Monday, January 20, 2014

नेट्द्वारे शिक्षणासाठी मुडल सिस्टीम भाग - १

माहिती तंत्रज्ञानात झालेले प्रगत संशोधन व इंटरनेटचा सर्व जगभर झालेला विस्तार यामुळे कोणत्याही विषयाचे ज्ञान कोणासही घरबसल्या आता मिळू शकणार आहे. स्थान, वेळ, तज्ज्ञ शिक्षकांची उपलब्धता आणि प्रत्यक्ष उपस्थितीची गरज या सर्व अडचणी दूर करणार्‍या  नेटद्वारे  शिक्षण पद्धतीचा अंगिकार भविष्यकाळात सर्वांना करावा लागणार आहे. मात्र सध्याच्या शाळा - कॉलेजात दिल्या जाणार्‍या शिक्षणपद्धतीतील फायदे दूरस्थ पद्धतीत अबाधित राहतील अशी सोय  नेट आधारित शिक्षणात करणे हे मोठे अवघड काम आहे.

सध्याच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थी व शिक्षक यांच्यात प्रत्यक्ष  संवाद होऊ शकतो. विद्यार्थी आपल्या शंका शिक्षकांना विचारू शकतो व शिक्षक  विद्यार्थ्याच्या शंका लगेच सोडवू शकतो. सर्व विद्यार्थी एकत्र शिकत असल्याने अशा शंका निरसनाचा इतर विद्यार्थ्यांनाही फायदा होत असतो. विद्यर्थ्याची पूर्व तयारी, त्याची मानसिक व बौद्धिक पातळी, त्याच्याकडून होणारा अभ्यास या सर्वांचा विचार करून शिक्षक योग्य ते मार्गदर्शन करू शकतो व त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवू शकतो. दूरस्थ पद्धतीमध्ये अशा प्रत्यक्ष  संवादाची सोय मर्यादित असल्याने, विद्यार्थ्यांविषयी पूर्ण माहिती नसल्याने,  तसेच शिक्षण देण्याचे व घेण्याचे कार्य  एकाच वेळी नसल्याने बर्‍याच त्रुटी राहतात. यावर मात करून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी वापरावयाची पद्धत विविध पर्यायी सुविधांनी सज्ज असावी लागते.

 सध्या प्रचलित असणार्‍या अनेक दूरस्थ शिक्षण पद्धतीत विषयाचा अभ्यासक्रम व पुस्तके व इतर अभ्यास साहित्य ( पीडीएफ, ध्वनी- चित्रफिती वा सीडी ) पोष्टाने वा इ-मेलने  विद्यार्थ्याकडे पाठविले जाते व नंतर परीक्षा घेऊन विद्यार्थ्याचे मूल्यमापन केले जाते. काही बाबतीत शिक्षक-विद्यार्थी संपर्कासाठी स्थानिक केंद्रांची योजना केली जाते. या पद्धतीमध्ये अनेक दोष आढळतात.

अशा दूरस्थ शिक्षणात विद्यार्थ्यावर शिकण्याची सर्व जबाबदारी टाकल्याने व अभ्यासाच्या काळात शिक्षकाशी संपर्क नसल्याने शंका व अडचणी सोडविण्यासाठी त्याला शिक्षकाच्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ घेता येत नाही. विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करून एकत्रपणे शिकण्याचा अनुभव  घेता येत नाही. विषय समजण्यासाठी विद्यार्थ्याने किती कष्ट घेतले, त्याला कोणता भाग समजला नाही त्याला विषयाचे ज्ञान कितपत आत्मसात झाले हे पाहण्यासाठी त्याचे परीक्षेतील यश एवढाच मापदंड वापरला जातो. त्यामुळे विषयात प्राविण्य  मिळविण्यापेक्षा परिक्षेत  यशस्वी होणे एवढेच उद्दीष्ट विद्यार्थ्यापुढे राहते. साहजिकच अशा दूरस्थ पद्धतीचा वापर करून दिले जाणारे शिक्षण प्रत्यक्ष शिक्षणापेक्षा फारच कमी दर्जाचे राहते.

  वेबमास्टरचा कोर्स नेटद्वारे देण्याची योजना ज्ञानदीपने आखली त्यावेळी अशा प्रचलित दूरस्थ शिक्षणाऎवजी  प्रत्यक्ष शिक्षणाचा अनुभव देणारी आधुनिक शिक्षण प्रणाली वापरण्याचे निश्चित केले होते.
उपलब्ध दूरस्थ शिक्षण प्रणालींचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले की मुडल शिक्षण प्रणाली ही अत्यंत लवचिक, प्रभावी व आवश्यकतेनुसार बदलता येणारी मुक्त स्रोत संगणक प्रणाली आहे व   जगातील अनेक शाळा व महाविद्यालये यांचा यशस्वीपणे वापर करीत आहेत.

मुडल प्रणालीचा अभ्यास करताना एक गोष्ट मनाला भावली ती म्हणजे शिक्षणप्रक्रियेचा मूलभूत विचार घेऊन ही प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. मुडल प्रणालीत शिकविणे व शिकणे या दोन्ही क्रियांतील वैयक्तिक ( Personal Constructionism)  तसेच  सामूहिक कृतीशीलतेला (Social Constructionism) मह्त्वाचे स्थान दिले आह्रे.

 पेडॉगॉगी (Pedogogy) म्हणजे लहान मुलांना शिकविण्याची पद्धत व अँड्रागॉगी (Andragogy) म्हणजे प्रौढांना  शिकविण्याची पद्धत या दोन परस्पर भिन्न पद्धतींचा यथायोग्य उपयोग करणे शक्य व्हावे हे उद्दिष्ट ठेवून मुडल प्रणालीची रचना केलेली आहे. पेडॉगॉगी ही शिक्षणाची रूढ पद्धत असून विद्यार्थ्याला नवीन शिकण्यास उद्युक्त करणे, त्याच्या जिज्ञासेला प्रोत्साहन देऊन नवी माहिती देणे  याला महत्व दिले जाते. येथे शिक्षकाला महत्वाचे स्थान असून कल्पनाशक्ती व आपला शिकवण्याचा अनुभव याद्वारे तो विद्यार्थ्याला ज्ञान देतो. विद्यार्थ्यांकडून कृती करवून घेतो.  तर प्रौढांना शिकवितांना त्यांची शिकण्याची क्षमता, त्यांचा अनुभव व शिकलेल्या ज्ञानावर आधारित जबाबदारी स्वीकारण्याची तयारी यांचा विचार करून त्यांना स्वयंशिक्षणासाठी प्रेरित केले जाते. येथे शिक्षकाची जबाबदारी मार्गदर्शनाची रहाते.

शिक्षण देणे व शिक्षण घेणे या गोष्टींची शिक्षक व विद्यार्थी या गटात विभागणी करण्याऎवजी खर्‍या शिक्षण पद्धतीत  शिक्षक व विद्यार्थी एकत्रपणे विषय समजावून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे या क्रियेत शिकणे व शिकविणे या दोन्ही भूमिका परस्परांना घ्याव्या लागतात. विद्यार्थ्याने आपल्याला समजलेले आपल्या भाषेत पुनः शिक्षकाला वा इतर विद्यार्थ्यांना सांगणे वा त्यावर आधारित कृती करणे यात अभिप्रेत असते. अशा सामूहिक कृतीस पोषक असे मुक्त चर्चा व्यासपीठ ( फोरम) ठेवणे मुडलमध्ये शक्य असते.

याशिवाय शिक्षक अनेक प्रकारचे अभ्यास साहित्य व मल्टीमिडीया सुविधांचा वापर करून विद्यार्थ्यांना ज्ञान देऊ शकतात. विद्यार्थ्यांना समजलेल्या माहितीचे मूल्यांकन करण्यासाठी विविध प्रकारचे प्रश्न देणे, परीक्षा घेणे  वा प्रकल्प करवून घेणे शिक्षकास शक्य असते.   

मुडल प्रणालीत सर्व्हरवर सर्व शैक्षणिक सुविधा देणारा डाटाबेस ( माहिती कक्ष ) व त्यावर आधारित  डायनॅमिक वेबसाईट यांचा वापर केला जातो. या पद्धतीत वेबसाईट व्यवस्थापक, शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी वेगवेगळी  प्रवेश द्वारे असून त्यांना विशिष्ट अधिकार देता येतात.

No comments:

Post a Comment