मे 2023 मध्ये मी सांगलीत असताना नाशिकचा माझा मावसभाऊ धनंजय मलो भेटायला आला. त्याने केलेल्या नर्मदा परिक्रमांबाबत मला कुतुहल होते. त्यामुळे ज्ञानदीपचया ऑफिसमध्ये मी त्याची व्हिडीओ मुलाखत घेतली. दातार कुटुंबिय, नर्मदा परिक्रमा आणि स्वतः धनंजयच्या कर्तृत्वाविषयी मला पहिल्यांदाच बरीच नवी माहिती मिळाली. दोन भागात सुमारे तासाभराचा हा व्हिडीओ आम्ही यूट्यूबवर प्रसिद्ध केला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या मुलाखतीत मला कळलेल्या नव्या गोष्टी या लेखात मांडत आहे.
दातार कुटुंब – कोकणातून साता-याजवळील लिंब-गोवा येथे 1928 मध्ये वास्तव्यास आले. पुढे पुण्यात त्यांनी भिक्षुकी आणि दूधडेअरीचा व्यवसाय सुरू केला होता सध्या प्रसिद्ध असलेले चितळे यांनीही त्यावेळेसच पुण्यात डेअरी व्यवसाय सुरू केला होता. लहानपणी पुण्याला लक्ष्मी रोडवरील पाषाणकर वाड्यात त्याच्या घरी गेलो असताना पहाटे दूध तापविणे, मोठ्या लाकडी रवीने दोरीच्या साहाय्याने ताक घुसळणे हे मी पाहिले होते. रात्री आम्ही समोरच्या डेअरीत पहारा म्हणून झोपत असू. दोघे मोठे भाऊ खालच्या मजल्यावर तर माझ्या मावशीचे घर तर माळ्यावर होते.
चितळे यांनी आपल्या शेतीवाडीच्या जोरावर व्यवसाय पुढे वाढविला. मात्र भांडवल नसल्याने दातारांना तो व्यवसाय पुढे बंद करावा लागला.म्हणजे व्यवसाय यशस्वी होण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. आज यशस्वी असणारे बरेचसे उद्योग हे मुख्यत्वे स्वतःच्या भांडवलावरच सुरू झाले होते. आपली संपत्ती आपल्या उद्योगासाठी खर्च करण्याचे धाडस ज्यानी दाखविले तेच पुढे यशस्वी उद्योजक बनले.
नर्मदा परिक्रमा – धनंजयने आपल्या ओघवत्या भाषेत नर्मदा नदी,तिचे पौराणिक महत्व, परिक्रमेचा मार्ग आणि रोज 30-35 कि. मी. पायी चालत सुमारे 3500 कि. मी. लांबीची परिक्रमा एकट्याने करीत असताना आलेले अनुभव, निसर्गसौदर्य, देवालये आणि आश्रम यांची माहिती दिली.
दिवसा प्रवाशांना लुटून त्यावर उदरनिर्वाह करणारे जंगलातील आदिवासी घरात येणा-या पांथस्थाला देव मानून त्याला जेवण व निवारा देत असत. हे ऐकून आश्चर्य वाटले. तेथील स्थानिक लोकांची नर्मदेवर अमाप श्रद्धा आहे आणि ते परिक्रमा करणा-या लोकांना सर्वतोपरी मदत करतात हे त्यांनी आवर्जून सांगितले.शब्दांतील वर्णनाबरोबर प्रत्यक्ष नर्मदेची चित्रे आणि फोटो व्हिडीओत घालता आले नाहीत. ते मी खाली देत आहे.













धनंजय दातार यांचे खालील व्हिडीओ पाहताना वरील ठिकाणे प्रत्यक्ष भेट देऊन पाहिल्याचा अनुभव येईल.
या नर्मदा परिक्रमा केल्यानंतरही धनंजय दातार यांनी अलिबाग ते गोवा आणि गोवा ते थेट कन्याकुमारी पायी प्रवास कसा केला आणि दरवर्षी न चुकता आपल्या मूळ लिंब गोवा या गावी उत्सवाला आणि सज्जनगडावर पायी चालत जातात हे ऐकून माझा त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित झाला.
त्यांची जीवननिष्ठा, कष्ट करण्याची जिद्द आणि आनंदी वृत्ती नव्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी ठरेल. त्यांनी आमच्या ज्ञानदीपच्या कार्यातही असाच सहभाग घ्यावा असे आवाहन करून मी मुलाखतीचा समारोप केला.
त्यांच्या या अलौकिक जीवननिष्ठेला माझे विनम्र अभिनादन.
No comments:
Post a Comment