Tuesday, November 7, 2023

शालेय स्तरावर मराठीतून वेबसाईट डिझाईन

 ज्ञानदीपने मराठीतून वेबसाईट डिझाईन शिकविण्याचे जाहीर केल्यानंतर अनेकांना हा प्रसिद्धी स्टंट वाटला. अमेरिकेतील माझ्या माहितीच्या काही लोकांनी  वेबसाईट डिझाईन आता कालबाह्य तंत्रज्ञान झाले असून फेसबुक, व्हॉट्सएप, गुगलसारख्या सर्वव्यापी आणि सोप्या प्रसारमाध्यमांचा उपयोग आपल्या शिक्षण, व्यवसाय वा छंद जोपासण्यासाठी करणे जास्त उपयुक्त आहे असे मत व्यक्त केले. शिवाय वेबडिझाईनसाठी  अनेक नो-कोड किंवा ड्रॅग-ड्रॉप सुविधा नेटवर उपलब्ध असल्याचे निदर्शनास आणून दिले.

मात्र या सुविधा वापरत असताना वेबसाईट म्हणजे काय, तिचे कार्य कसे चालते याची माहिती न झाल्याने एक प्रकारचे परावलंबित्व येते. तसेच या प्रसारमाध्यमांचे तंत्रज्ञान एक अवघड आणि अनाकलनीय असून आपल्याला त्यात काही काम करणे अशक्य  आहे असा ग्रह होतो.

वेबडिझाईन हे तंत्रज्ञान आता शालेय विद्यार्थीही मराठीतून सहज शिकू शकतो. या माहितीचा उपयोग करून त्याला हवी तशी वेबसाईट तयार करता येते आणि आपले विचार इंटरनेटवर प्रसिद्ध करता येतात. आतापर्यंत गृहपाठात लिहिले जाणारे लेख, कविता वा गोष्टी  विद्यार्थ्यांना नेटवर प्रसिद्ध करता आल्या तर त्याना जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळू शकते. शिवाय गुगल ट्रान्स्लेटद्वारे भाषांतर होऊ शकत असल्याने त्याचा लाभ इतर भाषा येणा-या विद्यार्थ्यांनाही होऊ शकतो.

यासाठी वेबडिझाईनची प्राथमिक सर्व माहिती व्हिडिओ, मराठीतून लेख आणि प्रत्यक्ष संवाद या माध्यमातून  देऊन त्यांना या तंत्रज्ञानाविषयी वाटणारी भीती दूर करून एक आत्मविश्वास निर्माण करण्याचा ज्ञानदीप प्रयत्न करणार आहे.  शिवाय मराठी भाषेचा वापर करणे आपल्या परिसर व निसर्गसंवर्धनाची माहिती  सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविण्यासाठी याचा  उपयोग ङोईल व  एकूणच आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची माहिती  सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे शक्य होईल असे ज्ञानदीपला वाटते.

तरी या ज्ञानदीपच्या अभिनव प्रयोगाचे विद्यार्थी व महाराष्ट्रातील जनता  स्वागत करेल व  इंग्रजीचा वरचष्मा मोडून काढून  माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मराठीला आपले मानाचे स्थान मिळू शकेल अशी मला आशा आहे.

No comments:

Post a Comment