मिलपिटास, कॅलिफोर्निया - आज शनिवार, 16 डिसेंबर 2023. कॉम्प्युटरवर जतन केलेल्या जुन्या फाईल वाचणे हा माझा रिकाम्या वेळचा छंद असतो. सध्या ज्ञानदीपच्या कार्याचे नियोजन मी दूरस्थपणे करीत असताना ज्ञानदीपच्या गेल्या कित्येक वर्षांचा इतिहासातील आशा-निराशा, यश-अपयश यांच्या घटना मनासमोर तरळून जातात.
1973मध्ये कानपूर आयआयटीत असताना कॉंम्प्युटरच्या अद्भुत विश्वाने मला भुरळ घातली. पर्यावरण अभियांत्रिकी माझा विषय असूनही संगणकाची कोणताही विषय आत्मसात करण्याची व गहन प्रश्न सोडविण्याच्या यांत्रिक कुशलतेमुळे मला याच विषयात आपण संशोधन करावे असे माझ्या मनाने घेतले.
1976 मध्ये पीएचडी पूर्ण करून मी जेव्हा माझ्या वालचंद कॉलेजमध्ये पुन्हा रुजू झालो त्यावेळी कॉलेजमधील इतर कॉम्प्युटरप्रेमी प्राध्यापकांशी माझे सूत जुळले. सुदैवाने इलेक्ट्रॉनिक्सचे प्रमुख प्रा. एन. आर. फडणीस यानी मला प्रोत्साहन दिले. पुढे कॉलेजने घेतलेल्या ऑम्नी कॉम्प्युटरच्या प्रशिक्षणासाठी मला बंगलोरला जाण्याची संधी मिळाली. बेसिक आणि कोबोल प्रोग्रॅमिंगचे प्रशिक्षण वर्ग आम्ही घेतले.
माझी पत्नी सौ. शुभांगी संस्कृत शिक्षिका होती तरी मी तिला संगणक प्रशिक्षम घेण्यास सांगितले. तिनेही हे आव्हान स्वीकारून बेसिक कोर्स केला आणि सावरकर प्रतिष्ठानच्या शाळेत मुलांसाठी महिन्याचा प्रशिक्षण कोर्स घेतला. माझा उत्साह यामुळे अधिकच द्विगुणित झाला. नंतर विश्रामबाग येथे सुयश कॉम्प्युटर्स या नावाने सुहास खांबे, वैजयंती कुलकर्णी आणि सौ शुभांगी यानी संगणक प्रशिक्षम आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे काम सुरू केले.
वालचंद कॉलेजतर्फे महाराष्ट्रातील अनेक शाळांत बीबीसी कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगचे प्रशिक्षण देण्याची मला संधी मिळाली..
त्यानंतर ज्ञानदीप इन्फोटेकची स्थापना आम्ही इ. स. 2000 नोव्हेंबर मध्ये केली. आज मागे वळून पाहताना असे लक्षात येते की इतक्या वर्षांच्या प्रवासानंतरही ज्ञानदीपची स्थिती कायम बाल्यावस्थेची व नाजूक राहिली. काम खूप केले पण हाती काही राहिले नाही. याचे एक कारण म्हणजे माझा स्वभाव शिक्षकी पेशाचा असल्याने ज्ञानदीपमधून चांगले डेव्हलपर तयार करणे यावरच मी लक्ष केंद्रीत केले. फायदा तोट्याचे गणित त्यामुळे जमले नाही. शिकलेले विद्यार्थी दुस-या मोठ्या कंपन्यात गेले.
हे असे होते ... विचार करू लागले की मन वहावत जाते व काय करायचे ते विसरले जाते.
मी हा ब्लॉग लिहिण्याचे कारण म्हणजे 2003 मध्ये प्रसिद्ध केलेल्या ज्ञानदीपच्या परिचयाची फाईल मला हार्डडिस्कमध्ये सापडली. त्यावेळी आम्ही वापरत असलेल्या श्रीलिपीमध्ये असल्याने ती मला वाचता येईना. श्रीलिपी फॉंट इन्स्टॉल क्ल्यावर मला त्यावेळच्या ज्ञानदीप कार्याची व भविष्यातील योजनांची माहिती कळली. पीडीएफ करून मी त्याचे फोटो खाली देत आहे.
No comments:
Post a Comment