( Election नावाच्या रशियन
विज्ञानकथेवर आधारित विज्ञानकथा - - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली)
‘बाबा, उठा की.
आठ वाजले.’
छोटी लता बाबांना हलवून उठवीत होती. ‘बाबा, उठा की. बाहेर पोलीस दिसताहेत. पोलिसांची गाडीही आहे’
जगन्नाथ्ने शेवटी ‘हं’ म्हटले आणि डोळे चोळत मान
उचलून पाहिले? ‘बघा ना
बाबा. आपल्या गावातलाच कोणीतरी निवडला गेला असणार.’
लताच्या
उत्साही चेहर्याकडे पाहताना जगन्ना्थच्या लक्षात आले. अरे. आज राष्ट्राध्यक्ष निवडणूक
होणार आहे. तो झटकन् उठला खिडकीतून बाहेर पाहिले. खरेच रस्त्यावर बरेच पोलीस
हिंडताना दिसत होते. एक दोन पोलीस व्हॅनही कोपर्यावर उभ्या होत्या.
‘मी
म्हटले नव्हते का? यावर्षी
तरी आपल्या गावाला संधी मिळणार.’
सरला स्वयंपाकघरातून डोकावून म्हणाली. ‘ असं वाटतंय खरं ! पण सरला, पूर्वीच्या निवडणुकीतली
गंमत या लॉटरीत काही येत नाही.’
‘अहो, पण निवडणुकीत जो राजकारण
आणि भ्रष्टाचार यांचा सावळागोंधळ चालायचा. तो तरी संपला की नाही. शिवाय सामान्य
नागरिक राष्ट्राध्यक्ष होण्याची घटना अशा लॉटरी निवडीनेच शक्य झाली आहे हे खरे ना?’
‘ ते खरे ग
! पण गणकयंत्राने राष्ट्राध्यक्ष ठरवला जात असताना सार्या लोकांच्या मनावर किती
टेन्शन येते याचा विचार केलास का तू?’
‘ ते बाई
खरं हं. कालपर्यंत तरी राजस्थानातील वा केरळमधील राष्ट्राध्यक्ष होणार असे
टीव्ही्वर अंदाज केले जात होते. पण आज पहाटेपासूनच गावात पोलीस फिरताना पाहून, मला तर बाई, आपल्याच गावातला
राष्ट्राध्यक्ष असणार असे वाटू लागले आहे.’
‘ जाऊ दे.
आपल्याला काय करायचंय? निवडणूक
म्हणून सुट्टी नाही. ऑफिसात जायलाच हवे. संध्याकाळी कळेलच टीव्हीवर. एक फर्मास चहा
ठेव. मी आलोच आवरून.’ जगन्नथ
लगबगीने बाथरूममध्ये शिरला. तासभर झाला असेल नसेल तो दारावरची बेल वाजली. आत्ता या
गडबडीच्या वेळी कोण उपटले असे पुटपुटत जगन्नाथने दार उघडले. बाहेर दोन पोलीस
इन्स्पेक्टर उभे पाहून तो दचकला. ‘
कोण पाहिजे?’ त्याने
विचारले.
‘ जगन्नाथ
जोशी आपणच का?’ ‘ होय. पण
कां?’ ‘ वय ३२, पोष्टात असिस्टंट क्लार्क , पत्नी- सरला वय २८, एक मुलगी - लता वय ६, बरोबर?" हातात्ल्या कागदावर खुणा
करीत इन्स्पेक्टरनी सर्व माहिती तपासून पाहिली. क्षणात त्यांचे चेहरे बदलले.
निर्विकार, गंभीर
चेहर्यांची जागा आता आनंदी, नम्र व
आतिथ्यशील चेहर्यांनी घेतली. दोघे खाली मान करून अदबीने म्हणाले ‘ महोदय, नव्या वर्षाचे
राष्ट्राध्यक्ष म्हणून आपणास अभिवादन.’
जगन्नाथ भांबावला. ‘
सरला, अग मी
राष्ट्राध्यक्ष झालो असे ओरडून त्याने शर्ट अंगात चढवला. पिठाच्या हातानी सरला
तशीच धावत बाहेर आली. लता ‘ बाबा, तुम्ही निवडून आला ’ असे म्हणून त्याला बिलगली.
सरलाला
काय करावे सुचेना.. पोलीस इन्स्पेक्टर अदबीने पुढे आले व म्हणाले. ‘ महोदय, आपणास लगेच राष्ट्रपती
भवनात शपथविधीसाठी जायचे आहे.. गाडी व विमान तयार आहे.’
‘ माझे
ऑफिस? जगन्नथ म्हणाला पण मध्येच
थांबला. राष्ट्राध्यक्षाला कसले आले ऑफिस.
‘ बाबा, मला मॉंटेसरीत कोण पोचविणार? मी तुमच्याबरोबर येणार.
लताने बाबांना धरून ठेवले. सरला पुढे आली तिने लताला मागे ओढले. जगन्नाथच्या
डोळ्यात पाणी आले. आनंद व दुःख . दोहोंचे मिश्रण होते त्यात. भरल्या डोळ्यांनी
दोघींकडे पाहून जगन्नाथ निघाला.
आता
त्याच्या दोन्ही बाजूस सशस्त्र शरीररक्षक होते. तो रस्त्यात आला तो सैनिकांच्या
गराड्यातच. बुलेटप्रुफ गाडीत बसल्याबरोबर गाडी भरधाव वेगाने निघाली.
विमानतळावर
स्वतंत्र कक्षात सेवकांनी जगन्नाथचा सारा पेहराव बद्लून त्याला मान्यवर नेत्याचे रूप
दिले. खास शाही विमान तयार होते. महाराष्ट्राचे राज्यपाल व सर्व प्रमुख व्यक्तींनी
जगन्नाथचे अभिनंदन केले.
विमान
सुटले आणि विमानात जगन्नाथच्या शेजारी बसून तीनही लष्करप्रमुख हलक्या आवाजात
देशाच्या संरक्षणव्यवस्थेविषयी जगन्नाथला माहिती देऊ लागले.
जगन्नाथला त्यातले काहीही उमगले नाही. विमानातून उतरल्यावर तर
जगन्नाथ थक्कच झाला. राजधानीतील हजारो लोक त्याचे अभिनंदन करण्यासाठी हातात पुष्पगुच्छ घेऊन उभे होते.
गतवर्षीच्या
राष्ट्राध्यक्षांनी जगन्नाथचे स्वागत केले. २१ तोफांची मानवंदना लष्कराकडुन त्याला
देण्यात अली. नंतर खास उभारलेल्या शामियानात नूतन राष्ट्राध्यक्षांची ऎतिहासिक
पत्रकार परिषद सुरू झाली. ....
जगन्नाथच्या चेहर्यावर
सारख्रे फ्लॅशचे झोत पडत होते. तो बसला होता त्याच्या समोर २०/२५ मायक्रोफोन गर्दी
करून लागले होते. दुरून टीव्ही कॅमेर्यासाठी टाकलेला प्रकाशझोत पुढे मागे रेंगाळत
होता.. जगन्नाथला घाम फुटला.
मुख्य
निवडणूक अधिकारी प्रख्यात तंत्रवैज्ञानिक डॉ. शहाणे यांच्या निवेदनाने पत्रकार
परिषद सुरू झाली.‘ भारतातील
तंत्रविज्ञानातील क्रांतीने खरी लोकशाही प्रस्थापित करून एका नव्या युगाची सुरुवात
केली आहे.
पूर्वीच्या पक्षीय,
भावनाप्रधान, खर्चिक व
सदोष मतदान पद्धत रद्द करून खर्या अर्थाने वस्तुनिष्ट व पूर्वगृहविरहित अशी
गणकयंत्राच्या पद्धतीने सर्व जनतेतून एक राष्ट्राध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पार
पाडून कोणत्याही
व्यक्तीस राष्ट्राध्यक्ष
होण्याची पद्धत आपण विकसित केली आहे हे भारतास निश्चितच भूषणास्पद व आपल्या
गौरवशाली परंपरेस साजेसे आहे.
आजच्या
निवडणुकीबाबत गेले कित्येक दिवस वृत्तपत्रे व इतर प्रसारमाध्यमे अंदाज व्यक्त करीत
असताना त्या सर्व अंदाजांचा फोलपणा या निवडणुकीने सिद्ध केला आहे.
राष्ट्रीय
व आंतरराष्ट्रीय अशा गुंतागुंतीच्या प्रश्नांवर नूतन राष्ट्राध्यक्ष आता खर्या
अर्थाने भारतातील सामान्य नागरिकाची प्रतिक्रिया व्यक्त करतील. सन्माननीय
राष्ट्राध्यक्ष माननीय जगन्नाथ आता पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देतील
जगन्नाथच्या चेहर्यावरील प्रकाश झोत वाढले.
समोरच्या
रांगातील एका भारदस्त पत्रकाराने प्रश्न विचारला ‘ युरोपमध्ये मध्यमप्रतीची अण्वस्त्रे ठेवण्याच्या
अमेरिकेच्या निर्णयावर आपले काय मत आहे?"
जगन्नाथला प्रश्नातले ‘ओ की ठो’ कळले
नाही. त्याने नुसती मान हलवली. डॉ. शहाणे म्हणाले ‘माननीय राष्ट्राध्यक्षांनी या संवेदनशील प्रश्नावर
मतप्रदर्शन करण्यास नकार दिला आहे.’
‘भारताने
अंतराळ संशोधनात आपले काय उद्दीष्ट ठेवले आहे?’ एका विदेशी पत्रकाराने विचारले.
शनी व मंगळाची धास्ती घेतलेल्या जगन्नाथ्ने सांगितले. ‘शनी व मंगळ जिंकणे’.
‘ भारत
अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी आपण कोणते उपाय योजणार आहात?’
शेजार्याने वर्षाचे धान्य घेतल्याने तो सध्या आरामात आहे हे आठवून
जगन्नाथ म्हणाला ‘ वर्षभर
पुरेल एवढे धान्य साठविण्याची व्यवस्था करू.’
टाळ्यांचा कडकडाट झाला.
त्या आवाजाने जगन्नाथने डोळे उघडले. लता कानाशी टाळ्या वाजवून त्याला
उठवीत होती. ‘ बाबा उठा
की.’
( Election नावाच्या
रशियन विज्ञानकथेवर आधारित विज्ञानकथा - डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली)