वरील नावाचा ब्लॉग पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल याची मला खात्री आहे. माझा देवावर विश्वास नाही हे मी याआधीच आपल्याला ठासून सांगितले होते. मग मी देवपूजा करतो हे काय गौडबंगाल आहेअसे तुम्हाला वाटणे साहजिक आहे. पण आता मी देवपूजा करायला लागलो याचे कारण अगदी वेगळे आहे
घरातला थोरला मुलगा म्हणून लहानपणी माझ्याकडा देवपुजेचे काम असे. पुढे शाळेत शिकताना मला पुस्तके वाचण्याचे प्रचंड वेड लागले. अशी पुस्तके वाचताना मला पाश्चात्य तत्वज्ञानाची ओळख झाली. निसर्गातील अतर्क्य गोष्टींचा कार्य कारण भावाने अन्वयार्थ लावणे अशक्य असल्याने मनाला समाधान देण्यासाठी माणसाने देव या संकल्पनेची निर्मिती केली आहे असे लक्षात आल्याने त्याची पूजा करून काही साध्य होऊ शकत नाही व देवपूजा, धार्मिक रूढी व परंपरा यावरचा माझा विश्वास उडाला. माझी देवपूजाही थांबली माझा वर्गमित्र डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धानिर्मूलन चळवळीचा मी समर्थक होतो
तरीदेखील घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या श्रद्धेला तडा जाऊ नये व लहान भावांच्या संवेदनशील मनांवर माझ्या नास्तिकतेचे सावट पडू नये म्हणून मी देवाला नमस्कार करणे, देवळात जाणे वा धार्मिक परंपरांचे पालन करणे मी कटाक्षाने करीत असे. बाहेर मित्रांशी वाद घालताना मात्र मी माझे विचार त्यांना पटवून देण्यात आघाढीवर असे.मात्र समाजमनाविरूद्ध संघर्ष करण्याचे धैर्य माझ्यात नव्हते.
१९७० साली माझे लग्न झाले. माझी पत्नी सौ. शुभांगी अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची होती. तरी तिने मला माझ्या निधार्मिकतेला कधी विरोध केला नाही. तिची रोजची देवपूजा अगदी साग्रसंगीत असे. देवपूजा, पोथीवाचन करण्यात तिला विलक्षण समाधान वाटत असे. माझ्यादृष्टीने भ्रामक असणारे ते समाधान तिला दिवसभर प्रसन्न ठेवे. त्या समाधानाला माझी बुद्धीच मला नाकारत होती.अर्थात तिच्या श्रद्धेसाठी मीही देवधर्म करीत होतो. मी जरी सांगितले की माझा विश्वास नाही हे देवाला माहीत असेलच मग माझ्या नमस्काराचा काय उपयोग. ती म्हणे असूदे माझ्या दृष्टीने तुम्ही नमस्कर केला तेवढे पुरेसे आहे.
मुलीकडे ती एकटी गेली होती तेव्हा तिची आठवण म्हणून मी तिच्यावतीने मी देवपूजा करीत असे. हे तिला कळल्यावर तिला झालेला आनंद माझ्या स्मरणात आहे. गेल्या काही वर्षांत आजारीपणामुळे पूजा करणे शक्य नसल्याने मी देवपूजा करत असे पण ती वरवरची असे.
ती गेल्यानंतर माझी देवपूजाही थांबली. अमेरिकेत मुलाकडे गेल्यावर लक्षात आले की तेथे धार्मिक संस्कार हे त्यांना आपली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचे वाटतात. माझी सून मधुरा म्हणाली बरे झाले आता तुम्ही व्यवस्ठित पूजा कराल. छोट्या दोन्ही मुलींनाही देवपूजेची आवड आहे व त्यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार होतात हे माझ्या ध्यानात आले आणि मी पुन्हा देवपूजेला सुरुवात केली. नमस्कार करून नैवेद्याची साखर खाण्याचा आनंद मला त्यांच्या नजरेत दिसे.
अमेरिकेतून सांगलीत परत आल्यावर मी आमच्या देवघराकडे नजर टाकली व कोळीष्टकात विखुरलेले अनेक फोटो, मूर्ती व देवपुजेचे साहित्य पाहून कसेसे वाटले. सौ. शुभांगीसारखी साग्रसंगीत पूजा करण्यासही मन तयार होईना. मग मी निर्ण. घेतला. प्रतिकात्मक काही थोड्या मुर्तींची पूजा करायची
मी मग सर्व पसा-यातून चार देव मी निवडले ते असे
१.
देवी – सरस्वती, लक्ष्मी आणि आदि
शक्तीचे प्रतीक असणारी देवीची मूर्ती
२.
गणपती – बुद्धीदेवता म्हणून नर्मदेतील लाल
रंगाचा पाषाण
३.
गोमाता व वासरू – मातृत्व आणि प्रेमाचे
प्रतीक
४.
सिलिकॉन चिप – २००४ मध्ये अमेरिकेतील
स्टॅन्फोर्ड विद्यापिठातील आवारातून भक्तीभावाने आणलेला तेथील दगड तेथील सिलिकॉन
चिपचे प्रतिनिधीत्व करणारा. ( त्यावेळी ज्ञानदीपच्या सदस्यांना मी असे दगड आणि एक
एक डॉलर दिले होते ) हे सर्व देव चिंचेने नीट घासून धुतल्यावर त्यांचे मूळ तेजस्वी रूप दिसू लागले.
देवघराची स्वच्छता करून व सौ. शुभांगीचा फोटो लावून त्च्या साक्षीने मी देवपूजा केली.
आणि त्यावेळी मला तिच्या श्रद्धा व समाधानाचा मनोमन प्रत्यय आला.आता अशी पूजाच मला तिचे दर्शन व समाधान देईल अशी मला खात्री पटली.
No comments:
Post a Comment