महाराष्ट्रात पहिलीपासून इंग्रजीचे शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे सारे जग एक झाले आहे. या स्पर्धेच्या युगात मराठी माणूस मागे पडू नये व नव्या आव्हानांना सामोरे जाणे नव्या पिढीला शक्य व्हावे या दृष्टीने सरकारने हा धाडसी निर्णय घेतला आहे. मुले नवी भाषा लगेच सहजपणे शिकू शकतात व लहानपणी शिकलेले चांगले लक्षात रहाते या गोष्टींचा विचार करता हा निर्णय योग्य आहे असे वाटते. कदाचित चौथीनंतर बरीच मुले शाळा सोडतात त्यासाठी त्यांनाही इंग्रजीची तोंडओळख असावी अशीही त्यामागे कल्पना असावी.
यावेळी हे लक्षात घ्यावयास हवे की या धोरणाचा दृश्य परिणाम दिसायला किमान पाच वर्षे वाट पहावी लागणार आहे. तसेच याचा आपल्या सांस्कृतिक जीवनावर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेणे जरूरीचे आहे. गरीब शेतमजूर, झोपडपट्टीत हलाखीत जीवन कंठणारे लोक आपली मुले ` पप्पा मम्मी ` म्हणतात आणि इंगजी गाणी गातात म्हणून निश्चितच खूष होतील पण मुलेच मानसिकदृष्ट्या त्यांचेपासून व इंग्रजी न जाणणाऱ्या इतर बालमित्रांपासून मानसिकद्दृष्ट्या दूर होण्याची भीती आहे.
आपण याआधीच परिसरविज्ञानासारख्या आवश्यक विषयांचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. मुलांवर अभ्यासाचा जास्त बोजा पडला तर त्याचाही दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे इंग्रजी शिक्षणाकडे जास्त लक्ष दिल्यास मुलांचे मराठी कच्चे राहण्याचा धोका जास्त जाणवतो. इंग्रजी माध्यमामध्ये शिकणाऱ्या मुलांना इतर विषय चटकन् समजत नाहीत व ती मुले बऱ्याच वेळा सामान्य ज्ञानात मागे पडतात असा अनुभव आहे. पुष्कळदा महत्वाकांक्षी गरीब पालक आपल्या पोटाला चिमटा काढून मुलांना इंग्रजी शाळेत घालतात. मात्र सधन व सुशिक्षित पालकांसारख्या सुविधा व लक्ष देऊ न शकल्याने त्यांच्या पदरी निराशा येते व मुलांनाही ते न पेलवणारे ओझे ठरते.
यामुळे इंग्रजीच्या हव्यासापायी मराठीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लोकांची बोली व्यवहाराची भाषा मराठीच राहणार असल्याने मराठी अधिक समृद्ध व सर्वसमावेशक करण्याची खरी गरज आहे. समाजाची इंग्रजीबाबत असणारी उदासीनता ही मागासलेपणाचे लक्षण न मानता त्यात व्यावहारिक अडचण आहे हे समजून घेतले पाहिजे.परक्या भाषेत शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना शक्य असले तरी सर्वसामान्य माणसास तशी इच्छा, सवड व क्षमताही नसते. त्यामुळे मातृभाषेत उपलब्ध असणाऱ्या ज्ञानावरच तो आपले काम भागवतो.
याउलट संगणक क्रांतीकडे पाठ फिरवूनही चालणार नाही. संगणकाचे फायदे त्वरीत मिळण्यासाठी तातडीने उपाय करणे आवश्क आहे यात शंका नाही. यासाठी इंग्रजी भाषेतील ज्ञान मराठीत आणण्याचा प्रयत्न संगणक तज्ञांनी करावयास हवा. सध्या संगणक क्षेत्रात समाजातील उच्चशिक्षित बुद्धीमान वर्ग प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यांना मराठीसाठी नव्या संगणक प्रणाली विकसित करणे सहज शक्य आहे.
मात्र मराठीबाबत त्यांचा दृष्टीकोन सहसा नकारात्मक असतो. मराठीतून काम करणे म्हणजे कमीपणाचे अशी त्यांची समजूत असते. मात्र आजच्या काळाची ती गरज आहे हे त्यांनी ओळखले पाहिजे. सध्या संगणक शिक्षणाचे सगळीकडे पेव फुटले आहे. गल्लोगल्ली निघालेल्या अशा शिक्षणसंस्थांत लाखो मुले, नोकरी मिळेल या आशेने महागडी फी भरून शिक्षण घेत आहेत. मात्र या सर्वांना देण्यासाठी आपल्याकडे नोकऱ्या नाहीत. नोकऱ्या देऊ शकणारे उद्योग परदेशी मालाच्या आक्रमणाने याआधीच आर्थिक मंदीत आहेत. अशावेळी मराठीतून संगणक प्रणाली विकसित करण्याचा व्यवसाय स्वयंरोजगार निर्मितीसाठी एक आशेचा किरण आहे.
मराठीस माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय दिल्याने मराठी की माहिती तंत्रज्ञान असा वाद मध्यंतरी निर्माण झाला होता. मात्र मराठीस माहिती तंत्रज्ञानाने नवी संजीवनी मिळाली आहे. संगणक आणि इंटरनेटद्वारे मराठी सर्वदूर पोहोचणे आणि मराठीतून सर्व व्यवहार करणे हे माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कधी नव्हे इतके सोपे झाले आहे. युनिकोड वा डायनॅमिक (स्वयंचलित) फॉंटचा वापर करुन इंटरनेटवरून मराठी साहित्य सर्व जगभर कोणासही उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे.
No comments:
Post a Comment