Tuesday, October 1, 2019

गणित आणि गणपती


।।श्री गणेशायनम: ।।

आपल्या हिंदू धर्मात गणपतीला सर्वात महत्वाचे स्थान दिले आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात ही गणपतीच्या पूजनाने करावी म्हणजे काही विघ्न न येता कार्य सफल होते असे मानले जाते. गणपती शब्द गण् या संस्कृत  धातूवरून आला आहे. गण्  म्हणजे गणना करणे, मोजणे किंवा गणित करणे.  गणपति: = गणानाम् पति: =गणित करणार्या गणांचा (गणकांचा) नेता म्हणजे  गणितज्ञ.

म्हणजे आपल्या हिंदू धर्मात गणिताला सर्वात महत्वाचे स्थान दिले आहे  असा याचा अर्थ होतो आणि हे खरेच आहे आणि कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आधी त्याचे गणित मांडले तर म्हणजे काही विघ्न न येता कार्य सफल होते असे म्हणता येईल.

गणपतीला एकदंत असे म्हटले जाते. तो चतुर्भुज आहे.  त्याला लंबकर्ण आहेत.  त्याला ११ वा १०८ प्रदक्षिणा घालाव्या. त्याला २१ मोदक, २१ दुर्वा लागतात. यातून अंक मोजायची शिकवण मिळते.  आपल्या संस्कृत साहित्यकृती व ग्रंथातही  संख्यांना महत्वाचे स्थान दिले आहे. दहा तोंडाचा रावण, चार तोंडाचा ब्रह्मदेव, तीन तोंडांचा दत्त,  त्रिशूळ, सूर्याची बारा नावे, सात घोडे,  विष्णूची हजार नावे, गाईच्या शरिरात ३३ कोटी देव  या व अशा  अनेक ठिकाणी संख्यांचा वापर करून  हिंदू धर्मात  गणित शिकविले जाते. गणेशयंत्र, श्रीयंत्र या संख्या व भौमितिक आकृत्यांना पूजनीय मानून गणिताबद्दल  कुतूहल,  गोडी व शिकण्याची इच्छा निर्माण केली.



इतर कोणत्याही धर्मात गणिताला एवढे महत्वाचे स्थान दिलेले आढळत नाही. गणितात  भारताची जी प्रगती झाली तिचे मूळ या गणपती वा गणित पूजनाने झाली असे म्हटले तर वावगे होणार नाही. शून्याचा वा अनंताचा शोध, खगोलशास्त्रातील  गहन गणिते भारतानेच जगाला दिली.

काॅंम्प्युटर  किंवा संगणक म्हणजे तरी काय? गणित करणारा. म्हणून त्याच्या मदतीला माऊस असतो.

 सध्या मात्र आपले गणिताकडे दुर्लक्ष झाले आहे. कोणत्याही क्षेत्रातील अभ्यासासाठी गणिताचा अभ्यास सर्वप्रथम करावयास हवा. म्हणजे गणपतीच्या आशीर्वादाने कार्य सफल होईलच.

No comments:

Post a Comment