Wednesday, April 10, 2019

माझी रेडिओवरील मुलाखत २७ जुलै २०१२ (भाग-१)

ग्रीन एफ एम ९०.४ या सांगलीतील कम्युनिटी रेडिओ चॅनेलवर दिनांक २७ जुलै २०१२ रोजी माझी एक मुलाखत ( भाग-१) प्रसिद्ध झाली होती. त्या मुलाखतीचा वृत्तांत आहे त्याच बोली भाषेत सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.एक जुनी आठवण आणि  आमच्या ज्ञानदीपची प्रगती यांचे दर्शन त्यात होईल अशी आशा आहे. 



मुलाखतकार सौ. मेधा सोवनी- नमस्कार मंडळी,  आज शुक्रवार आहे. आमि आज आपला सेकंड इनिंगचा दिवस, त्यामुळे मी मेधा आज तुम्हाला भेटायला पुन्हा एकदा आलेली आहे. मंडळी, मागच्या शुक्रवारी आपण सौ. शुभांगीताई रानडे यांची मुलाखत ऐकलेली होती. आणि त्यांच्या कविता ज्या आहेत त्या गेय असतात.  त्या इंटरनेटवर टाकण्यासाठी त्यांना सरांची खूप मदत होते आसं त्यानी सांगितलं होतं आणि आपण म्हटलं होतं की आपण पुढच्या आठवड्यात सरांना नक्की भेटू. त्याप्रमाणं आज आम्ही सरांना इथं बोलावलेलं आहे. आपण सरांविषयी थोडंसं बघूया. त्यांचं नाव डॉ. श्री. सुरेश विष्णु रानडे. १९६६ साली बीई झालं ते आणि १९७६ मध्ये आय.आय.टी. कानपूर येथून पर्यावरण शास्त्रामध्ये त्यांनी पीएचडी केली आहे तर असं हे विद्वान व्यक्तिमत्व त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार सर,

डॉ. रानडे - नमस्कार

सौ. मेधा सोवनी - या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. आणि मागच्या कार्यक्रमात मॅडमनी सांगितलं होतं की सरांची त्यांना किती मदत होत असते आणि सहचारी म्हणून देखील त्यंना तुमच्याबद्दल वाटणारा अभिमान त्यांच्या शब्दांमधून मला जाणवत होता. म्हणजे आज तुमची भेट घ्यायची आमि तुमच्याकडूनच तुमच्या कामाबद्दल सगळी माहिती घ्यायची. तर तुम्ही पहिल्यांदा सांगलीमध्ये ज्ञानदीप इन्फोटेक अशी संस्था चालू केलेली होती. तर मला काय म्हणायचंय आपल्या सांगलीकरांना ब-याचजणांना ही गोष्ट माहिती आहे पण आपल्या ग्रीनएफएमचे लिसनर्स आहेत त्यापैकी ब-याच जणांना या कामाबद्दल तुमच्या खूप इंटरेस्ट असेल तर त्यांना हे सगळं कळावं यादृष्टीन आतापर्यंत तुम्ही कायकाय केलंत आमि यापुढे काय करायच. या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत तर पहिल्यांदा मला असं सांगा की तुम्ही ज्ञानगीप इन्फोटेकबद्दल सुरवात कशी केलीत व काय झालं त्याचं आणि सध्या तुमचे काय काम चालू आहे.

डॉ. रानडे -  सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो कारण मला आणि माझ्या पत्नीला ग्रीन FM वर बोलायची संधी दिली. यामध्ये विशेष म्हणजे ग्रीन हे नाव तुम्ही जे निवडलेलं आहे हे काळाला अतिशय योग्य असं नाव आहे. कारण पुढचं भविष्य हे सगळं ग्रीन आहे. मी बऱ्याच वेळेला ग्रीन बिल्डींगवरती महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी लेक्चर्स दिलेली होती. माझा पर्यावरण विषय असल्यामुळे मला पर्यावरण शास्त्रामध्ये अतिशय आवड आहे आणि माझा जो दुसरा आवडीचा छंद म्हणजे इंटरनेट आणि कॉम्प्युटर आहे. या विषयी आज मी बोलणार आहे.

मी १९६६ साली B.E झालो आणि लगेच वालचंद कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून लागलो. याच कॉलेजमधून १९७० साली पर्यावरण शास्त्रामध्ये M.E.  केले आणि १९७३ ते १९७६ मला क्वालिटी इंम्प्रुव्हमेंट प्रोग्रॅम खाली आयआयटी कानपूरमध्ये पीएचडी करण्याची संधी मिळाली. आता जे पर्यावरण विज्ञान मुख्य तज्ञ आहेत डॉ. जी.डी.अग्रवाल त्यांच्या हाताखाली मी पीएचडी केली आणि जलशुध्दीकरणामध्ये मी काम केलं. त्यानंतर इथ आल्यावर आमचे डॉ.व्ही.सुबाराव म्हणून पर्यावरण शास्त्रामध्ये आहेत त्यांच्याबरोबर आम्ही ३०-४० वर्षे साखर उद्योग, टेक्स्टाईल उद्योग, शहर, सांडपाणी, पाणीपुरवठा यावरती असंख्य कन्सल्टेशनची कामं केली आणि हे काम ३०-४० वर्षे चालू होतं, अजूनही चालूचं आहे

पण त्याच बरोबर काय झालं की १९८० च्या सुमाराला जसं कॉम्प्युटरच युग आलं त्याबरोबर आमच्या कॉलेजमध्ये सुध्दा हालचाल सुरु झाली की आपण मोठा कॉम्प्युटर घ्यायला पाहिजे. मग त्यांनी असं ठरवल की बंगलोर मधील ऑम्नी म्हणुन कॉम्प्युटर घ्यायचा आणि त्यावेळी शिकणार कोण? कारण कॉम्प्युटर कुणालाच माहित नव्हता. यासाठी त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंटचा एक प्रोपेसर असे पाच प्रोपेसर निवडले आणि आम्ही बंगलोरला सव्वा महिना ट्रेनिंकसाठी गेलो. आणि तो जो कॉम्प्युटर होता तो कपाट किंवा फ्रीजच्या डबल आकाराचा कॉम्प्युटर आम्ही आणला. त्यामध्ये बेसीक आणि कोबोल्ट या दोन लंगवेज होत्या. आणि त्यानंतर मला जे कॉम्प्युटरच वेड लागल त्यावेळेपासून मी कॉम्प्युटर बद्दलच वाचायला लागलो आणि मला पर्यावरण नको वाटल. कारण कस आहे की कॉम्प्युटरमध्ये दोन अधिक दोन चारच असतं. पर्यावरणात तस होत नाही त्यामध्ये अनेक राजकिय, सामाजिक हितसंबंध गुंतलेले असतात काम होत नाहीत. सल्ला दिला तरी ते झालेलं नसतं मग आपल्या मनाला उगीच त्रास होतो. मग याच्यापेक्षा हे कॉम्प्युटर क्षेत्र चांगल आहे असं मला वाटलं.

त्याच काळामध्ये कॉम्प्युटरच युग सुरु झालं सगळं जग त्यामुळे भारावून गेलं आणि वायटूके प्रॉब्लेम तुम्हाला माहिती असेल. त्यावेळी आपल्यातील हजारो मुले अमेरीकेला शिकायला गेलेली कारण तिथल्या ज्या कंपनी होत्या त्यांच्यापुढे मोठा प्रॉब्लेम आला होता वायटूके कारण पूर्वी जी कमी मेमरी लागायची त्यासाठी Year च फक्त Y Y एवढच वापरायच आणि त्यामुळे काय झालं २००० साली एकदम ० ० अस आल म्हणजे सगळं ती फेल होण्याची शक्यता आहे त्यांना कळलं मग त्यांनी भारतातील तज्ञ बोलावून घेतले होते. आणि तिथ एकदम कॉम्प्युटरच्या अनेक कंपन्या उभ्या राहिल्या म्हणजे २००० नंतर कॉम्प्युटरचा आपण बिग बबल झाला म्हणतो हजारो कंपन्या निर्माण झाल्या आणि नंतर त्या सगळ्या कोसळल्या ५-१० वर्षामध्ये. आणि त्याचवेळी मी माझी ज्ञानदीप इन्फोटेक ही कंपनी सुरु केली. अगोदर मी माझ्या मिसेसलाही कॉम्प्युटर शिकवलं. कारण ती संस्कृत या विषयामध्ये असल्यामुळे बेसीक कॉम्प्युटर सर्व शिकवल. आम्ही कॉलेजमध्ये ही कॉम्प्युटर शिकवत होतो. डिप्लोमा कोर्सेसना आणि मी सिव्हीलचा जरी असलो तरी तिथ जावून शिकवायचो. याठिकाणचे बरेच प्रोफेसर, डॉक्टर वगैरे माझ्याकडे शिकले.

विश्रामबागला सुयश कॉम्प्युटर म्हणून आम्ही सुरु केलं. हे सेंटर मिसेस चालवायची ते आम्ही १०-१२ वर्षे चालवली पण नंतर असा विचार केला की आपल्याला जागतीक मार्केटमध्ये जायच असेल तर काहीतरी मजबूत अशी कंपनी व्हायला पाहिजे म्ह्णून ज्ञानदीप इन्फोटेक प्रा.लि कंपनी मी २००० साली स्थापन केली. यामध्ये पहिला उद्देश असा होता की लोकांना इंटरनेट कळावं यासाठी नेट कॅफे सुरु केला आणि नेट कॅफे सुरु केल्यानंतर असं लक्षात आलं की आपण हॉटेलच्या मॅनेंजरसारख बसायच नुसत तास झाला की पैसे घ्यायचे. ती मुले काय बघतायत आपल्याला माहिती नाही. मग म्हंटल की आपण ते मुलांना शिकवूया. त्यानंतर मी अमेरीकेला मुलीकडे २-३ वेळेला गेलो आणि मग माझ्या लक्षात आलं की तिकडचे लोक कॉम्प्युटरचा जास्तीत जास्त उपयोग करमणूक व जाहिरात यासाठी करतात. त्यामुळे त्याठिकाणच्या मुलांवरती गेम्सचा खूप वाईट परिणाम होतो आहे. म्हणून त्या ठिकाणच्या सबंध लोकांच शिक्षण मागं पडलेल आहे. तर मनोरंजन हा इंडस्ट्री धरुन कॉम्प्युटरचा पहिला विकास झाला. आज सुध्दा व्हिडीओ गेम्सना प्रचंड डिमांड आहे. यासाठी २००७ साली मी पहिला ब्लॉग लिहिला टॉय मॅनिया म्हणुन की ज्यांनी ग्रासलेल आहे अमेरीकेला आणि उद्या ते जगाला ग्रासणार आहे.

 यावेळी मला अस वाटल की या मनोरंजनाच्या क्षेत्रापासून आपण कॉम्प्युटर दूर ठेवून शिक्षण क्षेत्राकडे घेवून जावे. कारण शिक्षणामध्ये याला प्रचंड महत्त्व आहे. आता आपली जी मोठी लोकसंख्या आहे ही जर आपल्या Asset बनवायची असेल तर या लोकसंख्येची बुध्दीमान लोकसंख्या आहे आणि त्यांना जर का हे कॉम्प्युटरच तंत्रज्ञान मिळालं तर ती सगळ्या जगावर राज्य करु शकतील. खरचं आपण नेतृत्व करु शकू कारण त्या ठिकाणची लोक तशी भाबडी आहेत. त्यांना शिक्षणाचं एवढ वेड नाही. आज त्या ठिकाणी जी प्रगती होत आहे ते आपले भारतीय लोक तिथ जाऊन करत आहेत. त्यांच्या मोठ्या कंपन्या आज आपण चालवतोय. आज तुम्हाला सांगताना वाईट वाटत की इन्फोसिस कंपन्या वगैरे आपण कौतुकाने बोलतो पण या कंपन्या फक्त माणसं पुरवण्यासाठी असतात. म्हणजेच B.E झालेली माणसं इथून घेतात आणि ती अमेरीकेला पाठवतात. त्या ज्या आंतराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या इथून सगळा फायदा घेऊन जातात. पुर्वी जे ब्रिटीश अधिकारी होते ते इथून कापूस घेऊन जायचे आणि तिथून कापड तयार करुन आणावयाचे. तोच प्रकार आता इथे चालू आहे की, ते या ठिकाण ब्रेन वापरतात त्यांना पुष्कळ वेळेला कोड मंकीज म्हणतात. परंतु ते जे काय करताहेत यांनी जगावर राज्य करण्याच तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलेल आहे आणि अमेरिका सारख्या प्रगत राष्ट्रांच्या ताब्यात दिलेल आहे.

 मग याच्यातून जर सुटका व्हायची असेल तर आपल्या मुलांना लहानपणापासून कॉम्प्युटरची ओळख व्हायला पाहिजे. म्हणजे कॉम्प्युटरची वेड न लागता त्याचा शिक्षणासाठी आपल्याला कसा उपयोग करता येईल हे बघायला पाहिजे. दुर्दैवानं कसं केलं आमची एवढी शक्ती नव्हती त्यामुळे या कंपन्या आल्या त्यांनी व्हीडीओ गेम्स केले आणि आत्ता मुलं फेसबुक आणि आरकुट वर बसलेली दिसतात. आणि २० वर्षाच्या मुलाला १०,००,००० पगार दिला की लोकांना वाटत की याच्यात पाहिजे तेवढा पैसा मिळतो. हे सर्व जाहिरातीचे टेक्निकच आहे. इथही तसच झालेल आहे त्यामुळे ज्ञानदीप इन्फोटेक आम्ही सुरु केली त्यामध्ये पहिल्यांदा मराठीतून वेबसाईट्स करायला सुरुवात केली.

मातृभाषेतून शिक्षण हे महत्वाच आहे. मी मराठी विज्ञान परिषदेचाही कार्यकर्ता आहे आणि हे जे शिक्षण आहे किंवा कोणतही शिक्षण हे मातृभाषेतूनच चांगल होतं. त्यामुळे कॉम्प्युटरवर मराठी आणण्याचा उद्योग आम्ही सुरु केला. त्यावेळी बेसीक होतं त्यावेळी  डॉट डॉट कारुन आम्ही अक्षरं काढली. संस्कृतकरीता आम्ही श्रीलिपीचा फॉंट वापरला. एक होतं की सॉर्टिंग करता येत नव्हत अल्फा बेटीकल प्रमाण कारण त्याला आम्ही कोड केल की, ‘अ’ म्हणजे काय ‘क’ म्हणजे काय कारण ते आपल्या पद्धतीन पाहिजे ना. काय त्यांच A,B,C,D आपल्याला नको आहे आपल्याला क ख ग घ पाहिजे. अस आम्ही ३-४ वर्षे संस्कृतमध्ये काम केल तीनही भरपूर साथ दिली आणि आम्ही ती साईट पूर्ण केली. त्याचबरोबर मराठीतून आम्ही माय मराठी. कॉम म्हणुन मराठीतून साईट केली अन् सबंध जगातल्या महाराष्ट्र मंडळाची माहिती त्यामध्ये दिली. संस्कृती, साहित्य अशी सर्व माहिती तुम्हाला माय मराठीवरती बघायला मिळेल. कोट्यावधी लोक ही साईट अजून बघताहेत. खाण्याच्या पदार्थापासून सर्व गोष्टी यामध्ये आहेत. तसच शहरासाठी म्हणून माय सांगली. कॉम ही साईट काढली. नंतर माय कोल्हापूर काढली.

आणि मग मला अस वाटल की भरभर सगळीकडे सेंटर सुरु होतील पण माझ्या असं लक्षात आलं की ज्या ज्या ठिकाणी मी सेंटर्स सुरु केली म्हणजे मुंबई, बेंगलोर त्याठिकाणच्या ज्या लोकच कॉम्प्युटर नौकी होती. ते म्हणजे उद्योजक होती मोठी होती पण त्यांना कॉम्प्युटरच ज्ञान नव्हतं त्यामुळे त्या संस्था पुढे चालल्या नाहीत. मग मी ठरवलं की इथ आपण स्थिर होऊ आणि इथून रिमोटली सर्व फिरवू. मग २००५ साली मी ज्ञानदीप एज्युकेशन आणि रिसर्च फौंडेशनची स्थापना केली. खर म्हणजे इन्फोटेकबद्दलची माझी हीच संल्पना होती की, सामाजिक शिक्षण किंवा पर्यावरणाबद्दलची जागृती करायची फक्त काय आहे प्रायवेट लिमीटेड कंपनी म्हंटल्यावर लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन फायदे मिळवणारी संस्था असा होतो. त्यामुळे २००५ ला मी फौंडेशनची स्थापना केली. फौंडेशनचा मुळ उद्देश हाच आहे की सर्व लोकांना व जनसामान्यांना वेबसाईट आणि इंटरनेटबद्दलची माहिती देणे आणि ही माहिती मराठीतून देणे. यामधून शिक्षण देऊन त्यांना कॉम्प्युटरच्या धोके आणि फायद्याची जाणीव करुन देणे. इंटरनेटवर फसवणुक वगैरे असे बरेच प्रकार घडतात, गुन्हे होऊ शकतात पण त्याचबरोबर चांगलेही फायदे होऊ शकतात. त्यामुळ कॉम्प्युटर उगीचच्या उगीच बदनाम झाला. इंटरनेट किंवा फेसबुक म्हंटल की बदनाम झाला. याच्या ऐवजी कॉम्प्युटरचा उपयोग शिक्षणासाठी केला तर प्रचंड त्याला पोटेंशीयल आहे. आणखी माझ्या मनामध्ये अशी एक कल्पना आली की, भारतामधील महिला या ५०% पोटेंशीयल अन्- टॅपड् आहे. महिला हुशार असतात पण मुल व इतर संसार बघून त्यांना नोकरीसाठी बाहेर पडता येत नाही. नोकरी करणाऱ्या बऱ्याच महिला आहेत पण काही महिलांचा वेळ कादंबऱ्या, मासिक, वृत्तपत्र वाचण्यात जातो. याच्या ऐवजी त्यांना जर आपण वेब डिझायनिंगच ट्रेनिंग दिलं, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच ट्रेनिंग दिलं तर त्याच्यातून एक मोठी Asset निर्माण होईल.

ती अलिबाबाची गुहा आहे जवळजवळ हे आपल्या लक्षात आलं नाही ही आपल्या हातात आहे फक्त ती आपल्याला उघडून बघायची आहे. त्या दृष्टीन मी ती कल्पना मांडली. आणि शाळेमध्ये ज्ञानदीप मंडळ सुरु करायच असं ठरवलं. शाळेमध्ये शिक्षक जे शिकवतात ते फक्त पुस्तकावरुन शिकवतात. पुस्तकातील ज्ञान हे जुन असतं, मासिकातील त्यातल्या त्यात नवीन असत आणि इंटरनेटवर त्याच्याहीपेक्षा रोज नविन ज्ञान असतं. आज जर दोन मिनीटांपुर्वी काय झाल हे आपल्याला पहायच असेल तर आपण इंटरनेटवरती पाहू शकतो. हे ज्ञान जर तुम्ही लोकांना दिल नाही तर तुमची मुल पुर्वीच्या पठडीतल काहीतरी टेक्निक वापरत बसतील. आणि डिग्री झालेली मुल ही नुसती शिक्का मारलेली मुल होणार. आज आपल्याला मार्केटींगच्या दृष्टीन म्हणा किंवा इतर कोणत्याही दृष्टीन याहु व गुगल यांनी प्रचंड प्रमाणात ज्ञान मुफ्त दिलेलं आहे. तुम्ही सॅटेलाईटद्वारे न्यूज बघू शकता. अमेरिकेच्या रस्त्यावरती काय चाललेल आहे ते तुम्हाला समजू शकतं. ही सर्व माहिती तुम्हाला फ्री मध्ये मिळते. सांगलीचा नकाशा गुगलवरुन पाहिल्यानंतर मला पुर्ण कळतो. आणि त्या नकाशावर मी माझी माहिती भरु शकतो. आणि हे फ्री आहे पण मुलांना हे माहित नाही. मी अनेक ठिकाणी लेक्चरस् दिली, अनेक चांगल्या चांगल्या अमेरिकेच्या, सायन्सच्या व्हिडीओ यु टुब वरती दाखवल्या. मग मी हे व्हिडीओ काढून दाखवल्यानंतर शिक्षक चकित झाले. पण ते म्हणाले, आमच्याकडे नेट नाही मग मी सांगीतल नेटवरुन डाऊनलोड करुन घेतो आणि तुमच्या कॉम्प्युटरवर घालून देतो.

कस आहे हल्ली शिक्षण हे व्यवसायाच साधन झाला आहे. त्यामुळ प्रचंड फी घेवून मोठ्या बिल्डींगा बांधून पैसे उकळायचे असा उद्योग चालू झाला आहे. त्यामुळ या इंग्लीश मिडियम स्कूलसारख्या मोठ्या डिजीटल शाळांकड माझा दृष्टीकोन नाही. तर जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत या शाळांमध्ये कॉम्प्युटर आहेत पण वापरता येत नाही. अशा ठिकाणच्या शिक्षकांना आपण शिकवू शकतो आणि त्यांना ट्रेन कस करता येईल? यासाठी मी सुरु केलं. आता माझ्याकडे फौंडेशनला जी मुल काम करतात ती सर्वजन डेग्री न झालेली आहेत. कोणी बारावी झालेल आहे, कोणी मधूनच शाळा सोडुन आलेल आहे. पण ती अतिशय उत्तम प्रोग्रॅमींग व वेब डिझाइन केलेल्या आहेत व करताहेत. काही दिवसापुर्वी लुल्ला चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेची प्रचंड मोठी अशी साईट आमच्यातील दोनच मुलांनी केली. आणि ती मुल ग्रॅज्युटपण नाहीत. पण मी त्यांना शिकवू शकतो त्यांच्यामध्ये आता एक प्रकारची ताकत आलेली आहे. ती अशी तयार आहेत की कुटेही गेली तर वेब डिझाईन करु शकतील व १०००० रु मिळवू शकतील. मी त्यांना नेहमी सांगतो की तु बाहेर जा स्वत:चा बिझनेस सुरु कर.

मी नंतर काय केल की २००७ पासून मी ब्लॉग लिहायला लागलो आता माझे जवळजवळ ३०० ब्लॉग लिहून झालेले आहेत. सगळ्या विषयावर लिहतो मी दारुच्या व्यसनापासून ते राजकारणापर्य्ंत. यामध्ये मला अस वाटल की लोकांना वेबडिझाईन विषय किंवा कॉम्प्युटर विषय अवघड वाटतो. मराठीतून जवळजवळ ६० ते ७० ब्लॉग लिहले. त्यामध्ये वेबसाईट कशी करायची, डिझाईन कशी करायची हे सर्व लिहले. तरीही लोक वाचत नाहीत, फुकट असूनसुध्दा वाचत नाहीत. म्हणुन मी अस ठरवल की पैसे घेऊन ऑनलाईन कोर्स सुरु करायचा. नंतर मी काय केल की संस्कृत, माय मराठी या साईटबरोबर विज्ञान. नेट ही साईट सुरु केली. कारण विज्ञानच ६०० पानांच इंग्रजी पुस्तक मी मराठीतून भाषांतर केलं. आणि आता मग अस झाल की संस्कृत, माय मराठी, विज्ञान बरोबर स्कूल4ऑल.ओआरजी ही साईट सुरु केली. यामध्ये शालेय स्तरावरचे मराठी, गणित, इंग्रजी, चित्रकला, संस्कृत, संगीत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र असे सर्व विषय घेतले एवढच नव्हे तर कन्नड सुद्धा घेतलेलं आहे. कारण मिरजच्या जवळ कर्नाटक भाग येतो. आपण भांडत बसतो कन्नड आणि मराठी पण त्या मुलांना कन्नड शिकायला मिळेल. मला कन्नड भाषा येत नाही तरीही कन्नडच पुस्तक मी आणून त्याच्यातील पेजस स्कॅन करुन साईटवरती घातली. मी म्हंटल की ज्याला कन्नड शिकायच असेल तो ही पुस्तके वाचून शिकेल. आणि म्हणूनच माझा विचार असा आहे की याच्या पुढच्या काळामध्ये हे सर्व रिमोटली घरी बसून शिक्षण देणार आहे.

कारण माझ वय आत्ता ७० व मिसेसचे ६५ आहे तर पुढच्या काळात आम्हाला बाहेर फिरता येणार नाही. आणि शक्यतो मराठी मधून देणार आहे. कारण गुगल टॉक सारख्या सुविधा असल्यामुळे मी कोणाशीही घरी बसून बोलू शकतो. आज पुण्यातली लोक अमेरीकेतल्या लोकांच्या शिकवण्या घेताहेत. तिकड इंग्रजी शिकवायला पुण्यातील लोक प्रचंड पैसा मिळवत आहेत. आणि आमच्या इन्फोटेक मध्ये फ्लॅश, फ्लेक्स मध्ये भरपूर काम सुरु आहेत व डेव्हलपमेंटही सुरु आहे. आता डॉ. किल्लेदारांच्यासाठी नविन अपॉंटमेंटच सॉफ्टवेअर तयार केलेल आहे कारण कस होत की लोक खूप लांबून येतात आणि त्यांना अपॉंटमेंट तर प्रॉब्लेम येतो. या सॉफ्टवेअर मध्ये १०० रु भरुन तुम्ही डॉक्टरांच टाईम बुक करु शकता. आणि या सॉफ्टवेअर आपल्याला डॉक्टर कधी भेटणार आहेत ते लगेच समजते व त्यांना पुढच्या महिन्यापर्यंतच्या अपॉंटमेंटच ठेवता येतात. आणि हे अपॉंटमेंट सिस्टीम आता आम्ही सर्व हॉस्पीटल्स मध्ये देणार आहे. आज कॉमप्युटरच्या किंमतीही कमी झालेल्या आहेत व ब्रॉडबॅंडच्याही किंमती कमी झालेल्या आहेत महिलांना शिकून त्या तासाला १० डॉलर मिळवू शकतात. आमच्याकडे मुल मिळवत आहेत. आज ४०,६० हजार पगार मी स्वत: मुलांना देतोय. ६० हजार पगारावर समाधान न मानता ते मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये जाऊन १,५०,००० रु पगार घेत आहेत.

एकदा प्रा. माधूरी बापट अमेरिकेतून आलेल्या होत्या त्यांना कोणी विचारलं की तुमची भारतीय मुलं इतकी हुशार कशी आहेत तेव्हा त्या म्हणाल्या, मुले  संस्कृत भाषा शिकतात. तेथल्या स्त्रिया रांगोळी काढतात. त्यामध्ये पेशंस असतो आणि पेशंस व लॉजिक असल्यावर ही मुल नक्की बाहेर जातात. परदेशामध्ये गेली तरी ही मुलं मजा करत नाहीत तर रविवारी सुध्दा अभ्यास करतात. आणि तिकडली मुलं रविवारची हिंडायला जातात.
--- to be continued

No comments:

Post a Comment