानडे व जोगळेकर कंस्ट्रक्शन क्षेत्रातून आले होते. साहजिकच त्यांच्या अनुबवाचा फायदा विद्यार्थ्यांप्रमाणे आम्हा अननुभवी शिक्षकांनाही होत असे. दुपारचा डबा खाण्यासाठी आम्ही एकत्र बसत असू. त्यावेळी मेकॅनिकलचे प्रा बाम व इलेक्ट्रिकलचे प्रा. सी. जी. जोशीही येत. त्यांच्या गप्पा ऐकताना आम्हाला बाहेरच्या प्रत्यक्ष कामांची माहिती कळे.

 प्रा. बर्वे होस्टेलचे रेक्टर असल्याने सतत फार कामात असत. सर्व्हे प्रॉजेक्टच्यावेळी मात्र   त्यांच्याशी संवाद होत असे. त्यांनी सांगली रेल्वे स्टेशनपासून कॉलेजमधील धोंडुमामा साठे पुतळ्यानजिकच्या पायरीपर्यंत स्थान उंची नोंद (समुद्रसपाटीपासूनची उंची) आणून तेथे खोदून ठेवली होती. व्हरांड्यामध्येदेखील चेनची लांबी तपासण्यासाठी खुणा केल्या होत्या. सर्व्हे डिपार्टमेंटमधीत सत्तू भोसले  सर्व्हेचे सर्वेसर्वा होता. लेव्हल मशीन न वापरताही  केवळ नजरेने  लेव्हल वा अंतराचे त्याचे अंदाज  बरोबर यायचे. श्री कावरे  तसेच सॉईलमधले गोडबोले इन्स्ट्रुमेंट रिपे्रीमध्ये वाकबदार होते.

१९६७ साली डिसेंबरमध्ये कोयनानगर येथे भूकंप झाला. त्यायेळी कोयनेचे धरण फुटले तर महापूर येऊन सारे सांगली शहर वाहून जाईल अशी भीती सहळीकडे पसरली होती. त्यावेळी कॉलेजमधील प्रा. भाटे, प्रा. सखदेव व प्रा संतपूर यांनी गावातील चौकात खुल्या सभा घेऊन लोकांच्या भीतीचे निरसन केले होते.

प्रा. ब्रह्मनाळकर बुद्धीमान, तत्वचिंतक व कवीमनाचे होते. त्यांच्या खोलीत गेले की ते आमच्यासारख्या ज्युनिअरांना देखील ते आपले विचार व  उकाई प्रॉजेक्टमधील अनुभव सांगत. त्यांनी केलेल्या कविता ऐकवत. सॉईल मेकॅनिक्सचे  महत्व त्यांना कळले होते. या विषयातील प्रयोगशाळा सुरू करून त्यांनी तेथे शास्त्रज्ञ टेरझागी यांचा फोटो लावला होता.  कॉलेजच्या मासिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या दोन कविता खाली देत आहे.
तर असे होते ब्रह्मनाळकर, तत्वज्ञानी पण त्याचबरोबर रसिकही.

 प्रा. सखदेव इरिगेशनच्या डिझाईनमध्ये एक्स्पर्ट होते. कराडपासून सांगलीपर्यंतच्या सर्व साखरकारखान्यांच्या इरिगेसन स्कीम त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हील स्टाफने  प्रत्यक्ष सर्व्हेसह डिझाईन केल्या. रिटायर झाल्यावरही डिझाईन व सल्ला देण्याचे त्यांचे काम शेवटपर्यंत चालू होते. त्यांनी आमच्या शिल्प चिंतामणी सोसायटीची स्थापना केली. प्लॉट पाडून ते मंजूर करून घेतले. इ. स. २००१ मध्ये सोसायटीतील  त्यांच्या बंगल्यातच मी ज्ञानदीपच्या नेट-कॅफेचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते केले होते.
प्रा. मकरंद जोगळेकर हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते. त्यांचा माझेशी कॉलेजप्रमाणेच इतरही अनेक कामात निकटचा संबंध होता.  त्यांच्या कार्याची नुसती वरवर ओळख करून देण्यासाठी मला वेगळा लेख लिहावा लागणार आहे.

माझ्या नोकरीतील पहिल्या काही वर्षात बर्वे सरांचा विठ्ठल, ब्रह्मनाळकरांचा बाळू साखळीकर, अप्लाईड मेकमधील वाय. आर. माने, जिमखाना विभागाचा आनंदा मोहिते  व अशाच इतर डिपार्टमेंटमधीलही अनेक  विश्वासू  सेवकवर्गाने त्यांच्या कामातून मला प्रभावित केले होते. त्यांची  नावे वालचंदच्या इतिहासात कायमची कोरून  ठेवणे आवश्यक आहे.

Monday, October 22, 2018

वालचंद कॉलेज- माझ्या आठवणीतील काही प्राध्यापक - १

 मी १९६६ मध्ये वालचंद कॉलेजमधून बी.ई. पास झाल्यावर लगेचच असिस्टंट लेक्चरर म्हणून नोकरीस लागलो. सर्व्हे डिपार्टमेंटला त्याकाळी मानाचे स्थान होते कारण सर्व विद्यार्थ्यांना तो विषय प्रॅक्टिकलसह असल्याने तेथे जास्त प्राध्यापकांची गरज असे. साहजिकच माझी नेमणूक सर्व्हे डिपार्टमेंटमध्ये झाली. प्रा. बर्वे सर विभाग प्रमुख असले तरी  एम. डी. व के आर. पटवर्धन हे सर्व्हे तॅबचे मुख्य आधारस्तंभ होते. पाच सहा जणांच्या तेथल्या ग्रुपमध्ये त्यांनी लहान भावासारखे मला सामावून घेतले.

प्रा. एम. डी. पटवर्धन भारताच्या फाळणीपूर्वी कराचीत इंजिनिअरिंग कॉलेजवर नोकरीस होते. मोजके पण महत्वाचे बोलणारे असल्यामुळे त्यांना बोलते करून मी त्यांचेकडून कॉलेजच्या स्थापनेविषयी बरीच माहिती मिळविली अनेकांच्या त्यागातून सुरू झालेल्या या कॉलेजमध्ये मला नोकरी करण्यास मिळाली याचा मला अभिमान वाटला.

एकत्रपणे चर्चा करताना सर्व्हे या विषयातील खाचाखोचा व कसे शिकवायचे या गोष्टी समजल्याच पण त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे  जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे याचेही  ज्ञान नकळत मिळाले.

 त्यावेळी सगळ्यानाच पगार फार कमी होते. मात्र प्रा. के.आर. पटवर्धन कायम उत्साही व हसतमुख असायचे. त्यांचे थोरले भाऊ विलिंग्डन कॉलेजवर प्रोफेसर होते. त्यांच्या मानाने आपल्याला कमी पगार मिळतो म्हणून त्यानी कधी वाईट वाटून घेतले नाही. ते   म्हणायचे प्रत्येकाने आपला पगार आहे त्यापेक्षा दोन इन्क्रिमेंट कमी आहे असे मानून घरखर्च भागवला तर तो कायम सुखी राहतो.  मी विजयनगरमध्ये रहात असलो तरी  सांगलीतल्या आमच्या स्नेहदीपमधील फ्लॅटशेजारीच ते रहायचे.  रिटायर झाल्यावर गच्चीत बसून रस्त्यावरची ट्रॅफिक पहाण्यात ते आनंद मानायचे.  डायबेटिसच्या आजाराने त्रस्त असतानाही त्यांची समाधानी वृत्ती  तशीच होती. आपले आवडते कुत्रे अचानक मेल्यावर असे दुख पुन्हा आयुष्यात भोगावे लागू नये म्हणून त्यांनी चक्क दीर्घायुषी कासव घरात पाळले होते. त्यांच्या  ऑपरेशनच्यावेळी तर त्यांनी डॉक्टरनाच शुभेच्छा देऊन चकित केले होते.

सांगलीतील नामवंत आर्किटेक्ट श्री,  नरगुंदे  अमच्या डिपार्टमेंटचे भूषण होते.  त्यांच्याकडे बिल्डिंग ड्राईंग हा विषय होता. गावात त्यांच्या शब्दाला मान असला तरी येथे  वरिष्ठांनी सांगितलेल्या सूचना ते तंतोतंत पाळत.
कॉलेजवर आलो की मी आर्किटेक्ट व्यावसायिकतेचा कोट काढून ठेवतो असे ते म्हणायचे.

प्रा. रा. त्र्यं रानडे हे आमच्या डिपार्टमेंटमधील ज्येष्ठ व आदर्श प्राध्यापक होते. आपल्या विषयाच्या सविस्तर नोट्स ते आपल्या सुंदर हस्ताक्षरात लिहीत व प्रत्येक लेक्चरनंतर त्यात अधिक माहिती नोंदवून ठेवीत. बहुरंगी करमणूक या त्यांनी मुलांसाठी लिहिलेल्या तीन पुस्तकांमुळे त्यांचे नाव घराघरात पोचले होते. त्यासाठी होस्टेलच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अॉक्सिडेशन पॉंड  बांधून  डॉ. सुब्बाराव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एम. ई. केले. दुर्दैवाने १९७२ मध्ये ब्रेन हॅमरेजने त्यांचे अकाली निधन झाले.


आज ही थोर मंडळी आपल्यात नाहीत. मात्र त्यांच्याबद्दलच्या माझ्या काही आठवणी मी आपणापुढे मांडल्या आहेत. क्रमाक्रमाने इतर प्राध्यापकांबद्दल मला आठवत असलेली माहिती मी सादर करेन.

अशाच अनेक आठवणी आपल्याकडेही असतील. आपण त्या शब्दबद्ध केल्या तर आजच्या व माजी विद्यार्थ्यांना वालचंदच्या प्रगतीत पायाभूत काम करणार्या प्राध्यापकांची माहिती होईल. या प्राध्यापकांचे फोटो तसेच इतर सर्व माहिती संकलित करण्याचा माझा मनोदय आहे.

आपले सहकार्य मिळाले तर कालांतराने का होईना पण ते शक्य होईल असे मला वाटते.


Saturday, October 20, 2018

मायसिलिकॉन व्हॅली - प्रस्तावित नवी वेबसाईट



( Ref: https://en.wikipedia.org/wiki/San_Francisco_Bay_Area)

अमेरिकेच्या पश्चिम कडेला  कॅलिफोर्निया स्टेट आहे. तेथे सॅन फ्रान्सिस्को शहराच्या दक्षिणेला असलेल्या बे एरिया ( खाडीमुळे तयार झालेले खोरे) प्रदेशाला सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते. कारण येथे सिलिकॉन चिपवर आधारित संगणक क्रांतीला प्रारंभ झाला. इ. स. २००० च्या सुमारास येथे अनेक संगणक कंपन्या उदयास आल्या. एच. पी,, इंटेल, य़ाहू, गुगल, फेसबुक, आय.बी.एम., मायक्रोसॉफ्ट, अॅपल, अडोब, ओरॅकल या व अशा कंपन्यांचे आश्रयस्थान असणारी ही सिलिकॉन व्हॅली आजही  संपूर्ण जगभरातील तरुण आयटी कर्मचारी आणि व्यावसायिक उद्योजकांचे स्वप्नस्थान बनले आहे. परंतु बहुतेक लोकांना  या स्थानाबद्दल फारच त्रोटक माहिती असते.

ज्ञानदीप फाऊंडेशनने www.mysangli.com आणि www.mykolhapur.net यासारख्या स्थानिक माहिती मराठीतून देण्यासाठी वेबसाईट डिझाईन केल्या. त्यास प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मी स्वत: आता या सिलिकॉन व्हॅलीत कायमचा राहण्यास आलो असल्याने या भागासाठीही अशी बहुभाषिक वेबसाईठ करण्याचे ज्ञानदीपने ठरविले आहे.

वेबसाईटच्या नावाला my हा प्रत्यय जोडण्यामागे  एक विशेष अर्थ  अभिप्रेत आहे जे सिलिकॉन व्हॅलीचे रहिवासी झाले आहेत वा होणार आहेत त्यांना स्थानिक रहिवाशांप्रमाणेच या जागेबद्दल आत्मियता निर्माण व्हावी अभिमान वाटावा असा उद्देश मायसिलिकॉनव्हॅली या नावात आहे.

बे एरियाबद्दलची  माहिती संकलित करणे ही कल्पना आहे. येथे लोकप्रिय असलेल्या बहुतेक वेबसाईट आयटी आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित आहेत. त्यांच्याकडे व्यवसाय आणि व्यावसायिक उपक्रम आणि संस्थांची भरपूर माहिती आहे. काही साईट धार्मिक किंवा सामाजिक आणि सांस्कृतिक गटांमध्ये विभाजित असलेल्या वा विशिष्ट देशांसाठी आहेत.

व्याप्ती -  आयटी आणि व्यवसाय यांच्या  माहितीशिवाय येथील पर्यावरण आणि संस्कृतीची  ओळख येथे येणार्या वा येऊ इच्छिणार्या लोकांना  होण्यासाठी  स्थलांतरित लोकसंख्येवर विशेष लक्ष देऊन बे एरियाच्या सर्व बाह्य रहिवाशांना आवश्यक माहिती त्यांच्या भाषेतून नेटद्वारे मिळविण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे. सुरवातीच्या काळात इंग्रजी भाषेत सर्व माहिती दिली जाईल . नंतर टप्याटप्याने प्रतिसाद पाहून इतर भाषातून माहिती दिली जाईल .

उद्देश -


१. बे एरियामधील सर्व स्थलांतरितांचा जलद गतीने स्थानिक रहिवाशांमध्ये समावेश व्हावा यासाठी पोषक वातावरण तयार करणे. जेणेकरुन त्यांना स्थानिक रहिवाशांचा दर्जा मिळेल,

2. स्थलांतरितांना रोजच्या जीवनात येणार्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करणे. तसेच इतिहास, भूगोल, पर्यावरण, प्रशासन आणि पायाभूत सुविधांच्या सुविधांबद्दल त्यांना माहिती देणे.

वेबसाइटचे प्रस्तावित मुख्य विभाग


 1. अमेरिका, कॅलिफोर्निया, बे क्षेत्र आणि त्याची सिलिकॉन व्हॅली ओळख इतिहास आणि भौगोलिक माहिती - स्थान, आकारमान, लोकसंख्या इत्यादी
2. भूगर्भ रचना, पाणी, माती, हवामान, पर्यावरण आणि बदलणारे ऋतू
3. वनस्पती आणि झाडे, वन्य प्राणी
4. रस्ते आणि इमारती, वाहतूक व्यवस्था
5. काउंटी (शहरसमूह) आणि त्यांचे प्रशासन
6. पाणी पुरवठा, घनकचरा, विद्युतपुरवठा
7. रुग्णालये, शाळा, ग्रंथालये, शासकीय. कार्यालये, मनोरंजन केंद्रे, दुकाने आणि मॉल
8. स्थानिक आणि क्षेत्रीय समस्या.
9. अभिप्राय आणि अभ्यागत मंच

मी वरील मुद्द्यांविषयी काही मूलभूत माहिती संकलित केली आहे,  (त्यावर  येथे इंग्रजी भाषेत ब्लॉगही पूर्वी प्रसिद्ध केले आहेत.) परंतु प्रस्तावित वेबसाईटच्या व्याप्ती आणि उपयुक्ततेबद्दल  सूचना आणि माहिती अवश्य कळवावी.

मला आशा आहे की या वेबसाईटने ज्ञानदीप इन्फोटेक आणि ज्ञानदीप फाऊंडेशनच्या प्रगती आणि सहकार्यासाठी नवीन कार्यक्षेत्र खुले होईल.

Thursday, October 18, 2018

वालचंदची गौरवशाली परंपरा आणि स्वायत्ततेचे आव्हान

वालचंद हेरिटेज आणि इनोव्हेशन या ज्ञानदीपच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून मी १९७० ते २००० या काळातील वालचंद कॉलेजमधील संशोधनाचा आढावा घेतला. कॉलेजच्या वार्षिक मासिकांतून मला त्या काळात विविध विभागातील  प्राध्यापकांनी केलेल्या  संशोधनाची तसेच भारतात उद्योग व प्रकल्पांसाठी जे योगदान दिले त्याची माहिती झाली. सुमारे २२ मासिकांतून मिळालेल्या माहितीचे गुगलवर शोध घेता येईल अशा  टेक्स्टमध्ये रुपांतर करून   www.walchandalumni.com  या वेबसाईटवर ही सर्व माहिती प्रसिद्ध केली आहे.

मी स्वत: त्या काळात कॉलेजवर नोकरी करत होतो तरी मला इतर विभागात होत असलेल्या संशोधनाची फारच कमी माहिती होती हे माझ्या ध्यानात आले. त्या काळात अमेरिकेतील प्रथितयश जर्नलमध्ये प्रबंध सादर करणे, जपान, सिंगापूर, इंग्लंड, थायलंड येथे भेटी देऊन तेथे चर्चासत्रे आयोजित करणे, भाभा अणुकेंद्र वा उपग्रह संशोघनात साहाय्य, भारतातील प्रमुख उद्योगांशी संबंधित संशोधन आणि त्याचबरोरर सांगली परिसरातील उद्योगांना तांत्रिक सल्ला देणे हे सर्व कार्य केवळ सिव्हील मेकसारख्या मोठ्या विभागांबरोबरीने फिजिक्स, मॅथ्ससारख्या छोट्या विभागातील प्राध्यापकही करीत होते.

गेल्या सहा महिन्यात कॉलेजवर मी अनेकवेळा गेलो. निरनिराळ्या विभागांना भेटी दिल्या. मात्र सर्व ज्येष्ठ प्राध्यापक सांख्यिकी विष्लेषण, कागदपत्रांची पूर्तता व वारंवार वेगवेगळ्या मीटींगच्या कामात गर्क असल्याचे मला दिसले. त्यांना त्यांच्या विषयाचा अभ्यास करायला, संशोधन करायला, विद्यार्थ्यांशी संवाद साधायला वेळच नव्हता. मग बाहेरच्या उद्योगांशी संपर्क साधून त्यांना सल्ला देण्याला वेळ कुठला मिळणार. मला वाईट वाटले. पूर्वीचा काळ आठवला.

त्यावेळी प्रत्येक शिक्षकाचे बाहेरच्या उद्योग व व्यावसायिक जगाशी जवळचे संबंध होते. विद्यार्थ्यांना कारखान्यात वा प्रकल्पावर जाऊन काम करण्याची संधी मिळे. प्राध्यापकही गटागटाने काम करीत. पर्यावरण क्षेत्रात डॉ. सुब्बाराव, मी व प्रा. गाडगीळ तर  स्ट्रक्चरमध्ये डॉ. कृष्णस्वामी, घारपुरे व     डॉ. ए. बी. कुलकर्णी आणि इतर विभागातही असे ग्रुप होते. सर्वांच्या खोल्या विद्यार्थ्यांसाठी सदैव उघड्या असत. शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही एकत्रितपणे काम करीत.
त्याच स्फूर्तिदायी वातावरणात शिकलेले प्राध्यापक आजही कॉलेजमध्ये मानाच्या पदावर विराजमान आहेत. मात्र स्वायत्ततेबरोरर आलेल्या जबाबदार्यांनी त्यांना शिक्षण, संशोधन वा नवनिर्मितीच्या कार्यासाठी फारच कमी वेळ मिळतो.  प्रत्येकजण आपल्या व्यापात एवढा गुंतलेला असतो की एकमेकांशी चर्चा करायला वेळ नसतो. आय. आय.टी. मध्ये जसे प्राध्यापक स्वयंभू असतात व वागतात तशीच संस्कृती स्वायत्ततेमुळे वालचंद कॉलेजमध्ये येऊ लागली आहे. पूर्वीचे  खेळीमेळीचे व उत्हाहाचे वातावरण हळुहळू लोप पावत चालले आहे.

शिक्षक  हा व्यवस्थापक झाला की त्याच्यातील शिक्षक हरवला जातो. "No man can serve two masters " या उक्तीप्रमाणे शिक्षक हा शिक्षकच राहिला पाहिजे.

त्या काळात सर्व संशोधन भारतातील उद्योगांच्या प्रत्यक्ष समस्यांवर होत होते. मात्र या संशोधन प्रकत्पांची माहिती नेटवर न येता छापील स्वरुपात राहिल्याने सध्याच्या नेटसेव्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोचलेलेच नाही याची जाणीव झाली.
 त्या काळात सर्व संशोधन भारतातील उद्योगांच्या प्रत्यक्ष समस्यांवर होत होते. मात्र या संशोधन प्रकत्पांची माहिती नेटवर न येता छापील स्वरुपात राहिल्याने सध्याच्या नेटसेव्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोचलेलेच नाही याची जाणीव झाली.
अजूनही वेळ गेलेली नाही. वालचंद कॉलेजने यात लक्ष घालून आतापर्यंत कॉलेजच्या प्राध्यापकांनी केलेले संशोधन प्रकत्प व प्रबंधांचे संगणकीकरण करावे. ज्ञानदीप ही जबाबदारी आनंदाने स्वीकारेल.

 नव्या संगणक युगात वालचंद कॉलेजने सांगली परिसरात मोलाचे पायाभूत काम केले आहे. स्वायत्तता मिळवून नवा आधुनिक अभ्यासक्रम आणि शिक्षणपद्धतीचा अवलंब कॉलेजने सुरू केला आहे ही अभिमानाची गोष्ट आहे.

 मात्र स्वायत्ततेबरोबर येणारी व्यवस्थापनाची जबाबरारी समर्थपणे पेलण्यासाठी स्वतंत्र नेमणुका न करता कॉलेजमधीलच व्यासंगी, अनुभवसंपन्न प्राध्यापकांवर ही जबाबदारी टाकल्याने शिक्षण व संशोधन दोन्हींचे मोठे नुकसान होत आहे असे मला वाटते.

या विषयावर फार पूर्वी मी एक लेख (Dark side of Autonomy ) लिहिला होता त्याची आठवण झाली.

विद्यापीठाचे महत्वाचे कार्य म्हणजे अभ्यासक्रम ठरविणे व परिक्षा घेणे. या दोन कामांसाठी  फार मोठी प्रशासकीय  यंत्रणा  तेथे कार्यरत असते. अनेक अधिकारी, व ऑफिस कर्मचारी  तसेच सेवा सुविधा असल्याने त्यांच्या कार्यात सुसूत्रता असते. या सर्व सोयी स्वायत्तता मिळालेल्या कॉलेजला आहे त्या टीचिंग व नॉन टीचिंग स्टाफने करणे अपेक्षित असते. साहजिकच त्याचा ताण सर्व शिक्षण प्रक्रियेवर पडतो.

याशिवाय नव्या शिक्षणपद्धतीत उपस्थिती, विद्यार्थ्यांची प्रगती व शिक्षकांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी अनेक नोंदी करण्याचे काम शिक्षकांना करावे लागते.

 वस्तुत: शासनाने यासाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था तसेच अधिकार्यांची नियुक्ती करावयास हवी.स्वायत्तता मिळालेल्या कॉलेजानी याबाबत आवाज उठविण्याची गरज आहे. कारण तज्ज्ञ प्राध्यापक या कामात गुरफटले तर त्याचा परिणाम शिक्षण व संशोधनावर फार विपरीत होईल. बरेच चांगले प्राध्यापक संस्था सोडतील. मग स्वायत्तता हे भूषण न वाटता ते एक मुद्दाम ओढवून घेतलेले संकट वाटेल. शिवाय यामुळे विद्यार्थ्यांचे फार नुकसान होईल आणि संशोधन व नवनिर्मितीच्या प्रयत्नांना खीळ बसेल.

वालचंद कॉलेजच्या व्यवस्थापनाने यावर योग्य ती उपाययोजना करावी  व तज्ज्ञ प्राध्यापकांना त्यांच्या संशोधन व शिक्षणाच्या कार्यासाठी व्यवस्थापन जबाबदारीतून मुक्त करावे असे मला वाटते.

Tuesday, October 2, 2018

प्राचार्य बापूसाहेब कानिटकर




प्रा. मालतीबाई किर्लोस्कर यांच्या ’मधुघट’ या लेखसंग्रहातील लेख मायमराठी डॉट कॉम या वेबसाईटवर  त्यांच्या  स्मृतिदिनी प्रसिद्ध झाला होता तो खाली देत आहे.
-------------
प्राचार्य बापूसाहेब कानिटकर

सांगलीच्या वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे भूतपूर्व प्राचार्य गो. चिं. उर्फ बापूसाहेब कानिटकर यांचा सात फेब्रुवारी हा पहिला स्मृतिदिन! पाहता पाहता त्यांना जाऊन एक वर्ष झाले. यावर माझा अजूनही विश्र्वास बसत नाही. कै. बापूसाहेबांची पत्नी ’शरयू’ ही माझी किर्लोस्करवाडीतली जीवाभावाची बालमैत्रीण! त्यामुळे कानिटकर कुटुंबाशी माझा अतिशय जिव्हाळ्याचा आणि जवळचा असा भावबंध! अर्धशतकापेक्षा अधिक काळाचा! त्यामुळेच आज हा लेख लिहिताना तीर्थरुप बापूसाहेबांच्या अनेक आठवणींनी मनात एकच गर्दी केली आहे!

 मागच्या वर्षी एक नोव्हेंबरला बापूसाहेबांना नव्वदाव्वे वर्ष लागले. त्या प्रीत्यर्थ त्यांचे अभिष्टचिंतन-अभिनंदन करावे म्हणून सकाळी जरा लवकरच मी त्यांच्या बंगल्यावर गेले. आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ मोठ्या भक्तिभावाने त्यांनी आपल्या बंगल्याचे नाव ’चंद्रमणी’ असे ठेवले होते. मी गेले तेव्हा ते नेहमीप्रमाणेच व्यवस्थित पोशाख घालून दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचीत बसले होते. मी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांच्या लख्ख, गोर्‍या आणि भव्य कपाळावर कुंकू लावले आणि दोन गुलाबाची सुंदर फुले आणि एक सुबकशी छोटी वस्तु भेट म्हणून त्यांच्या हातात दिली. त्यांनी प्रसन्नपणे हसून त्याचा स्वीकार केला. नंतर मी त्यांना म्हटले, ’तुम्ही टेनिस खेळता हे मला माहिती आहे, क्रिकेटमध्येही खूप ’रन्स’ काढत होतात हे पण मी ऐकले आहे, आता जीवनाच्या खेळातले धावांचे शतक तुम्ही पूर्ण करणार, याबद्दल मला खात्री आहे. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा, मी आणि माझी कुटुंबीय मंडळी यांच्यातर्फे!’ त्यावर पुन्हा एकवार शांतपणे त्यांनी स्मित केलं आणि माझ्या मस्तकाला स्पर्श करुन मला आशीर्वाद दिला. पण नियतीला माझी ही प्रार्थना मान्य नसावी. कारण या घटनेला दोन महिने होतात न होतात तोच त्यांना देवाघरचे आमंत्रण आले ! तेही पहाटे पहाटेच !

समाजाला कै. बापूसाहेबांची ओळख आहे ती ते वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्रथम प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य म्हणून ! तेथून ते सेवानिवृत्त झाल्यावर बुधगावच्या वसंतदादा इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे ते प्राचार्य झाले. त्या संस्थेचा परिसर विस्तृत असा त्यांनी एकदा जातीने हिंडून आम्हा मंडळींना दाखवला होता, सर्व माहिती तपशीलवार सांगितली होती. जयसिंगपूरच्या डॊ. मगदूम इंजिनिअरिंग महाविद्यालयातही प्राचार्याचीच जबाबदारी त्यांच्यावर होती. ते मेकॆनिकल आणि इलेक्ट्रिकल अशा दोन्ही शाखांचे उत्तम इंजिनिअर होते. बनारस, बेंगलोर अशा नामवंत शहरात राहून त्यांनी या पदव्या मिळविल्या होत्या. त्यांचे या इंजिनिअरिंग क्षेत्रातले योगदान महत्वपूर्ण व मोलाचे होते. त्यामुळे त्यांच्या सल्लामसलतीसाठी, मार्गदर्शनासाठी दूरदूरहून माणसे येत असत.

बापूसाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी आलेले एक स्नेही म्हणाले, ’मालतीबाई, स्वर्गात गेल्यावरही बापूसाहेब स्वस्थ बसणार नाहीत. तिथेही ते एखादे इंजिनिअरिंग कॊलेज काढतील बघा!’

बापूसाहेबांमधला जातीवंत शिक्षक सदैव जागा असायचा. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर विश्रामबागेत राहणार्‍या मुलांना (व अर्थात जवळपासच्या परिसरातल्या मुलांनाही) शिक्षणासाठी सांगली-मिरजेला जायला लागू नये, गोरगरीब मुलांची इथे जवळच सोय व्हावी म्हणून त्यांनी १९७३ च्या सुमारास काही सहकार्‍यांच्या मदतीने ’विश्रामबाग शिक्षण संस्थे’ची स्थापना केली. तिच्यामार्फत प्राथमिक-माध्यमिक शाळा सुरु केल्या. त्या शाळांतून आज पंचवीस वर्षांनंतर दोन हजारापेक्षा जास्त मुले-मुली शिकत आहेत. भिन्न भिन्न विचारसरणीच्या तसेच स्वतंत्र मते असलेल्या लोकांना एकत्रित करुन आर्थिकदृष्ट्या अवघड असा उपक्रम राबविणे हे काम काय सोपे थोडेच असेल? पण ते त्यांनी यशस्वीरितीने पार पाडले. या संस्थेवर त्यांचे अपत्यनिर्विशेष प्रेम होते. ही शिक्षणसंस्था माझ्यामते कै. बापूसाहेबांचे चिरस्मरणीय आणि स्फूर्तिदायक असे स्मारकच म्हणायला हवे!

एकूणच पाहता त्यांना शिक्षणप्रमाणेच विधायक आणि सर्जनशील अशा कामांत मनापासून रस होता. सांगली अर्बन को-ऒप. बॆंकेचे ते संचालक होते. विविध संस्थांच्या सभांना ते न चुकता हजर राहात, चर्चेत भाग घेत, आवश्यक तेव्हा आणि आवश्यक तिथे सला देत, मार्गदर्शन करीत. आपल्या संपन्न आणि सुदीर्घकाळाच्या अनुभवांचा त्यांनी अखेरपर्यंत समाजाच्या कल्याणासाठी उपयोग केला. अशा कार्यमग्नतेमुळेच सेवानिवृत्तीनंतरचाही त्यांचा काळ समाधानात, आनंदात गेला.

            विश्रामबागेतील ज्येष्ठ नागरिकांची सभा बर्‍याचवेळा बापूसाहेबांच्या ’चंद्रमणी’ बंगल्यात भरत असे. त्या बंगल्यातल्या प्रशस्त, हवेशीर, देखण्या दिवाणखान्यात अनेक व्यवसायातील मंडळी जमून काव्यशास्त्र विनोदात रंगून जात. अशा सभांची गोडी आमच्या प्रिय शरयूने केलेल्या ओल्या नारळाच्या करंज्या, सुरळीच्या वड्या किंवा अशाच अन्य रुचकर पदार्थांनी आणखीनच वाढायची.

प्रिय शरयूप्रमाणेच (तिचे सासरचे नाव ’प्रतिभा’ आहे. पण मी तिच्या माहेरची! त्यामुळे मी तिला तिकडच्या नावानेच संबोधते) कै. बापूसाहेबांनी नियतीने देखणे, रुबाबदार व्यक्तिमत्व बहाल केले होते. त्यांची उंची बेताची व अंगलट काहीशी स्थूल होती. वर्णाने ते चांगले गोरेपान होते. भारतीय आणि पाश्चात्य दोन्हीही पोशाखात प्रथमदर्शनीच पाहणार्‍याच्या मनावर त्यांचा प्रभाव पडे. ते मितभाषी आणि शिस्तप्रिय होते. अधिकारपदस्थ माणसांना मग ते कुटुंबातले असोत की संस्थेतले असो, प्रसंगी कठोर वा उग्रही बनावे लागते. त्यामुळे त्यांचा थोडा धाक आणि दराराही वाटे. पण अंतर्यामी ते खूप हळवे होते, मृदु होते. गौरी, गुड्डू (ही मी त्यांच्या नातवंडांची ठेवलेली नावं) किंवा घरातले अन्य कोणी यांना दोन दिवस साधा थंडीवार्‍याचा ताप आला, तरी आतून ते फार अस्वस्थ असत. शरयूचे घर इंजिनिअरिंग कॊलेजात असताना तिथून परतायला मला उशीर झाला, तर ते जातीने मला घरी सोडायला येत.

मला काही लहान-मोठे वा मौल्यवन असे खरेदी करायचे असले की मी शरयूबरोबर जायची. पुष्कळदा बाजारहाट करुन यायला बराच उशीर व्हायचा. दुपारची जेवणाची वेळ टळून गेलेली असायची, तरीही बापूसाहेब शरयू आल्याशिवाय कधीही जेवायचे नाहीत. आमच्या उशिरा येण्याबद्दल ते कधी रागावलेलेही मला आठवत नाही. या गोष्टी वरवर पाहता छोट्या वा साध्या दिसतात, पण अशा छोट्याछोट्या आणि भावपूर्ण गोष्टींनीच पती-पत्नींच्या सहजीवनाचा प्रेममय, सुंदर गोफ विणला जात असतो. आयुष्यभर एकात्म मणाने, परस्परांचा आदर करीत, एकमेकांना समजावून घेत जीवन जगणारे शरयू-बापूसाहेब हे जोडपे सर्वांनाच आदरणीय वाटे. या उभयतांनी व त्यांच्या कुटुंबियांनी विश्रामबागेतल्या माझ्या ५० वर्षांच्या आयुष्यात माझ्या सर्व सुखदुःखात माझ्यावर मायेची शाल पांघरली.

 जेव्हा जेव्हा आमची ’नन्नी’ (माझी आई) मला इथे भेटायला येई त्यावेळी शरयूच्या पाठीवर धप्पदिशी थाप मारुन तिला म्हणायची, ’तुम्ही दोघं, तुमचं घर इथे आहे म्हणून मालीची आम्हाला काळजी वाटत नाही हो.’

बापूसाहेबांचा दिनक्रम रेखीव असायचा! प्रातःकाळी उठून घराचे फाटक उघडून ते हौसेने दूध घेत, चहापाणी-स्नान आदी आन्हिक उरकले की नऊ-साडेनऊला व्यवस्थित नास्ता करीत, न चुकता भोजनापूर्वी नवनाथाची पोथी वाचीत व नंतर मोठ्या निगुतीने ती रेशमी रुमालात बांधून ठेवीत. देवावर त्यांची निस्सीम श्रध्दा होती. त्यांच्याकडे गणपती दीड दिवसाचा त्याची दुर्वा-सुपारी-कापूर, उदबत्ती, प्रसादापासून सर्व जय्यत तयारी शरयूने केली असली तरीही त्यांचे सर्वत्र बारीक लक्ष असे. कापर्‍या हातात पुजेचं तबक घेऊन सर्व आरती ते म्हणत. धार्मिक सणांना गडद-लाल कद नेसत. पूजाअर्चेनंतर भोजन-वामकुक्षी-चहा, शनिवारी उभयतांचा उपवास म्हणून साबुदाण्याची खिचडी खाऊन दूरदर्शनवर खेळ, बातम्या जे आवडेल ते दिवसभरात बराच वेळ पाहात. ’वालचंद’ला येण्यापूर्वी ते ’सरस्वती सिने टोन’ साऊंड इंजिनिअरचे काम पाहत. त्यामुळे व्ही. शांताराम, भालजी, सुलोचना बाई आणि अशीच कितीतरी चित्रपटसृष्टीतली मातब्बर मंडळी त्यांच्या चांगल्या परिचयाची ! त्यांचे चित्रपट, नाना आठवणी सांगत, ते आवर्जून पाहात असत.

संध्याकाळी येणार्‍या-जाणार्‍यांबरोबर माफक गप्पा, फार लांब चालवत नसे तेव्हा घरा शेजारच्या दुकानातून भाजी-ब्रेड आणणे, कधी मिरजेला शरयूसह आप्त मंडळींकडे फेरी मारणे, असा दिवस घालवून रात्री हलकेसे जेवण करुन ते झोपायचे. जेवणात ना कसली त्यांना खोड ना जीवनात कसलेही व्यसन! त्यामुळे दीर्घायुष्याचे वरदान त्यांना ईश्वराने दिले. वयोमानानुसार अधून-मधून काही तक्रारी उदभवत. पण त्यांन अतिशय सोशिकपणे व शांतपणाने ते विवेकाने तोंड देत. 

 कै. बापूसाहेब-शरयू यांच्या व माझ्या घरात केवळ काही फुटांचेच अंतर आहे. त्या घरी मी कितींदा जायची. त्याला हिशेबच नाही. कारखान्याच्या डिपॊझिटचे काम असो की नारळ काढणार्‍याला किती रक्कम द्यायची हे ठरवायचे असो, बापूसाहेबांना मी सल्ला विचारत असे. कसलाही कंटाळा न करता ते मला सल्ला देत. आज ते आठवताना माझे मन त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेने भरुन येते आहे. एक-दोन दिवस माझी फेरी झाली नाही तर प्रकृती बघायला शरयूबरोबर तेही आस्थेवाईकपणे येऊन चौकशी करीत. म्हणून त्या उभयतांना विश्रामबागमधील माझे ’पालक’ असेच मी मानते.
 
 सुमारे वीस वर्षापूर्वीची गोष्ट! माझ्या ’पसायदान’ बंगलीचे काम अगदी शेवटच्या टप्प्यात आलेले! वास्तुशांतीची तारीख ठरुन संबंधितांना आमंत्रण पत्रे गेलेली आणि नेमक्या त्याचवेळी आमचे कॊन्ट्रॆक्टरसाहेब पूर्वसूचना न देता काश्मीरला की कुठे प्रवासाल गेलेले ! आता आली का पंचाईत! मी तरी पार गडबडून गेले. कामाचे आता काय होणार म्हणून ! त्यावेळी कै. बापूसाहेब आणि माझ्या घराचे डिझाईन करणारे सुप्रसिध्द स्टक्चरल आर्किटेक्ट आनंदराव साळुंखे माझ्या अंगणात खुर्च्या टाकून आपला बहुमोल वेळ खर्चून बसून राहिले व कामगारांकडून त्यांनी उर्वरित काम करुन घेतले. माझ्या वास्तुशांतीच्या यशात या दोघांचा वाटा सर्वात मोठा आहे, तो मी कधीच विसरणार नाही.

 गरजू माणसांना मग तो नोकर असो, आप्त असो की अपरिचित निर्धन माणूस असो, बापूसाहेब आपला मदतीचा हात कसलाही गाजावाजा न करता त्यांच्यासाठी पुढे करीत. असे करताना आर्थिक फटका व कटु अनुभवाचे धनीही त्यांना कधीकधी व्हावे लागले, पण त्यामुळे त्यांनी आपले मन कडवट होऊ दिले नाही.

बापूसाहेबांच्या कर्तव्यनिष्ठेची आणि राष्टाबद्दलच्या प्रांजळ भक्तीची दोन उदाहरणे माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहेत. त्यांच्या एक वडील बहीण अविवाहित होत्या, अशक्त होत्या. त्या जन्मभर भावाजवळच राहिल्या. आठ-दहा वर्षांपुर्वीच त्या गेल्या. त्यावेळी बापूसाहेबांचे वय ऐंशीच्या घरात होते. म्हणून त्यांनी घरीच रहावे, अशी विनंती आप्तस्वकियांनी करुनही ते बहिणीच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले आणि पुढचे सर्व विधीही यथासांग केले. त्या गंगुताई अधून मधून माझ्या घरी आल्या म्हणजे म्हणायच्या, "मालूताई, माझा भाऊ कोहिनूर हिरा आहे." दुसरी आठवण आहे ती सुमारे ३५-४० वर्षांपुर्वीची ! सांगली-मिरज ही सर्वांना फार उपयोगी असलेली आगगाडी सरकारने तडकाफडकी बंद केली ! त्यामुळे विद्यार्थ्यांपासून व्यापार्‍यांपर्यंत सर्वांनाच फार गैरसोय सोसावी लागली. ती गाडी पुन्हा सुरु व्हावी म्हणून अनेक नामवंत प्रतिष्ठीत नागरिक खटपट करीत होते, पण सरकारच्या आडमुठेपणापुढे कुणाचे काय चालणार? ती खटपट करणार्‍या लोकांना काही महत्वाचे नकाशे तातडीने करुन हवे होते, हातात फार थोडा वेळ असूनही बापूसाहेबांनी ते नकाशाचे काम तत्परतेने करवून घेतले आणि संबंधितांकडे सर्व साहित्य पोहोचविले. एखाद्या कामाची आवश्यकता व निकड त्यांना पटली म्हणजे ते काम होईपर्यंत बापूसाहेबांना चैन पडत नसे. हा गुण आज एकूण दुर्मिळच झालाय.

 बापूसाहेब तसे हौशीही होते. त्यांच्या इंजिनिअरिंग कॊलेजात नवीन कसले यंत्र की काय आणले होते. त्यावर छान आईस्क्रिम होई. एक दिवस त्यांच्या सांगण्यावरुन मी दूध+आंबा+साखर आदी मिश्रण करुन त्यांच्याकडे पाठवले तर काय गंमत! अर्ध्या-पाऊण तासांत रुचकर सुवासिक आईस्क्रिम घेऊन त्यांचा नोकर माझ्या दारात उभा! आनंदाची देवघेव करण्याची ही त्यांची वृत्ती मला खूपच काही शिकवून गेली.

बापूसाहेब हिंदू धर्म, संस्कृती, इतिहास, परंपरा यांचे गाढे अभिमानी होते. आपल्या पडत्या काळात ज्यांनी आपल्याला मदत केली, अशी आपली दिल्लीस राहणारी मोठी बहीण व मेहुणे यांना ते फार मानीत. नाशिक हे त्यांचे मूळ गाव. तिथल्या आठवणी ते खूप सांगत. देशाच्या सध्याच्या दुरवस्थेचे त्यांना अतिशय दुःख वाटे. पण आपण वयाच्या अशा टप्प्यात आहोत की ती स्थिती बदलण्याच्या दृष्टीने फारसे काही आपल्याला करता येत नाही, हे जाणून ते ती उद्विगता गिळून टाकत.

 बापूसाहेबांच्या या जीवनचित्रांत प्रिय शरयूचे स्थान महत्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती सर्वार्थाने त्यांची नमुनेदार सहचारिणी होती. संसारात तिच्या वाट्याला आलेल्या सर्व जबाबदार्‍या तिने समर्थपणे पार पाडल्या. तीही मितभाषी, शांत, सोशिक आहे. कष्टाळू, समंजस आहे. अनेक खेळांत पटाईत आहे. तशीच हाडाची कलावंतही आहे. भाज्या आणि फळे यांचे सुंदर देखावे बनविण्याचे तिने महिला मंडळात सांगलीत एकदा सुरेख प्रात्यक्षिक करुन दाखविले होते. ते मला चांगले आठवते. नाटकांत ती छान काम करते. हिंदीच्या परीक्षाही तिने दिल्या आहेत, सुगरण तर ती आहेच, विणकाम-शिवणकाम म्हणजे तिचा जणू श्वासोच्छवासच आहे. इंजिनिअरिंग कॊलेजच्या महिला मंडळात चैत्रागौरीच्या हळदीकुंकवाचा थाट मोठा बहारीचा असे. वर्तमानकालीन सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांवर एखादा शोभिवंत देखावा तिथल्या भगिनी उभा करीत. एकजुटीने व तळमळीने करीत. त्यात या प्रतिभाताई कानिटकरांचा सहभाग, सल्ला भरपूर असे. बापूसाहेबांना आपल्या कलावंत पत्नीच्या गुणांचे कौतुक होते. त्या देखाव्यासाठी लागणार्‍या लहानमोठ्या कितीतरी गोष्टी ते हौसेने कॊलेजमार्फत करुन देत. बापूसाहेबांच्या सुखी सहजीवनात शरयूचा वाटा मोठा आहे, असे मी म्हणते ते काय उगीच? संसाराची धुरा तिने जवळजवळ ६०-६५ वर्षे सांभाळल्याने बापूसाहेबांना इतर कामांसाठी वेळ मिळाला! त्यांच्या जाण्याने ती बरीच एकाकी झाली हे खरे, पण ते एकाकीपण आजही काहींना काही कामात, वाचनात, मन गुंतवून ती सह्य करुन घेते!

बापूसाहेबांनी कृतार्थ मनाने जीवनाचा निरोप घेतला, आपल्या कर्तृत्वाने शैक्षणिक जगात ते नामवंत झाले. सौ. प्रिय शरयूसारखी सद्गुणी, विवेकी पत्नी त्यांना लाभली. डॊ. सौ. शशिकला, इंजिनिअर सौ. नीलप्रभा, एम. ए. झालेली सौ. वासंती यांना अनुरुप सहचर लाभले. मुला-मुलींचे संसार बहरले-फुलले, नातवंडे-परतवंडे पाहिल्याने सोन्याची फुले उधळून घेण्याचे भाग्य त्यांना मिळाले. धाकटा कुशाग्र बुध्दीचा सुपुत्र श्रीराम कानिटकर आज डिप्लोमा इंजिनिअरिंग कॊलेजाचा प्राचार्य झाला आहे. सून डॊ. सौ. संपदा कर्तबगार व कुशल दंतवैद्य म्हणून महाराष्ट्राबाहेरही गाजते आहे. मोठी सून डॊ. सौ. हेमा दामले समाजशास्त्राची डॊक्टर आहे, प्राध्यापिका आहे. नातवंडे-परतवंडे घराण्याच्या सत्किर्तीत खूप भर घालताहेत. या सार्‍यांचा लौकिक ऐकत, त्यांना आशीर्वाद देत, कुणाचीही सेवा न घेता बापूसाहेबांनी देवाघराकडचे प्रस्थान ठेवले. असे भाग्य कितीजणांच्या वाट्याला येते? या सुंदर जीवनचित्रावर नियतीने एक भलामोठा खिळा ठोकला होता तो बापूसाहेबांचा सर्वात हुशार इंजिनिअर मुलगा अरविंद याच्या अकाली मृत्युचा! पण हा वज्राघात बापूसाहेब-शरयूंनी फार विवेकाने-धीराने सोसला! असे त्या उभयतांबद्दल किती लिहावे !

जगद्विख्यात नाटककार शेक्सपिअरनं जगाला रंगभूमीची यथोचित उपमा दिली आहे. कै. बापूसाहेबांनी आपल्या वाटयाला आलेल्या सर्व भूमिका सुविहीतपणे पार पाडल्या. त्यांना आज पुन्हा माझे एकवार नम्र अभिवादन !

ज्ञानदीप मंडळ योजनेचे पुनश्च हरि ओम.

२०१३ मध्ये कोल्हापूर येथे ज्ञानदीप मंडळ योजनेची सुरुवात केल्यानंतर कोरेगाव, अकोता, रत्नागरी अशा विविध ठिकाणांहून योजनेविषयी विचारणा करणेत आली. मात्र संगणक वापरण्याचे ज्ञान तेथील शिक्षकांना नसल्याने तसेच शाळांतील संगणक नादुरूस्त असल्याने याबाबतीत पुडे फारशी प्रगती होऊ शकली नाही.

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने डिजिटल स्कूलची योजना सुरू करून संगणक खरेदीसाठी अनुदान मंजूर केले. तसेच शालेय अभ्यासक्रमात संगणक प्रशिक्षणाचा समावेश केला. त्यामुळे बहतुेक शाळांनी वेगळा संगणक विभाग सुरू केला. शैक्षणिक ध्वनी-चित्रफिती तसेच अभ्यासक्रमावर आधारित सॉफ्टवेअरचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य सुरू झाले. तरीदेखील संगणकाचा व विशेषकरून इंटरनेटचा वापर नव्या ज्ञानाच्या शोधासाठी व नवील ज्ञान निर्मितीसाठी न झाल्याने ञानदीप मंडळ योजनेची गरज लक्षात आली.

मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने  ज्ञानदीप फौंडेशनने पुन्हा याबाबतीत प्रयत्न करण्याचे ठरविले. संगणकावर मराठी टाईप करण्याचे प्रशिक्षण देण्यास प्राधान्य द्यावे या सांगतीच्या माजी जिल्हाधिकारी सौ. लीना मेहेंदळे यांनी सुचविल्यामुळे प्रथम शिक्षक व नंतर विद्यार्थी यांना असे प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले.

१ सप्टेंबर २०१८ रोजी महाराष्ट्र टेक्निकल एज्ज्युकेशन सोसायटीच्या पुणे शाखेत ज्ञानदीप इनोव्हेशन सेंटर सुरू केल्यानंतर सांगली येथे प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे ठरले.

५ सप्टेंबर २०१८ या शिक्षकदिनी सावरकर प्रतिष्ठानच्या प्रज्ञा प्रशाळेत पहिले ज्ञानदीप मंडळ सुरू करण्यात आले. १९८५ साली ज्ञानदीपच्या संचालिका कै. सौ. शुभांगी रानडे यांनी  येथेच  संगणक प्रशिक्षणाचा एक महिन्याचा वर्ग घेतला होता. ज्ञानदीपतर्फे एक प्रश्नपेटी शाळेस देण्यात आली.



६ सप्टेंबर २०१८ रोजी महाराष्ट्र टेक्निकल एज्ज्युकेशन सोसायटीच्या शाळेत ज्ञानदीप मंडळ सुरू करण्यात आले.


यानंतर लगेचच ८ सप्टेंबर २०१८ रोजी पलूस येथील पंडित विष्णु दिगंबर पलुसकर शाळेत ज्ञानदीप मंडळाची स्थापना करण्यात आली.  आता मुख्य गरज आहे ती या शाळांतील शिक्षकांना संगणकाची माहिती करून देऊन मराठी टायपिंग शिकविण्याची.


१० सप्टेंबर २०१८ रोजी मला अमेरिकेला यावे लागले. संबंधित शिक्षकांशी नेटवरून संपर्क साधून मी हे काम करण्याचा प्रयत्न करणार आहे.  सांगलीतही असे शिक्षण देऊ शकतील अशा  शिक्षकांचा गट करण्याची गरज आहे. पाहू    त्यात कितपत यश येते ते. 
यावेळी मुले मराठीतून संगणकावर आपले लेख टाइप करू लागतील व ते लेख वेबसाईटच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचतील तेव्हा आपोआपच या योजनेला नवे बाळसे येईल.