Wednesday, April 9, 2008

साहित्यिक

या जानेवारीत सांगलीत मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्यावेळी काही साहित्यिकांना आपण इतर सामान्य लोकांपेक्षा वेगळे वा श्रेष्ठ आहोत असे वाटत असावे अशी शंका आली. माझ्यामते साहित्य म्हणजे लिखित स्वरुपातील माहिती. कोणताही माणूस जे लिहितो ते साहित्यच असते कारण तो आपले विचार व आपल्या भावनांना स्थायी स्वरूप देत असतो. तसे पाहता सर्वच लोक साहित्यिक असतात. आपण पाहतो की साध्या संवादात सामान्य माणूसही अतिशय मार्मिक, अर्थवाही बोलतो. मात्र ते लिहिले जात नाही. सतत लिहिण्याची सवय असणारा व लिहिलेले सर्वांसाठी प्रसिद्ध करणारा तो साहित्यिक अशी व्याख्या करणे अधिक योग्य ठरेल.
’दिसामाजी काहीतरी ते लिहावे’ हा संत रामदासांचा उपदेश प्रत्येकाने मानला तर अमाप साहित्याची निर्मिती होईल. शिवाय लिहिणार्‍याला साहित्यिक असा मान मिळेल. पण यापेक्षा महत्वाचे म्हणजे त्याच्या साहित्यामुळे त्याचे व्यक्तिमत्व चिरंतन होईल. फार वर्षांपूर्वी मी आणि माझा मित्र शिराळकर सांगलीतील प्रसिद्ध हिंदुत्ववादी नेते कै. का. भा लिमये यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला सतत लिहित रहा असा संदेश दिला होता याची आठवण झाली. ते म्हणाले ’माझ्यापेक्षाही माझा एक मित्र छ्त्रे माझ्यापेक्षाही खूप बहुश्रुत व हुशार होता. मात्र त्याला लिहिण्याचा कंटाळा होता. दुर्दैवाने त्याचे ऎन उमेदीत निधन झाले. त्याच्याबरोबर त्याची सारी विद्वत्ताही नाहिशी झाली. आज त्याचे नाव कोणालाही माहीत नाही. मात्र मी लिहीत असल्याने लोक मलाच मॊठा विचारवंत मानतात.’
आज ब्लॉगच्या सोयीमुळे कोणीही आपले विचार सहज प्रसिद्ध करू शकतो. त्याचा फायदा घेऊन प्रत्येकाने साहित्यिक व विचारवंत व्हायला हरकत नाही.

No comments:

Post a Comment