भौतिक समृद्धीच्या मागे धावणा-या नव्या पिढीला आपली मने सांभाळून ठेवण्यासाठी आता विशेष प्रयत्न करावे लागत आहेत. भारतीय समाजाला गेली अनेक वर्षे गुलामगिरीत काढावी लागली तरी धार्मिक परंपरा आमि अध्यात्मिक मनोवृत्तीमुळे समाजमन कायम सुदृढ राहिले. आता नव्या पिढीचा देवावर आणि अध्यात्म्यवरील विश्वास उडाल्यामुळे त्यांची मने उध्वस्त होण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट पहात असताना एकमेकांशी प्रेमाने वागणारी माणसे गाडीत शिरताना एकमेकांशी धक्काबुक्की करतात. एवढेच नव्हे तर वर चढायला मिळाले की आत येणा-या या थोड्या काळापूर्वी असणा-या मित्रांना खाली ढकलण्याचा प्रयत्न करतात.
अस्पृष्यांची घरे गावाच्या वेशीबाहेर असल्याबद्दल आपण जुन्या पिढीला दोष देतो. पण आतादेखील आपल्या बंगल्या शेजारी वा अपार्टमेंट कॉम्प्लेक्स भोवती असलेल्या झोपडपट्टीतील लोकांना आपण अस्पृशांप्रमाणेच वागणूक देतो हे आपल्या लक्षात येत नाही.
या झोपडपट्टीतील दारिद्र्य, अस्वच्छता, रोगराई, गुन्हेगारग व व्यसनाधीनता यामुळे आपल्याला या परिसराचीच भीती वाटते. झोपडपट्टी निर्मूलनासारख्या अनेक योजना शासन सुरू करते पण त्यांची जागा कामाच्या जागेपासून दूर असल्याने हे गरीब लोक ती घरे भाड्याने देऊन पुन्हा आहे त्याच ठिकाणी बेकायदा राहणे पसंत करतात. पोरिसांना हप्ता देऊन वा गुंडांचे वा प्रतिपक्षाचे साहाय्य घेऊन त्यांना याबाबतीत यशही येते.
बहुतेक मोठ्या शहरांत प्रचंड प्रमाणात वाढत राहणा-या अशा झोपडपट्ट्या स्मार्ट सिटीच्या आकर्षक कल्पनाविश्वाला सत्य परिस्थितीचे कुंपण घालतात.
मध्यम वर्गातील लोक आपल्या संरक्षित मर्यादित परिसरात आपले संसार करतात. श्रीमंत होण्याची स्वप्ने बघतात.समाज सुधारणेसाठी आग्रही असतात पण प्रत्यक्ष स्वतः त्यात सहभागी होत नाहीत.
नाही म्हणायला घरातील कामे करण्यासाठी या झोपडपट्टीतील लोकांना आपल्या घरात प्रवेश देतात. आर्थिक मदतही करतात. पण त्यांच्या घरी जाऊन तेथील परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करीत नाहीत. याचे कारण म्हणजे त्यांना तेथल्या समाजाची आणि रोगराईची भीती वाटते.
त्यांच्या संवेदनशील मनाला यातील दुटप्पीपणा जाणवू लागतो. मग हे लोक निसर्गसंवर्धनाच्या कार्याला वाहून घेतात.
कारण निसर्ग निखळ आनंद देऊ शकतो.
आपणही मोठ्या कंपन्यांच्या दृष्टीने गुलाम व झोपडपट्टीतील माणसेच आहोत हे कबूल करायला त्यांचे मन तयार होत नाही.
यातीलच काही कुशाग्र, हळवे व संवेदनशील या मानसिक गुलामगिरीविरुद्ध बंड करून उठतात. त्यांच्या मनावर होणारे गुलामगिरीचे आघात त्यांना सहन होत नाहीत. मने दुभंगतात. मानसिक रोग बळावतात. मग मानसिक सल्लागार नेमले जातात.
परदेशात बहुतेक सर्व मध्यमर्गीय असल्याने झोपडपट्टीचा एवढा विळखा तेथे पडत नाही.
तरीदेखील बेघर लोकांना आपल्या घरी प्रवेश देण्याचे धाडस कोण करीत नाही. कारण या लोकांची काहीच माहिती त्यांना नसते. ड्रग अडीक्ट वा माथेफिरू हिंसक मनोवृत्तीचे लोक असतील या भीतीने अशा लोकांना आपल्या वस्तीपासून दूर ठेवण्यास ते प्राधान्य देतात.
प्राण्यांवर प्रेम करणे परदेशात जास्त असण्याचे कारण मला पूर्वीच्या गुलामगिरीचेच सुधारित रूप वाटते. माणसांना नाहीतर प्राण्यांना आपण गुलाम म्हणून वागवू शकतो त्यांच्याकडून क्रांतीचा धोका नसतो.
पर्यावरणाबाबतची वाढलेली जागरुकता हादेखील स्वातंत्र्य उपभोगण्याचा एक हक्काचा मार्ग मानवी मनाला सापडला आहे.
धार्मिक श्रद्धा नसणा-यांसाठी निसर्ग हाच परमेश्वर आहे. माणसांच्या दमनवृत्तीविरूद्ध मोकळेपणाने संघर्ष करण्याचे स्वातंत्र्य निसर्गाने आपणास देऊ केले आहे. सध्याच्या समाजव्यवस्थेविरूद्धचा आपला राग व्यक्त करण्यासाठी तरी निसर्गसंवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हा व आपल्या मनाचे संतुलन राखा - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.