Friday, December 18, 2020

थोडसं जुन्या सांगली हायस्कूल विषयी

थोडसं जुन्या सांगली हायस्कूल विषयी .......

कृष्णा नदीच्या काठी एका उंचावटयावरील सहा गल्ली असलेलं गाव म्हणजे सांगली. १८०१ साली मूळ मिरज जहागिरीतून फूटून पहिल्या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी वेगळं राज्य बनवलं तेव्हापासून या गावाचा ख या अर्थांनं इतिहास सुरु झाला. शिक्षण हेच आर्थिक, सामाजिक, सांकृतिक विकासाचा पाया असल्याने शिक्षणाचे महत्व ओळखून श्रीमंत धुंडीराज उर्फ तात्यासाहेब पटवर्धन यांच्या काळात सांगली संस्थानात शिक्षणाला सुरवात झाली. १८६४ साली सांगली इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. सांगलीत इ.१८६४ मध्ये सुरु झालेल्या इंग्लिश स्कूललाच नंतर इंग्रजी माध्यमांचे स्वरुप आले असावे. तत्कालीन संस्थानाधिपदी धुंडिराज तात्यासाहेब पटवर्धन यांच्या कारर्किदीत सुरु झालेल्या या पहिल्या इंग्लिश स्कूलमध्ये इ.स. १८७८ पर्यंत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी होते. या शाळेच्या इ.स. १८८२ मध्ये झालेल्या पुर्नरचनेनंतर सहाव्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या शंभरावर पोहोचली त्यावेळी ही शाळा राजवाडयातील एका भागात भरत होती. क्रिकेट आणि गायनाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देणारी ही सांगलीतील पहिली शाळा म्हणता येईल. त्या काळात इंग्लिश स्कूल ही एकमेव सरकारी शाळा होती. याच शाळेची पुढे १८८४ साली सांगली हायस्कूल, सांगली या नावाने शाळा सुरु झाली. हणमंतराव भोसले या प्रख्यात क्रीडाशिक्षकामुळे क्रिकेटपटू विजय हजारे, बॅडमिंटन पटू नंदू नाटेकर यांच्यासारखे क्रीडाक्षेत्रातील नामवंत या शाळेला देता आले. ड्रॉईंग, गायन, तालिम, क्रिकेट अशा विषयांसाठी वेगवेगळा शिक्षक नेमण्याची प्रथा एकेकाळी या शाळेत होती. स्वातंत्र्योत्तर काळात शासनाने ही शाळा १ एप्रिल १९५३ साली तंत्रशिक्षण सुरु करण्याच्या अटीवर लठ्ठे एज्युकेशन सोसायटीकडे हस्तांतरीत झाली. शास्त्र शाखेचा उच्च माध्यमिक विभाग १९७५ मध्ये आणि १९८८ मध्ये व्यावसायिक शिक्षण (एम.सी.व्ही.सी.) विभाग सुरु झाला. लठ्ठेतंत्रनिकेतनची सुरवात या शाळेच्या आवारातच झाली. तंत्रशिक्षणासह या शाळेला आधुनिक स्वरुप देण्यात नेमगोंडा दादा पाटील, आमदार कळंत्रेआक्का, अड.केशवराव चौगुले, जी.के. पाटील, टी.के. पाटील, अड एस.एस. पाटील. बापूसाहेब कुंभोजकर आदी मंडळीचा मोठा सहभाग आहे.

वास्तूशिल्प कलेचा उत्कृष्ठ नमुना

सांगली हायस्कूलची भव्य इमारत ब्रिटीश कालीन असुन गोथीक वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. दुसरे चिंतामणराव पटवर्धन यांच्या काळात संस्थानचे प्रशासक कॅप्टन बर्क यांच्या कारकिर्दीत इ.स. १९०७-०८ मध्ये निसर्गसंुदर अशा आमराईच्या सान्निध्यात सांगली हायस्कूल बांधण्यात आले आणि सांगलीच्या ऐतिहासिक वैभवात भर पडली. सांगली हायस्कूलच्या इंग्रजी स् (एल) आकाराच्या इमारतीची रचना ब्रिटीश वास्तुशास्त्रानुसार आहे. क हाडचे मक्तेदार देवी यांच्या वतीने सांगलीतील ज्यून्या पिढीतील बांधकाम व्यावसायिक गोविंददास आणि केशवदास शेडजी या बंधुनी ती बांधली आहे. 


 


जुनी इमारत
इमारतीचे वैशिष्टय म्हणजे बांधकामासाठी अत्यंम चिवट अशा चुन्याचा वापर केलेला आहे. कात, गुळ, यांच्या मिश्रणातुन चुना आणि भाजीव विटांचा चुरा उत्तम दर्जाची चुनखडी यांचा उपयोग बांधकामासाठी केलेला आहे. भार (लोड) विभागणीसाठी कमान पध्दत वापरलेली आहे. चार खोल्यानंतर एक हॉल अशी रचना आहे. उंचवर्गखोल्या, नैसर्गिक वायूविजन, इमारतीच्या दर्शनी बाजुस एकशे दहाफूट उंचीची कमान, त्यावर लखलखता कळस, तर्फेवर चालणारे घडयाळ, पोर्चच्या माथ्यावर जाण्यासाठी दोन्ही बाजुंनी चक्राकार असे ओतीव बिडाचे जिने, इमारतीच्या दर्शनी भागावर ३२ पाकळयांचे कमळ, सिंहाची प्रतिकृती, व्हिक्टोरिया क्रॉस, नाजूक नक्षीकाम अशी वैशिष्टये. इमारतीसाठी संपुर्ण सागवानी लाकूड वापरलेले आहे. त्यावेळी नाईक यांनी ते लाकूड काम केले होते. या काळात गायन हॉल, व्यायामशाळा आणि क्रिकेटचे सुसज्य मैदान अशी खास सोय करण्यात आली होती.या इमारतीने नुकतीच आपली शताब्दी साजरी केली आहे. या शंभर वर्षात असंख्य राजकारणी, समाजकारणी, उद्योजक, साहित्यिक, नामवंत खेळाडू, तंत्रज्ञ असे कीर्तीमान, बुध्दीमान विद्यार्थी घडवले आहेत.

इमारतीचे नुतनीकरण



नवीन इमारत
 
 

 

नवीन इमारतमधील जिना
 


व्हिक्टोरिया राणीचे शिल्प
 

 
लठ्ठे एज्युकेशन सोसायटीची सांगली हायस्कूल सांगली ही एक नामवंत शाखा. दक्षिण महाराष्ट्रात ज्या काही भव्य व देखण्या इमारती आहेत त्यापैकी ही एक  ऐतिहासिक इमारत आहे. सन २००७ या वर्षी या ऐतिहासिक इमारतीला १०० वर्षे पुर्ण झाली आहेत. नैसर्गीक घटकांच्या परिणामामुळे ही इमारत जीर्ण झाली होती. तिला नुतनीकरणाची गरज आहे. आपल्या सारख्याच येथून पुढे येणा या विद्यार्थ्यांची निरंतर सेवा करता यावी म्हणून लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. सुरेश पाटील (माजी महापौर) आणि संस्थेच्या सर्व पदाधिका यांनी या सुंदर आणि दुर्मिळ वास्तूच्या नुतनीकरणाचा निर्धार करुन ते पुर्णत्वास नेले.

१०० वर्षांचा साक्षीदार - ज्ञानवृक्ष



चिंचेचे झाड
सांगली हायस्कुल, सांगलीचे वैशिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना मायेची सावली देणारे, मित्रत्व फुलवणारे, चिंतनशीलता वाढविणारे आणि मागे वळून पहायला लावणारे हे चिंचेचे झाड. एखाद्या वृक्षाचे कमाल वय किती असते याचा विचार करायला लावणारा हा चिंचवृक्ष गेल्या १०० वर्षांत असंख्य विद्यार्थ्यांनी चिंचेसाठी, लपण्यासाठी, विद्यार्थ्यांनी त्याच्या खोडया काढल्या असल्या तरी जाणा या खोडसळ, प्रेमळ माजी विद्यार्थ्यांच्या स्मृती जपत आजही तो उंच आकाशी झेपावत सतत वाढत्या संख्येने येणा या विद्यार्थ्यांसाठी आपले पंख पसरतो आहे. प्रसिध्द थोर साहित्यिक वि.स.खांडेकर तसेच भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे यांच्या स्मृती या वृक्षाच्या छायेत लपलेल्या आहेत. या वृक्षाच्या छायेत वि.स. खांडेकर यांची हुशार विद्यार्थी आणि साहित्यिक म्हणून जडणघडण झाली असावी. ललित लेखनाला पोषक अशी सौंदर्यदृष्टी, चिंतनशीलता, निसर्गप्रेम त्यांना या परिसरातच मिळाले असावे. कारण २२ डिसेंबर १९१३ रोजी वि.स. खांडेकर सांगली हायस्कूलमधून मॅट्रीक पास होऊन मुंबई विश्वविद्यालयात त्यांचा आठवा नंबर आला होता. तेव्हाचे संस्कृत शिक्षक श्रीपादशास्त्री देवधर आणि मराठी शिक्षक शंकरशास्त्री केळकर यांच्या रसाळ वाणीने खांडेकरांना मराठी आणि संस्कृत वाचनाची गोडी लागली त्यांच्यातला लेखक फुलत गेला.

एक प्रेरणा - हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे

सांगली हायस्कूल म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रच होते. जेष्ठ नेते वसंतदादा पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या जेल फोडो मोहिमेत हुतात्मा झालेले आण्णासाहेब पत्रावळे या शाळेचेच विद्यार्थी होते.

हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे

 
आण्णासाहेब पत्रावळे म्हणजे देशभक्तीचा धगधगता निखाराच होता. 'जेल फोडो' च्या आधीही ते एकदा तुरुंगात जाऊन आले होते. त्यामुळे त्यांची लढाऊ वृत्ती आणखी वाढली होती. 'तुरुंगातून सुटलास बुवा' असे त्यांचे मित्र त्यांना म्हणाले. त्यावर 'मी पुन्हा तुरुंगात जाईन आईएवढीच भारतमाता मोठी आहे. तिच्या मुक्तीसाठी मी मरणार आहे.' असे उत्तर पत्राावळे यांनी दिले होते.ड्रॉईंग हॉललगतच्या वर्गात ते शिकले जेल फोडो मोहिमेत ते हुतात्मा झाले ही बातमी सांगली हायस्कूल मध्ये पोहोचताच विद्यार्थ्यांमध्ये ब्रिटिशांबद्दल संतापाची लाट उसळलेली होती.

सांगली हायस्कूल भूषण - माजी विद्यार्थी

प्रख्यात ज्ञानपीठ परितोषिक विजेते थोर साहित्यिक वि.स.खांडेकर, कविवर्य यशवंत, उदयोगपती आबासाहेब गरवारे, स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, साहित्यिक श्रीनिवास शिंदगी स्व.आण्णासाहेब लठ्ठे गुरुनाथ गोंविद तोरो, शीघ्र कवी गोपाळ गोविंद मुजुमदार उर्फ साधुदास, शास्त्रीय संगीताचे गाढे संगीतज्ञ प्रा.ग.ह.रानडे, केशवसुत संप्रदायाचे अध्वर्यु धोंडो वासुदेव गद्रे तथा कवि काव्यविहारी अशी या शाळेची माजी विद्यार्थ्यांची परंपरा आहे.

परदास्याची बेडी होती पायी तव जेधवा
पुत्रं शहाणे तुझे दंगले संसारी तेधवा
काही वेडी तयाची भडकुनी गेली मने
क्रांती पूजा केली त्यांनी रुधिराच्या तर्पणे

राष्ट्रयोगिनी माजी आमदार कळंत्रेआक्का, स्वातंत्र्य आंदोलनात प्राणाची आहुती देणारे हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे, देशरक्षणांर्थ देशाच्या सदहद्दीवर कर्तव्य बजावताना वीरमरण पावलेल्या हुतात्मा स्कॉड्न लिडर अनिल घाडगे, कवी गिरीश, प्रसिध्द कायदेतज्ञ केशवरावजी चौगुले, स्वातंत्र्य सैनिक स्व. आण्णासाहेब पाटील सिंहगड एज्यु. संस्थेचे संस्थापक प्राचार्य श्री.एम.एन. नवले तसेच मुंबईचे प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ. महेंद्र परीख, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, प्रसिध्द ग्रंथीतज्ञ डॉ. वसंतराव खाडीलकर मा.खाजदार प्रकाश बापू पाटील, माजी आमदार प्रा.शरद पाटील आंतराष्ट्रीय क्रिकेटपटू विजय हजारे, प्रसिध्द बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, कबड्डीपटू शंकर गावडे, अर्जुन पुरस्कार प्राप्त कबड्डीपटू राजू भावसार, वेटलिफ्टींग चॅम्पियन अनिल पाटील, राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू आसिफ मुल्ला यांच्या सारखे किर्तीमान माजी विद्यार्थी याचा हायस्कूलचे विद्यार्थी आहेत.

सांगली हायस्कूलला नामवंत मुख्याध्यापक/शिक्षकांची परंपरा आहे. लोकमान्य टिळकांचे सहाध्यायी असलेले हरी गणेश करमरकर या शाळेचे पहिले मुख्याध्यापक होते नाटयाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, राजकवी साधुदास, चित्रकार देवल, पाटीलशास्त्री, श्रीपादशास्त्री देवधर, शंकरशास्त्री केळकर, मुदगलकर असे नामवंत शिक्षक या संस्थेला जुन्या काळात लाभले. तालीम मास्तर लिमये यांनी मुलांकडून व्यायाम आणि गायन मास्तर गोडबोले यांनी संगीताची तालिम करुन घेतली. प्रख्यात क्रीडाशिक्षक हणमंतराव भोसले यांच्या तालमीतच विजय हजारे सारखे क्रिकेटपटु येथे तयार झाले.

Thursday, December 17, 2020

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे अलौकिक कार्य

 महाराष्ट्रातील ग्रामीण भागात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा कॉलेजचे जाळे विणून सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना श्रमाधारित शिक्षण देण्याचे अलोकिक कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले.


बालपणी  ( १९४३ ते १९६१) सातारला त्यांच्या घराशेजारी रहात असल्याने आणि शिवाजी कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यामुळे मला त्यांच्या कार्याची जवळून माहिती आहे.

सातारला सोमवार पेठेत पंचपाळ्या हौदाजवळच्या फणसळकरांच्या कॉलनीत आम्ही रहात होतो. रोज सकाळी आणि संध्याकाळी पांढ-या शुभ्र दाढी असणारे भारदस्त भाऊराव हातात सोटासदृश काठी घेऊन जातायेताना दृष्टीस पडत व त्यांचेबद्दल आदरयुक्त भीती वाटे.


इयत्ता चोथीत असताना धनिणीच्या बागेत एका कार्यक्रमात मी झंप्याचे लग्न ही विनोदी नाट्यछटा त्यांच्या समोर सादर केली होती. तो प्रसंग अजूनही माझ्या मनात ताजा आहे. तसा माझा पेहरावही त्यावेळी झंप्यासारखाच बावळट होता.
 
मी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होतो आणि नरेंद्र दाभोळकर माझ्याच वर्गात पण दुस-या तुकडीत होता. कबड्डी खेळण्यात तो नावाजलेला होता. मला खेळता येत नसले तरी  शिवाजी उदय मंडळात त्याचे कबड्डीचे सामने पहायला मित्रांबरोबर मी जात असे. तेथे भाऊरावही येत आणि मार्गदर्शन करीत.   प्रतिस्पर्धी खेळाडूच्या अंगावरून उंच उडी मारून तो खेळाडूंना बाद करीत असे.  भाऊरावांचा नरेंद्रवर फार लोभ होता. त्याचे वडील कॉलेजमध्ये प्राध्यापक होते.

दहावी झाल्यानंतर शिवाजी कॉलेजमध्ये अकरावी आणि प्रीडिग्री शिकताना प्राचार्य पी. जी. पाटील, अकिवाटे व नसिराबादकर  यांचेकडून भाऊरावांच्या कार्याविषयी बरीच माहिती कळत असे. ते भाषणांतून ब्राह्मण समाजाच्या दोषांवर कडाडून टीका करायचे त्यामुळे  घरात आणि आमच्या नातेवाईकांमध्ये भाऊरावांबद्दल चांगले मत नव्हते. एकदा त्यांनी ब्राह्मणांच्या बायका मराठ्यांच्या घरी भांडी घासायला आल्या पाहिजेत असे सांगितले तेव्हा सातारच्या ब्राम्हण वर्गात संतापाची लाट उसळली. मलाही त्यावेळी त्यांचे भाषण प्रक्षोभक वाटले होते. आता मात्र त्यांचे विचार पटतात ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वाच्या अहंभावनेमुळे अजूनही दुसर्या घरी भांडी घासण्याचे काम आम्हा ब्राह्मणांना कमीपणाचे वाटते.

१९६० साली भाऊरावांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शिवाजी कॉलेजमध्ये मोठी सभा होणार होती. त्यावेळी आपण भाऊरावांच्या कार्याबद्दल भाषण करायचे असे मी आणि माझा जिवलग मित्र कै. भालचंद्र करंदीकर  याने ठरविले होते. प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाल्यावर प्राचार्यानी विद्यार्थ्यांपैकी कोणाला बोलायचे आहे का अशी विचारणा केली. मोठ्या भरगच्च हॉलमध्ये मी आणि भालू आम्ही दोघांनीच हात वर केले. आमची भाषणे झाल्यावर प्राचार्य पी. जी. पाटील यांनी ब्राह्मण असूनही आम्ही भाषण केल्याबद्दल आमचे कौतुक केले तर इतर सर्वांना याची जाणीव करून दिली.

बारावीत दुस-या सत्रातच वडिलांची बदली झाल्याने आम्ही सांगलीस आलो आणि मी विलिंग्डनमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी धनिणीच्या बागेत व कॉलेजात सुटीच्या वेळी बागकाम व इतर कामे करीत असणारे माझे मित्र पाहून मला त्यांचा हेवा वाटे मात्र स्वतः घरातही श्रमाचे काम करणे नको वाटे.    शिवाजी कॉलेजमधील त्यावेळी झालेले संस्कार पुढे नोकरीस लागल्यावर मात्र मला उपयोगी पडले आणि सतत काम करण्याची तसेच श्रम करणा-या सर्वांना मान देण्याची सवय लागली.

मध्यंतरी पुण्यात अनंतराव पवार कॉलेजवर गेलो असताना रयत शिक्षण संस्थेच्या आधुनिक इमारती व प्राध्यापक वर्ग यांची ओळख झाली. त्यांच्याबरोबर काम करावयास मिळणार म्हणून आनंदही झाला. मात्र काही कारणाने ते शक्य झाले नाही.

गेल्या महिन्यात इंटरनेटवर जुन्या पुस्तकांच्या शोधात असताना मला भाऊराव पाटील यांच्यावर महाराष्ठ्र साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलेले १९८९ सालचे पुस्तक सापडले.

ते वाचल्यावर माझ्या बालपणीच्या सर्व स्मृती जाग्या झाल्या आणि भाऊरावांचे कष्टमय जीवन, त्यांनी केलेला संघर्ष आणि ग्रामीण भागातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी श्रमाधारित शिक्षणाची योजना यांची माहिती झाली. माझे त्यांच्याबद्दल असणारे आकस आणि गैरसमज गळून पडले आणि नकळत का होईना ज्ञानदीप फौंडेशनसाठी त्यांच्याच कल्पनेनुसार योजला आखल्याचे मानसिक समाधान वाटले. लेखकाने इतक्या सविस्तरपणे प्रसंगांचे वर्णन केले आहे आणि पाश्चात्य विद्वानांच्या विचारासह त्यांच्या कार्याचे महत्व पटवून दिले आहे की मला ते अतिशय मौलिक वाटले. सरकारीकरण झाल्याने पूर्वीच्या शैक्षणिक ध्येयवादी कार्याचा लोकांना विसर पडल्याचे त्यांनी व्यक्त केलेले शल्यही मनाला भावले.

मायमराठी वेबसाईटवर जुन्या पुस्तकांतील परिचय दर्शक काही पाने प्रसिद्ध करण्याच्या पद्धतीत मी बदल केला आणि भाऊरावांचे संपूर्ण चरित्र प्रसिद्ध करण्याचे व ते रयत शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचे नवे कार्य मनाशी निश्चित केले.

पुढे हे चरित्र इंग्रजीत भाषांतरित करण्याचाही विचार आहे. मायमराठी वेबसाईटवर ही माहिती असणे हा एक गौरवाचा आणि अभिमानाचा विषय असून ज्ञानदीपसाठी तो सदैव प्रेरणादायी ठरेल असा मला विश्वास वाटतो. कै. भाऊरावांच्या शिक्षण क्षेत्रातील लोकोत्तर कार्यास माझे अभिवादन.
डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

Friday, December 11, 2020

विज्ञानवादी सावरकर



सांगलीत २५ ऑगस्ट २०१३ रोजी निवृत्त अभियंता मंडळाच्या सांगली, कोल्हापूर व सातारा या संघटनांचे संयुक्त संमेलन झाले. त्यात एड्व्होकेट बाळासाहेब देशपांडे यांचे सावरकरांच्या कविता या विषयावर व्याख्यान ठेवले होते. त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविण्याची मला संधी मिळाली. सावरकरांविषयी मला हिंदु धर्माचे पुरस्कर्ते व स्वातंत्र्यासाठी आपल्या जिवाची वा कुटुंबाची तमा न बाळगता संघर्ष करणारे नेते यापलिकडे फारशी माहिती नव्हती.

बाळासाहेब देशपांडे यांनी सावरकरांच्या  काव्यरचनेचा प्रवास सांगताना त्यांचा सारा जीवनपटच उलगडून दाखविला व त्यांच्या  अलौकिक काव्यप्रतिभेचा प्रत्यय सर्व श्रोत्यांपर्यंत पोचविला. माझ्या भाषणात मी असे सुचविले की सावरकरांच्या या पैलूबरोबर त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन व धर्मसुधारणाविषयक कार्याचीही माहिती लोकांपर्यंत पोचण्याची आवश्यकता आहे. कारण सावरकरांना अभिप्रेत असणारा हिंदू धर्म, सध्याच्या  जनमानसात हिंदू धर्माविषयी असणार्‍या कल्पनेहून फार भिन्न व उच्च दर्जाचा होता.

प्रस्तुत भाषणामुळे सावरकरांच्या सर्व कविता वाचण्याची मला हुरहुर लागली होती. इंटरनेटवर शोध घेताना बुकगंगा या संकेतस्थळावर सावरकरांच्या कविता हे पुस्तक मोफत वाचायला उपलब्ध आहे हेपाहून मला आनंद झाला हे पुस्तक डाऊनलोड करतानाच अंधश्रद्धा निर्मूलन भाग १ व भाग २ ही पुस्तके संकेतस्थळावर दिसली. डॉ. नरेंद्र दाभॊळकरांचा विषय ताजा असल्याने मी ती लगेच डाऊनलोड केली. मात्र ही पुस्तके सावरकरांनी लिहिली आहेत हे मला माहीत नव्हते. या कथा वाचल्यावर सावरकर यांच्या अंधश्रद्धांवर त्यांनी किती कठोर टीका केली आहे हे लक्षात आले. अधिक माहिती मिळण्यासाठी विज्ञान व सावरकर हे शब्द टाकून इंटरनेटवर शोध घेतला तेव्हा विकिपिडियामध्ये सावरकरांच्या  सावरकरांचा  वैज्ञानिक दृष्टीकोन आणि हिंदु धर्मातील  चुकीच्या रूढी व जातीधर्मातील विषमता यांच्या विरुद्धही त्यानी कसे उघडपणे बंड पुकारले होते याची माहिती मिळाली. त्यात असणारी काही  माहिती खाली देत आहे.

अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६) . हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्‍नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली.आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. स्वकीयातील जातीयतेवरपण निर्भीड टिका केली.

त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले.

जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले.

सावरकरांनी चालवलेल्या जात्युच्छेदन चळवळीने अस्वस्थ झालेल्या ब्राह्मणांनी लोणी येथे झालेल्या सनातनी परिषदेत सावरकरांना 'धर्मद्रोही' ठरवून 'त्यांना पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले गेले असते' असा ठराव मांडला. सावरकरांनी त्यावर 'शिवशाहीत अथवा, पहिल्या बाजीरावाच्या पेशवाईत आमच्यासारख्या हिंदू संघटकांना हत्तीच्या पाठीवरील अंबारीत मिरवले जाण्याचाच संभव अधिक होता' असे सडेतोड उत्तर दिले.

पूजा, पाठ, गौरी, गणपती, सोयरसुतक, संक्रांत, दिवाळी, दसरा, द्वादशी या धार्मिक कार्यक्रमांना भटांना बोलावणे बंद करून 'भटशाही' संपवावी असे मत मांडले.त्यासोबतच काशीतील ब्राह्मण महासंमेलनाची तुलना त्यांनी माकडांशी केली. त्यात 'काशीत दोन महासंमेलने भरली - एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन. माकडे परिवर्तनीय तरी आहेत. पण सनातनी तर काळ, वेळ, परिस्थिती या गोष्टीच बघत नाहीत. अशा वागण्यामुळे निदान काशीच्या भाकड महासंमेलनातील पंडित हे तरी माकडांची विकसित श्रेणी नसून तेथील माकडेच त्या पंडितांची विकसित श्रेणी आहे हे म्हणणे क्रमप्राप्त आहे' असे लिहित त्यांची विकेट घेतली.

वरील सर्व माहिती वाचल्यावर ही माहिती सध्याच्या हिंदू संघटना लोकांपर्यंत का नेत नाहीत असा मला प्रश्न पडला आहे.जर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनकार्याची खरी माहिती समाजातील खालच्या थरातील सर्व लोकांपर्यंत पोचली तर हिंदुत्वाचा व्यापक दृष्टीकोन समजून जातीपातींचे राजकारण करणा-या व चिनी समाजवादाची भलावण करणा-या पक्षांपेक्षा भारत देशावर व त्यातील सर्व समाजाला  हिंदू मानणा-या पक्षालाच जनता आपलेसे करील.

भारतातील लोकशाही अबाधित राखून आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता

-
शत्रूशी समोरासमोर लढण्यापेक्षा त्याच्या गोटात शिरून त्याला नामोहरम करणे सोपे असते. देश आणि धर्म या दोन्ही आघाड्यांवर एकाचवेळी लढण्याऐवजी देशासाठी दादाभाई नवरोजींनी धर्म बदलला. व्यापार हे त्यांचे शक्तीस्थळ आहे हेओळखून त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्वदेशी असोसिएशन काढली आणि इंग्लंडमध्ये जाऊन स्वदेशी उद्योग आणि व्यापार वाढविणे कंपनीच्या आणि ब्रिटिशांच्या कसे फायद्याचे आहे हे त्यांना पटवून दिले. येथील संस्थानांचे प्रश्न सोडविले त्यांना उद्योगवाढीस प्रवृत्त केले आणि स्वदेशी उद्योगाचे जाळे निर्माण करून आर्थिक स्वावलंबनाद्वारे अप्रत्यक्षपणे येथील धर्मांचे रक्षण केले. चीन, रशियाच्या डाव्या विचारसरणीसही लगाम घातला. 


टिळक, आगरकर यांनी इंग्रजी शिक्षणाच्या शाळा आणि कॉलेजेस सुरू करून त्यांना इंग्रज अधिका-यांची नावे दिली. पण उद्देश हा स्वकियांना व स्वधर्माला सशक्त आणि राजकीय दृष्ट्या जागृत करण्याचा होता.


होमरूल लीग द्वारे हिंदू- मुस्लीम एकी करून  कॉंग्रेसची स्थापना केली आणि  मर्यादित स्वदेशी स्वायत्ततेची मागणी केली.  महात्मा गांधींनी सुरू केलेल्या असहकार आणि स्वातंत्र्यलढ्यास या पार्श्वभूमीचा फार उयोग झाला.


सध्याच्या काळातही साम्यवादाचे आणि भांडवलशाहीचे जागतिक आव्हान स्वीकारून आपला भारत आत्मनिर्भर व येथील लोकशाही सुदृढ करण्याचे कठीण काम शासनाला करावे लागणार आहे  गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित, धार्मिक- निधर्मी सर्वांना बरोबर घेऊन हे आपल्याला साध्य करायचे आहे. यासाठी सर्व जनतेची त्यास सक्रीय साथ मिळण्याची आवश्यकता आहे. 


ज्ञानदीप फौंडेशनने आपल्या सर्व कार्याचे हेच उद्दीष्ट ठेवले आहे. - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

पुढे धावताना मागे पडलेल्यांचा विचार करा


आपण आतापर्यंत वर पाहून चढण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र मागे वळून पाहिल्याशिवाय आणि पायाखाली काय तुडविले यात आहे हे पाहिल्याशिवाय आपली प्रगती स्थायी व धोकारहित होणार नाही. विज्ञानाची प्रगती, धर्मांतर किंवा कम्युनिझम क्रांती हे आपण आपल्या धर्मावर आक्रमण समजून त्याला विरोध केला. पण कारणांच्या मुळाशी जाऊन उपाय केले नाहीत. 

दलित व गरीब यांच्या सांपत्तिक हिताची काळजी घेऊन जर आपण पुढील वाटचाल केली तर आपल्या प्रगतीचा वेग मंदावेल पण तो अधिक स्थायी आणि सर्व समाजाला एकत्र बांधणारा ठरेल. या साठी शहरातील झोपडपट्टीत राहणारे व ग्रामीण भागात शेती व छोट्या धंद्यांवर आपला चरितार्थ चालविणारे यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्व राजकीय व सामाजिक संस्थांनी प्रयत्न केले पाहिजेत. 

आपल्या नवसंशोधनाची दिशाही पाश्चात्य आधुनिक कल्पनांपेक्षा भारतीय व श्रम आणि कौशल्यावर आधारित छोट्या उद्योग व व्यवसायांच्या आधुनिकाकरणासाठी असावी  तेथे आर्थिक गुंतवणूक कशी वाढेल. परदेशस्थ भारतीयांचे यासाठी योगदान कशाप्रकारे घेता येईल याचाही साकल्याने विचार व्हवयास हवा. निसर्ग संतुलनाच्या कार्यापेक्षाही समाज समरसतेचे आव्हाल आज आपल्यापुढे आहे आणि त्यासाठी शासनाच्या कार्यात आपण  सक्रीय सहभागी होणे जरूर आहे.  असे मला वाटते.- डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली

Sunday, December 6, 2020

ज्ञानोदय (इ. स. १८४२ ते १९४१ ) लेखनसारसूची -प्रस्तावना

“ज्ञानोदय ' हे नियतकालिक शंभर वर्षांहून अधिक काळ चालू आहे. याचे जुने अंक अभ्यासकांना सर्वच ठिकाणी सहज उपलब्ध होण्यासारखे नाहीत. मूळ अंक आता इतक्या जीर्ण अवस्थेत आहेत को, ते हाताळणे म्हणजे ते पुढीळ संदर्भासाठी योग्य त्या अवस्थेत न ठेवणे, असा प्रकार आहे. म्हणून त्यांचे जतन वस्तुसंग्रहालयासारख्या पद्धतीनेच (म्युझियममध्ये) करता येणे शक्‍य आहे आणि आवश्यकही आहे. इतवया दीर्घकाळातील अंकांची छपाई करणे हे बरेच अवाढव्य काम आणि असे एखाद्याच ठिकाणी राष्ट्रीय प्रकल्पात उपलब्ष करणे शक्य आहे.

ही परिस्थिति लक्षात घेऊन या अंकांची शभर वर्षांची 'लेखनसारसूची' तयार करून प्रकाशित करण्याची कल्पना डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांच्या सूचनेद्वारा प्रथम नजरेसमोर आली. त्या अनुरोधाने डॉ. हिवाळे एज्यकेशन सोसायटी व अहमदनगर कॉलेज येथील अधिकारीवर्गाशी आणि अहमदनगर कॉलेजमधील मराठोवे प्राध्यापक व विभागप्रमुख, डॉ. गंगाधर मोरजे यांच्याशी विचारविनिमय करण्यात आला. महाराष्ट्र राज्य आणि संस्कृती मंडळाचे त्यावेळचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. या सर्व विचारविनिभयातून व चर्चेतून 'लेखनसारसूची'चा आराखडा
तयार होऊ लागला. इ. स. १८४२ ते १९४१ या कालावघीतील अंकांमधील सर्व लेख-कविता-इत्यादी साहित्याची ही सार-सूची सहा खंडांत तयार करण्याची योजना नक्‍की करून हा प्रकल्प संघटित केला. मदतीसाठी तो महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळापुढे ठेवला. सं प्रकारच्या सहकार्याची आणि उवंरित मदतीचो जवाबदारी डॉ. हिवाळे एज्युकेशन सोसायटी, अहमदनगर कॉलेज, यांनी स्वीकारली. साहित्य आणि संस्कृती मंडळानेही हा भार उचलण्यास आम्हांस मदत करून आश्वासित केले.

"ज्ञानोदय या नियतकालिकाचे महत्त्व ते शंभर वर्षांहून अधिक काळ चालले आहे, ख्रिस्ती मराठी मंडळींनी ते चालविले आहे, इतकेच नाही.ख्रिस्ती मराठो संस्कृतीचे ते प्रतीक तर आहेच, पण त्याशिवायही महाराष्ट्रातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, वाइमयीन, इत्यादी अनेक जीवनांगांमधील स्थित्यंतरे, विचारमंथने, वस्तुस्थिती, यांचे दप्तर म्हणूनही ते महत्त्वाचे आहे. या विषयांतील अभ्यासकाला व जिज्ञासूलाही या नियतकालिकातील हे लेखन अवकोकनार्थ आणि चिकित्सेसाठी मिळाले नाही, त्याचा उपयोग करून घेता आला नाही, तर त्याच्या अभ्यासात व ज्ञानात बरीच मोठी
उणीव राहिल्यासारखे होईल. म्हणून ही उणीव दूर करण्याचा प्रयत्न या लेखनसारसूचीद्वारे केला आहे. या सूचीमध्ये केवळ सारकथन केलेले नाही, तर मुळांतील शैली व भाषा यांची जाणोवही वाचकाला होऊ शकेल, अशा धोरणाने संशोधन-संपादन केलेले आहे.

मराठीतील कोणत्याही नियतकालिकाची अशी सारसूची केली गेलेली नाही. या दृष्टीने ही अशी पहिलीच सूची आहे. इतकेच नव्हे, तर कोणत्याही विषयाची जशी सारसूची मराठीत अजून तयार झालेली नाही. प्रस्तुत सूचीने आरंभ करून दिला आहे आणि धडा घालून दिला आहे, ही वस्तुस्थिती नमूद करण्यात आत्मस्तुती नाही. हा पहिलाच आणि अलौकीक असा प्रकल्प आहे. त्यामुळे तो चुकतमाकत झालेला असणे शक्‍य आहे. प्रयोग करीत आणि अनुभव घेत यातील उणीवा दूर होतील. इतर काही विषयांत असे प्रयत्न मुरू झाले की, या प्रकारच्या सूचीचे प्रारंभिक प्रवर्तनाचे कार्य
म्हणून “ज्ञानोदया'च्या या सूचीकडें बघावे लागेल. अशा प्रकारच्या कार्याचे “द्तोउवाच करण्याची संधी आलोचना प्रस्थानला डॉ. हिवाळे एज्युकेशन सोसायटी-अहमदनगर कॉलेज आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या बहुमोल साहाय्याने मिळाली आहे.

सारसूचीमध्ये प्रत्येक अंकातील मजकुराचे क्रमवार आणि कालानुक्रमाने सारकथन केलेले आहे. त्यांचे संदर्भही नमूद आहेत. विषयवार सूचीचीही जोड दिलेली आहे. उपयुक्तता, संदर्भ सहजतेने सापडणे आणि पद्धतशीर मांडणी, यांच्याकडे लक्ष देऊन सारसूचीची रचना केलेलो आहे. हे काम निव्वळ संकलनाचे जाही. शास्त्रीय संशोधनपद्धती नजरेसमोर ठेवून, सार करताना मुळातील विचार, अनुभव, , मांडणी, इत्यादींना धक्का लागणार नाही, काळजी घेत, भस्थासनोती पाळीत सारसूचीतील लेखन व त्याची मांडणी केलेली आहे. अभ्यासकांची सोय जाणि एका मराठी सांस्कृतिक ठेव्याचे मुळाशी संवादी राहून जतन, या दृष्टींनी वा सारसूचीची पूर्तता करण्यासाठी अवश्य ते संयोजन केलेले आहे. असे हे काम
करण्यांत सहभागी होण्याची संधी आलोचना प्रस्थानला मिळाली, याबद्दल संबंधित सर्वांचेच मनःपूर्वक आभार.