Monday, December 18, 2023

गुगल जाहिराती - डिजिटल मार्केटिंगसाठी एक अपरिहार्य वास्तव

'गुगलच्या मोहजालातून सुटका' या नावाचा एक ब्लॉग मी पूर्वी लिहिला होता. तो पुन्हा खाली उद्धृत करीत आहे.



सध्या गुगल हे आपल्या सर्वांचे आवडते, सोपे आणि नाद लावणारे शोधयंत्र झाले आहे. कोणतीही माहिती पाहिजे असल्यास आपण गुगल वापरतो. तशी इतरही अनेक शोध यंत्रे आहेत पण गुगलची सर कोणालाच येणार नाही. मात्र हे गुगल म्हणजे एक भुलभुलैया आहे. माहिती बघताबघता तुम्ही दुस-याच कोठल्यातरी आकर्षक जाहिरातीकडे आकर्षित होता. त्यावर क्लिक केले की काही वस्तू वा सेवा विकत घेण्याची इच्छा होते.

म्हणजे आपण गुगलवर एकाचा शोध घेत असतो मात्र प्रत्यक्षात ती माहिती न बघता आपण त्यात जाहिरात देणा-या कंपन्यांचे ग्राहक बनतो.

आज कोणतेही नेटवरील वर्तमानपत्र, बातमीपत्र, युट्यूब पहा. कोणताही मोबोईल, अगदी अॅपलसुद्धा वापरताना या गुगलच्या जाहिराती आपल्याला घेरून टाकतात. अभिमन्यूसारखी मग आपली स्थिती होते.

 गुगल जाहिरातीच्या या लोकप्रियतेमुळे बहुतेक व्यापारी व व्यावसायिक आपल्या जाहिरातींसाठी गुगल अॅड वापरतात. गुगलला यातून प्रचंड पैसा मिळतो.
प्रत्येक क्लिकचा आणि प्रत्यक्ष विक्रीचा हिशोब देऊन गुगल कंपन्याकडून पैसे गोळा करते.

ज्ञानदीप फौंडेशनने अनेक शैक्षणिक  वेबसाईट, मोबाईल अॅप केले व त्याचा वापरही लाखांच्या घरात आहे. पण त्यातून काही अर्थप्राप्ती होत नसल्याने गुगलच्या जाहिरात योजनेचा फायदा घ्यावा असा विचार केला व जाहिराती देण्यास गुगलला संमती दिली. मात्र गुगलच्या जाहिराती परदेशी मालाच्या व सेवासुविधांच्याच असल्याचे व ज्ञानदीपच्या ध्येयधोरणाशी विसंगत असल्याचे निदर्शनास आले. शिवाय अनेक जाहिराती फसव्या, अतिरंजित फायद्याचे आमिष दाखविणा-या, चैनीस उत्तेजन देणा-या व प्रसंगी असंस्कृत पद्धतीच्या असल्याचे आढळून आले.

आर्थिक लाभाच्या दृष्टीनेही जागरूक ग्राहकांनी जाहिरातींकडे दुर्लक्ष केल्याने व गुगलच्या आकडेवारीतील चलाखीमुळे फारशी मिळकत होत नव्हती. माहिती पाहण्यामाठी आलेल्या विद्यार्थी व इतर लोकांना या जाहिरातींचा त्रास होत होता. शिवाय अशा जाहिरातींमुळे वेबसाईटचा उद्देश सफल होत नव्हता.  त्यामुळे निर्धार करून या गुगलच्या मोहजालातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

आता केवळ भारतीय उत्पादनांच्या आणि सेवासुविधांच्या विधायक स्वरुपाच्या जाहिराती देण्याचे ज्ञानदीपने ठरविले आहे. 

सर्वांच्या सहकार्याने यातही यश मिळेल अशी आशा आहे.

------

आशा मोठी चिवट असते. वरील निर्धारानुसार सर्व वेबसाईटवरील गुगलच्या जाहिराती ज्ञानदीपने बंद केल्या. अतिशय कमी खर्चात भारतीय वस्तू आणि सेवा यांच्या जाहिरातींसाठी अनेक आकर्षक योजना जाहीर केल्या अगदी जवळच्या व माहितीच्या उद्योगांना यासाठी आवाहन केले.

परंतु अल्प प्रतिसाद मिळाला. वेबसाईट पाहण-यांची संख्या खूप असूनही त्याचा ज्ञानदीपला वा स्थानिक उद्योगांनाही काहीच फायदा होईना. नंतर असे लक्षात आले की स्थानिक उद्योग व सेवा पुरवठादार यांना गुगलचेच आकर्षण आहे. त्यासाठी ते पैसे खर्च करीत आहेत.

म्हणजे ज्ञानदीपने आपली कुवत न ओळखता बलाढ्य गुगलशी स्पर्धा करण्याचा निर्णय घेतला पण भोवतालची सर्व परिस्थिती व मानसिकता पाहता यात यश मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे नाइलाजास्तव पुन्हा 'शरण तुला भगवंता' या उक्तीप्रमाणे गुगलचे दास्यत्व स्वीकारणे ज्ञानदीपला भाग पडत आहे. त्याबद्दल प्रेक्षकांची माफी मागून  

पुन्हा गुगलच्या जाहिराती ज्ञानदीप फौंडेशनच्या सर्व वेबसाईटवर सुरू करण्यात येत आहेत.

कदाचित गुगलही यापुढे भारतीय उद्योगांच्या जाहिरातींना प्राधान्य देण्यास सुरुवात करेल आणि ज्ञानदीपच्या उद्देशास अप्रत्यक्षपणे सहकार्य करेल अशी आशा करूया.

 



 

No comments:

Post a Comment