Saturday, October 13, 2007

वर्ल्ड पेंटर्स डॉट नेट

साहित्याप्रमाणेच कला हा माणसाच्या सृजनशीलतेचा एक सुंदर आविष्कार आहे. जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या कलेचे उपासक एखाद्या व्रतस्थासारखे कलानिर्मितीत व्यग्र असतात. चित्रकला ही अशीच एक कला आहे. भारतात प्राचीन काळापासून चित्रकलेला फार महत्व दिले गेले होते. आजही भारताच्या कानाकोपऱ्यात असंख्य चित्रकार आहेत. मात्र त्यांच्या कलेला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळू शकत नाही.

विज्ञानाच्या प्रगतीमुळे चित्रांच्या प्रतिकृती करण्याचे तंत्र सर्वसामान्यांच्या हाती आले आहे. त्यामुळे चित्रकला हा व्यवसाय हळूहळू लोप पावत आहे. मात्र याचवेळी भारतातील काही मोजक्याच चित्रकारांची चित्रे लाखो नव्हे; तर कित्येक कोटी रुपयांना विकली जात आहेत. प्रसिद्धीमाध्यमांची जोड मिळाल्यामुळेच हे शक्य झाले आहे. इतर सर्व चित्रकारांना त्याच्या कलेच्या प्रदर्शनासाठी जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वर्ल्ड पेंटर्स डॉट नेट ही वेबसाईट तयार केली आहे.

कोणतेही मोठे चित्र काढण्यासाठी बराच खर्च येतो. चित्र काढण्याच्या माध्यमामध्ये आता अनेक नवीन प्रकार रूढ झाले आहेत. पेन्सिल स्केचिंग, पावडर शेडिंग, वॉटर कलर (जलरंग), ऑईल पेंट, नाईफ पेंटिंग, कोलाज (कागदाचे तुकडे जोडून केलेले चित्र) इत्यादी.

पूर्वी निसर्गाचे वा व्यक्तीचे दिसते तसे हुबेहूब चित्र काढण्याला फार महत्व दिले जाई. निसर्गाच्या रंगातील सूक्ष्म छटा, छाया-प्रकाशामुळे त्यांच्यात होणारे फरक, तलम वस्त्रामागील शरीराचे यथायोग्य दर्शन, दिव्याच्या प्रकाशाचा भोवतालच्या वस्तूंवर होणारा परिणाम, हलत्या वस्तूतील गतिमानता, डोळयातील चमक, चेहऱ्यावरील भाव दाखविण्यात चित्रकाराचे कसब पणाला लागते. फोटोग्राफीच्या तंत्रामुळे या कलाप्रकाराला मोठ्ठा धक्का बसला. फोटोत निसर्गाचे वा व्यक्तीचे हुबेहूब चित्र विनासायास निघत असल्याने व आधुनिक तंत्राचा वापर करून त्यात छाया-प्रकाशांचा प्रभाव दाखविता येत असल्याने हुबेहूब चित्रांची गरज कमी झाली. पूर्वी सधन लोक चित्रकारांकडून आपली चित्रे काढून घेत व त्यावर चित्रकारांचा उदरनिर्वाह चाले.

जाहिरातीसाठी चित्रे काढणे या व्यवसायाचा चित्रकारांना बराच काळ आधार होता. सिनेमा पोस्टर्स व मोठ्या जाहिराती, मासिकातील चित्रे काढणे, भेटकार्डे तयार करणे हे बऱ्याच चित्रकारांचे व्यवसायाचे मुख्य साधन होते. आता सिनेमा पोस्टर्स वा बॅनर जाहिराती डिजिटल पोस्टर स्वरूपात अगदी कमी खर्चात व थोड्या वेळात तयार करता येतात. मासिकातील चित्रेही संगणकावर कोणासही सहज तयार करता येतात. साहजिकच ही कला केवळ काही प्रायोजक व्यक्ती वा संस्था यांच्या सहकार्यावर तग धरून आहे.

मुंबई, बंगलोरसारख्या मोठ्या शहरात असणाऱ्या कलादालनात प्रदर्शन भरविल्यास मोठ्या कंपन्यांकडून अशी चित्रे विकत घेतली जातात. मध्यंतरी कोल्हापूरच्या शेलार या चित्रकाराची लाखांची चित्रे विकली गेली. चित्रकला ही सर्वांनाच आवडणारी कला असल्याने चित्रकला शिकविण्याचे कामही तितकेच महत्वाचे आहे. सांगलीतील श्री. पतंगे या पावडरशेडिंगमधील तज्ञ चित्रकाराने आर्ट सर्कल स्थापून ही कला शिकविण्याचे कार्य सुरू केले आहे व त्यास प्रतिसादही चांगला मिळत आहे.

वडगावचे नाईकवडी यांच्या चित्रांना मुंबई प्रदर्शनात मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांचे एक चित्र ५०००० रुपयांना विकले गेले. बी.बी.सी.ने त्यांच्या चित्रकलेविषयी एक डॉक्युमेंटरी तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी श्री. नाईकवडी यांचे स्टुडिओमध्ये चित्र काढतानाचे शूटिंग केले आहे.

No comments:

Post a Comment