Monday, October 15, 2007

इंटरनेटवर कुलवृत्तांत


भारतीय कुटुंबव्यवस्था ही भारतीय समाजाचा मुख्य आधार आहे. वंशपरंपरा व नातेसंबंध यांची माहिती एकत्रितपणे सुसंगतपणे
मांडणे म्हणजे कुलवृत्तांत. अनेक वर्षे अथक प्रयत्न करून, निरनिराळया ठिकाणी राहणाऱ्या कुलबंधूंची अधिकृत माहिती जमा करणे, ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे वंशावळीचा व घराण्यांचा इतिहास लिहिण्याचे फार मोठे कार्य अनेकांनी केले आहे. आजच्या धकाधकीच्या युगात असे कार्य करणे अशक्यप्राय झाले आहे.

प्रत्येकाला आपल्या कुळाचा अभिमान असतो आपल्या पूर्वजांबद्दल आदरयुक्त प्रेम असते. कुलदैवतावर श्रद्धा असते. आपल्या
पूर्वजांचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा असते. घराण्यातील रीतीरिवाज, सणवार यांची माहिती पूर्वी एकत्र कुटूंबपद्धतीत
विनासायास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जायची. आता विभक्त कुटुंबपद्धतीमुळे, शिक्षण व नोकरीसाठी राहण्याचे स्थान
बदल्याने अशी माहिती मिळण्यास अडचणी येतात. कुलवृत्तांत ही सर्व माहिती असते. मात्र असे कुलवृत्तांत फारच थोड्या घराण्यात तयार झाले आहेत. आणि ते तयार झाल्यावर काळ लोटला की त्यातील माहितीने नूतनीकरण न झाल्याने त्याचा फक्त ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून उपयोग शिल्लक रहायचा.

सध्याच्या संगणक युगात वेबसाईटवरून नित्य नूतनीकरणाची सोय उपलब्ध असल्याने अद्ययावत कुलवृत्तांत केव्हाही कोणासही कोठेही पाहता येणे शक्य झाले आहे. या सुविधेचा वापर करताना फक्त आवश्यक तेवढ्याच माहितीचा कोश तयार झाला तर तो जास्त उपयुक्त ठरेल. नातेसंबंधांची माहिती उपयुक्त असली तरी त्याचा फारच थोड्या लोकांशी असल्याने तसेच त्यात अनेक प्रकारच्या माहितीचा व घराण्याचा संबंध येत असल्याने त्याचा समावेश करणे योग्य ठरणार नाही.

आतापर्यंत अनेक घराण्यांनी आपले कुलवृत्तांत तयार केले आहेत. मात्र सर्व जाती-धर्मांच्या लोकांत हे काम अजून झालेले नाही. कुलवृत्तांत डॉट कॉम ही वेबसाईट त्यासाठी तयार करण्यात आली असून रानडे डॉट कुलवृत्तांत डॉट कॉम हा विभाग सबडोमेन स्वरुपात नमुन्यादाखल तयार करण्यात येत आहे. या विभागात त्या घराण्याची तसेच मान्यवर कुलबंधूंची व्यवसायानुसार वर्गीकरण करून माहिती नाव, शिक्षण, व्यवसाय, गाव, फोन, इ-मेल इ. माहिती देता येईल. आमच्या मते कुलवृत्तांतात खालील माहिती असावी -
कुलदैवत, कुळाचार, संक्षिप्त इतिहास, मान्यवर कुलबंधूंची व्यवसायानुसार वर्गीकरण करून माहिती नाव, शिक्षण, व्यवसाय, गाव, फोन, इ-मेल.


युनिकोड मराठीचा वापर केल्यास फ्लॅश वा डायनॅमिक फॉंट न वापरता मराठीतून आपली माहिती लिहिणे आता शक्य असल्याने कुलवृत्तांत आता मराठीत लिहिता येईल. पुरेसा प्रतिसाद मिळाला तर या वेबसाईटवर इतर अनेक सुविधा निर्माण केल्या जातील. उदा. व्यवसाय जाहिरात व मार्गदर्शन, वधू-वर मंच इ.

माहिती अधिकृत होण्यासाठी तसेच त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून लॉग-इन व्यवस्था तयार करून त्याचे संचालन प्रत्येक घराण्याच्या प्रायोजकाकडे दिले जाईल. आपल्याकडून यास योग्य प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. ही वेबसाईट अधिक उपयुक्त ठरण्यासाठी आपल्या काही सूचना असल्यास त्या जरूर कळवाव्यात. तसेच आपल्या घराण्यासाठी स्वतंत्र विभाग करावयाचा असल्यास इच्छुक प्रायोजकांनी ज्ञानदीपशी संपर्क साधावा. ही विनंती.

1 comment:

  1. I am unable to connect site "www.kulvruttant.com"
    please help me.

    ReplyDelete