Saturday, January 18, 2014

इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर – भाग - २



वस्तु खरेदी - निर्मिती उद्योगासाठी लागणारा कच्चा माल वा सुटे भाग यांची संख्या प्रत्येक वस्तूनुसार वेगवेगळी असते. संगणक, टीव्ही, स्कूटर, मोटार या वस्तूंसाठी अनेक सुटे भाग लागतात. हे खरेदी करताना प्रत्येक तयार वस्तूसाठी कोणत्या प्रकारच्या किती सुट्या भागांची वा वस्तूंची गरज आहे व एकूण उत्पादन क्षमता किती आहे याचा विचार करावा लागतो.  यातील काही भाग जास्त किमतीचे तर काही भाग अगदी कमी किमतीचे असू शकतात. 

उदाहरण द्यायचे झाले तर संगणकजोडणीसाठी त्यातील प्रोसेसर वा मेमरीचिप यांची किंमत जास्त असते तर वायर व स्क्रू यांची किंमत अगदी कमी असते. शिवाय त्यांचे मोजमाप करावयाची पद्धतही भिन्न असते. काही वस्तू नगावर, काही वस्तू वजनावर तर काही वस्तू लांबी वा आकारमानावर मोजल्या जातात. नगावर मोजताना देखील डझन, शेकडा यासारखी मापे वापरली जाऊ शकतात. जी गोष्ट मापनाची तीच किंमतीची. कच्चा माल वा सुटे भाग सहसा घाऊक स्वरुपात घेतले जातात त्यावेळी अशा मापन पद्धतीचा विचार करून आवश्यक तेवढ्या मालाची खरेदी करावी लागते.

खरेदी केलेल्या वस्तू साठवून ठेवताना त्यांचे आकारमान, वजन व वस्तुनुरूप योग्य ती संरक्षक सुविधा यांचा विचार करून वस्तुभांडाराची व्यवस्था करावी लागते. 

वस्तूची खरेदी प्रक्रिया खालील टप्प्यात होते.
१.      वस्तू ज्यांच्याकडून विकत मिळतात त्या सर्व पुरवठादारांकडून  कोटेशन मागविणे
२.      या कोटेशन्समधील वस्तूंच्या किमती, कर, गुणवत्ता व इतर अटींचा विचार करून योग्य पुरवठादार निश्चित करणे व त्यास पर्चेस ( खरेदी )ऑर्डर पाठवणे
३.      आलेल्या वस्तू तपासून भांडारात जमा करणे व पुरवठादाराचे बिल रोखीने अदा करणे वा उधारी म्हणून नोंद करणे 

खरेदीमुळे वस्तुभांडारातील वस्तूंच्या संख्येत जशी वाढ होते त्याप्रमाणे वस्तुभांडाराच्या एकूण किमतीत देखील वाढ होते. यातील संख्येची वाढ उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाची असते तर किंमतीत होणारी वाढ. ही वस्तुभांडारात गुंतलेल्या भांडवलातील वाढ दर्शविते. 

खरेदीपूर्वी वस्तुभांडारात असणार्‍या वस्तूंची एकूण किंमत + खरेदी केलेल्या वस्तूंची किंमत= वस्तुभांडारातील वस्तूंची एकूण नवी किंमत

वस्तूंच्या किंमती कालमानाप्रमाणे व बाजारातील चढ उताराप्रमाणे बदलत असतात. त्यामुळे भांडारातील वेगवेगळ्या वेळी खरेदी केलेल्या एकाच प्रकारच्या वस्तूंची किंमत वेगवेगळी असू शकते. साहजिकच नवीन उत्पादनासाठी वस्तूंचा वापर करताना कोणती किंमत गृहीत धरायची असा प्रश्न पडतो.  याबाबतीत तीन पद्धतींचा वापर करता येतो.

FIFO (पहिल्यांदा खरेदी केलेला माल प्रथम वापरणे)
LIFO(सर्वात शेवटी खरेदी केलेला माल प्रथम वापरणे)
AVERAGE COSTING सर्व वस्तूंच्या एकूण खरेदी रकमेस वस्तूंच्या संख्येने भागून सरासरी किंमत काढणॆ.

No comments:

Post a Comment