Monday, October 22, 2007

वर्ल्ड लायब्ररियन्स डॉट कॉम


प्राचीन काळापासून मानवी संस्कृतीत ग्रंथालयांना फार महत्व आहे. ग्रंथालय म्हणजे ज्ञानाचे भांडार. विविध विषयात माणसाने केलेली प्रगती व मिळविलेले ज्ञान यांचा एकत्र संचय ग्रंथालयात पहावयास मिळतो. या ग्रंथालयांची व्यवस्था पाहणारा ग्रंथपाल आवश्यक तो संदर्भग्रंथ देऊन प्रत्येक वाचकाची जिज्ञासा पूर्ण करतो. त्याला ग्रंथालयातील सर्व ज्ञानभांडाराची माहिती असते. सध्याच्या माहितीतंत्रज्ञानयुगात ग्रंथालयांचे महत्व अधिकच वाढले आहे. पुस्तकांशिवाय इतर अनेक नवीन माध्यमे ग्रंथकाराला हाताळावी लागतात. ग्रंथालयांना भरपूर अर्थसाहाय्य मिळत असले तरी ग्रंथपालाकडे बहुधा दुर्लक्षच केले जाते. या ग्रंथपालांना आधुनिक साधनांचा वापर सातत्याने करता यावा, त्यांचे संघटन व्हावे या दृष्टीकोनातून ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे.
ग्रंथपाल हा सतत पुस्तकांच्या संपर्कात असल्याने ते ते विषय व त्या अनुषंगाने उपलब्ध असणारी पुस्तके याचे समीकरण त्याचा मनात सतत मांडलेले असते. विविधविषयांवरील नवीजुनी पुस्तके, मासिके, वार्तापत्रे, ध्वनिफीती, चित्रफीती यांची आकर्षक पद्धतीने मांडणी करून तो वाचकाला सर्व प्रकारची माहती पुरविण्यात सदैव तत्पर असतो. अशा ग्रंथपालांना एकमेकांची माहिती व्हावी, त्यांच्या माहितीची देवाणघेवाण करता यावी या हेतूने ही साईट तयार करण्यात आली आहे. यात ग्रंथपालाची स्वत:ची माहिती, फोटो घालण्याची सोय केलेली आहे. जगभरातील सर्व ग्रंथपालांच्या माहितीसोबत वेगवेगळया प्रकाशनसंस्था, प्रकाशक यांचाही संग्रह वा साईटमध्ये केलेला आहे.

मधुरंग डॉट कॉम


मधुरंग वधुवर सूचक मंडळ या सांगलीतील संस्थेची ही वेबसाईट असून श्री. शामराव भिडे त्याचे प्रवर्तक आहेत. सर्व जातीधर्माच्या वधुवरांची नोंदणी या वेबसाईटवर करता येते. सर्व उपलब्ध स्थळांची फोटोसहीत माहिती ह्या वेबसाईटवर ठेवण्यात आली असून नोंदणीकृत सभासदांना ती पाहता येते. संस्थेच्या ऑफिसात व मेळाव्यात नोंदणी करता येत असून विशेष सॉफ्टवेअरच्या साहाय्याने विविध प्रकारचे रिपोर्ट तयार तयार करता येतात. वेबसाईट व सॉफ्टवेअरच्या वापरामुळे इच्छुक वधुवरांना आवश्यक ती सर्व माहिती कोठेही पाहता येते.

इ गुजर डॉट कॉम

मराठी भाषिक गुजर समाजाच्या उन्नतीसाठी बंगलोरमधील काही तरुणांनी पुढाकार घेऊन ही वेबसाईट कार्यांन्वित केली आहे. त्यात व्यवसाय मार्गदर्शन, वधुवर माहिती, भारतातील प्रमुख हॉस्पिटलचे पत्ते, मैत्री,परस्पर सहकार्य आणि आपल्या आवडीच्या विषयावर इतरांची मते जाणून घेण्यासाठी सूचनाफलक अशा अनेक सेवा सुविधा आहेत मात्र यातील काही सुविधांचा लाभ घेण्यासाठी सभासद नोंदणी करावी लागते. देशात व परदेशात राहणाऱ्या गुजर बांधवांपर्यंत गुजर समाजाची वैशिष्ठ्ये, रीतीरिवाज व इतर सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यासाठी ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे.

छोटे उद्योगधंदे आणि इंटरनेट

इंटरनेटच्या वाढत्या प्रसाराबरोबर अनेक परदेशी कंपन्या वेबसाईटच्या माध्यमातून येथील बाजारपेठ काबीज करीत आहेत. जागतिकीकरणाच्या या लाटेचा चीन, सिंगापूर, कोरिया या देशांनी फायदा घेतला असून आपला माल येथील ग्राहकांना विकण्यात ते यशस्वी झाले आहेत व त्याचा येथील उद्योगांवर विपरीत परिणाम होत आहे. 

घरोघरी ब्रॉडबँड पोहोचल्यावर आणि मोबाईलवर इंटरनेटसेवा सुरू झाल्यावर तर हा धोका अधिकच वाढणार आहे.

 त्यांच्यावर बंधने घालून हा प्रश्न सुटणार नाही. तर येथील उद्योगांनीही इंटरनेटच्या माध्यमातून आपली जाहिरात केवळ येथील ग्राहकांसाटी नव्हे तर जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत. 

आपण आपल्या व्यवसायाची / उद्योगाची वेबसाईट तयार केल्यास परदेशी कंपन्यांच्या येथील आक्रमणास यशस्वीपणे तोंड देऊ शकाल. एवढेच नव्हे तर आपल्या मालाची परदेशात निर्यात करू शकाल. रंगीत आकर्षक माहिती पत्रके, दरपत्रक वा मॅन्युअल छापण्यास व ती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास बराच खर्च येतो. ही सर्व माहिती आपल्या वेबसाईटवर टेवल्यास कोणासही व कोठेही पाहता येते वा छापून घेता येते. यामुळे छपाईचा वा पोस्टेजचा खर्च वाचतो. याशिवाय वेबसाईटवर फोटो, ध्वनी वा चित्रफिती अथवा संदर्भ साहित्य ठेवता येत असल्याने ग्राहकास उद्योग, उत्पादन व सेवा यांचे प्रत्यक्ष भेटीसारखे सर्वार्थाने ज्ञान होऊ शकते. 

वेबसाईटवरूनच संपर्क साधण्याची व अधिक माहिती, शंका वा मागणी नोंदविण्याची सोय असल्याने ग्राहकास ते फार सोयीचे ठरते. क्रेडिट कार्डसारखी व्यवस्था असल्यास वेबसाईटवरूनच जागतिक स्तरावर खरेदी विक्रीचे व्यवहार होऊ शकतात. 

इंजिनिअरिंग वा बांधकामविषयक उद्योगात मोठी ड्नॅइंग पाठवावी लागतात. नेहमीच्या इमेलने ती पाठविता येत नाहीत. साध्या वेबसाईटवरूनही ती लवकर घेता येत नाहीत. अशावेळी वेबसाईटवर आवश्यक तेवढी जागा राखून ठेवून व एफटीपी प्रणालीचा वापर करून ही गोष्ट साधता येते.

विज्ञान डॉट नेट


इंटरनेट ही आधुनिक काळातील विज्ञानाची सर्वात मोठी भेट आहे कारण इंटरनेटने जीवनाच्या सर्व क्षेत्रात क्रांती केली आहे. मराठीतून विज्ञान शिक्षण आणि विज्ञानप्रसार यासाठी मात्र इंटरनेटचा वापर झालेला दिसत नाही. सर्व मराठी विद्यार्थ्यांची ही गरज लक्षात घेवून ह्या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. या वेबसाईटवर २०० वर शास्त्रज्ञांची विषयवार फोटोसहीत माहिती, विज्ञानविषयक पुस्तकांची सूची, शोध, विज्ञानलेख,तारकासमूहांची छायाचित्रे, विज्ञानजिज्ञासा, विज्ञान प्रसारक व्यक्ती आणि संस्थांची माहिती देण्यात आली आहे. लवकरच यात विज्ञानप्रयोग आणि चलत्चित्रांचा समावेश करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य लोकांपर्यंत व ग्रामीण भागातही विज्ञानप्रसार करण्यासाठी एक खुले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सर्व विज्ञान शिक्षकांनी व विज्ञानप्रसारकांनी या व्यासपीठाचा विज्ञान शिक्षण आणि विज्ञानप्रसारासाठी वापर करावा अशी अपेक्षा आहे.

संस्कृतदीपिका डॉट ओआरजी


संस्कृत भाषा ही सर्व भारतीय भाषांची जननी आहे. त्यामुळे कोणत्याही भारतीय भाषेचा अभ्यास करताना संस्कृतचा अभ्यास अनिवार्य ठरतो. याशिवाय संस्कृत साहित्यात सर्व विषयांवरील ज्ञानाचे अपार भांडार आहे. भारतीय संस्कृतीचा पायाही हे साहित्यच आहे. यामुळे शालेय स्तरावर संस्कृत विषयाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र संस्कृत शिकविण्यासाठी चांगले शिक्षक मिळत नाहीत. संस्कृत पुस्तकांत फक्त काही उदाहरणे दिलेली असतात. त्यांचा उपयोग करून आवश्यक ती विभक्ती वा धातुरूपे विद्यार्थ्यांना करता येत नाहीत. संस्कृत शब्दांचा अर्थ लावणे, संधी, समास सोडविणे तसेच मराठीतून संस्कृतमध्ये भाषांतर करणे हेही त्यांना अवघड जाते. या अडचणींचा विचार करून विद्यार्थ्यांना संस्कृत शिकण्यासाठी शब्दकोश तसेच व्याकरण व भाषांतराची उदाहरणे उपलब्ध करून देण्यासाठी तीन वर्षे अथक प्रयत्न करून ही वेबसाईट बनविण्यात आली आहे. यात ६००० वर संस्कृत शब्दांचे अक्षरक्रमाप्रमाणे व विषयवार इंग्रजी व मराठीत अर्थ दिले असून संस्कृत, इंग्रजी व मराठी अशा कोणत्याही भाषेतील शब्दाचे अन्य दोन भाषांत अर्थ मिळविता येतात. आठशे वाक्यांसाठी हीच सोय केली आहे. दोनशेवर संस्कृत सुभाषितांचे मराठी अर्थ दिल्यामुळे ही सुभाषिते कळणे व पाठ करणे मुलांना सोपे जाईल. नेहमीच्या वापरातील नामांची व सर्वनामांची विभक्तीरूपे, ४००वर धातूंची सर्व रूपे, ८०० संधी, ८०० समास, समानार्थी व विरूद्धांर्थी शब्द, अव्यये तसेच संपूर्ण व्याकरणाचा या वेबसाईटवर समावेश करण्यात आला आहे. आता संस्कृत शब्दांचे उच्चार कसे करावेत हे समजण्यासाठी ध्वनीफितीद्वारे आवाजाचीही जोड यास देण्यात येणार आहे.

माय कोल्हापूर डॉट नेट


प्राचीन काळापासून कोल्हापूरचा इतिहास, कोल्हापूरची वैशिष्ठ्ये, शहरातील तसेच कोल्हापूर परिसरातील प्रेक्षणीय स्थळे, किल्ले, तीर्थक्षेत्रे यांची सचित्र माहिती या वेबसाईटवर आहे. सर्व महत्त्वाचे फोन व संपर्क पत्ते यात आहेतच शिवाय फोटोगॅलरी, विनोद, सिनेमा यासारखी मनोरंजनपर माहिती व वधू वर सूचक माहिती, हवामान, सोन्या चांदीचे भाव इत्यादी अनेक आवश्यक माहिती यात आहे. नुकत्याच घडून गेलेल्या प्रलयंकारी महापूराचे रौद्ररूप दर्शविणाऱ्या छायाचित्रांचा संग्रहही या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

या वेबसाईटचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे कोल्हापूरचा नकाशा. अतिशय आधुनिक तंत्रज्ञान वापरून हा माहिती पूर्ण नकाशा तयार केला असून यात प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणाची माहिती तसेच त्याचे स्थान पाहता येते. या नकाशावर व्यावसायिकांना आपली जाहिरात करण्याची सोय केल्यामुळे व्यवसायाचे स्थान, पत्ता व माहिती ग्राहकास पाहता येणार आहे. अशी सुविधा भारतातील फारच थोड्या वेबसाईटवर पहावयास मिळते. या अभिनव वेबसाईटवर आपली जाहिरात करून सर्व जगभर आपल्या मालाची व व्यवसायाची माहिती देण्याची सुवर्णसंधी कोल्हापूरकरांना उपलब्ध झाली आहे.

Wednesday, October 17, 2007

माय मराठी


मानवी जीवनाचा साहित्य व संस्कृती हा महत्वाचा वारसा आहे व भाषा त्यासाठी अत्यावश्यक माध्यम आहे. महाराष्ट्रीयनांसाठी तर मराठी भाषा ही जीवापाड जपण्यासारखी गोष्ट आहे. महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी लोकांना यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. भोवतालची परिस्थिती व नेहमीच्या व्यवहारासाठी लागणारी स्थानिक भाषा यामुळे यात अनेक अडचणी येतात. आपल्या पुढील पिढ्यांमध्ये मराठी भाषा व संस्कृती टिकून रहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र मुलांना मराठी शिकविण्यासाठी वेळ मिळत नाही. मराठी शाळा, पुस्तके वा शिक्षक नसतात. मराठी मासिके व पुस्तकेही मिळत नाहीत. घरातही मराठीऎवजी दुसरी भाषा वापरण्याची सवय लागते व हळू हळू मराठीपासून मुले दूर होऊ लागतात. त्यांचा मराठी संस्कृतीशी असणारा संपर्क तुटत जातो. पालकांनी मराठी बोलण्याचा कटक्ष ठेवला तर मुलांना मराठी समजते थोडे बोलताही येऊ लागते. मात्र वाचणे वा लिहिणे यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. अशा मुलांसाठी प्रभावी दृकश्राव्य माध्यमाची गरज आहे. परप्रांतांत वा परदेशात स्थायिक झालेल्या आपल्या मुलांकडे जाणाऱ्या व नेहमी मराठी मासिके व पुस्तके वाचणाऱ्या मराठी मंडळींना मोजक्या मराठी वृत्तपत्रांचे अंक इंटरनेटवर वाचून त्यावर समाधान मानावे लागते. वेबसाईट हे माध्यम साहित्य प्रसार व उपलब्धतेसाठी वापरणे हा यावर उपाय ठरू शकतो. महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी लोकांची ही गरज भागविण्याच्या हेतूने माय मराठी वेबसाईटची कल्पना सुचली.
याच अनुषंगाने पुण्यात भरलेल्या ७५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माय मराठी डॉट ओआरजी या वेबसाईटद्वारे अभिजात मराठी साहित्याची ओळख करुन देण्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प ज्ञानदीपने हाती घेतला. पुढे साहित्याबरोबरच मराठी रीतीरिवाज, सण, परंपरा तसेच महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळे यांच्याही माहितीचा यात समावेश करण्यात आला. इंटरनेटवर मराठी लिहिता यावे यासाठी प्रथम शिवाजी हा फॉंट, नंतर सीडॅकचा योगेश, मोड्युलरचा श्रीलिपी फॉंट वापरून वेबसाईट तयार करण्यात आली. मात्र वाचकांना मराठी फॉंट आपल्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करावा लागे. डायनॅमिक श्रीलिपी फॉंट मिळाल्यावर ही वेबसाईट सर्वांना विनासायास पाहणे शक्य झाले. मात्र तरीही गुगलसारख्या शोधयंत्रास ही मराठी अक्षरे समजत नसल्याने या वेब साईटची माहिती सर्व मराठी बांधवांपर्यंत पोहोचू शकत नव्हती.
अगदी अलिकडच्या काळांत मायक्रोसॉफ्टने आपल्या विंडोज आणि इंटरनेट एक्स्प्लोअरमध्ये युनिकोड मराठी फॉंट वाचण्याची सोय उपलब्ध केली. युनिकोड मराठी फॉंट वापरून नव्या वेबसाईटही इंटरनेटवर आल्या. ओंकार जोशी यांनी गमभन नावाचा ब्राउजरमध्ये मराठी लिहिण्याचा प्रोग्राम विकसित केला व सर्वांना मोफत ऊपलब्ध करून दिला. बराहा डॉट कॉम या वेबसाईटनेही बराहा नावाचा युनिकोड मराठी फॉंट डाऊनलोडसाठी दिला. गुगल व रेडीफने इंटरनेटवर मराठी मेल लिहिण्याची सोय उपलब्ध केली. या पार्श्वभूमीवर ज्ञानदीपने माय मराठी डॉट ओआरजी या वेबसाईटचे युनिकोड मराठी फॉंटवर आधारित मायमराठीडॉटकॉम मध्ये रूपांतर करण्याचे ठरविले आणि एका महिन्याच्या अवधीत हे काम पूर्ण केले. आता डायनॅमिक श्रीलिपी फॉंट आणि युनिकोड मराठी फॉंटमध्ये माहिती वाचण्याचा पर्याय ज्ञानदीपने मराठी वाचकांना दिला आहे. तसेच वेबसाईटवर मराठी अभिप्राय देण्याची सुविधा निर्माण केली आहे.
जानेवारी २००७ मध्ये सांगलीत भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सर्व माहिती देणे तसेच त्यावेळेपर्यंत मायमराठीडॉटकॉम या वेबसाईटचा विस्तार करून मराठी लिहिण्या-वाचण्यास शिकण्याची सोय, महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीबरोबरच भौगोलिक, सामाजिक, आर्थिक या व अशा इतर क्षेत्रांतील माहितीचा समावेश करणे हा उद्देश ज्ञानदीपने बाळगला आहे. माहिती तंत्रज्ञान हे मराठी भाषेसाठी नवे वरदान आहे. त्याचा उपयोग करून म्रराठी भाषा व संस्कृती अधिक समृद्ध, बळकट व सर्वव्यापी करण्याची सुसंधी आपल्याला लाभलेली आहे. सर्वांच्या सक्रीय सहकार्याने यात यश येईल असा विश्वास वाटतो.

Tuesday, October 16, 2007

शिक्षणाचे माध्यम - मराठी का इंग्रजी

महाराष्ट्रात पहिलीपासून इंग्रजीचे शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे सारे जग एक झाले आहे. या स्पर्धेच्या युगात मराठी माणूस मागे पडू नये व नव्या आव्हानांना सामोरे जाणे नव्या पिढीला शक्य व्हावे या दृष्टीने सरकारने हा धाडसी निर्णय घेतला आहे. मुले नवी भाषा लगेच सहजपणे शिकू शकतात व लहानपणी शिकलेले चांगले लक्षात रहाते या गोष्टींचा विचार करता हा निर्णय योग्य आहे असे वाटते. कदाचित चौथीनंतर बरीच मुले शाळा सोडतात त्यासाठी त्यांनाही इंग्रजीची तोंडओळख असावी अशीही त्यामागे कल्पना असावी.

यावेळी हे लक्षात घ्यावयास हवे की या धोरणाचा दृश्य परिणाम दिसायला किमान पाच वर्षे वाट पहावी लागणार आहे. तसेच याचा आपल्या सांस्कृतिक जीवनावर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेणे जरूरीचे आहे. गरीब शेतमजूर, झोपडपट्टीत हलाखीत जीवन कंठणारे लोक आपली मुले ` पप्पा मम्मी ` म्हणतात आणि इंगजी गाणी गातात म्हणून निश्चितच खूष होतील पण मुलेच मानसिकदृष्ट्या त्यांचेपासून व इंग्रजी न जाणणाऱ्या इतर बालमित्रांपासून मानसिकद्दृष्ट्या दूर होण्याची भीती आहे.

आपण याआधीच परिसरविज्ञानासारख्या आवश्यक विषयांचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. मुलांवर अभ्यासाचा जास्त बोजा पडला तर त्याचाही दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे इंग्रजी शिक्षणाकडे जास्त लक्ष दिल्यास मुलांचे मराठी कच्चे राहण्याचा धोका जास्त जाणवतो. इंग्रजी माध्यमामध्ये शिकणाऱ्या मुलांना इतर विषय चटकन् समजत नाहीत व ती मुले बऱ्याच वेळा सामान्य ज्ञानात मागे पडतात असा अनुभव आहे. पुष्कळदा महत्वाकांक्षी गरीब पालक आपल्या पोटाला चिमटा काढून मुलांना इंग्रजी शाळेत घालतात. मात्र सधन व सुशिक्षित पालकांसारख्या सुविधा व लक्ष देऊ न शकल्याने त्यांच्या पदरी निराशा येते व मुलांनाही ते न पेलवणारे ओझे ठरते.

यामुळे इंग्रजीच्या हव्यासापायी मराठीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लोकांची बोली व्यवहाराची भाषा मराठीच राहणार असल्याने मराठी अधिक समृद्ध व सर्वसमावेशक करण्याची खरी गरज आहे. समाजाची इंग्रजीबाबत असणारी उदासीनता ही मागासलेपणाचे लक्षण न मानता त्यात व्यावहारिक अडचण आहे हे समजून घेतले पाहिजे.परक्या भाषेत शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना शक्य असले तरी सर्वसामान्य माणसास तशी इच्छा, सवड व क्षमताही नसते. त्यामुळे मातृभाषेत उपलब्ध असणाऱ्या ज्ञानावरच तो आपले काम भागवतो.

याउलट संगणक क्रांतीकडे पाठ फिरवूनही चालणार नाही. संगणकाचे फायदे त्वरीत मिळण्यासाठी तातडीने उपाय करणे आवश्क आहे यात शंका नाही. यासाठी इंग्रजी भाषेतील ज्ञान मराठीत आणण्याचा प्रयत्न संगणक तज्ञांनी करावयास हवा. सध्या संगणक क्षेत्रात समाजातील उच्चशिक्षित बुद्धीमान वर्ग प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यांना मराठीसाठी नव्या संगणक प्रणाली विकसित करणे सहज शक्य आहे.

मात्र मराठीबाबत त्यांचा दृष्टीकोन सहसा नकारात्मक असतो. मराठीतून काम करणे म्हणजे कमीपणाचे अशी त्यांची समजूत असते. मात्र आजच्या काळाची ती गरज आहे हे त्यांनी ओळखले पाहिजे. सध्या संगणक शिक्षणाचे सगळीकडे पेव फुटले आहे. गल्लोगल्ली निघालेल्या अशा शिक्षणसंस्थांत लाखो मुले, नोकरी मिळेल या आशेने महागडी फी भरून शिक्षण घेत आहेत. मात्र या सर्वांना देण्यासाठी आपल्याकडे नोकऱ्या नाहीत. नोकऱ्या देऊ शकणारे उद्योग परदेशी मालाच्या आक्रमणाने याआधीच आर्थिक मंदीत आहेत. अशावेळी मराठीतून संगणक प्रणाली विकसित करण्याचा व्यवसाय स्वयंरोजगार निर्मितीसाठी एक आशेचा किरण आहे.

मराठीस माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय दिल्याने मराठी की माहिती तंत्रज्ञान असा वाद मध्यंतरी निर्माण झाला होता. मात्र मराठीस माहिती तंत्रज्ञानाने नवी संजीवनी मिळाली आहे. संगणक आणि इंटरनेटद्वारे मराठी सर्वदूर पोहोचणे आणि मराठीतून सर्व व्यवहार करणे हे माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कधी नव्हे इतके सोपे झाले आहे. युनिकोड वा डायनॅमिक (स्वयंचलित) फॉंटचा वापर करुन इंटरनेटवरून मराठी साहित्य सर्व जगभर कोणासही उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे.

Monday, October 15, 2007

GREEN CITY


Today the growing cities are facing many problems either due to improper planning, lack of strict implementation of rules or paucity of funds to build infrastructural facilities leading the urban life to insecure, unhealthy and full of hardship. Every citizen thinks that some day his city would become livable, eco friendly and lovable. But his dreams seem to be fast disappearing. As engineers, architects and administrators can we do something which will convert that dream into concrete reality?
It is necessary that civic authorities of all municipalities to take part in this workshop and present their problems and methodology of solution they have adopted. As the topic deals with urban environment, experts from various fields like environment, town planning, architecture, engineering and finance need to contribute in tackling this complex problem. People action groups and NGOs should create pressure for speedy implementation of development plans and financial institutions should come forward to support them.

GREEN CITY PORTAL
A portal website www.greencityportal.com is launched by the foundation for focusing environmental issues in city planning and for promotion of architects and builders of green real estates. It would include all aspects of green city planning and assist civil administration in integrated environmental management. The website shall display advertisements of green products and technologies. Architects and builders can display their company profile and projects. It will also provide a platform for all concerned agencies to share articles, views and other information with experts, civic authorities and the general public.

Riddle of Family Tree Database

Design of effective and normalized database for family tree is a test for good designer. Though one family generations can be described and represented quite satisfactorily by sticking to family name ( surname in Indian context), it stops to explain and register linkages with other families at every node of marriage.

Though each person, he or she, has a father and mother, the relatives are spread in both families. In the Indian context there are variety of names for each relation and to prepare a complete database even for one person is complex. On the other had the basic relations are simple Father, Mother, Brothers, Sisters, Husband / Wife, Sons and Daughters which can be expressed in the form of as one to one or one to many relationships.

Family database could be plotted by interconnections with similar sets of each person in the family. Assigning relation names is a difficult task. Divorce, remarriages complicate the issue further.

Yet everybody wants to know about his ancestors, the family tree is understood by all, forms base of history, categorizes population in different groups. The perfect simple database design reducing redundancy is a challenge before those designing family histories and linkages for Indian matrimony software developers with display of complex relationships from database.

इंटरनेटवर कुलवृत्तांत


भारतीय कुटुंबव्यवस्था ही भारतीय समाजाचा मुख्य आधार आहे. वंशपरंपरा व नातेसंबंध यांची माहिती एकत्रितपणे सुसंगतपणे
मांडणे म्हणजे कुलवृत्तांत. अनेक वर्षे अथक प्रयत्न करून, निरनिराळया ठिकाणी राहणाऱ्या कुलबंधूंची अधिकृत माहिती जमा करणे, ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे वंशावळीचा व घराण्यांचा इतिहास लिहिण्याचे फार मोठे कार्य अनेकांनी केले आहे. आजच्या धकाधकीच्या युगात असे कार्य करणे अशक्यप्राय झाले आहे.

प्रत्येकाला आपल्या कुळाचा अभिमान असतो आपल्या पूर्वजांबद्दल आदरयुक्त प्रेम असते. कुलदैवतावर श्रद्धा असते. आपल्या
पूर्वजांचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा असते. घराण्यातील रीतीरिवाज, सणवार यांची माहिती पूर्वी एकत्र कुटूंबपद्धतीत
विनासायास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जायची. आता विभक्त कुटुंबपद्धतीमुळे, शिक्षण व नोकरीसाठी राहण्याचे स्थान
बदल्याने अशी माहिती मिळण्यास अडचणी येतात. कुलवृत्तांत ही सर्व माहिती असते. मात्र असे कुलवृत्तांत फारच थोड्या घराण्यात तयार झाले आहेत. आणि ते तयार झाल्यावर काळ लोटला की त्यातील माहितीने नूतनीकरण न झाल्याने त्याचा फक्त ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून उपयोग शिल्लक रहायचा.

सध्याच्या संगणक युगात वेबसाईटवरून नित्य नूतनीकरणाची सोय उपलब्ध असल्याने अद्ययावत कुलवृत्तांत केव्हाही कोणासही कोठेही पाहता येणे शक्य झाले आहे. या सुविधेचा वापर करताना फक्त आवश्यक तेवढ्याच माहितीचा कोश तयार झाला तर तो जास्त उपयुक्त ठरेल. नातेसंबंधांची माहिती उपयुक्त असली तरी त्याचा फारच थोड्या लोकांशी असल्याने तसेच त्यात अनेक प्रकारच्या माहितीचा व घराण्याचा संबंध येत असल्याने त्याचा समावेश करणे योग्य ठरणार नाही.

आतापर्यंत अनेक घराण्यांनी आपले कुलवृत्तांत तयार केले आहेत. मात्र सर्व जाती-धर्मांच्या लोकांत हे काम अजून झालेले नाही. कुलवृत्तांत डॉट कॉम ही वेबसाईट त्यासाठी तयार करण्यात आली असून रानडे डॉट कुलवृत्तांत डॉट कॉम हा विभाग सबडोमेन स्वरुपात नमुन्यादाखल तयार करण्यात येत आहे. या विभागात त्या घराण्याची तसेच मान्यवर कुलबंधूंची व्यवसायानुसार वर्गीकरण करून माहिती नाव, शिक्षण, व्यवसाय, गाव, फोन, इ-मेल इ. माहिती देता येईल. आमच्या मते कुलवृत्तांतात खालील माहिती असावी -
कुलदैवत, कुळाचार, संक्षिप्त इतिहास, मान्यवर कुलबंधूंची व्यवसायानुसार वर्गीकरण करून माहिती नाव, शिक्षण, व्यवसाय, गाव, फोन, इ-मेल.


युनिकोड मराठीचा वापर केल्यास फ्लॅश वा डायनॅमिक फॉंट न वापरता मराठीतून आपली माहिती लिहिणे आता शक्य असल्याने कुलवृत्तांत आता मराठीत लिहिता येईल. पुरेसा प्रतिसाद मिळाला तर या वेबसाईटवर इतर अनेक सुविधा निर्माण केल्या जातील. उदा. व्यवसाय जाहिरात व मार्गदर्शन, वधू-वर मंच इ.

माहिती अधिकृत होण्यासाठी तसेच त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून लॉग-इन व्यवस्था तयार करून त्याचे संचालन प्रत्येक घराण्याच्या प्रायोजकाकडे दिले जाईल. आपल्याकडून यास योग्य प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. ही वेबसाईट अधिक उपयुक्त ठरण्यासाठी आपल्या काही सूचना असल्यास त्या जरूर कळवाव्यात. तसेच आपल्या घराण्यासाठी स्वतंत्र विभाग करावयाचा असल्यास इच्छुक प्रायोजकांनी ज्ञानदीपशी संपर्क साधावा. ही विनंती.

Saturday, October 13, 2007

वर्ल्ड पेंटर्स डॉट नेट

साहित्याप्रमाणेच कला हा माणसाच्या सृजनशीलतेचा एक सुंदर आविष्कार आहे. जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या कलेचे उपासक एखाद्या व्रतस्थासारखे कलानिर्मितीत व्यग्र असतात. चित्रकला ही अशीच एक कला आहे. भारतात प्राचीन काळापासून चित्रकलेला फार महत्व दिले गेले होते. आजही भारताच्या कानाकोपऱ्यात असंख्य चित्रकार आहेत. मात्र त्यांच्या कलेला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळू शकत नाही.

विज्ञानाच्या प्रगतीमुळे चित्रांच्या प्रतिकृती करण्याचे तंत्र सर्वसामान्यांच्या हाती आले आहे. त्यामुळे चित्रकला हा व्यवसाय हळूहळू लोप पावत आहे. मात्र याचवेळी भारतातील काही मोजक्याच चित्रकारांची चित्रे लाखो नव्हे; तर कित्येक कोटी रुपयांना विकली जात आहेत. प्रसिद्धीमाध्यमांची जोड मिळाल्यामुळेच हे शक्य झाले आहे. इतर सर्व चित्रकारांना त्याच्या कलेच्या प्रदर्शनासाठी जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वर्ल्ड पेंटर्स डॉट नेट ही वेबसाईट तयार केली आहे.

कोणतेही मोठे चित्र काढण्यासाठी बराच खर्च येतो. चित्र काढण्याच्या माध्यमामध्ये आता अनेक नवीन प्रकार रूढ झाले आहेत. पेन्सिल स्केचिंग, पावडर शेडिंग, वॉटर कलर (जलरंग), ऑईल पेंट, नाईफ पेंटिंग, कोलाज (कागदाचे तुकडे जोडून केलेले चित्र) इत्यादी.

पूर्वी निसर्गाचे वा व्यक्तीचे दिसते तसे हुबेहूब चित्र काढण्याला फार महत्व दिले जाई. निसर्गाच्या रंगातील सूक्ष्म छटा, छाया-प्रकाशामुळे त्यांच्यात होणारे फरक, तलम वस्त्रामागील शरीराचे यथायोग्य दर्शन, दिव्याच्या प्रकाशाचा भोवतालच्या वस्तूंवर होणारा परिणाम, हलत्या वस्तूतील गतिमानता, डोळयातील चमक, चेहऱ्यावरील भाव दाखविण्यात चित्रकाराचे कसब पणाला लागते. फोटोग्राफीच्या तंत्रामुळे या कलाप्रकाराला मोठ्ठा धक्का बसला. फोटोत निसर्गाचे वा व्यक्तीचे हुबेहूब चित्र विनासायास निघत असल्याने व आधुनिक तंत्राचा वापर करून त्यात छाया-प्रकाशांचा प्रभाव दाखविता येत असल्याने हुबेहूब चित्रांची गरज कमी झाली. पूर्वी सधन लोक चित्रकारांकडून आपली चित्रे काढून घेत व त्यावर चित्रकारांचा उदरनिर्वाह चाले.

जाहिरातीसाठी चित्रे काढणे या व्यवसायाचा चित्रकारांना बराच काळ आधार होता. सिनेमा पोस्टर्स व मोठ्या जाहिराती, मासिकातील चित्रे काढणे, भेटकार्डे तयार करणे हे बऱ्याच चित्रकारांचे व्यवसायाचे मुख्य साधन होते. आता सिनेमा पोस्टर्स वा बॅनर जाहिराती डिजिटल पोस्टर स्वरूपात अगदी कमी खर्चात व थोड्या वेळात तयार करता येतात. मासिकातील चित्रेही संगणकावर कोणासही सहज तयार करता येतात. साहजिकच ही कला केवळ काही प्रायोजक व्यक्ती वा संस्था यांच्या सहकार्यावर तग धरून आहे.

मुंबई, बंगलोरसारख्या मोठ्या शहरात असणाऱ्या कलादालनात प्रदर्शन भरविल्यास मोठ्या कंपन्यांकडून अशी चित्रे विकत घेतली जातात. मध्यंतरी कोल्हापूरच्या शेलार या चित्रकाराची लाखांची चित्रे विकली गेली. चित्रकला ही सर्वांनाच आवडणारी कला असल्याने चित्रकला शिकविण्याचे कामही तितकेच महत्वाचे आहे. सांगलीतील श्री. पतंगे या पावडरशेडिंगमधील तज्ञ चित्रकाराने आर्ट सर्कल स्थापून ही कला शिकविण्याचे कार्य सुरू केले आहे व त्यास प्रतिसादही चांगला मिळत आहे.

वडगावचे नाईकवडी यांच्या चित्रांना मुंबई प्रदर्शनात मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांचे एक चित्र ५०००० रुपयांना विकले गेले. बी.बी.सी.ने त्यांच्या चित्रकलेविषयी एक डॉक्युमेंटरी तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी श्री. नाईकवडी यांचे स्टुडिओमध्ये चित्र काढतानाचे शूटिंग केले आहे.

Monday, October 8, 2007

इंटरनेट

प्रस्तावना :-

आजच्या युगात टेलिफोनचे महत्व अनन्यसाधारण आहे. पण त्यालाही मागे टाकण्याची किमया 'इंटरनेट` करीत आहे. नजिकच्या भविष्यकाळात इंटरनेट सर्वदूर पसरल्यानंतर संदेशवहनाचे तसेच इतर सर्व माहितीच्या देवाणघेवाणाचे ते एक महत्वाचे व कमी खर्चाचे साधन ठरणार आहे.

हे 'इंटरनेट` म्हणजे आहे तरी काय? तर संगणकाव्दारे संदेशवहन. आज संगणकाने सर्व क्षेत्रात व घराघरात प्रवेश मिळविला आहे. शब्द, चित्र वा संगीत कोणत्याही प्रकारची माहिती संगणक साठवून ठेवू शकतो. त्यावर पाहिजे ते संस्कार करू शकतो. एखाद्या ऑफिसात अनेक संगणक असल्यास ते एकमेकांना जोडून त्यांचे जाळे वा 'नेट` तयार केलेले असते. त्यामुळे हे संगणक एकमेकांत संवाद साधू शकतात. जगभरातील अशी सर्व जाळी वा नेट एकमेकांशी जोडली की होते 'इंटरनेट`

इतिहास :-

१९६९ साली इंटरनेटच्या कल्पनेचा जन्म झाला. अमेरिकन लष्कराने इंटरनेटच्या पायाभूत ठरणारे आर्पानेट नांवाचे नेटवर्क वापरात आणले. अमेरिकेला अशी भीती वाटे की संदेशवहनाचे मुख्य केंद्र जर रशियाने बॉम्ब टाकून नष्ट केले तर काय होणार? या भीतीपोटी त्यांनी चार केंद्रे स्थापून ती एकमेकांना जोडली. हेतू हा की कोणतेही केंद्र नष्ट झाले तरी बाकीची तीन केंद्रे काम करू शकतील. हेच आर्पानेट. युध्द संपल्यानंतर अमेरिकेतील विद्यापीठांना अशा नेटवर्कचा उपयोग करण्याची मुभा देण्यात आली व आर्पानेटचा विस्तार झाला. नवीन संशोधन व माहितीची देवाणघेवाण या कामासाठी वापर सुरू झाल्यानंतर सर्व क्षेत्रातील लोकांचे याकडे लक्ष वेधले गेले आणि 'इंटरनेट` चा खऱ्या अर्थाने उपयोग सुरू झाला. १९६९ मध्ये ४ केंद्रे असणारे हे नेटवर्क १९९५ मध्ये ५० लाख केंद्रे असणाऱ्या नेटवर्कमध्ये रूपांतरीत झाले. आता इंटरनेटमध्ये लक्षावधी नेटवर्क असून आता ५० टक्के नेटवर्क अमेरिकेबाहेर इतर देशात आहेत. इंटरनेटमुळे जग खऱ्या अर्थाने जवळ आले आहे.

इरनेट (ernet) :-

भारतात एज्युकेशन (e) आणि रिसर्च (r) यासाठी इरनेट १९८८ पासून कार्य करीत आहे. भारतातील सर्व आय.आय.टी., संशोधन संस्था व विज्ञान संस्था या इरनेटने एकमेकांशी जोडल्या गेल्या असून हे नेटवर्क अमेरिकेतील युयुनेटला जोडण्यात आले आहे. इरनेटचा उपयोग फक्त शिक्षण व संशोधन संस्थांना करता येतो.

व्ही.एस.एन.एल. (विदेश संचार निगम लि.) ने १९९४ मध्ये इंटरनेटसाठी निविदा मागविल्या. टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटने परदेशी निविदा रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना त्यात यश आले नाही. `कॉम्प्युसर्व्ह' नावावर अमेरिकेतील एका कंपनीने इंटरनेटची सेवा देणे सुरू केले. आता भारतातील कोणालाही जागतिक इंटरनेटचा वापर करणे शक्य होऊ लागले आहे. व्ही.एस.एन.एल.ने स्वतंत्रपणे अशी सेवा (इंटरनेट अक्सेस सर्व्हीस) देणे सुरू केले.
व्ही.एस.एन.एल.चे मुख्य केंद्र मुंबई असून दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बंगलोर व पुणे ही भारतातील शहरे अमेरिकेतील इंटरनेटला जोडण्यात आली आहेत. इतरही शहरे हळुहळु या नेटवर्कला जोडली जाणार आहेत.

वापर पध्दती :-

इंटरनेटचा उपयोग करण्यासाठी संगणक, फोन याशिवाय त्या दोघांना जोडणारे मॉडेम नांवाचे उपकरण लागते. मॉडेमची क्षमता बॉड रेटमध्ये (बिट्स पर सेकंद) म्हणजे एका सेकंदात माहितीचे कण वहन करण्याची क्षमता यात दर्शविली जाते. जास्त बॉडचे उपकरण घेणे भविष्यातील प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक आहे.

इंटरनेट वरून तुम्हाला समजा माहिती पाठवायची असेल तर जेथे ती पाठवायची त्याचा सांकेतिक क्रमांक देऊन ती पाठवावी लागते. ही माहिती जशीच्या तशी न जाता आधी त्याचे छोट्या भागांत (पॅकेज) रूपांतर केले जाते हे भाग कमी जास्त लांबीचे असू शकतात. हे भाग रूटर नावाच्या विशिष्ट संगणकाव्दारे एका नेट वरून दुसऱ्या नेटवर असे करत योग्य पत्त्यावर पाठविले जातात. (जणू काही वेगवेगळया बॅगांमधून पाठविलेले सामान) ज्या ज्या ठिकाणाहून भाग घेतले वा पाठविले जातात तेथे अनेक मार्गांनी माहितीची पाकिटे येत असतात. ज्या ठिकाणी जायचे त्यासाठी देखील अनेक मार्ग उपलब्ध असतात. त्यामुळे कोणत्या मार्गावर रहदारी कमी आहे व वेळ कमी लागेल याचा विचार करून प्रत्येक पॅकेज पाठविले जाते. हे सर्व अतिशय वेगात चालत असल्याने वेगवेगळया मार्गाने प्रवास करूनही हे भाग अत्यल्प वेळात मुक्कामी पोचतात. त्याचवेळी इतर ठिकाणहून माहिती येत असल्यास त्याचा क्रम लावला जातो. व पोस्ट बॉक्ससारखी त्या संगणाकावर सर्व माहिती साठवून ठेवली जाते. म्हणजे रोज कामाला सुरूवात करण्यापूर्वी कोणाकोणाची पत्रे आली आहेत ते ही पोस्ट बॉक्स उघडून पाहता येते. ज्या ठिाकणी माहिती जावयाची तेथे दुसरे काम चालू असल्यास मध्येच तातडीची खिडकी पडद्यावर येऊन माहिती आल्याची

सूचनाही दिली जाऊ शकते.

इंटरनेट व फॅक्स :-

इंटरनेटवरील इ मेल (इलेक्ट्नॅनिक मेल) आणि फॅक्स यांची तुलना केली. फॅकस कमी वेळात नियोजित स्थळी पाठविता येतो. इ मेल नेटवर्कवरील रहदारीवर अवलंबून असल्याने त्यास वेळ लागू शकतो. मात्र फॅक्ससाठी बराच खर्च येतो. एक पान माहितीसाठी भारतातल्या ठिकाणी १० रूपये तर अमेरिकेतील ठिकाणी त्यापेक्षा कितीतरी अधिक खर्च येतो. इ मेलसाठी फक्त फोनचा खर्च येत असल्याने तो नाममात्र असतो. फॅक्स ज्याला पाठवायचा त्यालाच तो मिळाला का दुसऱ्याने घेतला व फॅक्सचे ुत्तर त्याने परत फॅक्स केला तरच मिळू शकते. इ मेल मात्र योग्य त्या माणसाच्या सांकेतिक क्रमांकावर जात असल्याने त्याच्याशिवाय दुसऱ्याला मिळत नाही. तो मिळाला की नाही ते लगेच कळू शकते व थोड्याच वेळात त्याचे उत्तरही आपल्या संगणकावर मिळू शकते. आपण फॅक्स पाठविणार पाठविणार तो बाहेरगावी गेला असेल वा प्रवासात असेल तर त्याला फॅक्स मिळू ाकत नाही. इ मेलमध्ये पत्ता म्हणजे एक सांकेतिक क्रमांक असल्याने तो कोठेही असला व त्याने कोणत्याही संगणकावर काम सुरू केले की इंटरनेटव्दारा त्याचा शोध घेतला जाऊन त्याला तो निरोप पोहोचू शकतो.

इ मेल :-

इंटरनेटवरून पाठविलेल्या माहितीवर गुप्तता ठेवणे कठीण असते. पुष्कळ वेळा इ मेलवरील माहितीवर नजर ठेवली जाते. अर्थात इंटरदेटवरून माहितीच्या देवाणघेवाणीचे प्रमाण एवढे प्रचंड आहे की असे लक्ष ठेवणे वा माहिती विना परवाना वापरणे या गोष्टी कठीण आहेत. तरीही खाजगी कंपन्याना इंटरनेटव्दारे आपली माहिती बाहेर फुटण्याचा धोका वाटतो. यासाठी त्यांच्याकडे संरक्षक व्यवस्था ठेवणारे प्रोग्रॅम (फायरवॉल सारखे) वापरले जातात. पुष्कळ कंपन्या सर्व माहिती विशिष्ट सांकेतिक पध्दतीने बदलून इंटरनेटवर सोडतात. ज्यांना ती सांकेतिक लिपी माहीत असेल त्यांनाच त्याची उकल होऊ शकते. संरक्षण, गुन्हा अन्वेषण, संशोधन संस्था अशाप्रकारे इंटरनेटवरून माहितीची देवाणघेवाण करतात.

इंटरनेटवरील काही माहिती प्रचार वा प्रसारासाठीच असते. बातम्या, राजकीय पक्षांचे जाहीरनामे, कंपन्यांच्या जाहिराती, वस्तूंच्या किंमती, देखभाल व दुरूस्ती, शिक्षण. ग्राहक सेवा, पर्यावरण संरक्षण इत्यादी अनेक प्रकारची माहिती कोणासही सहजपणे विनामूल्य मिळेल अशी व्यवस्था इंटरनेटवर करण्यात आलेली असल्याने शिक्षण, व्यापार, संस्कृती, राजकारण यांच्या प्रसारास 'इंटरनेट ` हे महत्वाचे साधन झाले आहे. शिवाय इंटरनेट ही कोणा एकाची मालमत्ता नाही. जो कोणी इंटरनेटशी आपला संगणक जोडेल त्याचा तो हक्कदार होतो.

इंटरनेटवर खालील सेवा पुरविल्या जातात :-

१) इ मेल - माहितीची देवाण घेवाण- जगभरच्या मित्रांशी, सहकाऱ्यांशी वा नातेवाईकांशी आपण संपर्क ठेवू शकतो.
२) जगातील कोणत्याही संगणकावर आपणास काम करता येते व तेथे आपले प्रोग्रॅम चालवून पहाता येतात.
३) आपल्या संशोधन प्रबंधासाठी वा व्यापार उद्योगासाठी आपण इंटरनेटचा उपयोग करून घेऊ शकता.
४) जगातील वृत्तपत्रे, मासिके, लायब्ररीतील पुस्तके, म्युझियम, संगीत यांचा लाभ मिळू शकतो.
५) करमणुकीसाठी नवीन साधने उपलब्ध होतात.

जगभर असणारी व विखुरलेली माहिती व बुध्दीमत्ता यांचे अतिवेगात दळणवळण झाले तर प्रगतीचा वेग कितीतरी पटीने वाढू शकेल. इंटरनेटच्या प्रसारामुळे ही शक्यता आता दृष्टीपथात आली आहे. आतापर्यंत एका देशातील बुध्दीमत्ता तेथील इतर परिस्थिती योग्य नसल्याने त्या देशास वापरता येत नव्हती. त्यामुळे बुध्दीमान लोक प्रगत राष्ट्नत जाऊन बुध्दीमत्तेच्या साठ्यास गळती लागून (ब्रेन ड्न्ेन) प्रगतशील राष्ट्नना नव्या धोक्याला सामोरे जावे लागत होते.

इंटरनेटच्या वापरामुळे बुध्दीमान व्यक्तीना आता प्रगत राष्ट्नत न जाता तेथील प्रगतीचा उपयोग करणे शक्य झाले आहे. व्यापाराच्या दृष्टीने इंटरनेटमुळे दुहेरी परिणाम होणार आहे. जागतिक व्यापरपेठ इंटरनेटमुले खुली झाल्याने आपला माल सर्व जगभर पाठविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी स्थानिक उद्योजकांना बहुराष्ट्नीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागल्याने ते अडचणीत येऊ शकतील. पर्यावरण क्षेत्रामध्ये इंटरनेट फार उपयुक्त ठरणार आहे. नवनवी घातक द्रव्ये, त्याचा वापर, पर्यावरणाचे संरक्षणाचे उपाय याविषयी त्वरीत माहिती मिळण्याची शक्यता इंटरनेटने निर्माण केली आहे.

थोडक्यात इंटरनेट रूपाने मानवाने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले असून ते उज्वल भविष्याकडे नेईल अशी आशा आहे. इंटरनेटचा एक दोष म्हणजे त्यात माहितीचा असणारा न पेलवणारा साठा माहितीच्या समुद्रातून आपल्याला हवी ती माहिती मिळविणे ही एक मोठी मुश्किल गोष्ट आहे. अर्थात यासाठी विविध प्रकारचे शोधक प्रोग्रॅम (ब्राऊझर) बनविण्यात आले असून त्यांच्या साहाय्याने आवश्यक त्या माहितीचा शोध घेता येऊ शकतो. टेलनेट नावाचा प्रोग्रॅम वापरून आपल्याला दुसऱ्या नेटवर्कमध्ये प्रवेश मिळविता येतो. म्हणजे टेलनेट वापरल्यावर दुसरे नेटवर्क आपल्या नेटवर्कसारखे सहजसाध्य होते. सर्वांसाठी खुली असणारी माहिती उदाहरणार्थ जाहिराती वा बातम्या दाखविण्यासाठी बुलेटीन बोर्ड वापरतात. या बुलेटीन बोर्डवरील माहिती वाचण्यासाठी युजनेट हा प्रोग्रॅम वापरतात.

बी.बी.एस्. (बुलेटीन बोर्ड सिस्टीम) कंपन्या माहिती साठवून ठेवणे व वितरीत करणे या पध्दतीने काम करतात. या ठिकाणी आपण केव्हाही माहिती पाठवूश शकतो. घेणाऱ्याचा संगणक चालू नसला तरी अशा कंपन्यांच्या सहाय्याने ही माहिती पाठविता येते.

वर्ल्ड वाइड वेब (www) या सर्वांना वाचता येऊ शकेल असे पान (साईट) अनेक कारणांसाठी कंपन्या तयार करतात. त्यांना एक विशिष्ट संकेतक्रमांक मिळतो. यालाच संकेतस्थळाच्या नावाने ओळखता येते. छोट्या कंपन्या अशा पानाचा छोटा हिस्साही आरक्षित करू शकतात. या पानावर वर्णनात्मक वा चित्रमय माहिती असते. वर्णनात्मक माहितीतून आवश्यक ते शब्द पकडून वाचकास त्या शब्दाच्या अनुषंगाने अधिक माहिती मिळू शकते. अशा वर्णनाला हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज (HTML) असे म्हणतात.

गोफर या नावाच्या प्रोग्रॅम मध्ये आपल्याला विविध पर्यायातून निवड करावी लागते. (मेनू कार्ड) व अशाप्रकारे नवनवीन तक्यामधून योग्य पर्याय निवडत इच्छित स्थळी जाता येते.

इंटरनेटवर वेगवेगळया प्रकारचे संगणक जोडले जाण्याची किमया व त्यात संपर्क साधण्याची शक्यता टी.सी.पी./आय.पी. (ट्नन्स्मिशन कंट्नेल प्रोटोकोल/इंटरनेट प्रोटोकोल या नियम प्रणालींचा वापर केल्याने प्रत्यक्षात आली आहे. इंटरनेटचा प्रसार होत असताना या क्षेत्रातही नवनव्या सुधारणा होत आहेत. त्यामुळे भविष्यात इंटरनेटचा प्रसार होत असताना या क्षेत्रातही नवनव्या सुधारणा होत आहेत. त्यामुळे भविष्यात इंटरनेटचा वापर अधिक सुलभ व प्रभावीपणे करता येणार आहे.

इ मेल हा इंटरनेटचा प्राथमिक उद्देश वाटला तरी प्रत्यक्षात वापर करमणुकीसाठी खेळ, चित्रपट आणि संगीत यांच्या आदान प्रदानासाठी जास्त होत आहे.इंटरनेटचा शिक्षणासाठी उपयोग हा आपल्या भारतासारख्या प्रगतशील राष्ट्नंना एक वरदान आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. विविध क्षेत्रात होणारे संशोधन येथील संशोधनाला अधिक प्रेरणा देऊ शकेल. आरोग्याच्या क्षेत्रातही इंटरनेटचा वापर भविष्यकाळात फार प्रभावीपणे होऊ शकेल.

Wednesday, October 3, 2007

लिंक बदल

स्वप्न हरित नगरीचे, भविष्यातील वाहतुक समस्या आणि घन कचरा व्यवस्थापन या लेखांसाठी ग्रीनसिटीपोर्टल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या.