Friday, May 31, 2019

वेबसाईट जनजागृती अभियान

आज भारतात मोबाईल हे संदेश वहनाचे सर्वात प्रभावी व लोकप्रिय माध्यम बनले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत व गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, सर्वजण आपल्या दैनंदिन कामासाठी याचा वापर करीत आहेत. यामुळे प्रत्यक्ष भेटण्यासाठी लागणारा प्रवास, वेळ व पैसा यात बचत होऊन कार्यक्षमतेत वाढ झाली आहे. आजच्या युगात टेलिफोन/मोबाईलचे महत्व अनन्यसाधारण असले तरी त्यालाही मागे टाकण्याची किमया नजिकच्या भविष्यकाळात वेबसाईट (संकेतस्थळ) करणार आहे. कारण इंटरनेटवरून माहिती घेताना देणार्‍याशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याची आवश्यकता नसते. शिवाय वेबसाईटच्या माध्यमातून फोनपेक्षा दृक्‌श्राव्य तसेच लिखित स्वरुपाची माहिती सहजपणे मिळविता येते.

सध्याच्या काळात वेबसाईट हे जाहिरातीसाठी किफायतशीर व अत्यंत प्रभावी साधन आहे. उद्योग व्यवसायात कॉम्प्युटरचा वापर शक्यतो अकौंटस लिहिण्यासाठी, पगारपत्रके करण्यासाठी केला जातो. इंजिनिअरिंग व बांधकाम व्यवसायात ड्राईंगसाठीही याचा वापर होतो. मात्र आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी, नवे ग्राहक शोधण्यासाठी व जाहिरातीसाठी कॉम्प्युटरचा वापर अजून फारसा होत नाही. परदेशात इंटरनेट व वेबसाईट हे प्रत्येक व्यवसायाचे प्रमुख साधन असते. त्याचा वापर सर्व क्षेत्रातील व विविध आर्थिक स्तरावरील लोक करतात. अगदी साहित्य क्षेत्रातही प्रत्येक लेखकाची एक वेबसाईट असते. बरेच लोक आपली वेबसाईट स्वतःच बनवितात. वेबसाईटचा उपयोग आपल्या व्यवसायवृद्धीसाठी कसा करून घ्यायचा याची माहिती नसल्याने या प्रकाराकडे महाराष्ट्रातील व्यावसायिक फारसे वळत नाहीत. बॅनर, वर्तमानपत्रातील जाहिरात वा टी. व्ही.वर जाहिरातींसाठी वारेमाप खर्च करतात. मात्र वेबसाईटसाठी खर्च करायला ते राजी होत नाहीत.

आता हे चित्र थोडे थोडे बदलू लागले आहे. संपर्क, करमणूक व माहितीचा शोध घॆण्यासाठी इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे अनेक व्यवसायांच्या जाहिरातींची व त्यांच्या वेबसाईटची माहिती लोकांना होऊ लागली आहे. मराठी भाषेतील वेबसाईटही आता मोठ्या प्रमाणावर दिसू लागल्या आहेत व नजिकच्या भविष्यकाळात यात फार मोठी वाढ होणार आहे.
या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार सर्व व्यावसायिकांनी आवर्जून करावा व वेबसाईटबद्दलचा वापर वाढावा यासाठी ज्ञानदीप फौंडेशन एक जनजागृती अभियान सुरू करीत आहे.

आपली वेबसाईट स्वतःला बनविता येऊ शकते याचा आत्मविश्वास प्रत्येकाच्या मनात निर्माण करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. जाहिरातीच्या बाबतीत वर्तमानपत्रे, बॅनर, टीव्ही यांची मक्तेदारी मोडून काढून सध्याच्या आधुनिक युगात अत्यंत किफायतशीर व प्रभावी जाहिराततंत्राचा पर्याय सर्वांसाठी उपलब्ध करून देणे हा यामागचा हेतू आहे. यासाठी विद्यार्थी, शिक्षक, महिला यांच्यासाठी वेबडिझाईनचे शिक्षण देणारे प्रबोधन वर्ग घेण्याचे ज्ञानदीप फौंडेशनने ठरविले आहे. यासाठी वेबसाईट तंत्रज्ञानाची माहिती असणार्‍या शिक्षकांचे व व्यावसायिकांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. उद्योजकांसाठी वेबसाईटच्या उपयुक्ततेसंबंधी कार्यसत्रे आयोजित करण्याचा फौंडेशनचा मानस आहे. याबाबतीत अधिक माहितीसाठी वा असे कार्यसत्र आयोजित करू इच्छिणार्‍या व्यक्ती व संस्थांनी ज्ञानदीप फौंडेशनशी संपर्क (info@dnyandeep.net)साधावा.

No comments:

Post a Comment