Friday, October 18, 2019

सांगलीत विज्ञान संशोधन केंद्र



सांगली परिसरात मराठीतून विज्ञान प्रसाराचे कार्य मराठी विज्ञान प्रबोधिनी गेली अनेक वर्षे नियमितपणे करीत आहे.

१९६८ साली मराठी विज्ञाल परिषदेची शाखा म्हणून सर्वप्रथम हे कार्य सुरू झाले होते. नंतर १९८१ साली मराठी विज्ञान प्रबोधिनीची स्थापना कै. म. वा. जोगळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 


मराठी विज्ञान परिषद ते मराठी विज्ञान प्रबोधिनी वाटचाल

 सन १९६८ साली मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष श्री. म. ना. गोगटे  वालचंद कॉलेजमध्ये आर्किटेक्चर या विषयावर व्याख्यान झाले होते. त्यावेळी सांगलीतील राणी सरस्वतीदेवी कन्याशाळा येथे त्यांच्या हस्ते मराछी विज्ञान परिषदेची सांगली शाखा स्थापन झाली होती. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कै. य. द. लिमये अध्यक्ष, मी सेक्रेटरी आणि आरवाडे हायस्कूलमधील कै. जंबूकाका (टोपण नाव) सोमण खजिनदार होते. पुढे निवृत्त मुख्य अभियंता कै. वि. ह केळकर अध्यक्ष झाले. मी १९७३ साली कानपूरला पीएचडीसाठी तीन वर्षे गेलो. त्यामुळे मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यात खंड पडला. 

मराठी विज्ञान परिषदेत मतभेद होऊन  पुणे शाखा बाहेर पडली व  मराठी विज्ञान महासंघ नावाची नवी संस्था त्यांनी सुरू केली. या संघाचे अध्यक्ष कै. आ. मा. लेले याच्या अध्यक्षतेखाली विश्रामबाग येथील ए. आर. ई. संस्थेत सांगलीच्या संस्थेचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरले. मात्र दोन्ही संस्थांशी संबंध ठेवण्याच्या हेतूने मराठी विज्ञान प्रबोधिनी हे नाव निश्चित करण्यात आले व मराठी विज्ञान प्रबोधिनी महासंघाची घटकसंस्था बनली. 

मराठी विज्ञान महासंघाची दोन अखिल भारतीय संमेलने सांगली येथे वेलणकर हॉलमध्ये व इस्लामपूरला आरआयटी कॉलेजमध्ये आयोजित करण्यात मराठी विज्ञान प्रबोधिनीने पुढाकार घेतला होता. सांगली आकाशवाणीच्या सहकार्याने म्हैसाळ येथे मराठी विज्ञान प्रबोधिनीने स्वतःचे संमेलन आयोजित केले होते.

त्यानंतर अनेक विज्ञान शिक्षक व प्राध्यापक तसेच शिक्षणसंस्थांनी मराठी विज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून विज्ञानप्रसाराचे कार्य हाती घेतले. जिल्हा, राज्य व देशस्तरावर सांगलीतील विद्यार्थ्यांनी संशोधन प्रकल्प सादर करून पारितोषिके मिळविली. विज्ञान संशोधनाच्या या बाळकडूतूनच सांगलीतील अनेकजण आज आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन संस्थात मानाची पदे भूषवित आहेत. ही सांगलीकरांना निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.

२००६ साली कै. गोपाळराव कंटक यांच्याहस्ते ज्ञानदीपने मराठीतून विज्ञानप्रसारासाठी ज्ञानदीपने www.vidnyan.net हे संकेतस्थळ सुरू केले. 

 या संस्थेच्या विचारधारेतूनच पूढे अनेक विज्ञान तंत्रज्ञानावर आधारलेल्या संस्था सांगलीत उदयास आल्या. मात्र मूळ मराठी विज्ञान प्रबोधिनीचे पायाभूत कार्य दुर्लक्षित झाले. याचे महत्वाचे कारण म्हणजे संस्थेने स्वतःसाठी स्थायी जागा व कार्यासाठी विज्ञानकेंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.

मराठी विज्ञान प्रबोधिनीच्या या मातृसंस्थेच्या छत्राखाली सर्व विज्ञानप्रेमी व्यक्ती आणि संस्थांनी एकत्र येऊन सांगलीत मध्यवर्ती ठिकाणी असे कार्यालय आणि विज्ञान प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. ज्ञानदीप फौंडेशन, निसर्ग प्रतिष्ठान, येरळा विकास संस्था, रोटरी क्लब, नवनिर्माण व उद्योजक संस्था, सांगली नगर वाचनालय अशा सर्व संस्थांनी आपले योगदान देऊ केले तर असे केंद्र स्थापन होऊ शकेल.

सांगली नगरपालिका व जिल्हा परिषद यांचेकडे सार्वजनिक कार्यासाठी अशी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावयास हवेत. व्यक्ती व संस्थांना देणगीसाठी आवाहन केल्यास आवश्यक तेवढी आर्थिक मदतही सहज गोळा करता येईल.

ज्ञानदीप फौंडेशन याबाबतीत मराठी विज्ञान प्रबोधिनीला सर्वतोपरी साहाय्य करण्यास तयार आहे.
मराठी विज्ञान प्रबोधिनीच्या कार्यात पहिल्यापासून सहभागी असल्याने मी व्यक्तिशः आपणा सर्वांना याबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन करीत आहे. डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली.

No comments:

Post a Comment