Sunday, January 12, 2014

वैद्यकीय भोंदूगिरी

आरोग्यक्षेत्रात इतर क्षेत्रांप्रमाणेच माहिती अधिकार येणे अत्यावश्यक बनले आहे. परदेशात डॉक्टरवर रोगाचे निदान, त्यावर दिलेली ऒषधे,  त्याचे संभाव्य निष्ट अनिष्ट परिणाम याविषयी रोग्यास पूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र भारतात मात्र याविषयी उदासीनता दिसते. त्याचाच फायदा काही डॉक्टर घेतात. रोग्याच्या आरोग्यशास्त्रातील अज्ञानाचा फायदा घेऊन त्याला आजारपणाबद्दल अतिरंजित माहिती  देऊन घाबरवतात वा आपल्या औषधाच्या प्रभावी उपयोगाबद्दल दंतकथा सांगून त्याला लुबाडतात.


रस्त्यावर बसलेल्या, झाडपाल्याचे औषध देऊन गरिबांना गंडविणार्‍या वैदूपासून ते मोठ्या हॉस्पिटलमधील तथाकथित तज्ज्ञ डॉक्टरपर्यंत  असे फसवणुकीचे प्रकार घडतात.सुशिक्षित व अन्य क्षेत्रात मानाचे स्थान भूषविणार्‍या व्यक्तीही अशा फसवणुकीस बळी पडतात. त्यांचे उदाहरण पाहून इतर सर्वसामान्य लोकही अंधविश्वास ठेवून त्यामागे धावतात.


आयुर्वेद हे अनुभवांवर संचित झालेले ज्ञान आहे. त्यातील औषधांचा परिणाम कालांतराने होत असतो. त्यामुळे त्याच्या प्रत्यक्ष उपयोगाविषयी निश्चित अनुमान काढणे अवघड जाते. मात्र त्या औषधांच्या किंमतीबाबत रोग्यास अंदाज करता येतो.होमिओपॅथीची उपचार पद्धती रोग्याच्या आकलनशक्तीबाहेरची असते. त्यातील औषधांच्या किंमतीपेक्षा रोगाच्या निदानाला जास्त महत्व दिले जाते. अर्थात या दोन्ही बाबतीत केलेले निदान व दिलेले औषध यांचे दुसर्‍या तज्ञ व्यक्तीकडून परिक्षण शक्य होण्यासाठी त्याची माहिती रोग्यास लिखित स्वरुपात देणे बंधनकारक असले पाहिजे.

आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील औषधांतील घटक व परिणाम याविषयी रोग्याला माहिती कळली तरी त्याच्या किंमतीबाबत तो अनभिज्ञच असतो. ऑपरेशनसाठी लागणारा खर्च व शरिरात आरोपित करावयाच्या वस्तूंच्या किमती हॉस्पिटलच्या दर्जानुसार व वाढत जातात. त्यातच या वस्तूंची गरज डॉक्टर रोग्याच्या आर्थिक क्षमतेवर निश्चित करतो. प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. वस्तूची किंमत जितकी जास्त तेवढा रोग्यास फायदा असे गणित मांडले जाते. वस्तुतः ते डॉक्टरला लागू पडते.


वैद्यकीय क्षेत्रात औषध कंपन्यांकडून मिळणारे  कमिशन,  डॉक्टरला दुसर्‍या डॉक्टरकडून मिळणारे कमिशन व प्रत्यक्ष वैद्यकीय सल्ल्याबाबतची फी याबाबत योग्य नोंद बहुधा होत नाही. त्याच्या तपासणीचीही प्रभावी अंमलबजावणी होत नाही. आयकर विभागासही डॉक्टरांच्या उत्पन्नाविषयी बिनचुक माहिती मिळू शकत नाही.


नाही म्हणायला, विमा क्षेत्रातील आरोग्यसेवांचे आर्थिक परिक्षण होत असते. पण तेथेही काही लोक रोगाची खोटी बिले करून पैसे मिळविण्याचे उद्योग करतात.


‘आप’ सारख्य़ा भ्रष्टाचाराविरुद्ध जन आंदोलन करणार्‍या पक्षांनी व अंधविश्वासाविरुद्ध जनजागरण करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन संस्थांनी आरोग्य क्षेत्रातील या अनिष्ट प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवावयास हवा.

No comments:

Post a Comment