Wednesday, October 17, 2007

माय मराठी


मानवी जीवनाचा साहित्य व संस्कृती हा महत्वाचा वारसा आहे व भाषा त्यासाठी अत्यावश्यक माध्यम आहे. महाराष्ट्रीयनांसाठी तर मराठी भाषा ही जीवापाड जपण्यासारखी गोष्ट आहे. महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी लोकांना यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. भोवतालची परिस्थिती व नेहमीच्या व्यवहारासाठी लागणारी स्थानिक भाषा यामुळे यात अनेक अडचणी येतात. आपल्या पुढील पिढ्यांमध्ये मराठी भाषा व संस्कृती टिकून रहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र मुलांना मराठी शिकविण्यासाठी वेळ मिळत नाही. मराठी शाळा, पुस्तके वा शिक्षक नसतात. मराठी मासिके व पुस्तकेही मिळत नाहीत. घरातही मराठीऎवजी दुसरी भाषा वापरण्याची सवय लागते व हळू हळू मराठीपासून मुले दूर होऊ लागतात. त्यांचा मराठी संस्कृतीशी असणारा संपर्क तुटत जातो. पालकांनी मराठी बोलण्याचा कटक्ष ठेवला तर मुलांना मराठी समजते थोडे बोलताही येऊ लागते. मात्र वाचणे वा लिहिणे यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. अशा मुलांसाठी प्रभावी दृकश्राव्य माध्यमाची गरज आहे. परप्रांतांत वा परदेशात स्थायिक झालेल्या आपल्या मुलांकडे जाणाऱ्या व नेहमी मराठी मासिके व पुस्तके वाचणाऱ्या मराठी मंडळींना मोजक्या मराठी वृत्तपत्रांचे अंक इंटरनेटवर वाचून त्यावर समाधान मानावे लागते. वेबसाईट हे माध्यम साहित्य प्रसार व उपलब्धतेसाठी वापरणे हा यावर उपाय ठरू शकतो. महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी लोकांची ही गरज भागविण्याच्या हेतूने माय मराठी वेबसाईटची कल्पना सुचली.
याच अनुषंगाने पुण्यात भरलेल्या ७५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माय मराठी डॉट ओआरजी या वेबसाईटद्वारे अभिजात मराठी साहित्याची ओळख करुन देण्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प ज्ञानदीपने हाती घेतला. पुढे साहित्याबरोबरच मराठी रीतीरिवाज, सण, परंपरा तसेच महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळे यांच्याही माहितीचा यात समावेश करण्यात आला. इंटरनेटवर मराठी लिहिता यावे यासाठी प्रथम शिवाजी हा फॉंट, नंतर सीडॅकचा योगेश, मोड्युलरचा श्रीलिपी फॉंट वापरून वेबसाईट तयार करण्यात आली. मात्र वाचकांना मराठी फॉंट आपल्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करावा लागे. डायनॅमिक श्रीलिपी फॉंट मिळाल्यावर ही वेबसाईट सर्वांना विनासायास पाहणे शक्य झाले. मात्र तरीही गुगलसारख्या शोधयंत्रास ही मराठी अक्षरे समजत नसल्याने या वेब साईटची माहिती सर्व मराठी बांधवांपर्यंत पोहोचू शकत नव्हती.
अगदी अलिकडच्या काळांत मायक्रोसॉफ्टने आपल्या विंडोज आणि इंटरनेट एक्स्प्लोअरमध्ये युनिकोड मराठी फॉंट वाचण्याची सोय उपलब्ध केली. युनिकोड मराठी फॉंट वापरून नव्या वेबसाईटही इंटरनेटवर आल्या. ओंकार जोशी यांनी गमभन नावाचा ब्राउजरमध्ये मराठी लिहिण्याचा प्रोग्राम विकसित केला व सर्वांना मोफत ऊपलब्ध करून दिला. बराहा डॉट कॉम या वेबसाईटनेही बराहा नावाचा युनिकोड मराठी फॉंट डाऊनलोडसाठी दिला. गुगल व रेडीफने इंटरनेटवर मराठी मेल लिहिण्याची सोय उपलब्ध केली. या पार्श्वभूमीवर ज्ञानदीपने माय मराठी डॉट ओआरजी या वेबसाईटचे युनिकोड मराठी फॉंटवर आधारित मायमराठीडॉटकॉम मध्ये रूपांतर करण्याचे ठरविले आणि एका महिन्याच्या अवधीत हे काम पूर्ण केले. आता डायनॅमिक श्रीलिपी फॉंट आणि युनिकोड मराठी फॉंटमध्ये माहिती वाचण्याचा पर्याय ज्ञानदीपने मराठी वाचकांना दिला आहे. तसेच वेबसाईटवर मराठी अभिप्राय देण्याची सुविधा निर्माण केली आहे.
जानेवारी २००७ मध्ये सांगलीत भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सर्व माहिती देणे तसेच त्यावेळेपर्यंत मायमराठीडॉटकॉम या वेबसाईटचा विस्तार करून मराठी लिहिण्या-वाचण्यास शिकण्याची सोय, महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीबरोबरच भौगोलिक, सामाजिक, आर्थिक या व अशा इतर क्षेत्रांतील माहितीचा समावेश करणे हा उद्देश ज्ञानदीपने बाळगला आहे. माहिती तंत्रज्ञान हे मराठी भाषेसाठी नवे वरदान आहे. त्याचा उपयोग करून म्रराठी भाषा व संस्कृती अधिक समृद्ध, बळकट व सर्वव्यापी करण्याची सुसंधी आपल्याला लाभलेली आहे. सर्वांच्या सक्रीय सहकार्याने यात यश येईल असा विश्वास वाटतो.

1 comment:

  1. uttam upakram. Mymarathi site pahili, surekh aahe. Unicode fonts mule vachata yete, parantu jyanchya computer var he fonts nahit tyanna engrajitoon tya panavar margadarshan kele (Can't see the Marathi fonts? ya sheershakachi hyperlink deun) tar anek lok ya site la bhet deu shakatil.

    Bhavishyatil yojanansathi mana:poorvak shubhechchha.

    ReplyDelete