Thursday, December 17, 2020

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे अलौकिक कार्य

 महाराष्ट्रातील ग्रामीण भागात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा कॉलेजचे जाळे विणून सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना श्रमाधारित शिक्षण देण्याचे अलोकिक कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले.


बालपणी  ( १९४३ ते १९६१) सातारला त्यांच्या घराशेजारी रहात असल्याने आणि शिवाजी कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यामुळे मला त्यांच्या कार्याची जवळून माहिती आहे.

सातारला सोमवार पेठेत पंचपाळ्या हौदाजवळच्या फणसळकरांच्या कॉलनीत आम्ही रहात होतो. रोज सकाळी आणि संध्याकाळी पांढ-या शुभ्र दाढी असणारे भारदस्त भाऊराव हातात सोटासदृश काठी घेऊन जातायेताना दृष्टीस पडत व त्यांचेबद्दल आदरयुक्त भीती वाटे.


इयत्ता चोथीत असताना धनिणीच्या बागेत एका कार्यक्रमात मी झंप्याचे लग्न ही विनोदी नाट्यछटा त्यांच्या समोर सादर केली होती. तो प्रसंग अजूनही माझ्या मनात ताजा आहे. तसा माझा पेहरावही त्यावेळी झंप्यासारखाच बावळट होता.
 
मी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होतो आणि नरेंद्र दाभोळकर माझ्याच वर्गात पण दुस-या तुकडीत होता. कबड्डी खेळण्यात तो नावाजलेला होता. मला खेळता येत नसले तरी  शिवाजी उदय मंडळात त्याचे कबड्डीचे सामने पहायला मित्रांबरोबर मी जात असे. तेथे भाऊरावही येत आणि मार्गदर्शन करीत.   प्रतिस्पर्धी खेळाडूच्या अंगावरून उंच उडी मारून तो खेळाडूंना बाद करीत असे.  भाऊरावांचा नरेंद्रवर फार लोभ होता. त्याचे वडील कॉलेजमध्ये प्राध्यापक होते.

दहावी झाल्यानंतर शिवाजी कॉलेजमध्ये अकरावी आणि प्रीडिग्री शिकताना प्राचार्य पी. जी. पाटील, अकिवाटे व नसिराबादकर  यांचेकडून भाऊरावांच्या कार्याविषयी बरीच माहिती कळत असे. ते भाषणांतून ब्राह्मण समाजाच्या दोषांवर कडाडून टीका करायचे त्यामुळे  घरात आणि आमच्या नातेवाईकांमध्ये भाऊरावांबद्दल चांगले मत नव्हते. एकदा त्यांनी ब्राह्मणांच्या बायका मराठ्यांच्या घरी भांडी घासायला आल्या पाहिजेत असे सांगितले तेव्हा सातारच्या ब्राम्हण वर्गात संतापाची लाट उसळली. मलाही त्यावेळी त्यांचे भाषण प्रक्षोभक वाटले होते. आता मात्र त्यांचे विचार पटतात ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वाच्या अहंभावनेमुळे अजूनही दुसर्या घरी भांडी घासण्याचे काम आम्हा ब्राह्मणांना कमीपणाचे वाटते.

१९६० साली भाऊरावांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शिवाजी कॉलेजमध्ये मोठी सभा होणार होती. त्यावेळी आपण भाऊरावांच्या कार्याबद्दल भाषण करायचे असे मी आणि माझा जिवलग मित्र कै. भालचंद्र करंदीकर  याने ठरविले होते. प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाल्यावर प्राचार्यानी विद्यार्थ्यांपैकी कोणाला बोलायचे आहे का अशी विचारणा केली. मोठ्या भरगच्च हॉलमध्ये मी आणि भालू आम्ही दोघांनीच हात वर केले. आमची भाषणे झाल्यावर प्राचार्य पी. जी. पाटील यांनी ब्राह्मण असूनही आम्ही भाषण केल्याबद्दल आमचे कौतुक केले तर इतर सर्वांना याची जाणीव करून दिली.

बारावीत दुस-या सत्रातच वडिलांची बदली झाल्याने आम्ही सांगलीस आलो आणि मी विलिंग्डनमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी धनिणीच्या बागेत व कॉलेजात सुटीच्या वेळी बागकाम व इतर कामे करीत असणारे माझे मित्र पाहून मला त्यांचा हेवा वाटे मात्र स्वतः घरातही श्रमाचे काम करणे नको वाटे.    शिवाजी कॉलेजमधील त्यावेळी झालेले संस्कार पुढे नोकरीस लागल्यावर मात्र मला उपयोगी पडले आणि सतत काम करण्याची तसेच श्रम करणा-या सर्वांना मान देण्याची सवय लागली.

मध्यंतरी पुण्यात अनंतराव पवार कॉलेजवर गेलो असताना रयत शिक्षण संस्थेच्या आधुनिक इमारती व प्राध्यापक वर्ग यांची ओळख झाली. त्यांच्याबरोबर काम करावयास मिळणार म्हणून आनंदही झाला. मात्र काही कारणाने ते शक्य झाले नाही.

गेल्या महिन्यात इंटरनेटवर जुन्या पुस्तकांच्या शोधात असताना मला भाऊराव पाटील यांच्यावर महाराष्ठ्र साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलेले १९८९ सालचे पुस्तक सापडले.

ते वाचल्यावर माझ्या बालपणीच्या सर्व स्मृती जाग्या झाल्या आणि भाऊरावांचे कष्टमय जीवन, त्यांनी केलेला संघर्ष आणि ग्रामीण भागातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी श्रमाधारित शिक्षणाची योजना यांची माहिती झाली. माझे त्यांच्याबद्दल असणारे आकस आणि गैरसमज गळून पडले आणि नकळत का होईना ज्ञानदीप फौंडेशनसाठी त्यांच्याच कल्पनेनुसार योजला आखल्याचे मानसिक समाधान वाटले. लेखकाने इतक्या सविस्तरपणे प्रसंगांचे वर्णन केले आहे आणि पाश्चात्य विद्वानांच्या विचारासह त्यांच्या कार्याचे महत्व पटवून दिले आहे की मला ते अतिशय मौलिक वाटले. सरकारीकरण झाल्याने पूर्वीच्या शैक्षणिक ध्येयवादी कार्याचा लोकांना विसर पडल्याचे त्यांनी व्यक्त केलेले शल्यही मनाला भावले.

मायमराठी वेबसाईटवर जुन्या पुस्तकांतील परिचय दर्शक काही पाने प्रसिद्ध करण्याच्या पद्धतीत मी बदल केला आणि भाऊरावांचे संपूर्ण चरित्र प्रसिद्ध करण्याचे व ते रयत शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचे नवे कार्य मनाशी निश्चित केले.

पुढे हे चरित्र इंग्रजीत भाषांतरित करण्याचाही विचार आहे. मायमराठी वेबसाईटवर ही माहिती असणे हा एक गौरवाचा आणि अभिमानाचा विषय असून ज्ञानदीपसाठी तो सदैव प्रेरणादायी ठरेल असा मला विश्वास वाटतो. कै. भाऊरावांच्या शिक्षण क्षेत्रातील लोकोत्तर कार्यास माझे अभिवादन.
डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

No comments:

Post a Comment