Wednesday, October 30, 2019

अरूण – एका अबोल पण मनमिळाऊ जीवनाची अखेर




माझा धाकटा भाऊ, अरूण याचे दिनांक २८ ऑक्टोबर २०१९ रोजी अल्प आजाराने दुःखद निधन झाले. अमेरिकेत असल्याने मला त्याची भेट घेता आली नाही वा आजारीपणात काही मदत करता आली नाही याबद्दल मला फार वाईट वाटले. गेल्या तीन वर्षांत माझे दोन धाकटे भाऊ आणि माझी पत्नी गेल्याने मनावर झालेले आघात आता कायम सोबतीला राहणार आहेत.आता त्यांच्या केवळ स्मृतीच मनाला दिलासा देत राहतील.

 आम्हां चारही भावांत अरूण हा अतिशय शांत, मनमिळाऊ व संवेदनशील होता. आईचा हळवेपणा आणि वडिलांचा हिशोबीपणा हे त्याचे अंगभूत गुण होते. या गुणांच्या जोरावर खातेदारांचा विश्वास आणि सहकार्यांचा आदरभाव संपादन करून सांगली अर्बन बॅंकेतील एक  उत्तम बॅंक मॅनेजर म्हणून त्याने नावलौकिक मिळविला होता. मुंबईच्या नव्या शाखेला स्थायी स्वरूप देण्यासाठी त्या बॅंकेच्या प्रशासनाने त्याची तेथे नेमणूक केली होती.

त्यांचा मुलगा अक्षय याच्या आगमनाने अंजलीअरूण दोघांच्याही जीवनाला नवी उभारी आली. स्वतः काटकसर करून व कष्ट सोसून त्याचे जीवन फुलविण्यासाठी त्यांनी आपल्या सर्व सुखांचा त्याग केला.  मानवत या मराठवाड्यातील दूरच्या गावी बदली झाल्यावर   मुलाच्या दहावीच्या परिक्षेसाठी मदत करता यावी म्हणून अरूणने नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेतली. अक्षयला कॉम्पुटर इंजिनिअर करण्याचे श्रेय त्याच्या कर्तृत्वाबरोबरच अरूण आणि सौ. अंजली यां दोघांच्या तीव्र इच्छाशक्ती व प्रयत्नांनाच द्यावे लागेल. अक्षयनेही आपल्या नोकरीत प्रविण्य मिळविले व वरिष्ठांची मर्जी संपादन केली हे पाहण्याचे भाग्य त्याला लाभले याचे समाधान वाटते.

अरूण म्हणजे आमच्या रानडे घराण्याचा चालता बोलता इतिहासच होता. त्याची स्मरणशक्ती अफाट होती. पूर्वीच्या घटना, नातेसंबंध, जन्म व लग्नतारखा यांची माहिती त्याकडूनच मिळे.त्याच्या जाण्याने हा हक्काचा खजिना कायमचा लुप्त झाला आहे. आमच्या वडिलांप्रमाणेच रोजच्या घरखर्चाच्या नोंदी नियमितपणे लिहिणे ही आम्हाला कधी न जमणारी गोष्ट त्याच्या अंगवळणी पडली होती. वाहन चालविणे, व्यवसाय वा धकाधकीचे जीवन यातील मानसिक ताण  व भीती यापासून तो शक्यतो दूर रहाणे पसंत करीत असे. ज्ञानदीपच्या कामात त्याला सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला पण रोजच्या नवनवीन कटकटींना सामोरे जाऊन परक्या लोकांशी संवाद साधणे त्याला आवडत नसल्याने त्याने ते टाळले. तसा तो अबोलच होता. प्रश्न विचारल्याशिवाय स्वतःहून बोलणे त्याच्या स्वभावात नव्हते. मात्र त्याला सल्ला विचारला तर तो आपले मत सांगत असे व त्यावेळी त्याच्या विचारांची खोली ऐकणार्याला चकीत करी.

असा हा आगळा वेगळा अरूण आता आपल्यात नाही. पण त्याची आठवण सर्वांना पदोपदी येत राहील याची मला खात्री आहे.मूकपणे आपल्या विश्वात रममाण होऊन उज्वल भविष्याची वाट पहात राहण्याचा त्याचा संयम अद्वितीय होता. त्याच्याविषयी लिहिण्यासारखे खूप आहे. ते मी यथावकाश लिहीनच

 आज जे मला तीव्रतेना भावले ता आपणापुढे सादर करून त्याला माझी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.

No comments:

Post a Comment