Saturday, January 11, 2014

सध्याची शिक्षणपद्धती आणि रोजगाराची समस्या


आपण नेहमी म्हणतो की  आजकालचे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी झाले आहेत व त्यांचे लक्ष विषयांचे ज्ञान मिळविण्याऎवजी  परिक्षेत जास्त मार्क कसे मिळतील याकडे असते. त्यामुळेच क्रमिक पुस्तके व पुरवणी साहित्य  न वाचता गाईड वापरण्याकडे त्यांचा कल असतो.

  याबाबतीत आपण विद्यार्थ्यांना  दोष देतो. पण विद्यार्थ्यांच्या अशा वागण्यास सध्याची शिक्षणपद्धती पूर्णपणे जबाबदार  आहे हे समजून घेतले पाहिजे. शालेय शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे  वैयक्तिक लक्ष देणे शक्य असते व तेथे  निरंतर  मूल्यमापन पद्धती वापरून विद्यार्थ्यांना योग्य मानांकन दिले जाऊ शकते मात्र कॉलेजमध्ये  विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरविण्यासाठी परिक्षेतील यश हा एकमेव मापदंड वापरला जातो.  परिक्षेच्या प्रश्नपत्रिकाही ठराविक छापाच्या झाल्याने व वस्तुनिष्ठ प्रश्नांचे महत्व  गरजेपेक्षा वाढून, माहितीपर प्रश्नांची संख्या कमी झाल्याने  विद्यार्थ्यांना संभाव्य प्रश्नांचा अंदाज करणे  व केवळ घोकंपट्टी करून जास्त मार्क मिळविणे सहज शक्य झाले आहे. साहजिकच जे विषय समजण्यासाठी  पाठांतराएवजी त्याचा सखोल अभ्यास करतात ते या स्पर्धेत मागे पडू शकतात. सृजनशीलता व  संशोधन वृत्तीचे संवर्धन हे ज्ञान संपादनाचे   मूळ उ्द्दीष्ट या परिक्षाधिष्ठित शिक्षण पद्धतीत साध्य होऊ शकत नाही.

    अभ्यासक्रमासाठी नेमलेले  विषय व त्यातील माहिती जुनी, कालबाह्य व उद्योग व्यवसायास अनुरूप नसणे हाही दोष आपल्या  शिक्षणपद्धतीत आढळतो. विषय शिकविणार्‍या शिक्षकांच्या इच्छेनुसार असे अभ्यासक्रम बनविले  जातात. त्यावर विचारलेले प्रश्नही तेच तेच असतात.   इंटरनेटवर सर्व विषयातील अत्याधुनिक ज्ञान मिळू शकते. मात्र बहुतांश शिक्षक  या अद्ययावत ज्ञानकोषाचा वापर न करता क्रमिक पुस्तकांचाच वापर शिकविण्यासाठी करतात.  शिक्षक प्रगत ज्ञानाशी अवगत नसेल, बाह्य जगात आवश्यक असणार्‍या माहिती व कौशल्याचे  त्याला ज्ञान नसेल तर अभ्यासक्रमही तसेच मागासलेले राहतात. परिणामी मार्क जास्त मिळूनही  विद्यार्थ्याचे ज्ञान कौशल्य अपेक्षेप्रमाणे वाढलेले नसते.


  त्यामुळेच असेल कदाचित. पण परिक्षेत उत्तम गुण मिळवून  पास झालेले विद्यार्थ्यांत  उद्योग व व्यवसायासाठी  लागणारी पात्रता आढळत नाही. बर्‍याच वेळा कमी गुण असलेले विद्यार्थी याबाबतीत अधिक  योग्य व सरस असतात. मात्र दुर्दैवाने अशा विद्यार्थ्यांना उद्योग वा व्यवसायात गुणांकन  स्पर्धेमुळे नोकरी मिळणे दुरापास्त होते.


  शिक्षणाचा हेतू विशि्ष्ठ  विषयातील ज्ञान संपादन करणे व त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करून समस्यांचे निराकरण  करणे व जीवन अधिक सुसह्य, सुखकर व सुरक्षित बनविणे हा आहे ही गोष्ट आपण विसरून गेलो  आहे. परिक्षा पास होणे व चांगल्या पगाराची नोकरी मिळविणे हे एकमेव उद्दीष्ट आज विद्यार्थ्यांसमोर  आहे. साहजिकच मनासारखी नोकरी नाही मिळाली की निराशा, आर्थिक विवंचना  व इतरांकडून अवहेलना याला सामोरे जावे लागते. नोकरीच्या  कमी संधी, नोकरभरतीतील भ्रष्टाचार व नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांची प्रचंड संख्या  यामुळे बेरोजगारांचे प्रमाण अतिशय वाढले आहे. यातूनच नैराश्यातून आत्महत्या, गुन्हेगारी,  व्यसनाधीनता, हिंसा व गुंडगिरी यांचे प्रमाणही वाढीस लागले आहे. सर्वसामान्य जनतेची  व सार्वजनिक मालमत्तेचई सुरक्षाही यामुळे धोक्यात येत आहे.

    अशी  संभाव्य भयावह बेरोजगारी टाळण्यासाठी  प्रभावी उपाय योजावयाचा असेल तर सर्वप्रथम आपल्या  सध्याच्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र सुधारणा करणे आवश्यक आहे.

  लहान मूल कसे शिकते हे आपण पाहिले असेल. प्रत्येक  नव्या गोष्टीचे ज्ञान मिळविण्याची उत्कट इच्छा लहान मूल दाखवीत असते. निरीक्षण व प्रयत्न  व प्रत्यक्ष अनुभव टप्प्यांतून अशा जिज्ञासेचे ज्ञानात रुपांतर होते. पुनः नव्या गोष्टीबद्दल  जिज्ञासा उत्पन्न होते.  जिज्ञासा ही माणसात  उपजत असते. मात्र या जिज्ञासा वृत्तीला सध्याच्या शिक्षण पद्धतीत योग्य वाव न मिळता  त्याचे खच्चीकरण होत जाते. जिज्ञासेची जागा श्रद्धा आणि अंधविश्वास यांनी घेतली जाते.  ज्ञानापेक्षा ते असल्याचे दर्शविण्याचे अनेक सोपे मार्ग आपल्याला भुरळ घालतात. अंतर्गत  सामर्थ्यापेक्षा बाह्य दिखाऊपणाला जास्त महत्व दिले जाते. याचा उपयोग करून नोकरी मिळविण्यात  यशस्वी झाले तरी प्रत्यक्ष कार्य करताना ज्ञानाचा अपुरेपणा उघडा पडतो. याउलट जिज्ञासा,  निरीक्षण, प्रयत्न व अनुभवातून ज्ञान आत्मसात केले असेल तर ते लक्षात ठेवण्यासाठी वेगळे  प्रयत्न करावे लागत नाहीत.

  चित्रकार, कवि, लेखक,  कलाकार यांचे कौशल्य शिकवून संक्रमित करता येत नाही ते प्रत्येकास प्रयत्नपूर्वक साध्य  करावे लागते. त्यासाठी ध्यास व अभ्यास यांची गरज असते. जी गोष्ट अशा सृजनशील व्यक्तींची  तीच शेतकरी व परंपरागत व्यवसाय करणार्‍यांची असते अशा ज्ञानसंपन्न व्यक्तीचे मूल्यमापन  पदवी पाहून करता येत नाही. त्यांना नोकरी नसेल तरी त्यांच्यात स्वयंअर्थाजन करण्याची  क्षमता असते.


  सध्याच्या शिक्षण पद्धतीतील अनिवार्य असलेल्या परिक्षेचा  पर्याय काढून टाकला तर ्काय होईल? ही कल्पनासुद्धा सध्याच्या शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांना  अव्यावहारिक व टाकावू वाटॆल. पण विचार करा.

   आपली प्राचीन गुरुकुल पद्धती काय होती? गुरुकडे ठराविक  काळ राहून ती विद्या शिकणे याला महत्व होते. जगात कोणतीही शिकता येण्यासारखी  गोष्ट कोणासही अशक्य नाही. ध्यास व डोळस अभ्यास  केल्यास व त्यासाठी आवश्यक तेवढा ( बौद्धिक कुवतीनुसार) वेळ दिला तर सर्वांना ते शक्य  आहे. गरीब, श्रीमंत, बुद्धीमान व साधारण बुद्धीचा या भेदांवर शिक्षणाचा प्रकार, त्याची  उंची मिळविण्याची पात्रता अवलंबून राहणार नाही.


  सध्याच्या शिक्षणपद्धतीत  सुखसोयी व दिखावूपणावर विद्यार्थी शैक्षणिक संस्थेची निवड करीत असल्याने व नोकरी दॆणार्‍या  संस्था पदवी, मार्क व शिक्षणसंस्थेच्या भव्यपणाला जास्त महत्व देत असल्याने विद्यार्थी  व त्यांना नोकरी देणारे उद्योग या दोघांची फसगत होत आहे. प्रचंड पैसा घालून विद्यार्थ्याला  आकर्षित करणार्‍या बाजारू व्रुत्तीच्या शिक्षणसंस्थांची सध्या चलती आहे. मात्र थोड्याच  काळात त्यांच्या सुमार शिक्षणदर्जामुळे हा डोलारा खाली कोसळण्याची शक्यता आहे. असे  झाले तर बेरोजगारीचे संकट आणखी वाढेल.


  भविष्यात येऊ घातलेल्या दूरस्थ शिक्षण पद्धतीमध्ये  शिक्षणसंस्थेच्या इमारती व इतर सुखसोयी यांना काहीच महत्व उरणार नसल्याने व विद्यार्थी  आपल्या सोयीनुसार ज्ञान कौशल्य संपादन करू शकणार असल्याने तसेच हे शिक्षण देण्यासाठी  परदेशी नावाजलेल्या संस्था स्पर्धेत उतरणार असल्याने सध्याच्या शिक्षणव्यवस्थेस मोठा  धक्का बसणार आहे.


  या परिस्थितीत सध्याच्या  शिक्षणसंस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांचे खरे पालकत्व स्विकारावयास हवे. त्याला योग्य  शिक्षण मिळेल याची पुरेपूर व्यवस्था करून त्याला स्वयंव्यवसायासाठी अर्थ साहाय्य्य,   आपल्या संसाधनांचा उपयोग करू देणे, त्याच्या  व्यवसायात सहभागी होणे इत्यादी कामे करावी लागतील. हॉर्वर्ड बिझिनेस स्कूल सारखे विद्यार्थ्यांना  शिकताशिकताच अर्थार्जनाची व व्यवसायाची सोय करून दिली पाहिजे.


  याबाबतीत मला सातारच्या  ( पन्नास वर्षांपूर्वीच्या )  रयत शिक्षण संस्थेची  प्रकर्षाने आठवण होते. तेथील विद्यार्थ्यांना संस्था काम देई व त्यांचा शिक्षणाचा व  राहण्याचा खर्च त्यांच्या वेर्तनातून भागविला जाई. बागकाम, सफाई, शेती, शाळेची कामे  मुले आनंदाने करीत.


  अशा शिक्षणसंस्थाच शिक्षण व रोजगाराची सांगड घालू  शकतील.

No comments:

Post a Comment