सध्या निवडणुकांच्या दंगलीत सर्व प्रसार माध्यमे रंगून गेली आहेत. विरोधी उमेदवारांचे पूर्वायुष्य, त्यांनी केलेल्या चुका, घोटाळे, त्यांचे खरे उत्पन्न यांची माहिती मिळविण्यात आणि ती लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आटापिटा सर्व पक्ष करीत आहेत. दलबदल, आरोप प्रत्यारोप, मोर्चे आणि सभा यामुळे जनतेची खाशी करमणूक होत आहे.
व्यक्ती, पक्ष आणि विचारसरणी यांच्यात कधी नव्हे एवढा दुरावा निर्माण झाला आहे. मत देताना यापैकी कशाला महत्व द्यायचे याबद्दल कोणालाच खात्रीपूर्वक सांगता येणार नाही अशी स्थिती झाली आहे. मत मिळविण्यासाठी वैयक्तिक लाभाचे अमिष दाखविण्यासाठी अतिरंजित आश्वासनांनी भरलेले जाहीरनामे विविध पक्षांनी प्रसिद्ध केले आहेत. या सर्व गदारोळात खरे काय आणि खोटे काय याविषयी सर्वसामान्य माणूस पुरता गोंधळून गेला आहे.
पूर्वीच्या निवडणुका आणि आताची निवडणूक यात फार मोठा फरक पडला आहे असे मला वाटते.’जे गल्लीत ते दिल्लीत” या म्हणीप्रमाणे अगदी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत निवडणूक ही संकल्पनाच फार बदललेली आहे असे वाटते.
राज्य, देश, समाज किंवा वैचारिक बांधिलकी यांना पूर्वीच्या निवडणुकांत महत्वाचे स्थान होते. आता माणूस अधिक स्वयंकेंद्रित झाला आहे. उमेदवार असो वा मतदार; दोघेही स्वार्थाच्या एकमेव प्रेरणेने निवडणुकीकडे पहात आहेत.
मला वाईट याचे वाटते की अशी स्वयंकेंद्रीयता केवळ निवडणुकीपुरती मर्यादित राहिली नसून तिचा प्रादुर्भाव सर्व संस्थात झाला आहे.
माणसामाणसातील स्नेहबंध क्मी होऊन समाज व्यक्तीकेंद्रित झाला आहे. नातेसंबंध विस्कळीत होत आहेत. शेजारधर्म ही संकल्पनाच झपाट्याने कालबाह्य होत आहे.
शाळा कॉलेजात विद्यार्थी- शिक्षक संबंध, विविध विभागातील शिक्षकांतील परस्पर संबंध. विविध शासकीय, निमशासकीय संस्थांतील कर्मचारी, दुकानदार- ग्राहक यांच्यात जाणवण्याइतका तुटकपणा निर्माण झाला आहे.
मोबाईल क्रांतीमुळे परस्पर संपर्क जलद व सुलभ झाला असला तरी भावनिक जिव्हाळा वा सहसंवेदना याऎवजी दिखावू तयार संदेशांची देवाणघेवाण वाढली आहे.
सभ्यता, मैत्री, प्रेम, दया, औदार्य, ऋजुता, स्वार्थत्याग या मानवी जीवनातील महान शास्वत मूल्यांचा विसर पडला तर माणूस आणि प्राणी यात काहीच फरक उरणार नाही.
सध्या सर्व संस्थांत होत असलेला सत्तेसाठी अतिरेकी राजकारणाचा प्रयोग आपल्या समाजास अराजकतेकडे नेऊन जाईल अशी अशी सार्थ भीती वाटते.डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
No comments:
Post a Comment