महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनामध्ये मोलाची कामगिरी बजावणारे प्रा. श्री, कानिटकर आणि प्राथमिक शिक्षणातील तज्ज्ञ श्री. प्रभाकर खाडिलकर यांचा समावेश सध्याच्या व्यवस्थापनात नाही हे ऐकून धक्का बसला. गेल्या वर्षी १ सप्टेंबरला पुण्यामध्ये संस्थेचा फौंडर्स डे साजरा झाला त्या वेळी माझ्या पत्नीच्या ( कै. सौ. शुभांगी रानडे) स्मरणार्थ संस्थेला एक लाख रुपयांची देणगी दिली होती व पुण्यात मराठी माध्यमातून संगणक प्रशिक्षणाचे कार्य सुरू केले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. प्रा. कानिटकर सरांनी त्याबाबत योजनाही आखली होती.
संस्थेचे संस्थापक स्व. धोंडुमामा साठे यांचे व्यावसायिक शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी डिप्लोमा कोर्सला शासनमान्यता व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रा. कानिटकर यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. वालचंद कॉलेजमधील कै. प्रा. मकरंद जोगळेकर, कै. डॉ. संतपूर यांच्या पाठिंब्याने आपल्या नोकरीची पर्वा न करता प्रदीर्घ काळ प्रशासनाशी संघर्ष करून संस्थेच्या आवारात मराठी माध्यमाची आदर्श प्राथमिक शाळा स्थापन केली तसेच उत्तम इमारत व सुविधा व व्यासंगी शिक्षकांची नेमणूक केली. मिरज विद्यामंदीरमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेल्या माझ्या भावाला तसेच प्राथमिक शिक्षणातील तज्ज्ञ श्री. प्रभाकर खाडिलकर यांना मार्गदर्शक नेमून संस्था नावारुपास आणली.
पुण्यातही याचप्रकारे मराठी माध्यमातून संगणक शिक्षणाचे कार्य त्यांच्याकडून होईल याची मला खात्री होती. मुमारे सहा महिने अमेरिकेत राहून परत आल्यावर मला प्रा, कानिटकर व खाडिलकर, दोघेही शालेय व्यवस्थापनात नाहीत तसेच पुण्यातही त्यांचा सहभाग नाही हे कळले.
मला संस्थेच्या राजकारणात अजिबात रस नाही. कोणाचे बरोबर व कोणाचे चूक याबाबतही मला काही देणे घेणे नाही. मात्र शिक्षण क्षेत्राचे नेतृत्व शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ कार्य करणा-याच्या हाती असावे असे मला वाटते.
सध्याच्या व्यवस्थापनाने याबाबतीत योग्य तो निर्णय घेऊन सांगलीतील शाळा तसेच पुण्यातीस संगणक प्रशिक्षणाच्या कार्यास चालना मिळेल यादृष्टीने पावले उचलावीत असे संस्थेचा आजीव सदस्य, हितचिंतक आणि देणगीदार या नात्याने सुचवावेसे वाटते. -डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
No comments:
Post a Comment