Tuesday, October 3, 2023

मुलांची आवडती जिरोनिमो स्टिल्टनची पुस्तके

 

अमेरिकेत मुलाकडे रहात असताना माझा बहुतेक वेळ 8 वर्षाच्या नातीबरोबर, अस्मीबरोबर खेळण्यात जातो. तिच्याबरोबर खेळताना मी माझे वृद्धत्व विसरून जातो. तिचा उत्साह, नवीन काहीतरी करण्याची हौस आणि निरागस भावना मला माझे हरवलेले बालपण परत मिळवून देतात. तिच्या आवडीनिवडीवरून मला बालमानसशास्त्रही शिकायला मिळते.

मुलांवर मनोरंजनातून चांगले संस्कार करण्यासाठी खेळणी, पुस्तके, व्हिडीओ गेम एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी वाल्ट डिस्नेसारखे काल्पनिक विश्व उभारणे हा अमेरिकेत फार मोठा व्यवसाय झाला आहे. मुलांना वाटणारे याचे आकर्षण आणि शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष याचा अनुभव मला 2003 मध्ये अमेरिकेत गेलो असताना आला होता. त्यावेळी मी याविषयी चिंता व्यक्त करणारा लेखही लिहिला होता. परंतु त्यानंतरच्या अनेक अमेरिका वारीत माझे मत बदलत गेले. य़ा मनोरंजक खेळणी व पुस्तकांमुळे मुले अधिक चौकस, धीट बनून  नकळत सभोवतालचे मोठ्यांचे जग, निसर्ग आणि भविष्यातील आव्हाने  याबाबतीत जागरूक व सक्षम होतात हे माझ्या लक्षात आले.

या दृष्टीकोनातून मी जेव्हा अस्मीची आवडती जिरोनिमो स्टिल्टनची पुस्तके पाहिली व वाचली तेव्हा लेखकाच्या कल्पनाशक्तीएवढीच पुस्तकातील चित्रांची मांडणी, छपाईतील वैविद्ध्य, रंगसंगती यांनी भारावून टाकले. वाल्ट डिस्नेप्रमाणेच या पुस्तकात उंदीर हा नायक असून सॅन फ्रॅन्सिस्कोसारखेच त्यांचे एक काल्पनिक विश्व लेखकाने मुलांपुढे उभे केले आहे. आपल्याकडील आरके लक्ष्मण यांच्या सामान्य माणसाच्या व्यक्तीरेखेप्रमाणे स्वतः लेखकच मुख्य पात्र बनून अनेक प्रसंगांना सामोरे जातो. प्रथम अपयश, उपेक्षा, अपमान यांचा सामना करीत शेवटी विजयी व सर्वश्रेष्ठ पद कसे मिळवितो हे मनोरंजक प्रसंगातून दाखवून जीवनात यशस्वी होण्याचे तत्वज्ञान मुलांच्या मनात रुजविण्यात लेखक यशस्वी झाला आहे.

पुस्तकाचे मुखपृष्ठ गोष्टीतलाच एखादा प्रसंग चित्रित करते. कथेची सुरुवातच चित्तवेधक असते. अवघड शब्दांना मोठ्या ठळक अक्षरात दाखवून अर्थाप्रमाणे रंगीत वेडीवाकडी वळणे घेणारी वाक्ये, चित्रे यांनी पुस्तकाचे प्रत्येक पान सजलेले असते. साहजिकच मुलांना ही पुस्तके वाचायला आवडतात. कथानकही रोमहर्षक प्रसंगांची मालिकाच असते. वाचताना मुले रंगून जातात आणि नकळत शिकतही जातात.

आपल्याकडेही अशा पद्धतीने पुस्तके तयार केली तर शिक्षण हे ओझे न वाटता करमणुकीचा प्रकार वाटेल व मुले आनंदाने एरवी क्लिष्ट वाटणारे विषयही सहजगत्या शिकू शकतील.

सहासहा महिने आलटून पालटून भारत आणि अमेरिकेत रहायला मिळत असल्याने ज्ञानदीपच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी व कल्पना यांची देवघेव करण्याची सुवर्ण संधी मला मिळाली आहे. माझ्या मुलीने मला ग्रीन कार्ड मिळवून दिले त्यामुळेच हे शक्य होत आहे. भारतातही मला वरच्या दर्जाच्या हुषार व श्रीमंत मुलांपेक्षा ग्रामीण भागातील अर्धवट शिक्षण झालेल्या व परिस्थितीने गांजलेल्या लहान मुलांच्यात हे परिवर्तन घडवून आणायचे आहे.

ज्ञानदीपचे कार्य त्यामुळेच मराठीतून आणि तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवून सुरू आहे. ते पुढे सतत चालू राहण्यासाठी नव्या पिढीतील अशा जीव ओतून काम करणा-या युवक-युवतींची साथ मिळेल अशी मला आशा आहे.

No comments:

Post a Comment